Login

दिसतं तसं नसतं.. भाग -३(अंतिम )

अंकिताला आपल्या नवऱ्याकडून काही अपेक्षा असतात. ते पूर्ण होतात का नाही.
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ऋषी आणि अंकिता जायची तयारी करत होते.
“कपडे कोणते घालू?” ती आरशासमोर उभी राहून विचारत होती.
ऋषी शांतपणे म्हणाला—
“जे तुला आवडेल तेच घाल.”
अंकिता हसली — “तू तर नेहमीच असंच म्हणतोस!”

थोडा विचार करून तिनं निळ्या रंगाची जरीची साडी नेसली. हलका मेकअप, छोटी टिकली , आणि कानात चांदीच्या झुमक्यांची झुल. ती दिसत होती अप्रतिम. ऋषीने तिला एकदा पाहिलं, पण नेहमीप्रमाणे काही बोलला नाही.
ती मनात म्हणाली — ठीक आहे, मीं माझीच खुश राहणार .

संध्याकाळी ते रोहनच्या घरी पोहोचले. दरवाज्यावर एक ओळखीचा चेहरा दिसला — ती कीर्ती होती!
क्षणभर अंकिता थबकली.
“अरे! कीर्ती तू इथे?”
कीर्ती आनंदाने पुढे आली, “अगं हो! माझा नवरा रोहन! तू बघ, हा ऋषी तुझा नवरा ना? काय योगायोग आहे बघ!”

क्षणभर सगळं स्तब्ध झालं आणि मग हसण्याचा फवारा उडाला.
“काय गं, तू एकदम गायब झालीस, फोन पण नाही करत,” अंकिता म्हणाली.
कीर्ती म्हणाली— “लव्ह मॅरेज केलं म्हणून सगळ्यांपासून थोडं दूर गेलो होतो. मोबाईल नंबर पण बदलला होतं.आता रोहनला इथं जॉब मिळाला म्हणून परत आलो.”

रोहन खूपच हसतमुख, बोलका आणि आत्मविश्वासू माणूस होता.
तो अंकिताकडे बघत म्हणाला,
“वाह, वहिनी! तुम्ही खूप छान दिसताय.ऋषी, तू खरंच नशीबवान आहेस!”

अंकिताच्या चेहऱ्यावर हलकीशी लाज आणि आनंदाचा छटा उमटला. ऋषी मात्र फक्त हलकं हसून शांत बसला.

जेवण करतांना सगळ्यांनी गप्पा मारल्या. रोहन कीर्तीच्या भोवतीच फिरत होता — कधी तिच्या हातातलं डिश घेत होतं, कधी तिला कॉम्प्लिमेंटस देत होता.कधी म्हणत होता,
“तू नाहीस तर मी जगूच शकत नाही.”
सगळ्यांसमोर तो तिचं कौतुक करत होता.

अंकिता त्या दोघांकडे बघत विचार करत होती —
किती बोलका आहे हा रोहन! त्याच्या नजरेत कीर्तीबद्दल किती प्रेम दिसतं. आणि माझा ऋषी? त्याला तर माझं अस्तित्वसुद्धा जाणवतं का?

घरी परतल्यावर ती शांत राहिली. ऋषीने विचारलं,
“काय झालं, गप्प का आहेस?”
“काही नाही,” ती म्हणाली, पण तिच्या मनात मात्र गोंधळ उभा राहिला होता.

त्या दिवसानंतर दोन-तीनदा त्यांचं भेटणं झालं. दरवेळी रोहन तिला पाहून कौतुक करायचा,
“वाह वहिनी! आज तर अजून सुंदर दिसताय.”
अंकिता हसून म्हणायची, “तुमच्या बायकोसमोर हे बोलू नका बरं का!”
कीर्ती मात्र सहज हसायची, “माझ्या नवऱ्याला सगळ्यांची प्रशंसा करायची सवय आहे.”

पण अंकिताच्या मनात मात्र एक वेगळं बीज रुजायला लागलं होतं.
ती नकळत रोहनकडे आकर्षित होऊ लागली.
ती त्याच्याशी बोलताना, त्याचं हसणं, आत्मविश्वास — सगळं तिच्या मनात साचत होतं.

एका दुपारी ऋषी ऑफिसला गेला होता. कीर्तीचा फोन अंकिताला आला,
“आज संध्याकाळी या ना, रोहन म्हणतो सगळे मिळून जेवूया.”
अंकिताने तत्काळ होकार दिला.
ती संध्याकाळी सुंदर गुलाबी ड्रेस घालून तयार झाली. आरशात स्वतःकडे बघत ती म्हणाली — आज तो नक्कीच कौतुक करेल.

रोहन आल्याबरोबर म्हणाला—
“वहिनी, तुम्ही तर खूप सुंदर दिसताय! ऋषी खरंच खूप लकी आहे.”
ती लाजली, पण मनात मात्र काहीतरी वेगळं हललं.
माझ्या नवऱ्याने कधी असं म्हटलं नाही...

काही दिवस गेले. अंकिता रोज सकाळी स्वतःला आरशात बघायची आणि मनात म्हणायची —
आता भेटलो की,रोहन मला अजूनही छान कॉम्प्लिमेंट देईल.
पण तिचं आकर्षण आता भावनिक होत चाललं होतं.

तिचं मन अस्वस्थ राहायचं. ती स्वतःला विचारायची—
मी चुकीचं करतेय का? पण काय चुकतेय?..


एका दिवशी ऋषी म्हणाला,
“आज रोहनच्या घरी पुन्हा आमंत्रण आलंय.”
ती म्हणाली—“हो, जाऊया .”

संध्याकाळी ते दोघं त्यांचा घरी गेले.

ते दोघं येणार म्हणून कीर्तीने बिर्याणी बनवली होती. सगळे जेवायला बसले.
पहिलाच घास घेतल्यावर रोहनने कपाळावर आठ्या घेतल्या,
“कीर्ती, हे काय केलंय? मीठ कुठे आहे? रोज रोज चुका! अक्कल नाही का तुला?”

क्षणभर सगळं घर स्तब्ध झालं.
अंकिता थक्क झाली.
रोहनचं ते रागीट रूप तिने पहिल्यांदा पाहिलं होतं.
कीर्ती काहीच बोलली नाही, फक्त हळूच डोळ्यातून पाणी पुसलं.

थोड्या वेळाने अंकिता किचनमध्ये गेली आणि विचारलं—
“कीर्ती, हे काय झालं? तो असं बोलतो तुला?”
कीर्ती शांतपणे म्हणाली,
“अगं, लोकांसमोर तो खूप प्रेम दाखवतो, पण घरात असं वागतो. आज तर फक्त मीठाचं कारण होतं, पण कधी कधी कारणही नसतं.”

अंकिताला जणू एखादं जोरदार वीजेचं झटका बसला.
तिच्या मनातल्या सगळ्या कल्पना, आकर्षण, आदर — एका क्षणात कोसळले.
ती शांत राहिली, आणि स्वतःला म्हणाली—
मी किती चुकले… मी ज्याला परिपूर्ण समजलं, तो तर इतकं वाईट निघाला. आणि ज्याच्यावर मी तक्रार केली, तो माझ्यावर किती प्रेम करतो.

त्या रात्री घरी परतल्यावर ती ऋषीसमोर बसली.
तिच्या डोळ्यांत अपराधभाव स्पष्ट दिसत होता.

ती म्हणाली—
“ऋषी, मला काही सांगायचं आहे.”
“काय झालं?”
“मी काही दिवसांपासून गोंधळात होते. मला वाटायचं, तू मला प्रेम करत नाहीस. पण मी चुकले… थोड्या वेळासाठी मी रोहनकडे आकर्षित झाले होते. पण आज त्याचं खरं रूप पाहिलं आणि समजलं, की दुरून डोंगर साजरे वाटतात, पण जवळ गेल्यावर खडक दिसतात.”

ऋषी काही क्षण शांत राहिला. मग हळू आवाजात म्हणाला—
“अंकिता, प्रेम म्हणजे शब्द नाही, भावना. मी बोलत नाही, पण तू माझ्यासाठी सगळ्यात सुंदर आहेस. माझं आयुष्य तुझ्याशिवाय अपूर्ण आहे.”

अंकिता रडू लागली.
ती म्हणाली—
“मी तुला समजून घेत नव्हते… पण आता मला तुझ्या शांततेतल प्रेम दिसतंय.”

ऋषीने तिचा हात हातात घेतला.
“आपलं नातं शब्दांवर नाही, विश्वासावर उभं आहे.”

त्या रात्री अंकिताच्या मनात एक शांतता उतरली —
जशी डोंगरांवर सकाळच्या धुक्यानंतर दिसते तशी.
तिला उमगलं होतं,
'दुरून डोंगर साजरे 'दिसतात, पण खरं जवळ गेल्यावरच कळत.