दिशा भाग 34

Shalini Aai Enters Mumbai After A Gap Of Approximately 25 Years


दिशा:- भाग 34

कॅब त्या जागेवरून हलली तसे शालिनी आईने डोळ्याला पदर लावला. शरयू ने हलकेच तिच्या खांद्यावर हात टेकवत आधार दर्शवला. आईने पण तिच्याकडे बघितले आणि हलकेच हसली. समोर आदित्य सुद्धा धीराने घ्या असे नजरेने सांगत होता त्याच्याकडे पाहत ती शांत बसली.

शरयू आईच्या बाजूला मागे बसली होती तर आदित्य समोर ड्रायव्हर शेजारी बसला होता. वातावरण हलकं फुलकं करण्यासाठी तो मध्ये मध्ये जोक्स, काही आठवणी काही अनुभव असे सांगत होता. त्यामुळे आई आता थोडी नॉर्मल होत होती.
गाडी एक्स्प्रेस वे ला लागली आणि आई अनेक वर्षांत झालेल्या बदलांकडे नवलाईने पाहायला लागली.

एकदम ती म्हणाली,
"शरयू एक विचारू?"
"बोल ना आई!"
"आपण जातो आहेत खरं पण तिथे कोण कोण असेल? नाही म्हणजे तुझी आई बोलायला छान आहे ... पण मला स्वीकारणे तसे सोपे नाही ना."

शरयू हसली आणि म्हणाली " आई तिथे आत्या पण आहे. ती पण खूप छान आहे आणि माझे प्रचंड लाड केलेत तिने आजवर. तू काळजी करू नकोस".

आदित्य त्यांचे बोलणे ऐकत होता पण मुद्दाम काही बोलला नाही,कारण आईला थोडे मोकळे होणे पण गरजेचे होते. हा चार तासाचा प्रवास आणि त्यानंतर चे तिचे आयुष्य फार बदलणार होते. तिच्या मनाची हुरहूर साहजिक होती. तिच्या आयुष्यातील तिचे अनुभव तिला वेगळे विचार करायला भाग पाडत होते पण शेवटी तिने हात जोडून डोळे मिटले आणि "जे होईल ते बघू" मनात म्हणाली.

आदित्य आणि शरयू चे अधेमधे एकमेकांकडे एकमेकांच्या नकळत बघणे सुरू होते. आईला खोटे सांगितले होते आणि त्याबद्दल त्याला काहीच कल्पना नव्हती त्यामुळे ती थोडी मनातून घाबरली तर होतीच.

तिच्या आयुषयातल्या या नवीन वळणाला ज्याने तिची आई तिला जोडली गेली होती त्यासाठी आदित्य खंबीरपणे तिला साथ देत होता. तिला त्याच्याबद्दल प्रचंड आदर वाटत होता आणि ती त्याच्याकडे ओढली जात होती तर इकडे आदित्यला ती आधीपासूनच आवडत होती.

"आई काय गंमत आहे ना,आज तु अशी दिसत आहेत ना जणू सासरी निघाली आहे आणि मनातून घाबरली आहे" आदित्य बोलला तसे आईला हसू आले.

"तिच्यासाठी तसेच समज आदित्य! नवीन लोक, ठिकाण त्यामुळे ती काळजीत आहे हो ना आई?"

तसे आईने "हो" असे म्हणत मान डोलावली.

"आई मी काय म्हणतो तुला भूक लागली का? नाही म्हणजे काय आहे ना या शरयू ल कायमच भूक लागते.. खादाड सारखी!"

शरयू ने डोळे मोठे करत त्याच्याकडे पाहिले तसे त्याने मोठयाने हसायला सुरुवात केली. त्याच्या बोलण्यावर आई मनापासून हसत होती ते बघून शरयू मनातून सुखावली.

फूड कोर्ट ला ते थांबले आणि स्नॅक्स ऑर्डर केले. एरवी शांत असणारा आदित्य आईला हसवत ठेवण्याचा कसोशीने प्रयत्न करत होता आणि ते शरयू अनुभवत होती.

फूड कोर्ट ची लज्जत घेत ते निघाले. पुढे आईला प्रवासात थोडी झोप लागली. ट्रॅफिक कमी असल्याने गाडी वेळे अगोदर मुंबईत दाखल झाली.

जसे मुंबईमध्ये ते प्रवेशले तसे गाड्यांच्या आवाजाने आई जागी झाली, आजूबाजूची गर्दी बघून थोडी दचकली आणि शांत पणे बाहेर बघायला लागली.

"शरयू अजून किती वेळ लागेल?"
"अर्धा तास लागेल पोचायला"
"आदित्य तू कुठे राहतोस?"
"बोरिवली ल राहतो"
"लांब आहे का खूप?" निरागसपणे आई विचारत होती.
"नाही आई तुझ्या घरापासून पुढे आणखी अर्धा तास लागतो. इथे मुंबईत ट्रॅफिक खूप असते ना"

"हो ना दिसतच आहे ते" नजरेत काळजी, कुतूहल आणि थोडी भीती असे सगळे हावभाव दिसत होते तिच्या.

कॅब शरयू च्या सोसायटीत दाखल झाली आणि थांबली तसे आईची हृदयाची धडधड वाढली होती. शरयू ने तिला हाताला धरून खाली उतरायला मदत केली. इतकी मोठी आणि पॉश सोसायटी बघून आई थोडी दबकली होती आणि भिरभिर बघत होती.

एव्हाना ड्रायव्हर च्या मदतीने आदित्य ने समान खाली उतरवले होते. शरयू ने फोनवर कोणालातरी काहीतरी सांगितले आणि आईला घेऊन थोडे समान हाताशी घेत लिफ्ट गाठली.

"आदित्य तूही घरी येतो आहेस" तिने जणू हुकूम सोडला होता त्यामुळे आदित्य फक्त हसला आणि तिच्या पाठोपाठ चालायला लागला.


लिफ्ट ने ती तिघे निघाली आणि काही क्षणांत एका फ्लोअर वर लिफ्ट थांबली.

शरयू ने सामान बाहेर घ्यायला आदित्य ल मदत केली आणि आईला हाताला धरत पोर्च मधून डावीकडे चालायला लागली.

डाव्या हाताचा शेवटच्या फ्लॅट समोर ती पोचली पण त्या अगोदरच दरवाजा उघडलेला होता. सीमा आई औक्षण करायला आरती ची थाळी घेऊन समोर उभी होती.

तिने खूप आश्वासक अशी स्माईल दिली ती बघून शालिनी आई सुद्धा हसली.

सीमा आईने शालिनी आईला ओवाळले आणि शरयू ल सुद्धा औक्षण करून घरात घेतले.
हे बघून शालिनी आई भारावली आणि तिचे डोळे भरून आले.

तिच्या उभ्या आयुष्यात हे पहिल्यांदाच कोणी तिच्यासाठी असे केले होते. सीमा आईने हाताला धरून शालिनी आईला घट्ट मिठी मारली तसे शालिनी आई खूप रडायला लागली.

तिच्या रडण्याचा भर ओसरेस्तोवर ती तिच्या पाठीवर हलकेच हात फिरवत राहिली.

तिने नंतर तिला सोफ्यावर बसवले.

"आदित्य ये ना !असा बाहेर का उभा आहेस परक्यासारखा?" म्हणत आत्या पुढे आली आणि त्याच्या हातचे सामान घ्यायला वाकली तसे तो म्हणाला "कुठे ठेवायचे इतकेच सांगा" आणि घरात आला.

" ही माझी आई आणि ही आत्या..." दोघींनाही दोन बाजूला कवटाळून शरयू ने शालिनी आईशी ओळख करून दिली. प्रत्यक्षात आज त्या पहिल्यांदा एकमेकांनाभेटत होत्या.

"आणि ही माझी....
"शालिनी आई!" म्हणत आत्याने वाक्य पूर्ण केले आणि तिच्या खांद्यावर हात ठेवला.

तेवढयात आतून कामवाली मावशी सगळ्यांसाठी कॉफी घेऊन आली. शरयू ने स्वतः आदित्यला कॉफी मग दिला आणि नजरेतून आभार मानले. तिच्या दृष्टीने आजचा हा दिवस पाहायला आदित्य मुख्य भूमिकेत होता...

"आदित्य आज तू इथे जेवून जाणार आहेस" आत्या म्हणाली.

"नको आत्या.. घरी आई वाट बघेल माझी"

"फोन करून सांग की तू इथे जेवणार आहेस" म्हणत आत्याने त्याची बोलती बंद केली.

सीमा आईने शालिनी आईला तिची रूम दाखवली आणि सामान आत ठेवले. हे सगळे असे बघून शालिनी आईला खूप भरून आले आणि तिचे डोळे ओलावले तसे सीमा आईने तिला जवळ घेत "सगळं छान होईल इथून पुढे" असे म्हणत आधार दिला.

लांबून हे शरयू आणि आदित्य बघत होते, ते बघून तीही भावूक झाली तसे आदित्य ने नजरेने रडू नकोस असे खुणावले.

आपले झालेले स्वागत हे शालिनी आईसाठी सुखद धक्का होता. तिने मनापासून देवाचे आभार मानले की "असे घर, अशी माणसे तू माझ्या शरयू ला तू दिलेस!..तुझी लीला अगाध आहे देवा..."

क्रमशः
©®अमित मेढेकर

🎭 Series Post

View all