Login

दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं भाग -३अंतिम

जग जसं दिसतं तसं नसतं
जलद लेखन स्पर्धा नोव्हेंबर 2025

दिसतं तसं नसतं...भाग -३ अंतिम

पण पळता पळता माझी ओढणी दाराच्या कडीत अडकली.
शेवटी तेच समोर आले आणि ओढणी काढण्याच्या प्रयत्नात मुद्दामहून केलेला तो हवाहवासा स्पर्श आणि ती लबाड नजर सगळं सांगून गेली. मी कावरीबावरी झाले.
त्यादिवशी दोघे सोबत फिरुन आलो. मलाही जाणवले बाबांची निवड योग्य आहे.

लग्न झालं .सासरी आले.

नव्याचे नऊ दिवस सरले आणि खरे रंग दिसायला लागले.

घरात स्त्री च्या मताला किंमत शून्य होती असं म्हणण्याचं धाडस मी करणार नाही कारण अख्खं घर माझ्या सासुच्या तालावर नाचत होते.मोठ्या जाऊच्याही शब्दाला वजन होते.कारण ती एका प्रतितयश अशा राजकारणी व्यक्तीची मुलगी होती.

प्रश्न माझाच होता.मी एका सर्वसामान्य घरातून आलेली.मी तसंच वागावं ही अपेक्षा.
मला आपलं स्वतःचं मत असण्यावरच प्रश्नचिन्ह होतं.

मला वाटायचं आपल्या घरचीच शाळा आपल्या शिक्षणाचा चांगला उपयोग होईल. आपली शिक्षक होण्याची इच्छा पूर्ण होईल.
पण नवऱ्याचे म्हणणे ,"आपण नोकरी देणारे आहोत करणारे नाही."
प्रत्येक ठिकाणी मोठेपण आडवे येत होते. बाकी सगळ्यांपेक्षा नवरा एक पाऊल पुढेच होता याबाबतीत.

दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे होते.
अशा परिस्थितीत आयुष्याची मौल्यवान अशी पंचवीस वर्ष मी काढलीत.
आता सासू होण्याच्या उंबरठ्या वर उभी आहे. मुलगाही ज्या वातावरणात वाढला त्याच वळणावर गेला.

मी नुकतीच लदाख ट्रेकिंग कॅम्प आयोजित करणाऱ्या कंपनीसोबत लदाख जाऊन आले. आम्ही वीस लोक. कोणीच कुणाच्या ओळखीचे नाही तिथे गेल्यानंतर ट्रेकिंग आणि ध्यान केंद्रात शांतचित्ताने ध्यान.बस एवढेच.

तिथे भासले,
'डोंगर दुरून नव्हे 'जवळून'जास्त चांगले दिसतात '

पण त्या आठ दिवसांत मी 'स्व चा' शोध घेतला.मनसोक्त जगून घेतलं.
तिथून जी उर्जा मिळाली ती आयुष्यभर पुरेल.
तिथे फोन बंद.बाहेरचा संपर्कच नाही.पण परतताच घरी सगळेच अगदी तुटून पडलेत.
"घरादाराची काही काळजी होती की नाही? जाऊन बसली तिकडे. फोन बंद. आम्ही कसा संपर्क करणार?आईला बरे नाही तिचे कोण करणार ?"
मी न बोलता कामाला लागले.
पण आता मन मारुन नाही तर अगदी प्रसन्न चित्ताने.स्वत:च्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला होता माझा.परिस्थितीचा स्विकार करणारी मन:स्थिती बनली होती.
म्हणून मग मी ठरवून टाकलं कोणी कितीही ओरडू देत आपण दरवर्षी आठ दिवस असं जाऊन यायचं ऊर्जा घेऊन परत यायचं पूर्ण वर्षभरासाठीची.

अगं, म्हणूनच आता आपलं मैत्रीणींचं गेट-टुगेदर ही असंच कुठेतरी शांत ठिकाणी करू असं माझ्या मनात होतं.तर तू पुन्हा मला त्याच दलदलीत अडकवायला निघालीस.

हे सगळं संभाषण विभाचं मनाचं मनाशीच सुरू होतं.

उघड मात्र ती रंजुला एवढेच म्हणाली," अगं, बघू पुढचं पुढे आत्तापासून काय?

समाप्त
©®शरयू महाजन
0

🎭 Series Post

View all