दिशा:- भाग 37

Everyone Got Ready For The Party. Sharayu Wears the Diamond Necklace


दिशा:- भाग 37

"तुझ्या ऑफिसच्या पार्टीला आमचे काय काम ?"
शालिनीआई समजावत होती पण शरयू काही ऐकण्याच्या मूडमध्ये नव्हती.
"आई, तू तर कधीच असं काही पाहिलं नाही तुला तर यावच लागेल. सोबत सीमा आई आणि आत्या आहेतच तर तुला काय लाजण्यासारखं?"

पूर्ण दिवस समजवल्यानंतर शेवटी शालिनी आई यायला तयार झाली. सगळेजण शनिवारची वाट पाहत होते..

या शनिवारी ऑफीस ला सुट्टी दिली होती. आज सगळेजण डायरेक्ट डिनरला भेटणार होते. खरंतर तिची आदित्य सोबत जायची इच्छा होती पण तो सकाळपासून "ताज" मध्ये होता. सरांनी बरेच काम सांगितलं होतं ते सगळं करत तो पार्टीचे अरेंजमेंट कडे सुद्धा बघत होता.

तिला पार्टी खूप खास करायची होती म्हणून घरातील सगळ्याजणी नाही नाही म्हणत असताना सुद्धा तिने दोन्ही आई साठी खास पैठणीची खरेदी केली आणि आत्याला सुद्धा पटोला साडी घेतली.

दुपारी तिने प्रीतीला घरी बोलून घेतले होते त्या दोघींची आवरण्याची लगबग तुफान चालली होती. खास ठेवणीतला नेव्ही ब्लू वन पीस आज शरयू घालणार होती. तर खास पार्टी गाऊन प्रीतीने स्वतःसाठी आणला होता.

संध्याकाळी सहा वाजता बरोबर सगळेजण बिल्डिंगच्या खालती आले. शरयू ने उबर बोलावली होती. घरापासून ताजला पोहोचायला त्यांना एक तास लागणार होता.
अत्यंत उत्साहाने सगळे जण पार्टीसाठी निघाले. शरयू च्या मनात प्रचंड धाकधुक होती. असणे साहजिकच होते कारण पहिल्यांदा तिने आज ब्लू वन पीस सोबत अमेरिकन डायमंड सेट, हाय हिल्स सँडल्स, चेहऱ्याला मस्त मेकअप, सोडलेले लांब केस आणि हातात ब्रेसलेट असे घालून ती तयार झाली होती. तिला पाहून आदित्यची काय रिएक्शन असेल हा विचार मनात चालला होता.
शालिनी आई अजूनही बुजल्यासारखी वाटत होती पण आत्या बिनधास्त होती त्याच्यामुळे वातावरण बरेच नॉर्मल झाले होते.

सगळेजण बरोबर सात वाजता ताज ला पोहोचले. पोचल्यावर शरयूने लगेच आदित्यला फोन केला आणि आम्ही आलो आहोत असे कळवले. त्याने सगळ्यांना लॉबीत थांबायला सांगितले.

हॉटेल लॉबीत एंट्री करून ते सगळेजण आदित्यची वाट पाहत बसले आणि समोरून तो आला. ब्लॅक कलरचा थ्री पीस सूट, खालती ब्लॅक कलरचे पॉलिश शूज, कोटाक्या हाताला कफलिंग्ज, जेल लावून व्यवस्थित सेट केलेले केस, क्लीन शेव चेहरा आणि प्रचंड आश्वासक स्माईल वाल्या आदित्य कडे सगळे जण पाहतच राहिले.
तो आला आणि त्याने सगळ्यांना ग्रीट केले. शरयू त्याच्याकडे पहातच राहिली. अफलातून हँडसम दिसत होता तो.
त्याला बघत असता शरयू ची जणू विकेट पडली. डोळ्याची पापणी न लवता तो समोर येऊन उभा राहिस्तोवर एकटक ती त्याच्याकडे बघत होती. त्याची काही वेगळी परिस्थिती नव्हती, तोही एका वेगळ्या ओढीने जणू फक्त तिच्याकडे खेचला जात होता. पाय चालत होते पण नजर स्थिर एकटक शरयू चे सौंदर्य न्याहाळत होती.

त्यांच्या नजरेचा हा खेळ तिघी जणी गालातल्या गालात हसत बघत होत्या. प्रीती ला मात्र जाम खोड्या काढायची लहर आली.

आदित्य समोर येऊन थांबताच ती पटकन समोर आली आणि दोघांच्या मध्ये ऊभी राहिली.
"हाय हांडसम! काय आज मर्डर करायचा विचार आहे की काय?"

खरंतर तिच्या बोलण्याने त्याची तंद्री भंगली होती. तिचे असे शरयू समोर येण्याने शरयू त्याला दिसत नव्हती त्यात प्रीती चे वाक्य!

"मर्डर????" कोणाचा? चमकून तो म्हणाला.

"अरे किसी के दिल का यार! किसी एक पे नजर रखोगे तो बाकी की लडकियोंके दिल तो तुट ही जाएगे ना" हलकेच शरयू कडे खुणावत डोळा मारत ती त्याला बोलली तसा तो ओशाळला.

"प्रीती काय आगाऊपणा आहे हा? अशी कशी मांजरासारखी आडवी येऊन उभी राहिलीस तू?" शरयू थोडी भडकली.

"ओ हो हो! म्हणजे मी आडवी आले काय! कोणाच्या मध्ये कळेल का मला?"

"बस कर तुझा फाजिलपणा.
हॅलो आदित्य! खूप भारदस्त दिसतो आहेस"

तेवढ्यात त्याच्या मागून अदिती एका स्त्री सोबत आली. त्यांना पहिल्या लगेच कळले की आदित्य ची आई आहे. अदितीने ने सगळ्यांना ग्रीट केले.

आदित्य ने पुढे होत शरयू तसेच तिच्या घरच्यांनी ओळख करून दिली तसें शरयू ने लगेच त्यांना दोन्ही हात जोडून नमस्कार केला. प्रीती ने सुद्धा स्वतःची ओळख करून दिली.

शरयू ने दोन्ही आईंची ओळख आपली आई अशीच दिली तरी त्यांना नवल वाटले असे कोणालाच जाणवले नाही.

सगळे सोबतच पुढे जायला निघाले, आदित्य ची आई त्या तिघीसोबत जुनी ओळख असल्यासारखी बोलत होती तर आदिती चा ताबा मुद्दाम प्रीती ने स्वतःकडे घेतला.
सगळ्यात मागे आदित्य आणि शरयू चालत होते.

"लूकिंग ब्युटीफूल!" नकळत आदित्य बोलून गेला तशी शरयू लाजली.
प्रीती ने हळूच आदितीला खुणावले मागे बघ!
अदिती ने झरकन मागे वळून बघितले आणि तिला ते दोघे बोलण्यात व्यस्त दिसले तशी ती प्रीती कडे बघून हसली.

हळू हळू सगळे आपापल्या घरच्यांसोबत येत होते, ओळखी होत होत्या.
शरयू आणि आदित्य ची फॅमिली एकत्रच बसले होते

ते आलिशान ताज हॉटेल! त्यातला भव्य देखावा, ती उत्तम प्रतीची पेंटिंग्ज, टेबल्स, कटलरी सगळे काही पहिल्यांदा अनुभवत असल्याने नवलाईने शालिनी आई बघत होती.
तिच्या नजरेत दिसणारे नवखेपण, भोळेपण आदित्य निरखत होता. त्याने हाताला धरून शालिनी आईला उठवले आणि पूर्ण लॉबी, त्याच्या बाजूचा कॉरिडॉर, तिथली रेस्टॉरंट्स, साईडला असलेली भली मोठी जागा तिला नेऊन दाखवली. तिथले मोठाले फ्लॉवरपोट, रंगीबेरंगी फुलं, ती सजावट, तिथल्या स्टाफ ची वागण्यातील अदब हे सगळे नवीन जग तिला दिसले होते.
आपसूकच तिच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या तसे आदित्य ने खांद्यावर हलकेच थोपटले आणि हसत म्हणाला चला आपण प्रोग्रॅम ला जाऊ.
तिने मान डोलावताच दोघेही त्या भल्या मोठ्या हॉलमधल्या चेअर वर येऊन बसले.

आदित्य, प्रीती, शरयू मध्येच येणाऱ्या आपल्या कलिगला ग्रीट करून येत होते. शरीर सगळ्यांना तिच्या दोन्ही ऐंशी ओळख मनापासून करून देत होती ते करताना तिच्या मनातला अभिमान सहज दिसत होता.

हे सगळे चालू होते तरी शालिनी आई बरीच बुजल्यासारखी वाटत होती. तिला थोडीशी चक्कर पण येत होती कदाचित या सगळ्या वातावरणाचे दडपण आले होते.

आणि तेवढ्यात कार्यक्रमास सुरुवात झाली. मोठ्या साहेबांचं आगमन झालेलं होतं. टाळ्यांच्या कडकडात सगळ्यांनी मोठ्या साहेबांचे स्वागत केले आणि ते स्टेज वरती पोहोचले. टाळ्या नुसत्या सुरू होत्या आणि सगळीकडे शिट्ट्या आणि हिप हिप हूर्रे चा गजर सुरू होता. सरांनी शांत बसा असं सांगून सुद्धा कोणीच टाळ्या शिट्ट्या थांबवत नव्हते. सगळा हॉल आवाजाने दुमदुमून गेला होता. आवाजाचे प्रेशर की काय पण शालिनी आई एकदम खुर्चीवरून चक्कर येऊन कोसळली.

क्रमशः
©® अमित मेढेकर

🎭 Series Post

View all