दिशा भाग 45

Sharayu Is Firm About How To Deal With Her Father


दिशा:- भाग 45

आईचे असे उत्तर ऐकताच शरयू शॉक झाली. आपली आई माफ करायला तयार आहे ?
तिने स्वतःचे दुःख बाजूला ठेवले का?
अजूनही तिचे तिच्या नवऱ्यावर प्रेम आहे का?

क्षणात अनेक प्रश्न तिला त्रास देऊन गेले तसे ती तणतणत आईच्या खोलीत गेली.

"आई हे काय उत्तर दिलेस तू त्या माणसाला?"

"काय बोलले मी?"

"जर मी माफ करत असेल तर....? म्हणजे काय?"

"शरयू मला फक्त तू हवी आहेस! तू मला इथे आणले आहेस त्यामुळे यापुढे माझं आयुष्य हे आता तुझं आहे.
तू म्हणशील, जिथे नेशील , जे सांगशील ते आणि तसेच मी करणार!" ठामपणे आई म्हणाली तसे ती चकित झाली.
तिचे हे उत्तर आणि तिने सरांना सांगितलेले या दोन्हीं चे कुठेच काहीच जुळत नव्हते.
सीमा आई आणि आत्या ने मध्ये पडायचे नाही हे पक्के ठरवले होते.

ती स्वतःवरतीच राग करत बाहेर आली.
"तुम्हाला काय हवे आता नक्की? का मला आणि माझ्या आईला जगू देत नाही आहेत? आता चार तासापूर्वी पर्यंत तर तुम्ही आनंदी होता! सगळा कौतुक सोहळा सुरू होता, तोवर तर आई आठवली नाही, ना ही इतकी वर्षे तिला शोधायची गरज पडली तुम्हाला मग अचानक का आता माफी हवीय? कशासाठी आई हवी आहे माझी? कोण लागता तुम्ही आमचे? ज्याने आपल्या बायकोला नाही महत्व दिले ना ही माणुसकी दाखवली त्याला आता प्रेमाचा उमाळा येतोय?" ती बोलतच सुटली आणि आत निघून गेली.

"मला पाणी मिळेल का?" ते आत्याला उद्देशून बोलले.

आत्या पाणी आणायला गेली तोवर त्यांनी आदित्यला कॉल केला.

"आदित्य आताच्या आता शरयू क्या घरी येतोस का?"

त्याला नवल वाटले "शरयू च्या घरी?" तो आश्चर्याने म्हणाला.

"हो! मी तिथेच आहे. मला तुझी गरज आहे, ताबडतोब ये"

"सर, इथे मी पार्टीचे बघतो आहे ते ही तुमच्या सांगण्यावरून "

"आता काहीही कर! प्रीती, आशिष किंवा नम्रता कोणालाही जवाबदारी दे पण इथे ये" त्यांचा स्वर कातर झाला होता. वेगळाच हळवेपणा त्यात आदित्यला जाणवला तसे त्याने पार्टीचे बघायला बाकी लोकांना सांगितले आणि तो तडक शरयू कडे निघाला.

सुमारे पाऊण तासात तो तिथे पोचला तोवर सर सोफ्यावर मान टेकून शांत बसले होते पण त्यांना घाम आला होता.

आत्या ने दरवाजा उघडून आदित्यला आत घेतले.
आता येताच तो सरांकडे चालत आला "काय झाले सर?" तो म्हणाला

त्यांनी डोळे उघडले आणि म्हणाले " आदित्य मला मदत कर. मला शरयू आणि तिच्या आईची माफी मागायची आहे.पण शरयू खूप संतापली आहे"

"सर मी बाहेरचा आहे पण मी काही बोलू का?"

"बोल ना.. निसंकोच पणे बोल"

"सर, का हवी आहे तुम्हाला त्यांची माफी? का माफ करावे तिच्या आईने तुम्हाला? असे काय केलेत तुम्ही ज्यासाठी तुमचा विचार त्यांनी करावा?"

"आदित्य मी जगू शकणार नाही त्यांनी मला माफ नाही केले तर! सतत एक ओझे मनावर असेल जे आत्ताच सहन होत नाहीय मला!"

"वाह सर! मानले तुमच्या स्वार्थीपणाला?" आदित्य एकदम बोलून गेला तसे ते चपापले आणि त्याच्याकडे बघू लागले.

"अजूनही तुम्ही स्वतः चाच विचार करताय? तुम्ही कसे जगाल? तुमच्या मनावर ओझे? तुम्हाला सहज गिल्ट मधून बाहेर यायचे म्हणून तुम्हाला हे हवे आहे? इतके सोपे आहे का ते? आईने २२ वर्ष त्या नरकात काढलीत आणि आपल्या काळजाच्या तुकड्याला सुद्धा बघितले नाही. ते घाव क्षणात बरे होईल असे तुम्हाला वाटते का?" आता आदित्य सुद्धा त्यांना आरसा दाखवत होता.

आता त्यांना दरदरून घाम सुटला होता आणि त्यांनी डावा खांदा दाबायला सुरुवात केली पण त्यांची पकड सैल झाली आणि ते सोफ्यावर बाजूला कोसळले.

"शरयू!" आदित्य ने मोठ्याने आवाज दिला तशी ती बाहेर आली. त्यांना बघितले आणि किंचित हसत म्हणाली " ते नाटक करत आहेत" आणि पुन्हा निघून गेली.

पण प्रसंगाचे गांभीर्य लक्षात आल्याने आदित्य ने लगेच लीलावती ला कॉल करून कारर्डिआक अँब्युलन्स मागवली.
पुढच्या 10 मिनटात अँब्युलन्स आली तसे तात्काळ त्यांना हॉस्पिटल मध्ये अडमीट करण्यासाठी आदित्य घेऊन गेला.

तिथं पोचल्यावर डॉक्टर ने सांगितले त्यांना सिव्हियर हार्ट अटॅक आला आहे आणि त्यांना ICU मध्ये दाखल केले आहे.

काचेतून आदित्यने पाहिले तर त्यांना ऑक्सीजन मास्क लावला होता, सलाईन आणि सपोर्ट म्हणून असे बरेच काही त्यांना जोडले गेले होते. बाजूला एका स्क्रीन वर काहीतरी ग्राफ सारखे वर खाली होत होते.

एवढा वेळ ती एकटाच होता पण तिथं मनुष्य बळाची आवश्यकता होती.
त्याने पार्टी च्या ठिकाणी नम्रता आणि आशिष ला फोन केला आणि सांगितले, सर हॉस्पिटल मध्ये आहेत व त्यांची स्थिती नाजूक आहे.

त्याने शरयू आणि आईला कॉल करणे योग्य समजले आणि कॉल केला.
"शरयू सर क्रिटिकल आहेत असे डॉक्टर म्हणले आहेत" तो सरळ मुद्यच बोलला.

"मग मी काय करू? तुला थांबायचे तर थांब नाहीतर घरी जा. मला कॉल नको करुस या विषयी सांगायला" एकदम तोडून ती बोलली.

"आईला फोन दे" तो ही भिड ना बाळगता बोलला.

"का देऊ? काय बोलायचे आहे तुला?" आज पहिल्यांदा ती अडवत होती.

"शरयू बालिशपणा सोड, आईला ठरवू दे तिला काय करायचे ते. तू त्यांच्या मध्ये पडू नकोस. आज तुला काही तासांपूर्वी कळले की ते तुझे बाबा आहेत त्यामुळे तू संतापली पण एक सांग त्या आधी त्यांच्याबद्दल तुला आदर होता ना?"

ती काहीच न बोलता शांत राहिली.

" जर हे कळले नसते आणि सर जर आजारी पडून हॉस्पिटलला असते तर तू अशीच वागली असतीस का?"

"नाही!" इतकेच ती बोलली.

आज पहिल्यांदा तो जरा हुकमी स्वरात बोलला तसे नाराजीने तिने आईला फोन दिला.

"आई, सरांची तब्येत खूप क्रिटिकल आहे, काहीच सांगता येत नाही. तू यावे असे मला वाटते आहे,बाकी तू ठरव" मोजकेच पण योग्य ते तो बोलला आणि त्याने कॉल कट केला.

आईने काहीही न बोलता तिच्याकडे बघितले आणि रुमकडे निघाली.

सीमा आई आली आणि तिने शरयू कडे सूचक बघितले आणि आईकडे नजर फिरवली तसे शरयू बोलली "आई, चल हॉस्पिटल ला " तसे सीमा आईच्या चेहऱ्यावर समाधान आले.


शालिनी आई काहीच न बोलता फक्त शरयू च्या मागे चालत निघाली. कॅब मध्ये सुद्धा शांतच होती,फक्त बाहेर बघत होती पण आतून तिच्या मनात खूप खळबळ माजली होती.

एव्हाना ऑफीस मधील बरीच लोकं तिथे आली होती. सगळ्यांना हे जाणवले होते की एक बाई आणि शरयू आत भेटायला गेल्यानंतर सरांची तब्येत बिघडली होती.

आदित्य ला सगळे विचारत होते की ती बाई कोण आहे? शरयू सोबत ती का आली? सरांना अचानक का त्रास होऊ लागला?

आदित्य ने इतकेच उत्तर दिले, "त्या बाई म्हणजे सरांच्या पत्नी आहेत. बाकी शरयू तुमच्याशी बोलेल".

तेवढ्यात शरयू आणि शालिनी आई आल्या. आय सी यू च्या काचेतून बघितले तर त्याते दृश्य बघून जणू हेलावल्या असे आदित्यला जाणवले.

"आई, तू आत जाऊन बघू शकतेस. शरयू तू जरा येतेस् का बरोबर" आदित्य म्हणाला.

तिने मान डोलावली तसे आदित्य तिला घेऊन कॅन्टीन मध्ये आला.

"शरयू तुला असे नाही वाटत का की, तू जास्ती इंटरफेयर करत आहेस त्यांच्यात"

तसे तिने चमकून आदित्य कडे बघितले.

"कधी काळी ते नवरा बायको होते हे विसरू नकोस. भावना असतातच, आज तुझ्यापुढे जायचे नाही हे आईने ठरवले कारण तू तिला हवी आहेस पण ह्याचा अर्थ हा होते का की तू तिची हुकूमशहा बनावी?
तिने बस म्हणल्यावर बसावे आणि उठ म्हटल्यावर उठावे.

तिला तिचा निर्णय घेऊ दे. तू मुलगी आहेस त्यांची,काय घडते ते बघ शांतपणे, आणि हो, एक बघ आज सर एक खूप मोठे प्रस्थआहे.त्यांनी हे सगळे एम्पायर स्वतःच्या कामाने आणि चांगले वागल्याने मिळवले आहे. त्यांच्यावर आज अनेक लोक विसंबून आहेत तेव्हा नीट विचार करून वाग" असे म्हणून तो तिथून चालता झाला तसे शरयू पाठमोऱ्या त्याला फक्त बघत राहिली.

तिलाही जाणवले की आपले काहीतरी चुकतंय का?

ती आली तेव्हा आई बाहेरूनच बघत होती.
" आई आत जाऊन भेटूयात"

तसे आई आणि ती आई ICU मध्ये जायला वळल्या, नर्स ने हटकले पण आदित्य ने संगितले की त्यांचे आत जाणे गरजेचे आहे.

सरांना ऑक्सिजन मास्क लावला होता, सलाईन सुरू होते, छातीवर पण बरेच असे काही चिकटवले होते ज्यामुळे बाजूच्या स्क्रीन वार ग्राफ दिसत होता. ते बघून शालिनी आईला भरून आले, तिने अलगद पदर डोळ्याला लावला आणि म्हणाली "अहो, मी आले आहे"

तसे त्यांना डोळ्यांची किंचित हालचाल जाणवली, पण डोळे उघडता आले नाहीत.

त्याही परिस्थितीत त्यांनी हात जोडायचा निष्फळ प्रयत्न केला.

तसे शालिनी आई म्हणाली "मी बाहेरच उभी आहे".
शरयू त्यांना इतकेच म्हणाली "मी फक्त माझे सर म्हणून आले आहे. बरे व्हा, इतकीच इच्छा" आणि बाहेर निघून आली.

ऑफिस ची लोक शरयूला प्रश्न विचारायला लागले तसे तिने हाताने थांबवत "नंतर बोलते,ही योग्य वेळ नाहीय" एवढेच सांगितले.

"आदित्य, मी आणि आई इथेच थांबतो आहेत, तू जाऊ शकतोस. दमला असशील"

"तुला मी इथे थांबायला नको आहे का?"

"असे नाही पण तुझी विनाकारण फरफट झाली आहे यात"

तसे तो थोडा खिन्न हसला, तिथून गेला. थोड्या वेळाने खाण्याचे काही पार्सल आणि कॉफी त्याने दोघींसाठी आणली.
"काही लागले तर नक्की कॉल कर" शरयू च्या खांद्यावर हात ठेवत तो म्हणाला आणि घरी निघाला.

पुढचे 3 दिवस दोघीही तिथून हलल्या नाहीत. एव्हाना सरांचे बिझनेस पार्टनर येऊन गेले.ते फार चिंतेत होते, कारण सरांनी कोणतेही विल बनवले नव्हते. कंपनीचे शेअरस, प्रॉफिट डॉक्युमेंटस वगैरे बद्दल काहीच कागदोपत्री तयार नव्हते. जर त्यांना काही झाले तर सगळं नेस्तनाबूत होईल याची काळजी त्यांना लागून राहिली होती.

तसे याबद्दल ये आदित्य शी बोलले की जसे ते थोडे ठीक होतील तेव्हा काही निर्णय घेणे अत्यावश्यक आहे.

चौथ्या दिवशी त्यांना स्पेशल रूम मध्ये हलवले, पण तरीही ते धोक्याबाहेर नव्हतेच फक्त आय सी मधून बाहेर आले होते.

पाचव्या आणि सहाव्या दिवशी किंचित सुधार त्यांच्या प्रकृतीत दिसला. आता थोडसं शब्द ते बोलू शकत होते.

सातव्या दिवशी सकाळीच आदित्य त्यांना भेटायला आला तसे त्यांनी त्याला स्मितहास्य दिले.
"कसं वाटतं आहे सर आता?"
"थोड ठीक आहे, पण मला नको वाटतं आहे आता आयुष्य"

"असे कसे बोलू शकता तुम्ही सर? तुमच्यावर खूप लोक विसंबून आहेत. आई आणि शरयू आल्यापासून इथेच थांबून आहेत"

तसे त्यांना नवल वाटले.

"आदित्य तुला कसे माहित शरयू बद्दल सगळे? तिच्या आईच्या पूर्वायुष्यात काय नि कसे घडले?तू तिच्या इतका जवळ आहेस का?" एवढ्या आजारपणात सुद्धा त्याला त्यांची नजर थोडी भेदक वाटली तसे आदित्य गडबडला.

ते किंचित हसले आणि म्हणाले, "तिला हे माहिती आहे का की तू तिला जवळचा आहे?"

त्याने खाली बघितले, आणि नाही अशी मान डोलावली .

"मी काही निर्णय घेतले आहेत आदित्य!"

"सर आधी बरे व्हा मग बोलू "

"नाही आदित्य, माझ्या सगळ्या सॉलिसिटर ची टीम मला आज संध्याकाळी इथे हवी आहे तर सगळ्यांना सांग मी बोलावलं आहे"

"ठीक आहे सर" असे बोलून तो शरयू आणि त्याच्या आईला भेटायला गेला.

आदित्य तिथे आल्यावरती आईने विचारले,
"आदित्य तुम्ही दोघांनी पुढे काही ठरवलं आहे का?"

शरयू आता मनातून घाबरली कारण आईला आदित्य बद्दल तिने खोटे सांगितले होते आणि आई ते खरे समजून खूप विश्वास ठेऊन वागत होती.
आई काय बोलेल, कशी वागेल खरे कळले तर याची तिला भीती वाटतं होती.

सरांशी तो आत्ता सगळे कामाबद्दलच बोलून आल्यामुळे आदित्यला वाटले की आई ऑफिशियल कामाबद्दलच त्याला विचारत आहे तसे तो एवढेच फक्त म्हणाला,
"अजून काहीच ठरवले नाही आई"

संध्याकाळी कंपनी चे लॉयर त्यांच्या रूम मध्ये गेले आणि बराच वेळ काहीतरी आत सुरू होते.

दुसऱ्या दिवशी सरांनी आदित्य, ऑफीस चे मोठे काही लोक ,पार्टनर आणि या दोघींना आत बोलावले.

वकीलही आलेच होते, सगळे येताच सरांनी हाताने काही इशारा केला तसे वकील बोलू लागले.

"कंपनीचा सिईओ म्हणून यापुढे आदित्य काम करेल" तसे तो चाट पडला , सगळे त्याच्याकडे बघायला लागले, शरयू पण शॉक झाली. तो काही बोलायला जाणार तसे सरांनी हाताने थांबवले.
त्यांना पुन्हा थोडा थकवा जाणवत होता.

वकील पुन्हा बोलायला लागले "राहते घर, सौ शालिनी यांच्या नावावर करण्यात आले आहे. त्यांची प्रॉपर्टी आणि बाकीची काही स्थावर मालमत्ता चॅरीटेबल ट्रस्ट नावे करण्यात येते आहे. त्यांची जमा पुंजी,शेअर्स आणि कंपनीचा वाटा हा शरयू च्या नावे करण्यात आला आहे.

आदित्य मोठा नाही की शरयू एकटी निर्णय घेणारी नाही. दोघेही बरोबरीने असतील कारण ते दोघे एकच आहेत.यावर त्यांची स्वाक्षरी झालीय पण विटनेस म्हणून बाकीच्या लोकांची सही लागेल"

तसे पार्टनर आणि एक सिनियर व्यक्ती पुढे आले आणि त्यांनी सही केली.

सरांनी हे काय केले म्हणून आदित्य आणि शरयू पूर्ण शॉक मध्ये असतात. तिथे जमलेले बाकी लोक सुद्धा एका वेगळ्याच नवलाईने त्यांच्याकडे बघत असतात.
पण हे सगळं सरांनी केलं असल्यामुळे त्याच्या मागे त्यांची काहीतरी इच्छा आणि दृष्टी असेल हे सगळ्यांना माहिती असते.

शालिनी आईचा हात घट्ट पकडून शरयू उभी असते, ती आईकडे पाहते तसे शालिनी आणि शरयू पुढे काही बोलण्यासाठी सरांकडे बघतात तर त्यांचे डोळे सताड उघडे आणि हात जोडलेले असतात पण बाकी सगळे स्थिर जाणवते.

शरयू धावत त्यांच्यापाशी जाते तर तिला कळते की त्यांचे प्राण निघून गेलेले आहेत.
तसे शालिनी आईला रडायला लागली. शरयू पटकन तिच्यापाशी आली आणि तिला बिलगून रडायला लागली.

आदित्य सुद्धा आज त्याचे अश्रू थांबवू शकला नाही.

क्रमशः
©®अमित मेढेकर

🎭 Series Post

View all