दिशा भाग 40

Sharayu And Aaditya Asks Many Questions To Sir


दिशा:- भाग 40

कोणीतरी लगबगीने पुढे आले आणि सरांना पाणी पुढे केले.पण त्यांचे लक्षच नव्हते.
आदित्य मात्र हाताची घडी घालून अत्यंत भेदक नजरेने त्यांच्याकडे पाहत होता तर शरयू चे रडून लाल झालेले डोळे पण जणू आग ओकत होते.
अचानक ते उठले आणि त्या हॉल मधून बाहेर पडत बाजूच्या एका कनेक्टेड छोट्या रूम मध्ये गेले आणि त्यांनी दरवाजा लावून घेतला.

काही मिनिटे एकदम शांतता पसरली होती. काय झाले कोणालाच कळत नव्हते. पण काहीतरी मोठे असावे याचा अंदाज आला होता. सगळे कुजबुजत होते तर काही आदित्य भोवती गोळा झाले होते.

सीमा आई आणि आत्या, शालिनी आईला धरून बसल्या होत्या तर शरयू नकळतणे आदित्य चा हात घट्ट घरून होतो.

तेवढ्यात सरांच्या असिस्टंट ने हळूच येऊन सांगितले की आदित्य तुला बोलावले आहे.

आदित्य तसाच झपाझप पावले टाकत सोबत शरयू ला घेऊन निघाला.

विचित्र परिस्थिती होती सरांनी रुमाल बाहेर काढला होता आणि ते तोंडावरचा घाम पुसत होते बाजूला पाण्याची बॉटल होती आणि त्यांच्याजवळ असलेले अस्थमाची मेडिसिन काढलेली दिसत होती.

तो समोर येऊन उभा राहिला तसे त्यांनी त्याच्याकडे बघितले आणि क्षणभर शांत राहिले.

शरयू ला सोबत पाहून त्यांच्या कपाळावर किंचित आठी होती पण ते काहीच बोलले नाहीत.

बराच वेळ झाला कोणीच एकमेकांशी बोलत नव्हतं तसे शेवटी सर म्हणाले, सांगितले "आदित्य या तुला कुठे मिळाल्या?"

"कोण आहेत या?"

"तुला माहित नाही?" त्यांनीच प्रश्नार्थक विचारले.

"नाही!तुमच्या तोंडून ऐकायचे आहे सर"

"कुठे भेटल्या?"

"कुठे भेटायला हव्या होत्या?"

"आदित्य...! विसरू नको तुझ्या चेअरमनशी बोलतोयस."

"पूर्णपणे कल्पना आहे सर मला याची आणि म्हणूनच तुम्हाला विचारतो आहे....बोला ना सर? कुठे असायला हव्या त्या? आणि आहेत तरी कोण या?"

"माझी......माझी.....बायको.."हलकेच पुटपुटले ते.

"अच्छा, तुमची बायको! पण नाते तेवढ्यावरच थांबले नाही सर, तुमच्या बायको सोबत ती कोणाची आई सुध्दा आहे"

"आई...कोणाची?" चमकून त्यांनी विचारले

तसे आदित्य ने शरयु ला त्यांच्या समोर उभे केले.

मोठाले डोळे करून ते बघताच राहिले. थोडा अविश्वास, थोडे कुतुहल असे संमिश्रित भाव त्यांच्या चेहऱ्यावर उमटले.
शरयू मात्र तिरस्काराने त्यांच्याकडे बघत होती.

"म्हणजे शरयू ....शरयू माझी ....माझी...." ते पुढे काही बोलूच शकले नाहीत.

"सर तुम्हालाच माहिती की तुम्ही काय केले आहे ते..
ज्यावेळेस तुम्ही वागलात त्यावेळेस आमचा जन्म नव्हता झाला त्यामुळे आम्हाला काही सांगण्यापेक्षा तुम्ही हिच्या आईशी काय ते बोला बहुतेक अनेक वर्षांच्या न्यायाची वाट त्या पाहत असतील." त्याच्या बोलण्यात एक वेगळाच फर्मनेस होता.

"मला नाही वाटते मी तिला आत्ता फेस करू शकेल"

"हे तुम्ही म्हणताय सर? एवढ्या भल्या मोठा कंपनीचे मालक, एवढी इन्व्हेस्टमेंट स्वतःच्या नावावर, एवढे लोक तुम्हाला मानतात, एवढा तुमचा सगळीकडे मोठ्या लोकांच्या मध्ये वावर आहे, असे तुम्ही एका स्त्रीला फेस नाही करू शकत असं म्हणत आहेत...नक्की काय समजावे सर मी?"

"हो नाही करू शकत मी, कारण तेव्हाचा मी आणि आत्ताचा मी यात खूप फरक आहे. त्यामध्ये युगे लोटली आहेत. पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे आत्ताच्या मी मध्ये तो आधीचा मी कुठेच नाही.."

"कसे असणार सर?" एकदम शरयू बोलली.
तसे सरांनी तिच्याकडे ताडकन वळून पाहिले.

"कसे असणार सांगा ना सर..?" तुमची बायको तुमच्या सांगण्याकरता घर सोडून येते आणि तिला तुम्ही एका अनोख्या स्त्रीबरोबर सोडतात.. काय तर पुढे ती वेश्या म्हणून आयुष्य जगावे यासाठी.
तुमचं सगळं चांगलं होणार होतं आणि तिचं काय? काहीच नाही.. तिच्या आयुष्याची किती वर्ष तिने त्या वेश्यागृहात घालवली.. कशासाठी? जगण्यासाठी?
नाही सर...एक मुलगी जिला तिने जन्म दिला.. ती आयुष्यात कधीतरी मिळेल..परत भेटेल यासाठी...
ती रोज तुकडा तुकडा मरत राहीली.

अनेक अपमान सहन केले तिने.. अनेक त्रास भोगले.. या सगळ्यांमध्ये तुमची हजारो वेळा आठवण काढली असेल.. पण तुम्ही या सगळ्याच्या पलीकडे होता... खरंतर कुठेच नव्हता...स्वतःला पुढे नेण्याकरता तुम्ही त्या स्त्रीचा बळी दिला सर... कायमस्वरूपी!

तुम्ही हत्यारे आहात सर.. तुम्ही एका निरागस जीवाची हत्या केली आहे. तिला पळवून आणले हा गुन्हा केला. तिला आशेला लावले हा गुन्हा केला. जेव्हा ती प्रेग्नेंट राहिली तेव्हा तिला सोडून गेले हा गुन्हा केला. तिला एक वेश्या बनण्यासाठी प्रवृत्त केले हा गुन्हा केला..

गुन्हा तर फार मोठा आहे सर ..तो नुसता फेस करून थोडीच कमी होणार?"

शरयू च्या एवढ्या धारदार आणि तिखट बोलण्याने सर अक्षरशः कोसळले आणि रडायला लागले.

क्रमशः
अमित मेढेकर

🎭 Series Post

View all