दिशा भाग 35

Shalini And Seema Had A Pleasent Discussion


दिशा:- भाग 35

घरातील हसत खेळत वातावरण बघून क्षणोक्षणी शालिनी आई देवाचे आभार मानत होती.
थोड्या वेळात जेवणाच्या टेबलावर सुद्धा गप्पा मारत खिचडी कढीची जेवणं आटोपली. आदित्यचे आत्या आणि सीमा आईशी वागणं एकदम मनमोकळे होतं आणि आता तर शालिनी आईही त्याला नवीन नव्हती त्यामुळे सगळीकडे आपुलकी, आनंद असेच जाणवत होते.
शरयू ला तर आज आभाळ ठेंगणं झालं होते कारण तिची शालिनी आई तिच्या सोबत मुंबईला आली होती आणि आज तिच्या समोर बसून जेवत होती.
घरातील आपुलकीमुळे शालिनी आईचे अवघडलेपण कमी झालं होतं.

"शरयू ११ वाजत आलेत आता. उद्या ऑफिस आहे आपले..मला निघायला लागेल" आदित्य म्हणाला.

तिने मानेनेच संमती दिली तसे सगळ्यांचा निरोप घेऊन तो त्याच्या घराकडे निघाला.

"शालिनी ताई, तुम्ही पण आराम करा तुमच्या रूम मध्ये. काही लागले तर नक्की आवाज द्या" आत्या प्रेमाने बोलली तसे हलकेच मानेने त्याने होकार दर्शवला.

सगळे आपापल्या खोलीत गेले, शरयू सुद्धा जाम दमली होती. तीही सगळ्यांना "गुड नाईट!" म्हणून शालिनी आईला "एकदम रिलॅक्स झोप" म्हणाली आणि झोपायला गेली.

शालिनी आई आपल्या खोलीत आली.
नवीन जागा, नवीन शहर ! तिला खरंतर हे सगळे जगच नवीन होतं.

आपल्याच विचारात तिने बिछान्यात अंग टाकले पण तिला त्या मानस कन्येची आठवण येत होती.
हलकेच डोळ्याच्या कडा ओलावल्या, पण शरयू काहीतरी चांगले घडवून आणेल हा विश्वास मनात असल्याने विचार बाजूला सारला.

ती सारखी कूस बदलत होती पण झोप काही केल्या लागत नव्हती.
शेवटी उठून बाहेर जात शरयू च्या खोलीत वाकून पाहिले तर ती शांत झोपली होती.
तिने जाऊन तिच्या कपाळावरून हात फिरवला आणि बाहेर आली.

तिला दिसले की गॅलरीत सीमा आई आरामखुर्चीत बसली होती तसे तीही त्या दिशेने गेली.

"झोपला नाहीत तुम्ही अजून?"

"नाही ना, झोपच लागत नव्हती म्हणून बाहेर आले जरा वाऱ्यावर. तुम्ही पण जाग्याच आहेत.."

"हो ना! नवीन शहर, इथले वातावरण, नवीन जागा त्यामुळे असेल कदाचित"

"हो शक्य आहे. या बसा ना" म्हणत सीमा आई ने समोरची खुर्ची त्यांच्यासाठी ओढली.

"तुमचे आभार कसे मानावे खरं तर कळतच नाही आहे. आज शरयू जी आहे ती फक्त तुमच्यामुळे" ती बोलत बोलत असतानाच डोळे पाणावले.

सीमा तिच्या हातावर हात ठेवत म्हणाली "शरयू आहे माझ्याजवळ ती तर तुमच्याचमुळे आहे ना? तिची जन्मदाती आई तुम्ही आहेत मी तर फक्त सांभाळले"

"फक्त सांभाळले नाही तर तिला नवीन जीवन दिलेत. तुम्हाला माहित होते की मी कुठे असते तरी तुम्ही मनात काहीच न आणता तिला स्वीकारले हे सोपे नाही ना?"

"खरं सांगायचं तर शरयू चे बाबा खूप प्रगल्भ विचारांचे होते. ते एकच म्हणाले की बाळ हे बाळ असते ..ते कुठे जन्माला आले ह्याने काहीच फरक पडत नाही. आणि जे बाळ निरागस ज्याला जगाचं काही माहित नाही त्याला कशाला जागेवरून शिक्का लावायचा? तुम्ही तरी तिथे स्वखुशीने थोडीच राहिलात"

"सुरवातीला खूप जड गेले मला पण मनावर दगड ठेवला की तिला मानाने जगवायचे असेल तर मी दूर होणेच योग्य"

"आम्ही केलेल्या पहिल्या वाढदिवसाला खरं तर तुम्ही हव्या होत्या पण तोवर आम्ही पुणे सोडून इथे मुंबईत आलो होतो. मीही थोडी स्वार्थी झाले होते की तुम्ही स्वतःला थांबवू शकले नाहीत आणि शरयूला परत मागितले तर..अशी भीती वाटतं होती"

शालिनी आई फक्त हसली.

"कॉफी घेणार का?" सीमा आईने विचारले तसे शालिनी आई हो म्हणाली.

पाचच मिनिटात त्या दोन मग् घेऊन बाहेर आल्या. कॉफीचा घोट घेत दोघी आपले आयुष्य म्हणजेच शरयू बद्दल बोलत होत्या.

"शरयू च्या बाबांनी जाण्यापूर्वी एकच सांगितले की, आपण मोठं केले तरी शरयू वर तिच्या आईचा पूर्ण हक्क आहे. त्यांना इथे येण्यास कधीच मनाई करू नकोस" सांगताना त्यांचे डोळे पाणावले.

"तुम्ही खरंच देव माणसे भेटलात नशिबाने शरयूला आणि मलाही. मी कल्पनाही नव्हती केली इतके छान संगोपन केलेत तुम्ही तिचे. आता आदित्य सारखा जावई मिळत आहे यापेक्षा अजून काय हवे?" शालिनी आई बोलली तसे सीमा आईने आश्चर्याने तिच्याकडे पाहिले.

"म्हणजे ? हे कधी ठरले? मला तर शरयू काही बोलली नाही" थोडे चमकून त्या म्हणाल्या.

"कालच बोलली मला ती! म्हणून तर मी तयार झाले यायला. मला नको होते की माझ्यामुळे तिला त्रास व्हावा पण आदित्यला सगळे माहित असून त्याने स्विकारले आहे"

"हो.. हे तर नक्कीच छान होईल. खूप गुणी मुलगा आहे आदित्य. त्या सुशांत पेक्षा तर लाखपटीने चांगला आहे. पण अजून मला काही सांगितले नाही तिने..."

"नक्की सांगेल उद्या! आजचा दिवस खूप धावपळीत गेलाय त्याचा"

"हो ते तर आहे, मुलांनी सुखी असावे यापेक्षा अजून काय हवे आपल्याला"

"खरंय!"
"एक विचारू का?" सीमा म्हणाली

"हो विचारा ना, अगदी हक्काने. आणि मला आहो जाहो पेक्षा एकेरी बोललात तर आणखी छान वाटेल"

तशी सीमा हसली आणि शालिनी ला म्हणाली, "तू कधी प्रयत्न नाही केलास तिच्या बाबांना शोधण्याचा?"

"नाही! म्हणजे ज्या माणसाने माझ्या आयुष्याची राखरांगोळी केली त्याचे तोंडही मला बघायचे नाही. एक स्वप्न फक्त... प्रेमात सुखी जगण्याचे बघितले होते पण त्याच माणसाने मला वेश्या बनवले यापेक्षा दुर्दैव काय म्हणायचे" असे बोलून ती एकदम शांत झाली.

"संपले ते सगळे आता. इथून पुढे नवीन आयुष्य वाट बघत आहे त्याला हसत सामोरे जायचे आहे. यावेळी एकटी नाहीस तर आम्ही तिघीही सोबत आहोत" म्हणत सीमा आईने आपला भक्कम आधार दर्शवला.

शालिनी आई मनोमन सुखावली आणि हसत हो म्हणाली.

जवळपास पहाट व्हायला आली होती, त्या दिवसाची नाही तर शालिनी आईच्या आयुष्याची!

क्रमशः
अमित मेढेकर

🎭 Series Post

View all