दिशा:- भाग 36

Sharayu Tries To Hide The Things From Aditya That What She Has Told To Her Shalini Aai


दिशा:- भाग 36

सकाळपासूनच सीमा आईला एक आनंदी हुरूप चढला होता त्याच नादात आज खूप दिवसांनी ती काम करत गाणं गुणगुणत होती. तो बघून आत्याला नवलही वाटले आणि ती मनोमन सुखावली सुद्धा, कारण शरयू चे बाबा गेल्यापासून आज पहिल्यांदा तिने भावजयीला आनंदात बघितले होते.

"काय वहिनी?आज गाडी जरा वेगळ्या प्लॅटफॉर्म वर दिसतेय" खोडकरपणा करत ती म्हणाली.

"हो, कारणच तसे आहे"

"म्हणजे?"

सीमा आईने काल शालिनी आई आणि तिचे, शरयू बद्दल झालेली चर्चा आत्याच्या कानावर घातली तसे आत्या सुद्धा आनंदली, पण मनोमन ठरवले की आता शरयू ची खोड मोडायची . "मला सांगत नाही होय?" जरा लटक्या रागात ती पुटपुटली.

शरयू अंगाला अळोखे पिळोखे देत तिच्या रूम बाहेर आली आणि सवयीप्रमाणे ब्रश करायला गेली.
येऊन बघते तर या तिघी कॉफी चा आस्वाद घेत बसल्या होत्या आणि तिचा वाफाळता कॉफी मग टेबलवर ठेवला होता.

"काय मग शरयू, काय आजचा प्लॅन? आदित्य येतोय ना न्यायला?" आत्या एकदम बोलली तसे चमकून शरयू ने तिच्याकडे पाहिले.

"हो.. म्हणजे नाही!" अडखळत ती बोलली कारण आत्याचा रोख काही वेगळा आहे असे तिला जाणवलेच आणि त्याच वेळी दोन्ही आयांची झालेली नजरानजर तिने बघितली होती.

"चला मी आटोपते. ऑफीसला जायचे आहे" म्हणत ती उठली.

"शरय, तू शालिनी ताईंना म्हणाली होतीस ना की आज अदिती भेटायला येणार आहे"

"अरे हो! मी विसरलेच! आई तू बोलशील ना नीट अदिती सोबत? त्यावर ती आपल्याला तुझ्या त्या मुलींसाठी मदत करणार आहे"

"हो काळजी करू नकोस" शालिनी आई म्हणाली.

"काही वाटलेच तर मला किंवा आदित्यला कॉल कर" म्हणून ती आवरायला निघून गेली.

ती गेल्याबरोबर तिघी हसायला लागल्या.

ही रूम मध्ये जाताच "सुटले" असे मोठयाने म्हणाली. मनोमन मात्र ती आता थोडी घाबरली होती कारण आदित्य बद्दल जे खोटे ती बोलली ते आता नक्कीच लवकरच बाहेर पडणार होते.

ती निघाली तेव्हा आदित्यचा कॉल आलाच होता, त्याच्याशी बोलत ती घराबाहेर पडली.

दुपारी दोन च्या सुमारास दारावरची बेल वाजली. आत्या ने दरवाजा उघडला तेव्हा साधारण पंचविशी ची एक मुलगी जीन्स आणि टी शर्ट घातलेली, खांद्यावर सॅक घेऊन उभी होती.

"हॅलो मी अदिती!" तिने दरवाज्यात ओळख करून दिली.

"हो, ये ना आत. मी शरयू ची आत्या" आणि टेबल कडे बोट दाखवत म्हणाली "ही शरयू ची शालिनी आई आणि ही सीमा आई"

"हॅलो!"
"आदित्य बोलला असेल ना माझ्या येण्याबद्दल?"
"हो, बस ना तू" सीमा आई म्हणाली.

शालिनी आई सुद्धा तिच्या जवळ येऊन बसली. त्या दोघींचे बोलणे सुरू झाले. त्या मुलींबद्दल हवी असलेली माहिती ती घेत होती आणि शालिनी आई सुद्धा व्यवस्थित उत्तरे देत होती. दरम्यान सगळ्यांसाठी कॉफी आणि सोबत खारी बिस्कीटे घेऊन सीमा आई आली.
साधारण २ तास त्याबद्दलची चर्चा सुरू होती त्यानंतर त्यांचा निरोप घेत " काळजी नका करू. सगळं छान करूयात आपण त्यांचे" असे म्हणत आणि दिलासा देऊन आदिती निघून गेली.

आदितीला भेटून तिघीही खुश झाल्या. एकंदरीत आदित्य कडचे सगळेच चांगले असवेअसा त्यांचा ठाम विश्वास बनला होता.

इकडे ऑफिस मध्ये आदित्य समोर आज शरयू जरा शांत शांतच वावरत होती. ती असे का वावरते आहे हे त्याला समजत नव्हते पण फरक त्याला जाणवत होता.
प्रीती ने उलट त्यालाच काय झाले असे विचारले तेव्हा तो थोडा चक्रावला.

"शरयू मॅडम! काय आज कुठे हरवल्या आहात?" खोड्या काढत प्रीती बोलली.

"काही नाही" तुटक बोलून ती कामात असल्याचे दर्शवत होती. पण पिच्छा सोडेल ती प्रीती कुठली ना!

"गुमसूम गुमसुम! गुपचुप गुपचुप! क्यो बैठे हैं...."हे गाणे तिने मुद्दाम गायला सर्वात केली.
तसे एक वैतागलेला लूक शरयू ने तिला दिला. आता न बोलून काही होणार नाही हे लक्षात आल्याने ती प्रीतीला घेऊन कॅफेटेरिया मध्ये गेली.

"एक घोळ झालाय" ती बोलली
" तसे दुसरे काही वेगळे अपेक्षित नाही म्हणा तुझ्याकडून" प्रीती आपल्याच नादात होती
"तू ऐकणार असशील तर सांगते. पण पाहिले प्रॉमिस कर की मला मदत करशील?"
" मी का करू?"
"जा गेलीस उडत" चिडून शरयू जायला निघाली तसे प्रीती ने तिला जवळ खेचले आणि खुर्चीत बसवले.

शरयू ने तिला सगळे सांगितले की, कसे शालिनी आईला आणण्यासाठी आदित्य ने तिला मदत केली. आई तयार नव्हती तेव्हा आदित्य ने प्रपोज करून लग्नाला विचारले असे खोटे ती बोलली तेव्हा कुठे आई आली. हे सांगितले नसते तर आई आली नसती.
शिवाय सकाळचं घरातील त्या तिघींचे वागणं कसे होते हे सुध्दा सांगितलं.

प्रीती मोठाले डोळे करून फक्त ऐकत होती
मनातल्या मनात म्हणाली की "मस्तच झाले! या वेडीला अजूनही कळले नाही की तिला आदित्य आवडतो आहे. आणि तो तर आधीच तिच्या प्रेमात आहे म्हणून तर सगळी धावपळ करतोय ना" प्रीती हसली.

"तुला काय झालंय दात काढायला?" रागातच शरयू बोलली.
"आहे म्हणून दाखवते आहे. काही प्रॉब्लेम?"

"नाही " असे म्हणत वैतागतच ती कॉफी चे मग्ज आणायला काऊंटर ल गेली.

तोवर मोबाईल वर प्रितीचे काहीतरी उद्योग सुरू झालेच होते.

तिथे येत शरयू बोलली "तू मला मदत करणार आहेस! तू प्रॉमिस केलंय"

"हममम... देखते हैं!" स्टाइलमध्ये प्रीती बोलली आणि पुन्हा मोबाईल मध्ये डोकं खुपसून बसली.

"अशक्य आहेस तू" चिडत शरयू बोलली.

"तू टेन्शन मध्ये आलीस म्हणून काय मी पण तेच करू का? मदत करेल पण आताच असे नाही बोलले हे लक्षात ठेव. पण करेल नक्की" म्हणत तिने शरयू चा गाल खेचला.

तेवढ्यात समोरून आदित्य येताना दिसला तसे प्रीती ने लगेच त्याला हात दाखवत बोलावून घेतले.

"शरयू, अदिती गेली होती घरी तुझ्या" तो बोलतच होता त्याच वेळी शरयू ला कॉल आला. ती बोलत थोडी बाजूला झाली तसे प्रीती ने मोर्चा आदित्य कडे वळवला.

"काय आदित्य मग, कुठवर आलात?"
"काय कुठवर? म्हणजे काय?"

"अरे प्रोजेक्ट रे! तुला काय वाटलं" त्याला थोडे हडबडलेला बघत तिला मज्जा येत होती.

"ते होय! सुरू आहे. मला वाटलं तू काय बोलते आहेस"

"मी काय बोलणार? तुला काही वेगळं अपेक्षित होते का?"

"नाही, असे काही नाही"
"मग कसे?" ती पुरती फिरकी घेत होती.

आदित्यला काहीतरी शिजतंय हिच्या मनात याची कल्पना आली पण बोलणार काय आणि कसे? तो गप्पच राहिला.

"आदित्य मी जर तुला मैत्रीण वाटत असेल तर बोलू शकतोस माझ्याशी" प्रीती त्याच्या नजरेला नजर देत बोलली.

तेवढ्यात शरयू आली " अरे आईचाच कॉल होता. ती म्हणाली अदिती सोबत भेटून खूप छान वाटले आणि असेही वाटते आहे की नक्की काहीतरी चांगले होईल"

"ग्रेट!"
"मग मला तुमच्याकडून पार्टी कधी?" प्रीती फटकन पचकली.
"कशाची पार्टी" आदित्य न समजून बोलून गेला पण शरयू ने मात्र तिला बारीक चिमटा काढला तसे ती "आई ग!" करत ओरडलीच.

"काय झाले?"
"अरे काही नाही, डास चावला मला. इथे मार्टिन किंवा ऑल आऊट नाही लावत वाटत ही लोक" ती पुटपुटली.

"आदित्य हिच्याकडे लक्ष देऊ नकोस, येडी आहे ही"
"हो रे बाबा नकोस देऊस. फक्त हिच्याच कडे बघ आणि हिच्याच कडे लक्ष दे" मिश्किल खुन्नस देत प्रीती बोलली तसे आदित्यला पण हसायला आले पण मोठ्या मुश्किलीने त्याने स्वतःला कंट्रोल केलं.

"सगळ्यांना कॉन्फरन्स रूम मध्ये लगेच बोलावले आहे" पियुन सांगून गेला तसे \"काय झाले असावे अचानक\" असे म्हणत सगळे त्या दिशेने निघाले.

सगळे पोचताच मोठे साहेब तिथे आले. त्यांचा चेहरा बराच खूष दिसत होता. अख्खा स्टाफ त्यांच्याकडे बघत होता तसे ते म्हणाले,
"माझ्या सहकारी मित्रांनो,मला सांगायला आनंद होतो आहे की तुमच्या कष्टाला आणि क्रिएटिव्ह कामाला खूप छान दाद मिळाली आहे. आपल्याला खूप मोठे इंटरनॅशनल ॲड प्रोजेक्ट मिळाले आहे. अभिनंदन सगळ्यांचे"

तसे टाळ्यांचा कडकडाट झाला.

ते पुढे बोलू लागले "या प्रोजेक्टमुळे आपल्या कंपनीला खूप फायदा तर होईलच पण त्याहीपेक्षा मोठा की आपली कंपनी ही एक टॉप लिस्टेड कंपनी म्हणून यापुढे ओळखली जाईल. "

परत टाळ्या वाजल्या.

"या निमित्ताने, येत्या शनिवारी संध्याकाळी सगळ्या स्टाफ साठी एक पार्टी मी, गेट वे ऑफ इंडिया च्या समोर असलेल्या होटेल ताजमहाल पॅलेसमध्ये आयोजित करत आहे. सगळ्यांनी आपल्या कुटुंबीयांना घेऊन नक्की यायचे आहे. हे माझे आग्रहाचे निमंत्रण आहे."

टाळ्या वाजतच होत्या.

"हे यश जे तुमच्यामुळे मिळालं आहे तो आनंद तुमच्या सोबतच सेलिब्रेट करायला मला आवडेल. सो सी यु एव्हरीवन ऑन सॅटर्डे इव्हिनिंग विथ युवर फॅमिली"

इतके बोलून त्यांनी आपले थोडक्यात आटोपते घेतले.
प्रत्येकाला काहीतरी वेगळे पण मिळणार हेही नक्कीच होते कारण तसेही ॲप्रेझलची वेळ जवळ आली होती.

आदित्य आणि आणखी दोघांना सोबत घेऊन ते त्यांच्या केबिन मध्ये गेले.
शरयू आणि प्रीती दोघी एकमेकांना टाळ्या देत म्हणाल्या "वाह ताज...!"

क्रमशः
©® अमित मेढेकर

🎭 Series Post

View all