दिशा:- भाग 33

Sharayu Succeeded To Take Her Mother Out Of That Place


दिशा:- भाग 33

आईला असे हसताना पाहून शरयूला अक्षरशः तिची दृष्ट काढावीशी वाटली. एक क्षण छोटीकडे पहात तिला थोडं वाईट वाटले की, हा सहवास ती तोडत आहे पण शेवटी तिच्या आईला तीला मुंबईला न्यायचे हे तेवढेच महत्त्वाचे होते... आणि आज तो दिवस आला होता ज्या दिवशी ती त्याच्या बरोबर आईला मुंबईला घेऊन जाणार होती.तिच्या घरी! तिच्यासोबत !

आईला सामान भरायला शरयू ने मदत केली सोबत आदित्य पण होताच! पण आईचे सामान एवढे होते घरात की ते कसे भरायचे हा प्रश्न होता. आई प्रत्येक तिच्या छोट्या छोट्या गोष्टीला सोबत न्यायचे म्हणतं होती.. काय घ्यायचे काय नाही हे ती बघत होती...तिचे हे चालू होते ते पाहून शरयूला समजत नव्हते की हे काय चालले आहे...!

आईचे हात मात्र भरभर चालत होते. कुठला फोटो,कुठली फ्रेम, एखादी चादर, एखादी उशी, एखादा जुना कपडा, एखादा कंगवा तिने सोबत ठेवलेले काही जुने अलंकार हे सगळे तिची पत्र्याची ट्रंक होती त्या ट्रकमध्ये तिने ते सगळे सामान भरले. जे होते ते सगळे तिला न्यायचे होते.

आदित्य हे सगळे पाहून म्हणाला "शरयू एवढे समान आपण घेऊन नाही जाऊ शकत. हे सगळे सामान आपण कुरिअर करून बोलवू.. आत्ता आईला फक्त तिची बॅग घ्यायला सांग"

तिला त्याचे बोलणे पटले पण आई म्हणली की "हे सगळे सामान जर कुरिअरने हरवले तर?"

आता तिला कोण सांगणार की असं हरवत नाही पण आईचा काही विश्वास नाही बसला..शेवटी जे अगदी महत्वाचे सामान आहे ते सोबत घेण्याचे ठरले आणि बाकी सगळे सामान कुरिअरने नंतर आणायचे ठरवून झाले.

आणि ती वेळ आली... आई आज पहिल्यांदाच खऱ्या अर्थाने या जागेच्या बाहेर पाऊल टाकत होती. प्रचंड अस्वस्थ मन होते तिचे...तिला नक्की कळत नव्हते ती करते आज ते काय हे बरोबर आहे का चूक आहे?

पाऊल बाहेर ठेवताना ती रडली... अक्षरशः धाय मोकलून रडली. ही जागा तिला बरच काही शिकवून गेली होती या जागेवर तिच्या आठवणी अमर्याद होत्या. जरी ही जागा इतरांच्या दृष्टीने अयोग्य होती तरी तिच्या दृष्टीने तिने तिच्या आयुष्यातली असंख्य वर्ष इथे घालवली होती. आज या जागेवरची भावना तिला बाहेर पडून देत नव्हती.

तिने सगळ्या मुलींना एकत्र केले सगळ्यांच्या हातात काही पैसे ठेवले आणि सांगितले यातून तुम्हाला जे हवे ते घ्या आणि रडायला लागली.

तिचे बोलणे ऐकून सगळ्या मुली पण रडत होत्या. सगळ्यात जास्त तर छोटी रडत होती.. तिचे रडणे अजिबात थांबत नव्हते.
ते पाहून आईला वाटले की आपण स्वार्थी झालो का?

पण जी आश्वासकता शरयूच्या डोळ्यात होती ती तिला पुढे जाण्यासाठी प्रवृत्त करत होतीत.

आईने सगळ्यांना सांगितले "मी जात आहे पण लवकरच तुम्हा सगळ्यांना पण इथून घेऊन जाईल. माझी मुलगी आणि हा माझा जावई हे दोघेजण तुम्हाला भरपूर चांगल्या ठिकाणी घेऊन जाऊन योग्य ती काळजी घेणार आहेत...निश्चित रहा"

तिच्या अशा भावस्पर्शी बोलण्याने सगळ्या जणी अजून भाऊक झाल्या.

आईने त्या वास्तूला नमस्कार केला आणि म्हणाली "माझी चूक असेल काही तर माफ कर !मी कोणाला त्रास दिला असेल तर माफ कर! मी कोणाला दुखावले असेल तर माफ कर!
पण एकच गोष्ट आहे की या जागेने मला आसरा दिला , आधार दिला आणि पुढे जाण्यासाठी मदत पण केली. मी आज आहे जी काही ती या जागेच्या आधारे आहे...
आज इथून निघते आहे पण, ही जागा पुढे मागे एक वास्तू म्हणून जतन करू जिथे काहीतरी योग्य आणि चांगली गोष्ट सुरू करू" असे म्हणून आईने दाराच्या उमऱ्यावरती डोके ठेवले तसे तिचे डोळ्यातले पाणी त्यावर ओघळले.

आदित्य पण एकदम शांत झाला होता . वातावरण अतिशय वेगळे होते. त्या जागेतला प्राण आज तिथून बाहेर जात होता..!

आईने एकदम मान फिरवली आणि ती उतरायला लागली.
खालती एक मोठी गाडी आदित्यने आधीच मागवून ठेवली होती. त्यात आईचे सामान भरले होते.

आई आणि शरयू मागच्या सीटवर बसल्या आणि आदित्य पुढे बसला.

आईने एकदा काच खालती करून त्या जागेकडे तिथल्या आजूबाजूच्या घराकडे आणि तिच्यासाठी जमलेल्या तिच्या स्वतःच्या लोकांसाठी पुन्हा एकदा पाहिले.

डोळ्यातले पाणी परत एकदा टिपले.. हात वर केला आणि ती निघाली...

तिथून गाडी तिथून निघाली आईला घेऊन...
आता आई निघाली होती मुंबईच्या दिशेने...
तिच्या नवीन घरी..तिच्या मुलीसोबत...!
22 वर्षानंतर...!

क्रमशः
©® अमित मेढेकर

🎭 Series Post

View all