दिशा भाग 41

Sharayu Asks Questions To His Sir Which He Has No Answers


दिशा:- भाग 41

शरयू ची जळजळीत नजर त्यांना सहन होत नव्हती. आपल्याला इतकी गोड मुलगी आहे? हा प्रश्न ते स्वतःला विचारत होते.

"सर ! तुमची बायको कुठे भेटली विचारत होतात ना तुम्ही?"

त्यांची नजर आता मात्र वर होत नव्हती.

"ऐकायचे आहे का कुठे भेटल्या त्या?"त्याने पुन्हा विचारले.

"त्या जिथे भेटल्या तिथे तुम्ही पाऊल तरी टाकलं का? त्या वस्तीत आपली बायको सोडताना विचार केलात काही?"

अचानक त्यांना हुंदका आणि ते ओंजळीत तोंड खुपसून रडायला लागले. तसे शरयू चा संताप उफाळून आला.

"तुम्ही रडत आहात?
खरचं तुम्ही रडत आहात?

माणुसकी आहे का तुमच्यात? आजवर तुमच्याकडे बघून जो आदर वाटायचा तो पार धुळीला मिळाला आहे. माझी आई मला माहित देखील नव्हती. ज्या क्षणाला ते कळले त्या क्षणाला जो धक्का मला बसला तो मी कोणाला बोलूही शकले नाही. आनंद तर खूप झाला ती भेटली म्हणून पण ज्या परि्थितीत भेटली ते पाहून मात्र जीव तीळ तीळ तुटला. त्या क्षणालाच ठरवले की, ज्या नराधमाने माझ्या आईची ही अवस्था केली तो समोर आला मी त्याचा गळा दाबेन...."

"बस्... बस् कर शरयू...नाही ऐकवत मला"

"का नाही ऐकवत तुम्हाला? कसला त्रास होतो आहे? जर माझ्या चार शब्दाने तुम्हाला त्रास होतोय तर कधी विचार केलाय का तिचा? तिच्या मनाचा? काय भोगले असेल तिने? काय सहन केले असेल? बायको होती ना तुमची? जिने तुमच्यावर विश्वास ठेऊन आपल्या आईला सोडले! तिचा जाणून बुजून विश्वासघात केला! त्या धक्क्याने मेली तिची आई... जेव्हा ही तुमच्या सोबत पळाली. काय मिळाले तिला तुमच्यावर विश्वास ठेऊन ?
नराधम आहात तुम्ही!

ज्या बायकोला दुसऱ्याच्या हातात सोपवले ना तेव्हा तुमच्याच बाळाची आई होणार होती ती.
पण नशिबी काय आले? दर दिवसाला नवीन पुरुष? काय दोष होता तिचा? तिने प्रेम केले हा की, तुमच्यावर विश्वास ठेवला हा?
रोज कणाकणाने मरत होती ती गेली 22 वर्षे.मग तुमचा त्रास मोठा का तिचा?

साधे शब्द तुम्हाला ऐकवत नाही पण तिने हे भोगले आहे. प्रेमात आंधळी झाली होती ती, पण चांगल्या घरची मुलगी होती ना... काय नशिबी आले तर वेश्याव्यवसाय!
लग्न केले होते तिने. सुखी संसाराची स्वप्न बघितली होती पण तुम्ही राखरांगोळी केलीत तिच्या स्वप्नांची..तिच्या भावनांची, तिच्या भावविश्वाची, तिच्या आयुष्याची सुद्धा. काय सहन केलं असेल तिने, दरदिवशी याची कल्पना तरी आहे का?

तुम्ही मोठे बनलाय, श्रीमंत झालात, आयुष्य जगलात! आज सद्गृहस्थ म्हणून मिरवतात आहेत पण प्रत्यक्षात काय आहात? एक मतलबी मनुष्य ज्याने स्वतः चा फायदा बघितला फक्त.

अशा परिस्थितीत आपल्या मुलीचे जीवन, भविष्य उध्वस्त व्हायला नको म्हणून त्या माऊलीने काळजावर दगड ठेवला आणि मला एका चांगल्या घरात दत्तक दिले. नाहीतर मीही आज त्याच वेश्या गृहात...."

"शरयू बस कर...मी हात जोडतो तुला बस्..." म्हणत ते बाजूच्या खुर्चीत कोसळले आणि ओक्साबोक्शी रडायला लागले.

ते बघत आदित्य हाताची घडी घालून शांत उभा होता. शरयू मधील हा संताप, उद्वेग बाहेर पडणे गरजेचे आहे हे त्याला पूर्ण माहित होते.

ज्वालामुखी बनाण्याआधी हे घडणे आवश्यक वाटले त्याला त्यामुळे तो फक्त शांतपणे बघत होता.
शरयू नुसती धुस पुसत होती.

"मी आईंना घेऊन येतो " आदित्य बोलला

"नको..नको! काय बोलू मी तिच्यापुढे" सर एकदम म्हणाले.

"तुम्हाला बोलावच लागेल. शरय, आईला इथे सोडतो आणि मी बाहेर जातो"

"नाही आदित्य, तू सुद्धा इथेच थांब".

"शरयू, हा तुझ्या घरातला विषय आहे तुम्ही घरचेच बघा मी तुझ्यासोबत आहे कायम.पण आता मी बाहेर थांबेल"

"तू कुठे बाहेरचा? तुही माझ्या घरातलाच आहेस"

"नाही शरयू.. मी बाहेर थांबणे हेच योग्य! आईला तुझी गरज आहे कारण त्या काहीच बोलणार नाहीत जर तू नसशील तर"

त्याच्या एवढ्या फर्म बोलण्यापुढे शरयू काही बोलू शकली नाही.

तो सरांकडे वळून म्हणाला, "त्या आधी तुम्हाला बाहेर जाऊन भेटावे लागेल सगळ्यांना आणि सांगावे लागेल की तुमची तब्येत बिघडली आहे.तुम्ही सगळे एन्जॉय करा.. तुम्ही थोड्या वेळानंतर त्यांना जॉईन व्हाल.
कारण मगापसून सगळे चौकशी करत आहेत की काय झाले. घरातील गोष्ट बाहेर नको जायला असे मला वाटते"

त्यांनी मान डोलवली आणि ते उठले. त्या रूम ला लागून असलेल्या बाथरूम मध्ये फ्रेश व्हायला गेले तसे शरयू आदित्यला घट्ट पकडुन रडू लागली. त्याने हलकेच तिच्या डोक्यावरून हात फिरवून जणू सांगितले की, मी आहे तुझ्या सोबत.

फ्रेश होऊन नॉर्मल असण्याचा मुखवटा घालून ते आदित्य सोबत निघाले.

ते निघाले तेव्हा, \"आई आत आल्यावर कशी रिॲक्ट होईल\" ही काळजी शरयू क्या चेहऱ्यावर झळकत होती.

सर बाहेर आले आणि सगळ्यांना म्हणाले, "हॅलो माय फ्रेंड्स, अचानक थोडी तब्येत बिघडली आणि मला पार्टी सोडावी लागली. गेल्या दोन-तीन दिवसातला कामाचा व्याप, झोप नाही आणि नवीन प्रोजेक्टची धावपळ या सगळ्यामुळे बहुतेक मला थोडा ताण आला असेल.. तुमच्यासारखा मी यंग नाही ना.. !माझे हात पाय एवढे सहज हालत नाहीत!"
असे म्हणाल्यावर तिथे हशा पिकला.

"पण डोन्ट वरी माझे डॉक्टर येत आहे आणि त्यांनी एकदा चेक केल्यावर ती मी परत तुमच्याबरोबर पार्टी जॉईन करत असाल एव्हरीवन प्लीज रिलॅक्स अँड एन्जॉय युवर सेल्फ!"

सरांच्या त्या आश्वासन बोलण्याने सगळे निश्चिंत झाले.
सर परत त्या रूममध्ये जाण्यासाठी निघाले.
त्यांच्या मागोमग आदित्य निघाला. आता मात्र तो एकटा जाणार नव्हता तर शालिनी आईला घेऊन तो त्या रूममध्ये शिरणार होता.

क्रमशः
©®अमित मेढेकर

🎭 Series Post

View all