Login

DINK भाग 15

तिची कोमलता, कठोरपणात रूपांतरित होण्याचा प्रवास, कशी स्वीकारेल ती मातृत्व जीला प्रेमाचा स्पर्शच झाला नाही
दीर्घकथा लेखन स्पर्धा

DINK भाग 15

"वा, घरात मुलांकडे लक्ष देणे सोडून नोकरीच्या नावावर गावभर चारायचे. मग ती हातातून गेल्यावर चांगुलपणाचा आव आणायचा." आजीने पिहूच्या आईला टोमणे मारने सुरु केले जे पिहूला सहन झाले नाही.

"आई गावभर चरते? मग दर महिन्याला तिच्या खात्यात पगार तिचे यार पैसे जमा करतात का? आणि तुम्ही ते सहन करून त्या पैशात ऐश करता." पिहूचे वाक्य पूर्ण होत नाही तो तिच्या कानशिलात सनकन थापड पडली. पिहूच्या आईने ती वयात आल्यावर तिला मारने बंद केले होते. मात्र आज तिचा राग अनावर झाला.

"लाज शरम सगळी सोडली तु. आजी आहे तुझी. मोठी आहे तुझ्या पेक्षा." तिचे बाबा तिला बोलू लागले.

"मोठी आहेत तर मोठ्यांसारखे वागायला हवे ना त्यांनी. तुमच्या देखत तुमच्या बायकोला नको ते बोलतात आणि तुम्हीही षंढ बनून गप्प बसता." पिहू संतापली, "बसा पण मला आता सहन होणार नाही."

"नाही ना, मग निघून जा या घरातून. नको राहूस इथे. हे घर आजीच्या नावावर आहे. आमच्या कष्टाने आम्ही उभे केले आहे. ज्यांना इथे राहायचे असेल त्यांना आमचे ऐकूनही घ्यावे लागेल." आजोबा तिच्यावर गरजले, "चार पुस्तकं वाचली काय स्वतःला इंदिरा गांधी समजत आहे. घरातून बाहेर पड, बघ एकट्या मुलीला कसे लांडग्या सारखे तोडतात."

"पिहू, अजूनही काही बिघडले नाही आहे. आजी आजोबाला माफी माग. मोठ्या मनाचे आहेत ते. बाळ आपण थोडं नमते घ्यायला हवे." पिहूची आई तिला समजावण्याचा प्रयत्न करू लागली. मात्र पिहू आता चांगलीच संतापली.

"आई, आणखी किती सहन करणार आहेस तु? नोकरदार असूनही एक पैसा स्वतःच्या मनाने खर्च करण्याची मुभा नाही तुला आणि हे वर सुनावतात आमचं घर. अरे या घराच्या भिंती तुटायला आल्या तेव्हा तुम्ही पुन्हा त्यांची लिपाई पोताई केली, जीर्णोद्धार केला, यांच्या मुलीचा संसार अजूनही तु पोसतेय....." पिहू बोलता बोलता काय बोलतेय याचेही तिला भान नव्हते.

"पिहू पुरे, कळतंय ना तुला खूप ताण आहे माझ्यावर मग आणखी ताण नको देऊ मला. जा निघून जा या घरातून." तिची आई तिच्यावर ओरडली, "जा निघ, मेलीस तु आज आमच्यासाठी."

"ताई, हे घे तुझे सामान. खरंच जा तु या घरातून." नचिकेतने पिहूचे कागदपत्र व कपडे एका बॅग मध्ये भरून तिच्या हातात ती बॅग दिली, "आणि हो मरणाला टेकलीस तरीही परत पलटून येऊ नकोस."

त्याच्या तोंडून निघणारे शब्द त्याच्या डोळ्यात तरंगणाऱ्या आसवांशी मेळ घालत नव्हते. पिहू त्याच्या गालावर हात फिरवून हसतच त्या घराबाहेर पडली. जिथे तान्ही मुलगी किंवा म्हातारी बाई सुरक्षित नाही अशा जगात एकट्या तरुणीने वावरणे खरंच कठीण होते. मात्र आपल्या अवयवांचे गुलाम न बनता तिने त्यांना वळण लावले. मैत्रिणी कडून पैसे उधार घेऊन मुलींच्या हॉस्टेलवर राहायला गेली. दहा रंगाच्या दहा मुली. ही गप गुमान राहून आपण अस्तित्वातच नाही अशी तिथे वावरू लागली. एका कन्स्ट्रक्शन कंपनीत मार्केटिंग असिस्टंट पदावर रुजु झाली; पहिला पगार होताच आधी मैत्रिणीची उधारी फेडली. इतर तरुणीसारखे रंगीबेरंगी कपडे लत्ते, दहा प्रकारच्या चपला, वेगवेगळे मेकप साहित्य, हॉटेलिंग यावर पैसा खर्च न करता तो साठवू लागली, दर महिन्याला थोडे थोडे पैसे मागे टाकू लागली. एक वर्षात एक चांगली रक्कम जमा झाल्यावर वीस हजारचा एकदम बेसिक लॅपटॉप विकत घेऊन त्यावर नवीन मार्केटिंग सॉफ्टवेअरचा सराव ती करू लागली. सेल्स आणि मार्केटिंग क्षेत्रात जे काही नवीन येईल ते ती आत्मसात करू लागली. दरम्यान काही मुलांनीही तिच्या आयुष्यात यायचा प्रयत्न केला. पण हिने कोणालाच भाव दिला नाही. हिचे उद्दिष्ट पक्के होते. फक्त स्वतःच्या मर्जीने, स्वतःला हवे तेव्हा उठायचे, स्वतःला वाटेल तेव्हा चालायचे नाही तर पडून राहायचे बिछान्यात इतकी मोकळीक तिला तिच्या आयुष्यात कायम ठेवायची होती. त्यामुळे तिला कधी कोणी मुलगा हवा हवासा वाटलाच नाही. हा कधी कधी एकटं वाटायचं. मग रडायची, स्वतःलाच आरशात पाहून हसायची, आणि मनसोक्त रडून पडून पुन्हा उठून उभी व्हायची.

कस्तुरीमध्ये रुजू झाली अन स्थिरता लाभली तिच्या धावत्या आयुष्याला.

क्रमश :

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"

धन्यवाद.
0

🎭 Series Post

View all