Login

दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं भाग -२

जग जसं दिसतं तसं नसतं
जलद लेखन स्पर्धा नोव्हेंबर 2025

दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं भाग -२

लग्न पक्क करण्याआधी आई बाबांना म्हणाली होती,

"अहो आपल्या तोलामोलाचंच बघावं स्थळ. नाकापेक्षा मोती जड नको व्हायला. ते श्रीमंत लोक त्यांची बरोबरी आपण करू शकू का? उगाच उद्या त्यांना असं वाटायला नको की तिथे आपला योग्य सन्मान होऊ शकत नाही. आणि त्यांची बरोबरी करण्यासाठी आपण कर्जबाजारी व्हायला नको.
वेळोवेळी मुलीचा बाप म्हणून मान तुकवणार का तुम्ही त्यांच्यासमोर?

आपली मुलगीही या अशा साध्या वातावरणात रुळलेली. तिलाही तिथे सगळ्यांमधे मिसळायला जमायला हवे.
तिला सामावून घेतले जाईल का हो? समजून घेतले जाईल का ?
नाहीतर वरचेवर तिला टोमणे सहन करावे लागतील. माहेरचा उद्धार होईल.
मला फार भीती वाटते हो.

त्या शालुताईची मुलगी अशीच थोरा मोठ्यांच्या घरची सून म्हणून गेली.किती आनंद झाला त्यांना.
पण सगळ्या आनंदावर विरजण पडले.

साधी साडी नेसताना सासू म्हणायची," माहेरी बघितली होती का एवढी भारी साडी कधी ?दागिने घालायला घेतले की म्हणायची माहेरी पाहिले होते का कधी?"

तिला बिचारीला ती साडी ते दागिने टोचायला लागले.नको वाटायला लागले.
मन मारुन जगतेय ती त्या घरात.
स्वाभिमान दुखावला गेला की नकोसं होतं जगणं.

आनंदाने जगायला पैसा नको असतो हो मनःशांती हवी असते.

बघा दहादा विचार करा मुलगी त्या घरात देण्या अगोदर.
नुसते वैभव, संपत्ती ,पैसा ,प्रतिष्ठा या सगळ्यांना भाळून मुलीला नरकात तर लोटत नाही आहोत ना?
तपासून बघा एकदा.

आपल्यासारखेच एखादे हातावर कमावून पोट भरणारे सर्वसाधारण घर बरे .असे मला भाबडीला वाटते. बघा एक आई म्हणून मी माझा विचार सांगितला. "

पण बाबांवर त्या लोकांनी जणू मोहिनीच घातली होती.

"अगं सगळेच एका पारड्यात तोलण्याची चुक नको करूस. आपल्याच लेकीचे नुकसान होईल.
तिच्या नशिबाने घरबसल्या एवढं चांगलं स्थळ सांगून आलं. आपण ते ठोकरणं म्हणजे करंटेपणाच ठरेल.


ते लोक तसे नाहीत .फार माणुसकीचे लोक आहेत .आपली मुलगी राणी सारखी राहील त्या घरात.
उगाच दुसऱ्याचे ऐकून डोक्यात राख घालून घेऊ नकोस.

मग मला विचारणा झाली. बाबांनी मला सगळे सांगितले आणि विचारले,"तुला काय वाटते? तुझे काय मत आहे?"
मी तर काय तरुण वय .हवेतच तरंगत होते. एवढे टोलेजंग स्थळ घरबसल्या सांगून आले म्हटल्यावर जणू मुठभर मास चढले होते अंगावर.
मैत्रीणींना काय काय सांगू अन् काय काय नको असे होऊन गेले होते.तू पण तर होती त्यात.

मला तर रुपाचा गर्व चढला होता.
शिक्षणाचा अभिमान वाटला होता.
आणि भाग्याचा हेवा वाटत होता.
लग्न ठरले.आणि
अशात एक दिवस मला सरप्राइज द्यायचे म्हणून माझा होणारा नवरा सुहास न सांगताच येवून उतरला घरी.
मी तर लाजून घरात पळाले.
पण पळता पळता...
क्रमशः
बाकी पुढील भागात
भाग -३अंतीम मधे वाचा.
©®शरयू महाजन
0

🎭 Series Post

View all