दीर्घकथा लेखन स्पर्धा
DINK भाग 12
"पिहू, तु वरून जरी कठोर दिसतेस. स्पष्टवक्ता वाटतेस. सरळसोट बोलतेस. तुझ्या आत एक लहान मुल आहे ज्याला प्रेमाची गरज आहे. आपलं असं एक जग तयार कर, स्वतःला एक संधी दे. आधीच हात नको टेकवू." शशी तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला समजावून सांगू लागला, "तु, तु खूप छान आहेस पिहू."
"मग लग्न करून घे तिच्याशी." त्यांच्या बाजूलाच उभी असलेली रिद्धी संतापली. तिचे शब्द कानावर पडताच पिहू, शशी दोघेही उठून उभे झाले.
"रिद्धी काय बोलत आहेस. अगं मी..." पिहूचे वाक्य पूर्ण होण्या आधीच रिद्धी तिच्यावर बरसली,
"अगं मी काय? स्वतः डोळ्याने बघितलं मी कसा प्रेमाने तुझ्याकडे पाहत तुझे अश्रू त्याच्या रुमालाने टिपत असतांना त्याला आणि तुही त्याला झिडकारले नाही."
"रिद्धी तु गैरसमज करून घेतला आहेस. आम्ही तुझ्या बद्दल, आपल्या नात्या बद्दल बोलायलाच इथे आलो होतो. बोलता बोलता ती भावुक झाली..."
"आणि तु संधीचं सोनं करायचं ठरवलं." रिद्धी कोणाचेही काही ऐकायला तयार नव्हती, "अरे मी तर आपल्या नात्याची नव्याने सुरवात करायच्या इराद्याने तुला शोधत इथे आलेली. पण तु माझे डोळे लख्ख उघडलेस. लोकं म्हणतात तेच योग्य, आपल्या मैत्रीणीला नवऱ्याच्या दूरच ठेवायला हवं. एक स्त्री हीच दुसऱ्या स्त्री ची शत्रू असते." रिद्धी तोंडाला येईल ते बडबड करू लागली. एव्हाना त्यांच्या भोवती बघ्यांचीही गर्दी जमली. काहींनी मोबाईल काढून शूटिंगही घेण्याचा प्रयत्न केला. मात्र फेब्रुवारी महिन्यात अचानक पाऊस सुरु झाला आणि मोबाईल आत ठेवल्या गेले.
"रिद्धी पुरे. यावर एकही शब्द तोंडातून काढलास तर मी विसरून जाईल कि तु माझी मैत्रीण आहेस." पिहू रिद्धीवर संतापली.
"तेच चांगलं होईल. मला ही अशी आपल्याच मैत्रिणीच्या संसाराचे वाटोळं करणारी मैत्रीण नको आहे." रिद्धी बोलली तशी पिहूने तिच्या कानाखाली जोरात देण्यासाठी हात उचलला पण ती मध्येच थांबून म्हणाली,
"जशी तुझी इच्छा."
पिहू जी निघाली तिने परत वळून बघितलं नाही. रिद्धी व शशीच्या आयुष्यात कधीच डोकावलं नाही. शशीने माफी मागण्यासाठी एक दोन वेळा तिला फोन केला. मात्र तिने त्याचा मोबाईल नंबर ब्लॉक करून टाकला व कस्तुरीच्या पुणे ऑफिसला मार्केटिंग हेडच्या असिस्टंटची पोस्ट स्वीकारून ती तिकडे निघून गेली. त्या नंतर क्वचितच त्या दोघी एकमेकींसमोर आल्या. दरम्यान शशीने रिद्धीला पिहू व त्याच्यातील मोबाईल वरिल मॅसेज, कॉल सर्व रिकॉर्डिंग दाखवल्या, ऐकवल्या तेव्हा कुठे रिद्धीचा त्याच्या वरील संशय दूर झाला. तिचे शशी सोबत पॅचअप झाले. मात्र ज्या उद्देशाने त्याने सर्व उठाठेव केली तीच झाली नाही.
रिद्धीला आत कुठेतरी पिहू बद्दल, तिच्या स्वतंत्र विचारसरणी बद्दल असुरक्षितता होती. म्हणून तिने पिहूला तिच्या आयुष्या पासून दूरच ठेवायचा निर्णय घेतला. पण दोन अडीच वर्षांनी आता पुन्हा शशीची आई आणि तिची आईही बाळ कधी अशी विचारना करू लागल्या. इतकेच काय त्यांनी 2025 च्या जुलै मध्ये रिद्धीला दिवस जावे, मार्च मध्ये डिलिव्हरी व्हावी असा रट्टा रिद्धी व शशी मागे लावला. त्याने रिद्धीची चिडचिड आणखीच वाढलेली. त्यातच कस्तुरी मीडिया मुंबई हेड ऑफिसचे जनरल मॅनेजर पद मिळवण्याची संधी आणि पिहूला मिळालेली प्रसिद्धी. त्यामुळे आजही ती आईपन स्वीकारायला तयार नव्हती. पण हे पिहू सारखं स्पष्ट ना बोलता येत होतं ना स्वीकारता येत होतं. याचाच तिला सर्वात जास्त राग यायचा.
पिहू पुणे रवाना होण्यासाठी तिचे सामान घेऊन ऑफिस मधून निघाली. ऑफिसची गाडी तिला एअरपोर्टवर सोडायला सज्ज झाली. तेव्हा परत एकदा तिची नजर रिद्धीवर गेली. डोक्याला हात लावून असलेली रिद्धी तिच्या कारचे दार उघडणार तोच भोवळ येऊन खाली बसली. पिहूने तिला उठायला मदत करून गाडीत बसवले व त्यांच्या नेहमीच्या डॉक्टर मैत्रिणीच्या दवाखान्यात घेऊन गेली. डॉक्टरने तिला तपासून तिला तिसरा महिना सुरु असल्याचे सांगितले.
क्रमश :
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
धन्यवाद.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा