चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५
लघुकथा फेरी
संघ - सोनल शिंदे
©® नम्रता जांभवडेकर
विषय - दिसतं तसं नसत म्हणूनच जग फसत
"मी तुम्हाला शेवटचं विचारतेय. तुम्ही आपल्यासाठी नवं घर घेणार आहात की नाही? किती दिवस आपण ह्या वनरूम किचनच्या घरातच पडून राहायचंय." शर्वरी चिडतच नवऱ्याला म्हणजे शंतनुला विचारत होती.
"मीही तुला शेवटच सांगतोय. जोपर्यंत आपल्या लग्नासाठी घेतलेलं माझं कर्ज फिटत नाही, तोपर्यंत नवीन घर घेण्याचा विचारही मी करणार नाही." शंतनुने सुद्धा तेवढ्याच शांतपणे तिला उत्तर दिलं.
"कर्ज.. कर्ज.. वर्षभरापासून हेचं गाऱ्हाणं ऐकतेय मी. बाकीच्यांच्या घरात जाऊन बघा जरा. प्रत्येक वर्षाला त्यांचे नवरे त्यांच्या बायकोला एखादा दागिना किंवा नवी साडी भेट म्हणून देतं असतात. आम्ही मात्र त्याचं साड्या महिनोंमहिने वापरतोय आणि तरीही आम्ही गप्पच बसायचं." शर्वरीची नेहमीची बडबड सुरू झाली पण शंतनु मात्र बेडवर बसून त्यावर काहीच प्रतिसाद न देता शांतपणे हातातला वर्तमान पत्र वाचत होता आणि त्याचा हाच शांतपणा बघून शर्वरीची आणखीनच चिडचिड होतं होती.
"देवा.. मी असा कुठला उपवास मोडला म्हणून ह्या माणसाशी माझी लग्नगाठ बांधलीस तू." किचनमधून दिसणाऱ्या देव्हाऱ्यातल्या गणपतीच्या मूर्तीकडे बघत काहीश्या पाणावलेल्या डोळ्यांनीच शर्वरी म्हणाली.
"शर्वरी, जरा चहा देतेस का? चहा प्यायल्याशिवाय सकाळ झाल्यासारखीच वाटत नाही बघ आणि हो, चहात बुडवायला दोन बिस्कीट पण दे हो." नुकत्याच अंघोळ करून आलेल्या शर्वरीच्या सासूबाई हॉलमधल्या खुर्चीत बसल्या.
"हो, देते ना. त्यासाठीच तर आहे मी." एक रागीट कटाक्ष वर्तमान पत्र वाचणाऱ्या शंतनुवर टाकत शर्वरीने उकळलेला चहा एका पेल्यात गाळला आणि एका स्टीलच्या ताटलीत काही बिस्कीट ठेवून तिने चहा बिस्कीट सासूबाईंच्या पुढ्यात ठेवला आणि किचनमध्ये वळणार तोच,
"काकू.. ओ काकू.. आईने ह्या पेल्यात थोडंसं दूध मागितलंय." शेजारच्या पिंकीने दार ठोठावलं.
"हो, देते ना." मनातून चिडत पण चेहऱ्यावर खोटं हास्य घेऊनच शर्वरीने सिंगल डोअरच्या फ्रीजमधून दुधाच पातेल काढलं आणि पिंकीसमोर येऊन तिच्या पेल्यात दूध ओतलं. नाही नाही म्हणता चांगलं पेलाभर दूध घेऊन पिंकी निघून गेली.
"हे असं थोडंसं म्हणत पेलाभर दूध आणि दिवसभरात अजून किती काही घेऊन जातात हे शेजारी आपल्या घरातून पण त्यांना आपण नकार न देता सढळ हाताने सगळं द्यायचं आणि घरात मात्र काटकसर करायची. काय तर म्हणे शेजारधर्म! माझी सुद्धा ना नाहीच आहे शेजारधर्म करायला पण आपल्याकडे पुरेस असेल तर आपण दुसऱ्याला देऊ शकतो ना." स्वतःशीच बडबडत शर्वरी म्हणाली आणि किचनमध्ये निघून गेली.
शंतनु आणि शर्वरीच्या घरची दर रविवारची सकाळ ही अशीच सुरू व्हायची. शर्वरी आणि शंतनुच्या लग्नाला नुकतीच दोन वर्षे पूर्ण झाली होती आणि वर्षभरातच शर्वरी, 'ही रूम विकून नवं घर घेऊया.' म्हणून शंतनुच्या पाठी लागलेली पण शंतनुने आधीच वडिलांच्या आजारपणात कर्ज काढलं होतं ते फिटलं आणि लगोलग त्याची आई वय निघून चाललंय 'लग्न कर..' म्हणत मागे लागली आणि शंतनुने लग्नासाठी पुन्हा कर्ज काढलं आणि ते फिटेपर्यंत नवं घर विकत घ्यायचं नाही ह्या मतावर तो ठाम होता.
रादर आधीच एक कर्ज असताना बँक दुसर कर्ज देण्यासाठी अप्रूवल देणार नव्हती आणि ही रूम विकून त्याला नवं घर घ्यायचं नव्हतं; कारण ही रूम शंतनुच्या बाबांनी शंतनुच्या भविष्यासाठी जन्मावेळी केलेली गुंतवणूक आता शंतनुची भावनिक गुंतवणूक झाली होती. ह्याचं घरात आणि चाळीत त्याचं संपूर्ण बालपण गेलं असल्याने ही रूम विकणं शंतनुला जीवावर येतं होतं. शिवाय ही रूम त्याच्या बाबांची शेवटची आठवण होती.
शर्वरी स्वतःशीच बडबडत सकाळचा नाश्ता बनवू लागली. कितीही झालं तरी नवऱ्याच्या आणि सासूबाईंच्या नाश्त्याची काळजी तिला होती. शर्वरीने कांदा चिरला. कांदे पोहे बनवण्यासाठी तिने गॅसवर कढई ठेवली आणि तेल गरम करायला ठेवलं.
"काकू, तुमच्याकडे कोणीतरी पाहुणे आलेत." पिंकीने पुन्हा एकदा दार ठोठावलं.
"अगं, जरा बघतेस का कोण आलंय?" शंतनु वर्तमान पत्रातील कोडी सोडवत म्हणाला.
"आता कोण आलं कडमडायला." तोंडातच पुटपुटत पदराला हात पुसत शर्वरी बाहेर आली आणि आश्चर्यचकित झाली.
"पूजा, तू.." शर्वरी आश्चर्याने म्हणाली.
"येऊ का घरात?" पूजाने काहीसं हसत विचारलं.
"अगं, ये ना." शर्वरीने शंतनुला इशारा करत बनियनवर शर्ट घालायला लावलं आणि नेहमीप्रमाणे अंघोळी वरून आल्यावर त्याने बेडवर टाकलेला ओला टॉवेल बाहेरच्या दोरीवर वाळत घालून पुन्हा आत आली.
"अगं, तू उभी का? बस ना.." शर्वरीच्या सासूबाई म्हणाल्या.
तशी पूजा काहीशी हसतच बेडवर बसली.
"आई, ही माझी बालमैत्रीण पूजा. आम्ही एकत्रच शाळा शिकलो. कॉलेजला सुद्धा एकत्रच होतो पण मध्येचं पूजाच लग्न झालं आणि तिचं शिक्षण थांबलं आणि आमचा संपर्क तुटला." शर्वरी म्हणाली. तसं पूजा काहीशी शांत झाली.
"आणि परवाच्या दिवशीच तब्बल पाच वर्षांनी भेट झाली आमची. तेव्हा मी तिला म्हणाले, घरी ये एकदा. पण काय ग, तुला माझा ऍड्रेस शोधायला फार त्रास नाही झाला ना." शर्वरीने काळजीने विचारलं.
"छे.. ग! त्रास कसला. उलट अगदी रस्त्याला लागून आहे की तुमची चाळ आणि त्या पिंकीने मला घरी आणून सोडलं. खूप माणुसकी आहे इथल्या माणसांमध्ये." पूजा आपुलकीने बोलत होती.
तेवढ्यात, शंतनु पूजासाठी पाणी घेऊन आला.
"तुम्ही कशाला आणलंत? मी आणलं असतं." आपल्या मैत्रिणीला आपल्या नवऱ्याने पाणी आणून दिल्यामुळे शर्वरीला ओशाळल्यासारखं झालं.
"असूदे ग. आपल्या घरी पाहुणे किंवा माझे मित्र आले की, तू करतेस ना त्यांचा पाहुणचार. मग आज आपल्या घरी तुझी मैत्रिण आलीय. त्यांचा थोडा पाहुणचार मी केला तर बिघडलं कुठे!" शंतनु अगदी सहजपणे म्हणाला.
तशा शर्वरी आणि पूजा दोघीही आश्चर्याने त्याच्याकडे बघू लागल्या.
"बर, तुम्ही काय घेणार? चहा, कॉफी की सरबत.." शंतनु.
"खरतर काहीचं नको. मी फक्त शर्वरीला भेटायला आलेय." पूजा शर्वरीचा हात हातात घेत म्हणाली.
"अगं, असं कसं? तू पहिल्यांदाच आलीयेस आमच्याकडे. शर्वरी, तू आज नाश्त्याला कांदेपोहे बनवतेयस ना. चल, मी मदत करते तुला." शर्वरीच्या सासूबाई उठणार तेवढ्यात,
"आई, बसा तुम्ही. सगळी तयारी झालीय. फक्त पोहे फोडणीला घालायचे बाकी आहेत. होतील दहा मिनिटांत. पूजा, तू बस मी आलेच." शर्वरी किचनमध्ये गेली.
तसे शंतनु आणि शर्वरीच्या सासूबाई पुजाशी गप्पा मारत बसले. पूजा दोघांशी गप्पा मारता मारता हॉल न्याहाळू लागली. समोरच्या भिंतीवर शंतनु आणि शर्वरीच्या लग्नातली फोटो फ्रेम लावली होती. दुसऱ्या बाजूला शर्वरीच ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्याचं सर्टीफिकेट फ्रेम करून लावलं होतं, जे तिला लग्नानंतर मिळालेलं. एका बाजूला बसायचा बेड, दुसऱ्या बाजूला टेबल आणि खुर्ची, एकीकडे लाकडी कपाट होतं. हॉल लहान असला तरी बऱ्यापैकी सुटसुटीत होता.
काहीवेळाने, शर्वरी ट्रे-मध्ये तिघांसाठी तीन प्लेट कांदे पोहे घेऊन आली.
"अम्म.. किती छान झालेत ग कांदेपोहे. अगदी काकूंच्या हातची चव उतरलीय तुझ्या हातात. शाळेत आणायचीस डब्याला. तेव्हा सुद्धा इतकेच चविष्ट असायचे." पूजा पहिला घास खाताच म्हणाली.
"हो.. तर! सुगरण आहे माझी सून. ती ह्या घरात आल्यापासून मी तर स्वयंपाक घरातून राजीनामाच घेतलाय. तिचं माझ्या पथ्यानुसार नवनवे पदार्थ बनवून आम्हा दोघांनाही खाऊ पिऊ घालते." शर्वरीच्या सासूबाई पोहे खाता खाता सुनेचं कौतुक करत होत्या.
"खरचं! नेहमीप्रमाणे खूप छान झालेत पोहे. तूही कर नाश्ता आमच्यासोबत." शंतनु अगदी शांतपणे बोलला.
तसं शर्वरीनेही हसतच होकारार्थी मान हलवली आणि तीही तिघांसोबत नाश्ता करायला बसली.
"काय ग पूजा? एकटीच आलीस भाऊजींना सुद्धा घेऊन यायचं ना सोबत. तेवढंच त्यांनाही भेटता आलं असतं. एफ.बी.वर तुमच्या लग्नाचे फोटो पाहिलेले तेवढेच!" शर्वरी.
तशी पूजा काहीशी गडबडली.
"अगं, त्यांना खूप कामं असतात. आजही त्यांना ह्या भागात एक काम होतं. म्हटलं, संधी आलीच आहे तर सदुपयोग करून घेऊ आणि जसं मी माझ्या भाऊजींना भेटले तसं तुला तुझ्या भाऊजींना भेटायचं असेल तर पुढच्या रविवारी ये आमच्या घरी." पूजा तिच्या पर्समधलं कार्ड काढून शर्वरीला देतं हसत म्हणाली.
"नक्की येईन." शर्वरी हसतच म्हणाली.
"बर, मी निघते आता. नाहीतर घरी पोचायला उशीर होईल." पूजा रिकामी पोह्यांची ताटली टेबलावर ठेवत म्हणाली आणि पाणी प्यायली.
"आता आलीच आहेस तर जेवून जा." शर्वरीच्या सासूबाईंनी पूजाला आग्रह केला.
"नको काकू, पुन्हा कधीतरी येईन." पूजा.
सासूबाईंच्या सांगण्यानुसार शर्वरीने पूजाची खणा नारळाने ओटी भरली आणि एका पिशवीत तिला सगळं साहित्य भरून दिलं. घरात असलेला एक बिस्कीट पुडा तिच्या हातात दिला. पूजाने शर्वरीच्या सासूबाईंचा आशीर्वाद घेतला आणि शंतनु व शर्वरीचा निरोप घेऊन निघून गेली.
पूजा येऊन गेल्यामुळे शर्वरीचा मूड चांगला झाला होता. त्यामुळे सकाळचे वादविवाद विसरून शर्वरी दुपारच्या स्वयंपाकाला लागली.
*****
असेच दिवस सरले आणि पुढचा रविवार उजाडला. आज शर्वरी पूजाच्या घरी जाणार होती. ती सकाळीच लवकर उठून नाश्ता करून घरातून निघाली. तिला रिक्षात बसवायला शंतनु कोपऱ्यापर्यंत गेला.
******
साधारण अर्ध्या तासानंतर शर्वरीची रिक्षा एका मोठ्या आवारात थांबली. तसं रिक्षावाल्याला पैसे देऊन शर्वरी रिक्षातून खाली उतरली आणि समोरचं घर पाहतच राहिली. घर कसलं मोठा ऐसपैस बंगलाच वाटतं होता तो. बंगला पाहताच शर्वरीचे तर डोळेच दिपले. तिने पटकन पर्समधून पुजाने दिलेलं कार्ड काढून डोळ्यांसमोर धरलं आणि समोरच्या बंगल्यावरच्या नेमप्लेटवरच चमकणार नाव पाहिलं दोन्ही नाव सारखीच असल्याची खात्री होताच तिच्या चेहऱ्यावर हसू पसरलं. ती तशीच पुढे जातं होती की, वॉचमनने तिला अडवलं.
"ओ बाई, कोण हवंय तुम्हाला?" वॉचमनने तिच्या कपड्यांकडे निरखून बघत विचारलं
"मी शर्वरी. इथे माझी मैत्रीण पूजा राहते. तिलाच भेटायला आलेय मी." शर्वरी आत जातं म्हणाली.
"ओ, बाई इथे कोणी पूजा राहत नाही. तुम्ही चुकीच्या पत्त्यावर आला आहात." वॉचमन तिला त्याच्याकडे असलेल्या काठीने बाहेर काढत म्हणाला.
आता शर्वरीला त्या वॉचमनचा रागच आला पण ती शक्य तितक्या शांतपणे त्याच्याशी बोलत होती.
"हे बघा. ह्या कार्डवर इथलाच पत्ता आहे ना." शर्वरीने त्या वॉचमनला कार्ड दाखवलं. तसं त्याने कार्डवरचा पत्ता वाचला.
"पत्ता तर इथलाच आहे. पण पूजा नावाची व्यक्ती इथे राहत नाही." वॉचमन म्हणाला.
"अहो, हे कसं शक्य आहे काका? मी खोटं का बोलेन. मी सांगतेय ना, पूजा इथेच राहते." आता मात्र शर्वरी चिडली त्या वॉचमनवर!
"मग मी खोटं बोलतोय का? गेले पाच वर्षे नोकरी करतोय मी इथे. त्यामुळे इथे कोण येतं आणि कोण जातं. ह्याची सगळी माहिती असते मला आणि मी म्हणतोय ना, इथे कोणीही पूजा नावाची व्यक्ती राहत नाही. तुम्ही आधी बाहेर व्हा बघू. कुठून कोण माणसं येतात काय माहिती!" वॉचमनने तिला गेटबाहेर घालवलं.
वॉचमनचे शब्द ऐकताच शर्वरीच्या डोळ्यांत टचकन पाणी आलं. तिने पर्समधून तिचा मोबाईल काढला आणि पूजाला फोन लावला.
"हॅलो, काय ग शर्वरी? येणार होतीस ना, काय झालं?" पूजाने फोनवर विचारलं.
"अगं, मी आलेय तुझ्या घराबाहेर. पण गेटवर वॉचमनने अडवलय मला. तो आत येऊच देतं नाहीय. तरी मी त्याला तुझं कार्ड सुद्धा दाखवलं. तरी तो म्हणतोय, इथे पूजा नावाची कोणीच व्यक्ती राहत नाही." शर्वरी एक रागीट कटाक्ष वॉचमनकडे टाकत म्हणाली.
"आय एम सो सॉरी! मीच तुला सांगायला विसरले." पूजा.
"का ग काय झालं? तू घरी नाहीयेस का?" आपली फेरी वाया जाते की, काय असं वाटून शर्वरीने विचारलं.
"अगं, मी घरीच आहे. थांब, मी खाली येते. मग बोलू आपण." पूजा फोन ठेवतच म्हणाली आणि काही वेळातच गेटजवळ आली. पूजाने काकांना गेट खोलून शर्वरीला आत घेण्यास सांगितलं.
"आय एम सो सॉरी शर्वरी. अगं, लग्नानंतर माझं नावं बदललं आणि माझं बदललेलच नावं इथे सगळ्यांना माहितीये. त्यामुळे ते असे वागले." पूजा एक नजर रागाने वॉचमननकडे पाहत शर्वरीला म्हणाली.
"माफ करा वहिनीसाहेब. ह्या तुमच्या मैत्रिण आहेत हे माहिती नव्हतं मला." वॉचमनने दिलगिरी व्यक्त केली.
"मान्य आहे काका तुम्ही हिला ओळखत नाही पण तिने माझं कार्ड दाखवलं. शिवाय ती म्हणतेय की, ती माझी मैत्रीण आहे. मग तुम्ही एकदा मला फोन करून खात्री करायला हवी होती." पूजा.
"माफ करा. वहिनीसाहेब पुन्हा अशी चूक होणार नाही." वॉचमन दोघींसमोर हात जोडत म्हणाला.
"इट्स ओके पूजा! एवढं काही नाही. ते त्यांचं काम करत होते. हल्ली चोरीचे प्रमाण आणि खोटी कार्ड दाखवून घरात शिरण्याच प्रमाण वाढलंय, त्यामुळे ते तसे वागले असतील. बर, तू मला इथेच उभ करणार आहेस की, आपण आत पण जायचंय?" उभ राहून थकलेल्या शर्वरीने पूजाला हसतच विचारलं.
"हो, चल ना आत." पूजा शर्वरीला आत घेऊन आली. एवढ्या वेळापासून शर्वरीला बेडरूमच्या खिडकीतून बघणाऱ्या पूजाच्या सासूबाईंच्या कपाळावर मात्र आठ्या जमा झाल्या. त्याही तशाच खाली यायल्या निघाल्या.
*****
"शंतनु, मला असं वाटतं तू शर्वरीच्या म्हणण्याप्रमाणे नवं घर घ्यावं." शर्वरीच्या सासूबाई शांतपणे म्हणाल्या.
"हे काय बोलतेयस तू आई? बाबांनी किती कष्टाने घेतलं होतं हे घर. नाही, मी हे घर विकणार नाही. मी समजावेन शर्वरीला." शंतनु म्हणाला.
"काय आणि कसं समजावणार आहेस. आपल्या घरातली दर रविवारची सकाळ ही तुमच्या भांडणाने होते आणि ते मला बघवत नाही आणि ऐकवत सुद्धा नाही. तिचं तरी काय चुकलं रे. नवी नवरी आहे ती. तिचीही नाही स्वप्नं असतील. तिने सुद्धा दिड वर्ष केलंच ना आपल्या घरात ऍडजस्ट. मग आपण सुद्धा थोडं तिच्या कलेने घ्यायला काय हरकत आहे. शर्वरीची सासूबाई शंतनुला समजावत म्हणाल्या.
"अगं, आई पण..," शंतनु काही बोलणार तेवढ्यात,
"शंतनु, तुला तुझ्या बाबांची कष्टांची जाण आहे. ह्यातच सगळं आलं. शर्वरी ह्या घरची लक्ष्मी आहे आणि घरातली गृहलक्ष्मीचं जर नाराज असेल तर घरात सुखसमृद्धी कशी येणार म्हणून म्हणतेय. ती म्हणतेय ना, नवं घर घेऊया घ्या मग हे घर विकून घ्या नवं घर." शर्वरीच्या सासूबाई काहीशा हसत म्हणाल्या. पण त्यांच्या डोळ्यांच्या पाणावलेल्या कडा त्याच्या नजरेतून सुटल्या नाहीत. त्यावर त्याने फक्त हुंकार भरला.
******
शर्वरी घर पाहतच हॉलमध्ये आली. बंगला जितका बाहेरून प्रशस्त वाटतं होता, तितकाच आतून सुद्धा मोठा आणि ऐसपैस होता. लाईट्सच्या प्रकाशात पांढऱ्याशुभ्र फरश्या चकाकत होत्या, भिंतीवर मोठमोठ्या फ्रेम्स लावल्या होत्या, प्रशस्त अशा हॉलमध्ये मोठमोठाले सोफे होते. सगळे नोकर आपापल्या कामात व्यस्त होते. कोणी फरशी पुसत होतं, तर कोणी साफसफाई करतं होतं.
हे सगळं पाहून शर्वरीला क्षणभर पूजाचा हेवाच वाटला आणि हे सुख आपल्या नशिबी का नाही ह्याची खंतही वाटली.
"तू बस, मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येते." पूजा एका दिशेने निघून गेली. तर शर्वरी घर पाहतच तिथल्या एका सोफ्यावर अलगद विसावली.
"कोण हवंय आपल्याला?" पायऱ्यांवरून उतरतच पूजाच्या सासूबाईंनी शर्वरीला विचारलं.
"मी शर्वरी. पूजाची बालमैत्रीण." शर्वरीने स्वतःची ओळख सांगितली.
"तूच का ती. गेल्या रविवारी पूजा तुझ्या घरी गेलेली आणि आज तू इथे आलीस. आणि हो, पूजा नाही राधिका बोलायचं. इथे सगळे त्यांना ह्याचं नावाने ओळखतात." बोलताना पूजाच्या सासूबाईंचा स्वर चिडका झाला.
तेवढ्यात, पूजा तिच्यासाठी पाणी घेऊन आली. काचेच्या ग्लासातून पाणी पिताना पाणी आपल्या अंगावर सांडण्यापेक्षा ग्लास हातातून निसटू नये म्हणून शर्वरीने ग्लास अगदी गच्च पकडला होता. गार माठातलं पाणी पिण्याची सवय असलेल्या शर्वरीला फिल्टरमधलं पाणी तेवढं रुचल नाही पण तहान भागली ह्यातच तिने समाधान मानलं.
"तू बस. मी तुझ्यासाठी काहीतरी खायला आणते." पूजा किचनमध्ये जातच होती की,
"एकदा स्वयंपाक घरात दुपारच्या स्वयंपाकाची तयारी सुरू झाली की, दुसर काही बनवता येतं नाही. हे माहितीये ना तुम्हाला." पूजाच्या सासूबाई पुन्हा एकदा बोलल्या आणि शर्वरीला पूजाला नाश्ता वाढायला लावणारी आणि जेवणासाठी आग्रह करणारी स्वतःची सासू आठवली.
"अगं, ठिक आहे पूजा. तसंही मी घरून नाश्ता करून आलेय." शर्वरी पूजाचा पडलेला चेहरा बघत म्हणाली.
"मी आलेच." पूजा किचनमध्ये गेली आणि तिच्यासाठी चहा आणि शुगर फ्री बिस्किट्स घेऊन आली. पूजाच्या आग्रहाखातर शर्वरीने एखादं दुसर बिस्कीट खाल्लं.
तेवढ्यात, पूजाला हाका मारतच पूजाचा नवरा रिषभ खाली आला.
"मला जरा पाणी दे प्यायला." रिषभ सोफ्यावर बसत म्हणाला.
तसं पूजाने एक नजर शर्वरीकडे पाहिलं.
"अहो, ही माझी बाल मैत्रीण शर्वरी." पूजा ओळख करून देतं म्हणाली
"पाणी देतेयस ना प्यायला." तिच्या बोलण्याकडे सपशेल दुर्लक्ष करत रिषभने तिच्याकडे बघत विचारलं
तशी ती उठली आणि त्याला पाणी आणून दिलं. रिषभ पाणी पित तिथेच बसला होता. रिषभकडे पाहताच शर्वरीला पूजाला पाणी आणून देणारा शंतनु आठवला.
"तुम्ही दोघी बसा. आम्ही स्वयंपाकाचं बघतो. जेवणाची वेळ होतं आलीय ना." पूजाच्या सासूबाई उठल्या.
"मग ही कशासाठी आहे. ही करेल की स्वयंपाक. राधिका तुला माहितीये ना, आईला गोळ्या घ्यायच्या असतात. एकच्या ठोक्याला बरोबर स्वयंपाक तयार हवाय मला." रिषभ तिला बजावत म्हणाला.
तसं पूजा बावरून शर्वरीकडे बघू लागली.
"पूजा, मला सुद्धा उशीर होतोय. हे आणि आई घरी वाट पाहत असतील, मी निघते आता." शर्वरी पर्स घेऊन उठली आणि रिषभकडे पाहिलं पण तो मात्र स्वतःच्या मोबाईलमध्ये व्यस्त होता. ती पूजाच्या सासूबाईंच्या पाया पडली आणि जायला निघाली.
तसं पूजाच्या सासूबाईंनी नोकरांकडून खाऊ मागवला आणि तो शर्वरीच्या हातात दिला. हा तोच बिस्कीटचा पुडा होता, जो शर्वरीने पूजाला दिला होता. शर्वरीने एक नजर पूजाकडे बघितलं. ती हतबलतेने तिच्याकडे पाहत होती.
"आमच्या घरातले सगळेच ब्रँडेड खाणं खातात." रिषभ म्हणाला
तसं शर्वरीने तो बिस्कीटचा पुडा पर्समध्ये ठेवला आणि तिथून निघाली.
"शर्वरी, थांब.." बंगल्यातून बाहेर पडून काही पावलं चालताच मागून पूजाचा आवाज आला. तशी शर्वरी जागीच थांबली. पूजा शर्वरीच्या समोर येऊन ऊभी राहिली.
"आय एम सॉरी शर्वरी! माझ्या घरी अनपेक्षितपणे तुझा अपमान झाला. माझंच चुकलं. मी तुला माझ्या घरी बोलवायलाच नको हवं होतं." पूजा खाली मान घालत नाराजीने म्हणाली.
"इट्स ओके. मला नाही वाईट वाटलं. अगं, पण हे सगळं काय आहे?" शर्वरीला हे सगळंच खूप अनपेक्षित होतं.
"तेच जे कोणाला दिसतं नाही." पूजा दिर्घ उसासा टाकत म्हणाली.
"म्हणजे?" शर्वरीने गोंधळून विचारलं.
"शर्वरी, सगळ्यांना फक्त एवढंच दिसतं की, मला एका श्रीमंत मुलाचं स्थळ आलं आणि मी लग्न केलं. पण खरी गोष्ट ही आहे की, मी कॉलेजमध्ये असताना माझ्या धाकट्या भावाच्या शाळेच्या ऍडमिशनसाठी माझ्या बाबांनी कर्ज काढलं होतं. पण माझे बाबा ज्या कंपनीत काम करायचे त्या कंपनीचे मालक अचानक हृदयविकाराच्या झटक्याने एकाएकी वारले आणि बाबांची नोकरी गेली. बँकेतून कर्ज घेतल्यामुळे थकबाकी वसूल करण्यासाठी बँकेतून लोकं घरी येऊ लागले आणि मध्यमवर्गीय माणसाला बाकी कशाहीपेक्षा इज्जत खूप प्रिय असते. मी पार्ट टाईम जॉब करण्याचा विचार केला पण त्यावरही बाबांनी नकार दिला; कारण शिक्षण सुरू असताना जॉब करणं त्यांना मान्य नव्हतं. त्यातच आत्याच्या ओळखीतल्या एका संस्थेकडून आम्हाला मदत मिळाली. त्यांनी आमचं कर्ज फेडलं आणि माझ्या भावाची शाळेची फी सुद्धा भरली. पण मला कुठे माहिती होतं. त्यांनी केलेल्या मदतीची मला एवढी मोठी किंमत चुकवावी लागेल.
त्या संस्थेच्या मालकीण बाई म्हणजेच माझ्या सासूबाईंनी त्यांच्या एकुलत्या एक मुलासाठी रिषभसाठी मला मागणी घातली. बाबांना जणू देवानेच हा मार्ग सुचवला की, काय असं वाटलं आणि माझ्याही नकळत बाबांनी माझं लग्न रिषभशी ठरवलं. सासूबाईंच्या सांगण्यावरून इच्छा नसतानाही मला माझं शिक्षण अर्धवट सोडावं लागलं; कारण त्यांना घर सांभाळणारी सून हवी होती पण त्यांचे खरे रंग तर मला लग्नानंतर समजले." पूजा पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाली. तसं शर्वरीने तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला धीर दिला.
"पूजा, तू मला हे सगळं आधी का नाही सांगितलंस? मी त्यादिवशी तुला भेटले, तेव्हा तू भरजरी साडी नेसलेलीस, चारचाकी गाडीमधून आलेलीस. त्यामुळे मला वाटल की..," शर्वरी बोलता बोलता थांबली.
"शर्वरी, 'दिसतं तसं नसतं ग!' घराण्याची प्रतिष्ठा जपली जावी म्हणून भरजरी साड्या नेसणं, महागड्या गाड्यांमधून फिरणं म्हणजे श्रीमंती नाही ग. माणूस मनाने श्रीमंत असायला हवा. जिथे लग्नानंतर मला माझं शिक्षण सोडावं लागलं. तिथे तुझा नवरा तुझ्या शिक्षणाचा आदर करतो, तुझ्या पाककलेच कौतुक करतो. हे कुठल्या श्रीमंतीपेक्षा कमी नाही. हो ना?" पूजा बोलली.
तसं विचारात हरवलेल्या शर्वरीने पाणावलेल्या डोळ्यांनी होकारार्थी मान हलवली.
"सूनबाई, जेवणाची तयारी करायला घ्या." आतून पूजाच्या सासूबाईंचा करारी आवाज आला.
तसं शर्वरी सुद्धा पूजाचा निरोप घेऊन तिथून निघाली. शर्वरी जाताच पूजा सुद्धा घरात गेली.
"घरापर्यंत सोडायला गेलेलात की काय तिला!" पूजाच्या सासूबाईंनी पूजा घरात शिरताच पूजाला टोमणा मारला.
तशी पूजा दिर्घ श्वास घेतं किचनमध्ये निघून गेली.
*****
शर्वरी घरी आली. तेव्हा शंतनु आणि शर्वरीच्या सासूबाई दुपारच्या स्वयंपाकाची तयारी करत होत्या.
"आई, तुम्ही का करताय हे? मी येतच होते ना." शर्वरीने पर्स बेडवर ठेवत सासूबाईंच्या हातून काम घेतलं आणि किचनमध्ये जाऊन बाथरूममध्ये हात पाय धुतले आणि पुन्हा किचनमध्ये आली.
"अहो, सॉरी मला यायला थोडा उशीर झाला." शर्वरी बारीक आवाजात म्हणाली.
"अगं, सॉरी काय त्यात! बर, तुला एक सांगायचं होतं. मी माझ्या एका बँकर मित्राशी बोललोय. त्याच्या ओळखीने आपल्याला लवकरच कर्ज मिळेल. पण त्यासाठी सहा महिने तरी लागतील. तोपर्यंत लग्नासाठी घेतलेलं माझं कर्ज सुद्धा फिटेल. मग आपण लवकरच मोठ्या टॉवरमध्ये राहायला जाणार आणि तुझं मोठ्या घराचं स्वप्न पूर्ण होणार." शंतनु कातर स्वरात काहीसा हसत म्हणाला.
तशी शर्वरी सरळ त्याच्या मिठीतच शिरली.
"काही गरज नाहीय मला मोठ्या घराची. जे सुख आणि आपलेपणा ह्या चाळीच्या आपल्या चार भिंतीच्या घरात आहे. तो मोठ्या टॉवरच्या घरामध्ये नाही मिळणार आणि 'दिसतं तसं नसतं' ही गोष्ट पटलीय मला आता." शर्वरी म्हणाली, तर कुठल्या का कारणाने असेना, शर्वरीच्या डोक्यातून हे घर विकण्याचा विचार गेल्यामुळे शंतनुने निर्धास्त होऊन मिठी आणखीनच घट्ट केली.