Login

दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं भाग -१

दूरुन सगळं चांगलं दिसतं
जलद लेखन स्पर्धा नोव्हेंबर 2025
विषय- दुरून डोंगर साजरे

दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं भाग -१

"विभा,आपले मैत्रीणींचे गेट टुगेदर करायचे ठरवतोय ना आपण,ते तुझ्या या फार्महाऊसवरच करु बाई. काय मस्त आहे ना जागा.

खरेच भाग्य काढलेस बाई तू.
हे एवढं डोळे दिपवणारं वैभव आणि तरीही पाय जमिनीवर असलेले हे तुझे कुटुंबिय.
आमचे जावई तर... नावाप्रमाणेच सतत ज्यांच्या चेहऱ्यावर हास्य खेळते असे सुहास.
बायकोचा शब्द खाली जात नाही.खरेच भाग्यच लागतं असा नवरा मिळायला."
रंजु कौतुक सोहळ्यात रंगली होती.

हे सगळं ऐकून
विभाच्या डोळ्यात टचकन पाणी आले.ते लपविण्यासाठी तिने रुमाल खाली पडल्याचे नाटक केले आणि तो उचलायला म्हणून वाकत त्याच रुमालाने पटकन डोळे टिपले.
विभाला वाटले सांगून टाकावं हिला सगळं सत्य आपल्या जीवनातलं.

'दुरून डोंगर साजरे 'च दिसतात गं बाई.
जवळ गेलं की कळतं किती कठीण आहे चढाई

'काटा रुते कुणाला, आक्रंदतात कोणी
मज फुलही रुतावे'

अशी गत आहे.
हे वैभवच टोचतय गं.

आपलं सामान्य जगणंच छान होतं.काटेरी मुकूट म्हणतात ते खोटे नाही.
दोन खोल्यांचं घर होतं त्यात आजी आजोबा आई बाबा अन् आम्ही चार भावंड मस्त राहात होतो.
कदाचित जागा कमी असल्यामुळे एकमेकांचा सहवास खूप लाभत होता म्हणून असेल कदाचित एकमेकांत खूप आपुलकी होती.
सुख दुख सगळंच वाटून घ्यायचं.

इथे मोठ्ठा महाल.प्रत्येकाची सेपरेट रूम. म्हणजे कोणाशी बोलायचं असेल तरीही परवानगी घ्यावी लागते.
त्यामुळे आपुलकी निर्माण होणे तर दूरच राहिले सतत परकेपणाचा आभास होत राहतो.

नवऱ्याच्या मागे एवढा व्याप की त्याला बायकोसाठी वेळच नसतो.


अगं, डोहाळे लागले तेव्हा लाडक्या राणीचे डोहाळे पुरवायला जागेवर तरी होते का?
समोर पंचक्वानाने भरलेलं ताट असायचं ,चिंचा, बोरे ,आवळे रानमेव्यानी गच्च भरलेली टोपली असायची पण खायची इच्छाच व्हायची नाही गं. डोहाळे पूरवा म्हणायला आपलं माणूस जवळ असावं लागतं ना? तेच तर दूर होतं.

नवरा बायकोचं नातं म्हणजे काय केवळ शय्या सोबत करण्यापूरतंच असतं का? प्रश्न पडतो गं.
विभाला रंजुला विचारावसं वाटत होतं.
हे जे आजचं वागणं आहे ना ते सगळं वरवरचं आहे.दिखावा आहे सगळा. मुखवट्या आडचा चेहरा काही वेगळाच आहे.

सर्व सामान्यांमध्ये मिसळणं, त्यांच्याशी बोलणं
घराण्याच्या नावलौकिकाला शोभत नाही म्हणे.

मी भीसीत भाग घेतला. आमचे नवरोबा लगेच म्हणाले, "काय त्या चारचौघी मध्ये मिसळणार आहेस तू?
त्या कुठे तू कुठे? अगं आपलं मोठेपण राखावं आपण."

शेवटी भिशीतून भाग काढून टाकला.

मंदिरात जायचं तर चार चाकी गाडीतून .मंदिरात जायचं दर्शन घ्यायचं वापस यायचं. तिथे सुद्धा बरोबरीच्या चार मैत्रिणींसोबत बोलायला मुभा नाही.शोभत नाही स्टेटसला.
आणि समोरच्या बायकाही आपल्याशी बोलायला कचरतात.
दम घुटतोय गं या अशा वातावरणात.
मला लग्नापूर्वीचे आईचे शब्द आठवतात गं.
लग्न पक्कं करताना आई बाबांना म्हणाली होती,"......
क्रमशः
बाकी पुढील भागात.
भाग -२मधे
©®शरयू महाजन
0

🎭 Series Post

View all