Login

दिवा - भाग 2

आई कुणा म्हणू मी.
रमाचा निश्चय ठाम होता. तिने काळाच्या पुढे जाऊन अभ्यास करायला सुरुवात केली. एकेक टप्पा ती पार करत होती. तसतसा तिच्यातला आत्मविश्वास वृद्धिंगत होत होता. पण शेवटी निंदक त्रास द्यायचे काही थांबत नव्हते. ती परीक्षा पास झाली. डॉक्टर झाली. आणि ती ही आनंदाची बातमी घेऊन घरी येतंच होती. घराच्या उंबरठ्यात पाऊल ठेवणार तेव्हा माणसांची खूप गर्दी दिसली. तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. ती दबकत पुढे सरसावली. समोर जाऊन बघते तर काय, आतापर्यंत ज्या माऊलीने तिला पाठबळ दिलं तिच निष्प्राण होऊन पडली होती. "आई, उठ गं. तुझी रमा डॉक्टर झालीये बघ. उठ ना", रमा हंबरडा फोडून आईला साद घालत होती. पण एकदा आत्म्याने देह सोडल्यावर ती साद तरी कशी ऐकू जाईल. अंत्यविधी साठी त्या माउलीला नेण्यात आलं. तशी रमा धावत जाऊन त्यांना थांबवू लागली. जमलेल्या माणसांनी तिला मागे खेचलं.


रमाला आपण डॉक्टर झाल्याचा आनंद जिच्यासोबत साजरा करायचा होता, तीच तिला सोडून गेली होती. गावकऱ्यांनी रमालाच तिच्या आईच्या मृत्यूसाठी दोषी मानलं. विधवा पोरीला शिकवलं म्हणून आई तारुण्यात देवाघरी गेली, हा त्यांचा समज.
समाजाचा समज जर चुकीचा असेल तर आपण तिथे आपली भूमिका चोख बजावून बदल घडवला पाहिजे. रमा आईच्या कार्यासाठी सवाष्ण बायकांना बोलवायला घराबाहेर पडली. ज्या घराचा दरवाजा ती ठोठवत होती, तो प्रत्येक दरवाजा तिच्या तोंडावर बंद होत होता. तिला आईच्या आठवणीने रडू कोसळत होतं, पण सांगणार कोणाला होती ती तिचं दुःख.


तू सांग रे मुकुंदा

आई कुणा म्हणू मी

तूच भ्राता, तूच त्राता

दुःख सारे विसरतो तुझे गुण गाता

सांग रे मुकुंदा

आई कुणा म्हणू मी

मंदिरात एक तरुण हे गाणं तल्लीन होऊन गात होता, त्याचा प्रत्येक शब्द रमाच्या काळजाला भिडत होता. तिची पावलं तिच्याही नकळत त्या आवाजाच्या दिशेने वळली. वैधव्य आल्यामुळे ती मंदिरात प्रवेश करू शकत नव्हती.

जन्म दिला जिने

ती आई

जगण्याचे बळ तू दिले

मग विसरू कसा सांग मी

तुला विठाई

स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी

स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी

तूच गोपाळा, तूच चक्रधारी

बळ दे या बालका,

लढण्याचे

सामर्थ्य दे तुझे गुण गाण्याचे

आई तू, पिता तू

ही जाणीव होउदे आता अंतरी

कृपा करी प्रभू आता तू मजवरी


ताई, प्रसाद. हातात प्रसाद घेऊन रमाच्या समोर एक दहा बारा वर्षांची मुलगी उभी होती. तिची प्रसन्न साद ऐकून रमा भानावर आली. तिने तो प्रसाद घेतला आणि घराच्या दिशेने ती पुढे चालू लागली. घरी पोहोचल्यावर थोड्या वेळात तिची मावशी तिथे आली. तिने रमाला घट्ट मिठी मारली. रमाने तिला कोणतीच सवाष्ण बाई यायला तयार न झाल्याचं सांगितलं. तशी मावशी क्षणाचाही विलंब न करता म्हणाली, अगं रमे, मी आहे ना. मला तू सवाष्ण म्हणून कार्याकारण कार्य करू शकतेस. तसं रमाच्या डोळ्यात आस आणि दुःख एक होऊन पाणी तरळलं. अगं मावशी मी कसं, हे बोलताना रमाला हुंदका अनावर झाला. तसं मावशीच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला, रमाला तर वैधव्य आलंय आणि आपण हे काय बोलून गेलो. त्या दोघींनी पुन्हा एकदा एकमेकींना मिठी मारली.

मावशीने रमाचे डोळे पुसले आणि स्वतःच स्वतःला हळद कुंकू लावून घेतलं.

हळूहळू रमा तिच्या दुःखातून सावरण्याचा प्रयत्न करत होती. गावाने तिला जणू वाळीतच टाकलं होतं. अचानक गावात कसल्याशा आजाराची साथ पसरली. ताप, थंडी, पोटदुखी, उलट्या या आजारांनी लोकं बेजार झाली. कुणाच्या घरचं वयस्कर तर कुणाच्या घरचं लहान आजारी होतं.

0

🎭 Series Post

View all