Login

DINK भाग 14

स्त्री लाच काय आपण सर्वांनाच आपलं पहिलं युद्ध आपल्या आपटेष्टांसोबतच लढावे लागते
दीर्घकथा लेखन स्पर्धा

DINK भाग 13

दोघांना, कोथरूड भागातील वडिलोपार्जित घराच्या छतावर मोकळ्या हवेत बोलायला पाठवण्यात आले. पिहूच्या लहान भावाला, नचिकेतला त्यांना काही लागले तर देण्यासाठी म्हणून पाठवले. मात्र ही फक्त त्या दोघांवर नजर ठेवण्याची एक योजना आहे याची कल्पना त्या तिघांनाही होती. नचिकेत मोबाईलवर गेम खेळत पायऱ्यात बसला. जुजबी प्रश्न उत्तरांचा राउंड झाल्यावर पिहूने मुद्द्याला हात घातला.

"तुम्हाला लहान मुलं आवडतात?" तिचा प्रश्न.

"ही काही विचारण्याची बाब आहे?" तो हसून उत्तरला, "दादाची दिड वर्षाची मुलगी माझ्या अवती भवतीच असते. आताही मागे लागली होती पण आई बाबा म्हणाले आपल्याला वेळ होईल म्हणून आणले नाही."

"मला तुम्हाला धोक्यात ठेवायचे नाही म्हणून सांगते आहे माझ्याशी लग्न करणाऱ्या व्यक्तीला संतती प्राप्ती पासून वंचित राहावे लागणार." पिहू बोलली.

"म्हणजे? काही प्रॉब्लेम आहे का? जसं पाळी न येणं किंवा आणखी काही. हे पाहा आता मेडिकल सायन्स फार पुढारले आहे. सर्वच गोष्टींवर उपाय आहे. नाही काही तर टेस्ट ट्यूब बेबी करता येईल." ओम म्हणाला.

"तसे नाही ओम." पिहू एक पॉज घेऊन परत बोलू लागली, "माझ्यात अजून तरी काही कमी नाही."

"मग?" तो गंभीर झाला.

"मला कुटुंब संस्थेत अडकून पडायचे नाही. त्यातही आईपणाची जबाबदारी तर मुळीच नको. मला माझे आयुष्य फक्त माझ्यासाठीच जगायचे आहे. बळजबरीने मला कोणतीही जबाबदारी घ्यायची नाही आहे." पिहूने त्याच्या समोर तिचे मन रिते केले.

"कदाचित काही वर्षांनी किंवा लग्न झाल्यावर तुझे मन परिवर्तन होईल." ओम बोलला.

"आणि नाही झाले तर?" पिहूने त्याला समजावून सांगितले, "माझ्या सोबत नात्यात बांधलेल्या व्यक्तीला, त्याच्या कुटुंबातील सदस्यांना, माझ्या घरच्यांना सर्वांना त्रास होणार ना."

", इतक्या समजदारीच्या गोष्टी करतेस मग पाहण्याच्या या कार्यक्रमाला का तयार झालीस? मी इथे आलोच नसतो ना माझ्या आई बाबाच्या मनात आशा निर्माण झाली असती." तो स्वतःच्या रागाला ताब्यात ठेवायचा प्रयत्न करत तिला म्हणाला.

"मी बोलले होते आजोबाला मात्र त्यांनी गांभीर्याने घेतले नाही. म्हणाले येतील आणि पाहून जातील. त्यात काय इतकं? पण मला कोणाला धोक्यात ठेवायचे नाही. म्हणून मी तुम्हाला आधीच माझी विचारसरणी स्पष्ट सांगितली." पिहूने सौम्यपने त्याला सांगितले.

"ठीक आहे मग. पण मीच आई बाबाला तुझा पत्ता काढायला सांगितले होते त्यामुळे मलाही तुला नकार द्यायचे खरे कारण घरी सांगावे लागणार." ओम म्हणाला.

"चालेल, एका अर्थाने तेच बरे होईल. म्हणजे आणखी कोणी माझ्या घरापर्यंत येणार नाही, मला मनात नसताना या पाहण्याच्या कार्यक्रमात हजेरी लावावे लागणार नाही आणि आणखी कोणाचे मन माझ्यामुळे दुखावणार नाही." पिहू खाली मान घालून त्याला म्हणाली.

तो खाली गेला. कोणाशीच जास्त काही न बोलता फक्त घरी जाऊन सांगतो सविस्तर असे म्हणत तो त्याच्या आई, बाबा व मामा सह तिथून निघून गेला. पिहूच्या आजोबाला समजले की नक्कीच पिहू त्याला काहीतरी असे बोलली आहे ज्याने तो दुःखी झाला. नाहीतर घर शोधून, उत्साहात पाहायला येऊन असा नाराज चेहऱ्याने काहीच न बोलता जाने म्हणजे आणखी काय?

त्यांनी नचिकेतला त्यांची काठी मागितली व पिहूला जोरात आवाज दिला. तशी ती धावतच खाली आली.

"काय बोललीस त्या मुलाला तु?" त्यांनी कणखर आवाजात पिहूला विचारले.

"तेच जे मी तुम्हा सर्वांना सांगत आली आहे कि मी मुलं जन्माला घालणारी मशीन बनणार नाही." पिहू त्यांच्या नजरेला नजर देऊन उत्तरली.

"मग काय करायचा विचार आहे तुझा? आम्ही मूर्ख आहोत ज्यांनी मुलं पैदा केली." आजीही तावा तावाने तिला बोलू लागली, "भवाने, मी तुझ्या बापाला जन्म दिला, तुझ्या आईने तुला जन्म दिला म्हणून इथे आहात तुम्ही. आम्हीही तुझ्या सारखा विचार केला असता तर जगबुडी झाली असती कधीच."

"तसे कधीच होणार नाही. प्रत्येक व्यक्तीची विचारसरणी वेगवेगळी असते. मला नाही हे लग्न, संसार यात रस म्हणजे इतरांनाही नसावा असे काहीच नाही." पिहू अजूनही शांत राहायला तयार नाही हे पाहून तिच्या आईने समोर होऊन तिचा हात घट्ट पकडला,

"पिहू पुरे हे मोठ्यांच्या तोंडातोंडी लागणे."

क्रमश :

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"

धन्यवाद.
0

🎭 Series Post

View all