दीर्घकथा लेखन स्पर्धा
DINK भाग 19
"काय, काय विचारलेस तू?" पिहूने तिच्या कानांवर विश्वास ठेवण्यासाठी अनिताला प्रश्न केला.
" असंच मला वाटलं की तुम्ही दोघं एकमेकांमध्ये इंटरेस्टेड आहात कारण तुम्ही दोघंच आपल्या ग्रुपमध्ये इतके यशस्वी असूनही बिन लग्नाचे आहात. " अनिताने स्पष्टीकरण दिले.
"वा म्हणजे तुमची सगळ्यांची वाट लागली आहे म्हणून मग आता आमचीही वाट लावण्याच्या प्रयत्नात आहात तुम्ही. " ललित तिला म्हणाला.
" अरे पण काय हरकत आहे?" अनिता प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे बघत बोलली, " तुम्ही दोघेही आपापल्या क्षेत्रात चांगले नाव कमवत आहात. दोघेही अगदी करिअर ओरिएंटेड आहात, दोघांची विचारसरणीही सारखीच आहे. छान जोडी होईल तुमची. "
"अगदी म्हणूनच आम्ही एकमेकांशी लग्न करायला नको. खूप बोरिंग लाइफ असेल आमची. मित्र मैत्रीण हेच नातं योग्य आहे आमच्यात." इतकं बोलून ललित पिहूकडे वळला, " बरोबर ना पिहू."
मात्र पिहू केव्हाचीच तिथून गेलेली.
" अरे आत्ता इथे होती ना ती कुठे गेली? " अनिता ललितला म्हणाली.
" मला कसं माहित असणार. मी तर तुझ्याशी बोलण्यात व्यस्त होतो ना." ललित उत्तरला.
त्यांनी स्विमिंग पूल जवळ बघितले. तिथे, जीजा, कुणाल व अजितची रील बनवण्यात दंग होती.
" तुला माहित आहे ना तिला लग्नाची किती चीड आहे? " ललित अनिताला रागावला.
"हो, पण मला वाटलं माणसाचे विचार बदलतात कालांतराने. त्यात तुम्ही दोघे इतके छान एकमेकांशी बोलत होते तेव्हापासून मलाच काय पण जिजालाही तुमच्यात काहीतरी सुरू आहे असेच वाटले." अनिता त्याला म्हणाली.
" यार इतक्या दिवसांनी निवांतपने मित्र-मैत्रिणी भेटलो अर्थातच किती काही बोलायचे असेल, सांगायचे असेल. त्यात आता तूच म्हणालीस ना आमच्या आवडीनिवडी सारख्याच आहेत, बिजनेस एके बिझनेस. " ललित बोलला.
" मग आता असाच उभा राहणार का? चल तिला शोधून परत घेऊन येऊ. सोसायटीच्या गेटपर्यंतही गेली नसेल ती अजून. " अनिता त्याला म्हणाली.
" हो हो मी सिक्युरिटीला फोन करून सांगतो ती दिसताच तिला थांबवायला." ललित मोबाईल काढून सिक्युरिटीचा नंबर डायल करत बोलला. सिक्युरिटीने फोन उचलला. ललित काही बोलणार तोच त्या पेंतहाऊसच्या बेडरूम मधून पिहूचा ओरडण्याचा आवाज आला.
"आ SSS SS."
"ही आत कधी गेली?" ललितने प्रश्नार्थक नजरेने अनिताकडे बघितले.
"मला काय माहित." अनिता म्हणाली, "चल आत तिला काय झालं ते पाहायला."
"हो हो."
अजित, कुणाल व जीजाही त्यांच्या पाठोपाठ काय झालं ते पाहायला आत गेले मात्र समोरील सीन बघून सर्वच बेडरूमच्या दाराशी थबकले. एक हँडसम, अंगावर फक्त टॉवेल गुंडाळलेला तरुण पिहूच्या उजव्या पायाच्या अंगठ्याला टिंचर आयोडीन लावत फुंकर घालतांना त्यांना दिसला.
झालं असं होतं की अनिताने लग्नाचा विषय काढताच पिहूची सटकली म्हणून त्यांची लग्नावरील वायफळ चर्चा ऐकण्यासाठी तिथे न थांबता ती पेंत हाऊस पाहत आत ललितच्या भावाच्या बेडरूममध्ये गेली. तिला वाटलं तिथे कोणीच नाही. म्हणून ठण ठण ठणकणारं तिचं डोकं शांत करण्यासाठी तिने बेडवर अंग टाकलं. दोन मिनिट झाले नसतील बेडरूमच्या बाथरूम मधून एक तरुण टॉवेलने केस पुसत बाहेर आला. अचानक त्याच्या बेडवर कॉटनचा पायजामा व शॉर्ट कुर्ती घातलेली, डोक्यावर हात ठेऊन झोपलेली तरुणी कुठून अवतरली. ही मुलगी त्याच्या आई बाबाने त्याचे मन लग्न करण्यासाठी वळावे म्हणून पाठवली नाही ना या शंकेने तो मोठ्या आवाजातच बोलला,
"एक्सक्यूज मी. तु जे कोणी आहेस आताच्या आत्ता इथून निघून जा."
तसे डोळे मिटून पडलेली पिहू डोक्यावरील हात बाजूला करून पापण्या उघडून थाडकन बसली झाली. समोर त्याची छाती व कमेरेवर लपेटलेला टॉवेल, असा अर्धवट कपड्यातील तरुण पाहून तिचं डोकंच चकरावलं. त्याचा चेहरा बघण्याची तसदी सुद्धा न घेता ती बेडवरून उठून पटकन त्या खोली बाहेर जाण्याच्या नादात ती साईड टेबलवर कोलमडली, त्यावरिल पाणी भरलेली स्टीलची बॉटल तिच्या पायावर पडून तिचा अंगठा ठेचला गेला अन तिच्या तोंडून किंचाळी बाहेर पडली.
"पिहू?" त्याने तिला ओळखलं. तिलाही त्याचा आवाज ओळखीचा वाटला. तिने त्याच्याकडे नीट बघितलं.
"तेजस?" अंगठ्याच्या दुखण्याने कण्हत तिने त्याला विचारलं, "तु इथे काय करत आहेस ?"
क्रमश :
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
धन्यवाद.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा