दिशा भाग अंतिम

Sharayu Opens Her Mind To Aaditya
दिशा:- भाग अंतिम

अत्यंत नाजूक क्षण होता तो आणि इतके अचानक, अनपेक्षित झाले होते सरांचे जाणे.
आदित्य ने शालिनी आईकडे बघितले. तिला शरयू ने घट्ट धरून ठेवले होते. दोघीही रडत होत्या.
दोघींचं रडणे आपापल्या पातळीवरती होते त्याला कोणाला काय सांगावे हे समजलं नाही. तो तसाच थांबला. ऑफिसचे बरेच लोकही होते.

सगळ्यांसोबत तो काय पुढे करावे या विचारात पडला. शेवटी सरांच्या पुढच्या फॉर्मलिटी करणे पण गरजेचे होते. सगळ्यांनी आदित्यला पुढाकार घ्यायला सांगितले.

आदित्य ने पुढे होत हॉस्पिटल फॉर्मलिटी पुऱ्या केल्या. आता खरी वेळ होती ते सरांचे पुढचे क्रिया कर्म कोण करणार याबाबत.

सगळ्यात पहिल्यांदा सरांना तिथून कंपनीमध्ये नेले त्यांचा पार्थिव देह तिथे दर्शनाकरता ठेवला.
त्यांना बघण्याकरता लोकांची रांग लागली होती.
आणि साहजिकच होते सर खूप मोठी व्यक्ती होते.
त्यांचे सगळे बिजनेस पार्टनर्स ओळखीचे लोक कंपनी स्टाफ जुने पुराणे लोक सगळे लोक तिथे आले होते.

तोपर्यंत पुढच्या सोपस्कार साठी बोलणे सुरू होते सगळ्यांच्या मते आदित्य आता सरांना शेवटचा अग्नी देणार असे वाटत होते पण आदित्य ने पुढे काय करायचे हे ठरवले होते.

त्याने शरयू ला बोलवले. तिला त्याने स्पष्ट सांगितले सर तुझे वडील होते आणि हे सगळे विधी मुलगा किंवा मुलगी असताना त्यांच्याकडूनच झाले पाहिजेत.

शरयू ची बिलकुल तयारी नव्हती पण पुढे होत शरयू च्या हाताला धरत आदित्य ने तिच्याकडून सगळे करवून घेतले.

तिचे संपूर्ण वागणे यंत्रवत होते हे त्याला जाणवले पण निदान सरांच्या आत्म्याला शांती मिळावी ह्या हेतूने आदित्य तिच्याकडून हे करून घेत होता.

अंत्यसंस्कार झाल्यावरती आदित्य ने सगळ्यांना घरी सोडले आणि तो स्वतःच्या घरी गेला.

शालिनी आई मानसिक रित्या खूप थकली होती. तिच्या आयुष्यात अचानक इतक्या काही घटना घडल्या होत्या की ज्याचा विचार ही तिने केला नव्हता

मुलगी अचानक भेटणे, तिच्यासोबत रहायला येणे मग काहीच दिवसात अचानक नवरा समोर येणे आणि त्यांचे हे असे जाणे सगळेच अकलनीय होते तिला.
ती काहीच न बोलता तिच्या खोलीत गेले.

इकडे सीमा आईने शरयूला तिच्या खोलीत सोडले, शरयू मात्र एकदम स्तब्ध झाली होती.
ती स्वतःच्या रूममध्ये गेली आणि दरवाजा बंद केला.
ती इतक्या विचित्र परिस्थितीत होती की तिने स्वतःला बंद करून घेतले. त्यानंतर पुढचे दोन तीन दिवस ती रूम मधूनही बाहेर आली नाही. तिला तिचे मन प्रचंड खात होते आणि तिला ते सहनही होत नव्हते.
आई आत मध्ये येऊन जेवण नेऊन द्यायची पण शरयू काही विशेष त्यातले खायची नाही.
शरयू तर जणू पूर्णपणे हरवली होती.

सीमा आईला आणि आत्याला आता काळजी वाटायला लागली होती.
घरातील वातावरण प्रचंड डिस्टर्ब झाले होते.

इथे आदित्य ने ऑफिस मधील त्याच्या नवीन पदाबद्दल जवाबदारी स्वीकारली होती. कंपनी पार्टनरस् ने ही त्याच्यावर विश्वास दर्शवला होता. एकंदरीत ऑफिस चे बरेच रुळावर येत होते, पण काही ठिकाणी शरयू चे येणे आणि असणे हो गरजेचे होते.

तिच्या नावावर जे काही केले होते त्याबद्दल तिच्याही सह्या लागणार होत्या. पण ती कोणाचेच फोन उचलत नव्हती.
आदित्यने सीमा आईला कॉल केला तेव्हा त्याला खरी परिस्थिती कळली.

शेवटी काही ठरवून आदित्य शरयू च्या घरी आला आणि आधी शालिनी आईला भेटला.

शालिनी आई त्याला कळवळून म्हणली "आदित्य माझे दुःख माझ्यापाशी पण माझी शरयू! तिला बघवत नाही रे! काय हाल करवून घेतले आहेत तिने,काही बोलत नाही, खातपीत तर नाही काहीच" आणि ती रडायला लागली.

आत्या पण आदित्य ला म्हणाली,"शरयू ची अवस्था बघवत नाही."

सीमा आई बोलली "जा आदित्य, बोल तिच्याशी"

तसे आदित्य शरयू च्या रूम मध्ये गेला. त्याने दारावर टकटक केले पण आतून काहीच आवाज आला नाही. शेवटी मनाचा हिय्या करत त्याने दरवाजा उघडला.
आज पहिल्यांदा तो तिच्या रूम मध्ये आला होता.

समोरच दृश्य बघून त्याला थोडा धक्का बसला. शरयू पोटाशी पाय घेऊन त्यावर डोकं टेकवून बसली होती. नजर पूर्ण शून्यात होती, रूम मध्ये अंधार होता.
वातावरण कुबट सारखे जाणवत होते. खिडक्या सुद्धा बंद होत्या.

"शरयू!" त्याने आवाज दिला.
ती मोकळी झाली नाही आहे हे त्याला जाणवले होते.
तिने त्याची काहीच दखल घेतली नाही.

" शरयू, अशी काय बसली आहेस. बाहेर बघ, दोन्ही आई किती काळजीत आहेत. त्यांचा तरी विचार कर" तिच्या खांद्यावर हात ठेवत तो बोलला तरी तिने काहीच रिस्पॉन्स दिला नाही.

थोडा वेळ त्याने वाट बघितली की ही काही बोलेल, त्याने मुद्दाम ऑफिसच् काही विषय काढत बोलून बघितले की ही आता तरी बोलेल पण काहीच नाही. ती नुसती शून्यात बसली होती.

शेवटी तो उठला आणि जायला वळला तसे तिने त्याचा हात पकडला.
"नको ना जाऊस आदित्य"

"तुला काय झालंय? काहीच बोलत नाही आहेस मी काय समजायचे?"

तसे तिने एकदम रडायला सुरवात केली. रडताना तिने त्याचा हात घट्ट पकडला होता.
तो हात त्याने तसाच धरून ठेवला आणि तिचा भर थोडा ओसरू दिला कारण हे गरजेचे होते.

"आदित्य, माझ्यामुळे झाले हे! माझ्यामुळे सर गेले! मी आईला इथे घेऊन आले सुखी करण्यासाठी पण मीच तिच्यासाठी काळ ठरले. तिला तिचा नवरा डोळ्याने दिसत होता जो हात जोडून माफी मागत होता पण मी नाही म्हणले म्हणून आईनेही त्यांना माफ केले नाही. मी फार अडवून ठेवले तिला.
तिच्या ही याच भावना असतीलच ना. खुप बोलले मी त्यांना, त्यामुळेच ते गेले. त्यांना माझा तिरस्कार सहन नाही झाला. मी त्यांची खुनी आहे" असे म्हणून ती परत रडायला लागली.

"नाही शरयू, असे काही नाही. यामध्ये तुझी काही चूक नाही. असे कोणाही बाबतीत घडू शकते. तू स्वतःला दोष देऊ नकोस. काही गोष्टी विधीलिखित असतात ज्या आपल्या आकलनापलीकडच्या असतात. आपण काहीच करू शकत नाही.

आईला ते भेटले हे कदाचित त्यांचे नशीब असेल. तू जे वागलीस बोललीस तेही चूक नाही, जे घडायचे ते घडून गेले पण म्हणून तू स्वतःचे जगणे सोडू शकत नाहीस.
जरा बघ, त्या दोन्ही आईंकडे तू त्यांचा जीव आहेस. तुला बघून त्यांचीही मन हेलावली आहेत."

कळवळून आदित्य बोलत होता. एकीकडे शरयूचे सांत्वन ही करत होता अशीच काही मिनिटे गेली अचानक शरयू निर्धारक बोलली,

"आदित्य माझ्या आईच्या सुखाची जबाबदारी माझी आहे आता कुठल्याही परिस्थितीत मी तिला त्रास होऊ देणार नाही मी एक निर्णय घेतला आहे मी माझ्या आईला कधीच सोडणार नाही.
माझ्या आईला इथे आणून तिचा संसार मी मोडला त्याची शिक्षा म्हणून मी लग्नच करणार नाही"

जसे शरयू ने हे उच्चारले तसे आदित्य ला जणू धक्का बसला त्याने एकदम तिच्याकडे बघितले.
तिच्या नजरेतले दुःख आणि पाणी पाहून तो काहीच बोलला नाही आणि तसाच बाहेर निघून आला.

बाहेर हॉलमध्ये त्याची वाट बघत दोन्ही आई बसल्या होत्या. सीमा आईने पुढे होत आदित्य ला विचारले "काय झाले आदित्य? काही बोलली का ती तुझ्याशी?"

तसे आदित्य म्हणाला "हो बोलली ना आणि तिचा निर्णयही सांगितला"

दोघी आईंना आश्चर्य वाटले .दोघींचा प्रश्नार्थक चेहरा बघून आदित्य म्हणाला "ती स्वतःला दोषी समजते आहे की, तिच्यामुळे सर गेले आणि त्यामुळे आपली आई एकटी झाली आहे.
तिच्या वागण्यामुळे तिच्या आईचा संसार तुटला हे दुःख तिला सतावत आहे आणि त्या वागण्याची शिक्षा म्हणून ती कधीच लग्न करणार नाही आहे"

शालिनी आईला जणू कानात गरम रस ओतला असे वाटले जेव्हा आदित्य शेवटची वाक्य बोलला.
एकदम ओरडत "नाही..नाही !हे शक्य नाही" असे म्हणत ती शरयूच्या रूम कडे धावली तसे पाठोपाठ आदित्य, आत्या आणि सीमा आई सुद्धा आल्या.

"शरयू तू मला फसवू शकत नाहीस तू मला इथे घेऊन आलीस तेव्हा मला काय म्हणाली होतीस की तू आणि आदित्य लग्न करणार आहात. तुझं संसार जुळून येत आहे. आदित्य ने मला मान्य केले आहे हे सांगून तु मला पुण्याहून मुंबईला आणले आहेस.
आता तू अशी पलटू शकत नाहीस. तू असे वागू शकत नाहीस. तुला लग्न करावे लागेल. आणि जे सुद्धा लक्षात घे की माझ्या आयुष्याशी तुझे नाते हे लग्न झाल्यावर पण तसेच राहणार आहे. मी तुझ्या बरोबरच राहेन. मी तुला कधी सोडणार नाही. पण याचा अर्थ तू स्वतःला शिक्षा करून घ्यावी आणि लग्न करू नये हे मला कधीच पटणार नाही.
तुझ्या वडिलांनी सुद्धा त्यांच्या मृत्युपत्रा मध्ये हेच लिहिले होते की, तू आणि आदित्य दोघांनी एकत्र येऊन पुढे कंपनी न्यायची आहे"

शालिनी आईचे बोलणे ऐकून शरयूला थोडे बरे वाटले. ती रडायला लागली. बऱ्याच वेळ त्यांचे रडणे चालू होते आणि एकदम तिने आदित्यला आवाज दिला.

पण आदित्य तर कधीच तिथून निघून गेला होता. आपण आईशी जे बोलले, ते का बोलले का असे वागले, हे आदित्य ला सांगितले नाही हे योग्य नाही झाले याची तिच्या मनाला रुखरुख लागून राहिली.

आदित्य सोबत बोलणे आता नितांत गरजेचे होते. तिने लगेच आदित्यला फोन ट्राय केला पण त्याचा नंबर बंद येत होता. तिने ऑफिसमध्ये प्रीतीला फोन लावला पण प्रीतीनेही हेच सांगितले की तो तुझ्याकडे आला आहे म्हणजे याचा अर्थ तो इथून जो गेला तो ऑफिसमध्ये गेला नाही हे नक्की हे शरयूला जाणवले.
तिने अदितीला फोन केला पण अदिती पण म्हणाली की तो घरी आला नाही.
सेफर साईड म्हणून तिने आशिष आणि नम्रता या दोघांनाही फोन केला पण कोणालाच माहिती नव्हतं की आदित्य कुठे आहे.

आता मात्र शरयू घाबरली. ऑफिसच्या आणखी दोन-तीन लोकांना तिने फोन केला पण कोणालाच आदित्य बद्दल काहीच माहिती नव्हते.

तिचे मन आता थोडे घाबरले होते. कुठे गेला असेल आदित्य ?आपले बोलणे ऐकून त्याला फार वाईट वाटले असेल. त्याला काय वाटत असेल की आईला खूप मुंबईत आणण्यासाठी आपण त्याचा वापर केला का त्याचा उपयोग करून घेतला का त्याच्याशी याबाबतीत न बोलता डायरेक्ट आईला आपण त्याच्याशी लग्न करणारे सांगितले हे त्याला कळल्यावर ती काय वाटले असेल त्याला आपल्याबद्दल असे वाटते की नाही आपल्याला माहिती नाही आणि आपण त्याला न सांगता असे बोलून जातो खरंच आपल्याला काही वाचता येत नाही आपण पूर्णपणे माठ बावळट आणि मूर्ख आहोत .

आता आदित्यला कुठे शोधायचे कुठे असेल तो? विचार करत असताना तिला अचानक आठवले की आदित्य कधीतरी तिला बोलता बोलता बोलून गेला होता की, जेव्हा त्याचे मन अस्थिर होते तेव्हा तो मरीन ड्राईव्हला खडकांच्या तिथे एकटा जाऊन तिथे बराच वेळ नुसता बसून असतो.
तसे ताबडतोब ती घराबाहेर पडली.
कॅब पकडून तिने मरीन ड्राईव्ह गाठला.
संध्याकाळ झाली होती त्यामुळे प्रचंड गर्दी होती तिथे. खूप लोक आले होते.
अनेक फॅमिली, कितीतरी कपल्स, अनेक लोक तिथे बसली होती. ती खूप शोधत होती की आदित्य कुठे आहे? इकडे बघ, तिकडे बघ, ईकडे फिर, तिकडे फिर सगळीकडे धावून ती शोधत होती पण आदित्य काही दिसत नव्हता.

सूर्य आता अस्ताला येणार असं समुद्राकडे बघितल्यानंतर दिसत होतं .
आता या समुद्रामध्ये हा सूर्य हळूहळू विसर्जित करेल आणि तिथे पूर्ण अंधार पडेल. आदित्य जर नाही आत्ता मिळाला तर बाहेरचा अंधार आणि तिच्या मनातला अंधार या दोन्ही मधला फरक तिला स्वतःला शून्य वाटला असता.
ओबेरॉय हॉटेलच्या समोरच्या खडकांवर त्याच क्षणी तिला दिसलं की दूर कोपऱ्यावर अगदी समुद्राच्या लगत असलेल्या एका दगडावर आदित्य एकटाच बसला आहे. तसे धावत पळत ती त्या दिशेने निघाली. खडकांवर तिचा तोल जात होता, पाय ठेचत होता पण त्याची तमा तिला नव्हती. तिला फक्त दिसत होते की आदित्य तिथे बसला आहे.तिने जवळ जात मोठ्याने "आदित्य -आदित्य!" असा आवाज दिला. जशी ती थोडी जवळ पोहोचली आणि तिने पुन्हा हाक दिली तसे आदित्यच्या लक्षात आले की त्याला कोणीतरी बोलावते आहे.

त्याने मान वळवली त्याचे डोळे पाण्याने डबडबले होते ती लागोलाग त्याच्या जवळ आली आणि म्हणाली,
"आदित्य... कुठे होतास तू? किती शोधते तुला? का इथे आलास तू?"
पण तो काहीच बोलला नाही.
"तू इथे असा कसा निघून आलास? का तू कोणाला सांगितले नाहीस ?तुला कळत नाही का तुझा फोन लागला नाही की काळजी वाटली असेल तू कुठे असशील ?काय करत असशील? किती जीव घाबरला माझा. नशीब मला आठवले कधीतरी तू बोललेला की, तू इथे येतोस "

तरीही आदित्य काहीच बोलला नाही. तो फक्त तिच्याकडे बघत होता. ती म्हणाली "आदित्य ऐकतो आहेस का? मी तुझ्याशी बोलते आहे."
तरी तो शांतच होता.

"आदित्य जेव्हा सुशांत माझ्या आयुष्यातून गेला त्यावेळी मी ठरवले होते की मी आता कधीच कोणातच गुंतणार नाही. पण माझ्या नकळत मी गुंतले रे! कधी कशी काय मलाच कळले नाही. मी बाथरूम मध्ये पडल्यावर ती तू मला हातात उचलून आणल्यापासून ते गेल्या काही महिन्यांचा माझ्या आयुष्यातला हा जो संपूर्ण प्रवास होता तो तुझ्याशिवाय गेलाच नाही. माझी आई मला मिळवून देण्यामागे सगळ्यात मोठा हात तुझा आहे आदित्य.
माझी आई इथे आली, तिला मी सांभाळले, या सर्व आणि सर्व गोष्टींमध्ये कायम तू मला भक्कम साथ दिलीस.

तुझ्या असण्याने मला खूप आणि खूप आधार वाटत होता. तू तुझ्या कृतीतून, तुझ्या वागण्यातून हे प्रत्येक वेळी जाणवून दिले की मी एकटी नाही आहे. तू कायम आणि कायम माझ्यासोबत आहेस आदित्य.

खरंच आणि खरंच तू माझ्यासोबत आहेस आणि मी गुंतले आहे रे तुझ्यात. पण कधी काय कशी काहीच कळले नाही आज अचानक तुला मी लग्न करणार नाही असे बोलून गेले पण मनाची रुखरुख काही केल्या जात नव्हती.
मला पूर्ण खात्री आहे की तू माझ्यासोबत कायम असलास तरीही मला माझ्या आईची काळजी जेवढी असेल, जितके सुख मी तिला देईन, तेवढाच आनंद तू ही तिला देशील.

हे खरं आहे की आई मुंबईला येत नव्हती तेव्हा, मी तुझे नाव पुढे करून तिला इथे घेऊन आले. पण त्याही वेळेस माझ्या मनात तुझ्याबद्दल काहीतरी होतेच. कधीच व्यक्त नाही केले पण तुझ्याशिवाय मला इतक्या जवळचे कोणी नव्हते. तू माझी गरज होतास म्हणूनच मी सगळे करू शकले आणि हेही तितकेच खरे तुझा मी कधी चुकीचा उपयोग पण नाही करून घेतला कारण तू कधी परका वाटला नाहीस. तू माझा वाटलास. हककाचा वाटलास. स्वतःचा वाटलास .अगदी अंतरीचा वाटलास.
आता याच अंतरीच्या मनाने आज मी तुला विचारत आहे, आदित्य देशील का रे मला साथ?
जर नसेल तुला हे मान्य तरीही काहीही हरकत नाही. आदित्य तू खूप चांगला व्यक्ती आहेस. खूप चांगला मित्र आहेस. तू खूप चांगल्या प्रकारे सांभाळून घेऊ शकतोस. पण एवढे मात्र नक्की की जर तू नसशील तर मात्र माझ्या आयुष्यात कोणीही असा व्यक्ती नसेल की जो माझा जीवनसाथी नसेल. तू नसशील तर ही पण काळया दगडावरची रेघ असेल की मी कधीच कोणाशी लग्न करणार नाही. पण याचा अर्थ अजिबात नाही की मी तुझ्यावरती दबाव टाकत आहे.
तुलाही तुझ्या भावना आहेत, तुझ्या इच्छा आहेत, तुझ्या मनात जर नाही असेल तर तू बिनदिक्कत पणे मला सांग मला ते मान्य असेल" विचारांच्या वेगात शरयू बडबडत होती आणि बोलत होती.

आदित्य नुसता तिच्याकडे बघत होता आता दोन आसवे सुद्धा त्याच्या गालावर ओघळली होती.
शरयू आता थोडीशी रडत होती.

त्याने हलकेच शरयूच्या हाताला स्पर्श केला आणि बोलला "शरयू गेली कित्येक महिने माझ्या मनात हाच विचार होता, पण मी कधीही बोलून दाखवू शकलो नाही किंवा माझी हिंमतही झाली नाही. ज्या सगळ्या भावना तू आता बोललीस त्या सगळ्या भावना माझ्याही आहेत आणि माझेही तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे.

या जगाचा निरोप घेता घेता सरांनी आपल्याला एकत्र आणले आहे. त्यांनी आपल्या आयुष्याला एक नवीन दिशा दिली आहे ज्या मार्गावरून आपल्याला पुढे चालायचे आहे. आपण आपली कंपनी, आपला परिवार आपलं आयुष्य, असं एकत्रितपणे, सक्षमपणे एका योग्य दिशेने न्यायचे आहे. मी तुला वचन देतो की या जन्मात माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी तुला अखंड साथ देईन"

त्या भव्य समुद्राच्या साक्षीने त्या दोघांनी तिथे एकमेकांना वचन देत त्यांच्या आयुष्याची पुढची "दिशा" ही भक्कमपणे ठरवली होती.

समाप्त!

©® अमित मेढेकर.

🎭 Series Post

View all