दिशा भाग 43

Shalini Speaks Her Mind And Everyone Gets Stunned


दिशा:- भाग 43

"एका वेश्येशी बोलायला तुम्हाला कमीपणा तर वाटणार नाही ना मोठे साहेब?".....आणि शालिनी बोलली!

तिचे रडणं थांबून ती बोलायला लागली, आणि सगळे स्तब्ध झाले. आता या क्षणी तिच्या बोलण्यात एक जबरदस्त ताकद होती. एक आर्जव होते, एक वेगळा साज होता, एक वेगळाच भाव होता. असे वाटत होते की, ती स्वतःचे अंतकरण काढून बोलते आहे.
तिच्या बोलण्याने तिथे असलेले सगळे लोक अक्षरशः आतून रडायला लागले.

"तुम्ही सोडलेली शालिनी आणि तुमच्यासमोर उभी असलेली शालिनी यात खूप फरक आहे, साहेब.
ती भोळी, साधी, शांत आणि विश्वासाने तुमच्यासोबत घर सोडून आली होती. तिला एकचं माहिती होतं की, मी या माणसावर प्रेम करते आणि हा माणूस मला कधीच सोडणार नाही. माणसं ओळखण्याची ताकद तेव्हा नव्हती असं वाटायचं जे काही सुरू आहे ते योग्यच !
तुमच्या बोलण्यावरती फसले!
तुमच्या वागण्यावरती भुलले !
तुमच्या अस्तित्वावरती फिदा झाले!

का तर फक्त तेव्हा वाटत होते, तुम्ही मला आपले मानले आहे आणि मला घेऊन संसार थाटणार आहात.
किती वेडी होते ना मी? काय काय विचार करायचे, असं वाटायचं किती सुंदर आयुष्य आहे. पण त्या आयुष्याची पुढे राख रांगोळी होणारे हे तेव्हा थोडीच माहिती होते.

23 वर्ष होतील या गोष्टीला मला एकटीला सोडून जायचं त्या बाईच्या हवाली करायचं, तिथून पुण्याला वेश्यावस्तीत राहायला जायचं, तुम्हाला किती सोप्प वाटत असेल ना? सगळं तुम्ही तुमच्या मनाचे केलेत!
मग एका स्त्रीची अब्रू लुटली किंवा तिला बळी दिले तर तुमचं काय जाणार होतं ? कारण तुम्ही वचन देऊन विसरला होतात. किती मोठा विश्वासघात केलात माझा. खरं तर त्याच वेळेस कदाचित मी धक्क्याने मेले असते पण ही शरयू पोटात होती असे वाटले तिच्यासाठी का होईना जगावे.

हिचा जन्म झाला त्यावेळेस हिचे आयुष्य पण माझ्यासारखेच होणार का ? हा असा मोठा प्रश्न सतत मनाला पडत होता. तिला चांगले आयुष्य नशिबी यावे माझ्यासारखी आयुष्याची वणवण नको म्हणून तिला सुरक्षित जागी हलवण्यासाठी स्वतःच्या मनावर दगड ठेवला.
नवरा गमावला होताच आता एकुलती एक मुलीला सुद्धा लांब ठेवण्याची गरज होती.तसेच जगायचे होते मला ,माझ्याबद्दल किंचितही दया, सहानुभूती कीव मला कोणी दिलेली नको होती .

पण ज्याच्या वरती प्रेम केले, ज्याला सर्वस्व मानले, ज्याच्यासाठी घर सोडून आले त्यांनी आपल्याला दुसऱ्या पुरुषांच्या हवाली केले, माझ्या इज्जतीची वस्त्रे वेशीवरती टांगली...वाह. किती भाग्यवान आहे ना मी?

दररोज सकाळी वेगळा, दुपारी वेगळा माणूस यायचा. या शरीराला हव्या त्या पद्धतीने ओरबाडून घ्यायचा.
पण मी मनातून इतकी रक्तबंबाळ झाले होते की मला शरीराला कधी वेदना झाल्यास नाहीत.
तुकडे पडायचे शरीराचे आणि ज्याला हवेत तसे ते लचके तोडत होते. का जगत होते मी ?कुठल्या गोष्टींची इच्छा मनात होती ?
कधीच विचार केला नव्हता की तुम्ही भेटाल. कधी हाही विचार नाही केला की शरयू मला न्यायला येईल.

मग मी काय करत होते दररोज स्वतःला मारत होते,त्रास करून घेत होते, वैतागत होते, स्वतःवरच चिडत होते. असंख्य मरण एका वेळेस मरत होते कारण मी फक्त आणि फक्त एक उपभोग्य वस्तू होते. जिला भावना नव्हती..इच्छा नव्हती! जिला केवळ दुसऱ्यांना स्वतःचं शरीर नैवेद्य म्हणून वाटायची एवढीच परवानगी होती.

माझ्या नंतर अनेक स्त्रिया तिथे आल्या प्रत्येक वेळेला मला वाटायचे कुठल्याही स्त्रीने तिथे येऊ नये .लहान मुलींनी तर अजिबात येऊ नये .
खरं तर जोशी साहेबांनी खूप उपकार केले माझ्यावर माझ्या शरयूला सांभाळून. त्यांनी मला फक्त एकच गोष्टी करायला सांगितली होती जी मी केली, की मी कधीच त्यांना संपर्क केला नाही.

तुम्ही दुबईला गेलात अजून परदेशात गेलात,पैसे कमवले, उडवले, मुली उपभोगल्या, दारू पिली या सगळ्यांमध्ये प्रत्येक क्षणाला मी मरत होते. तुम्ही जगत होतात!

तुमच्या जगण्याच्या मागे मी नसेल कदाचित पण, माझ्या रोजच्या मरण्याच्या मागे तुम्ही स्वतः होतात !

किती वर्षे झाली मला, मी दररोज मरण मरत होते आणि मला मारणारा माझा हत्यारा आनंद उपभोग होता. म्हणले ना.. भाग्यवान आहे मी.
माझ्या बाबतीमध्ये माझ्या नशिबाला मी दोष देणे अपेक्षित आहे कारण तुम्हाला दोष देऊन उपयोग नाही

आज जर इथे भेटला नसतात तर तुम्हाला हेही माहिती नव्हतं की मी जिवंत आहे का मेले !
काय बोलू अजून काय बोलायचं राहिले तुम्हाला ?
आत्ता तुम्हाला रडायला येतंय आणि मी किंचित कधी तरी हसली असेल.

आता कशाचं काय वाटत नाही .
असे वाटते जे झाले ते झाले पण माझ्या आयुष्याची सगळी वर्षे वाया गेली!
माझं तारुण्य गेलं!
माझ्या ईच्छा गेल्या !
माझ्या आकांक्षा गेल्या!
माझ्या अपेक्षा गेल्या!
माझी माणसं गेली!
माझं स्वत्व गेलं !
माझं अस्तित्व गेलं !
माझं सर्व काही गेलं !

आता काय सांग.. काय मागू.... काय रागवू?
मागे काही राहिलं नाही. मला आता कसल्याच गोष्टींबद्दल काहीही वाटत नाही. तुमच्याबद्दल पण काही नाही" एवढे बोलून शालिनी आई बोलायचं थांबली

शरयू तिला घट्ट पकडून प्रचंड रडत होती.
सर पुतळा झाले होते पण डोळ्यातून घळाघळा पाणी ओघळत होते आणि आदित्य स्तब्ध होता.

सरांच्या हाता पायाला पूर्ण कंप सुटला होता. खुर्चीवर बसलेले ते एकदम उभे राहिले आणि खाडकिनी शालिनी आईच्या पायावरती लोटांगण घालून रडायला लागले.

आई मागे सरकली पण त्यांनी तिचे पाय घट्ट धरले होते .
"माफ कर शालिनी! माफ कर मला! खरंतर नको करू माफ, उलट या पायानेच मला तुडव! लाथ मार
किंवा मला पूर्णपणे मारून टाक. तरी मी तुझा अपराधीच आहे.
मी नाही क्षमेला पात्र...तुझा या जन्माचा मी प्रचंड मोठा पापी आहे .
माझ्याकडून मोठा गुन्हा झाला आहे. मी तू देईल ती शिक्षा भोगायला तयार आहे.
तुला मला मारायचे, पोलिसांच्या हवाली करायचं किंवा अजून काही वेगळे करायचे आहे ते मी सगळे मान्य करतो.
माझ्या सगळ्या चुकांना मी माफी मागणं हे चुकीचं ठरेल पण तरीही जमलं तर केवळ एकदा फक्त एकदा म्हण की मला माफ केले. कुठल्या तोंडात मी माफी मागतो हे मला माझंच कळत नाही पण, आता जर तू माफ केले नाही तर मग कदाचित मी एवढे मोठे ओझे घेऊन जगू शकणार नाही.

माफ कर मला शालिनी, माफ कर खरंच माफ कर! तुझा फार मोठा अपराधी मी आहे माफ कर मला!"

तिच्या पायावर लोटांगण घालत ते बोलत होते. ती निश्चल उभी होती तर शरयू आता रागाने थरथरत होती.

क्रमशः
©® अमित मेढेकर

🎭 Series Post

View all