घटस्फोट ( भाग 4 )

About Married Life
आर्यहीला मनिषा सर्व सुख देण्याचा प्रयत्न करीत होती.महागडे कपडे, वेगवेगळ्या प्रकारची खेळणी अशा अनेक गोष्टींची हौस पूर्ण करत होती. तिला चांगले शिक्षण मिळावे यासाठी सर्वोत्तम शाळा, वेगवेगळे क्लासेस निवडले होते.आपल्या मुलीने आपल्यासारखेच ध्येयवादी असावे, आपल्या गुणांनी तिने यशाचे शिखर गाठावे. असे मनिषाला वाटत होते आणि ती तसे प्रयत्नही करत होती. पण आर्यही एवढ्या सुखसुविधा असूनही आनंदी दिसत नव्हती.तिला आपल्या वडिलांची कमतरता जाणवायची. शाळेत होणाऱ्या कार्यक्रमात, मीटिंगला आपले फ्रेंड्स आईवडिलांना बरोबर आणतात. आणि आपल्या सोबत फक्त आपली आई असते आणि काही वेळेस तर तिला काम असेल तर आयालाच आपल्याबरोबर पाठवते. गार्डनमध्ये तर आई कधीच येत नाही. आयाच असते सोबत नेहमी.
आईने घरी थांबावं, आपल्या सोबत खेळावं, मजा करावी यासाठी आर्यही मनिषाला नेहमी सांगायची, त्यासाठी रडायचीही.
पण यशाची नशा चढलेल्या मनिषाला काही फरक पडत नव्हता. उलट ती आर्यहीला म्हणायची,
"बाळा, हे सर्व मी तुझ्या साठी तर करत आहे. तुला आता आणि यापुढे भविष्यात कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू नये. तू सुखात रहावी .यासाठी तर मी प्रयत्न करते आहे. काम करते आहे. आताही तुला कुठल्याच गोष्टीची कमी नाही. आनंद देणाऱ्या सर्व गोष्टी मी देत आहे. तू माझ्यासारखी आनंदी रहा ना.तू ही आनंदी रहा आणि मलाही आनंदात राहू दे."

आपल्या मनातील दुःख आईला का समजत नाही?तू देत असलेल्या गोष्टींतील आनंदापेक्षा मला पप्पांसोबत असतानाचा आनंद खूप आवडतो. पप्पा तुझ्या पेक्षा कमी पैसे कमवत असतील पण ते माझ्यासाठी वेळ देतात. माझ्याशी छान बोलतात.मला समजून घेतात. आपण तिघांनी एकत्र रहावे. यासाठी ते नेहमी प्रयत्न करत असतात.
या विचारांनी आर्यहीचा कोंडमारा व्हायचा.
आर्यही तिच्या वडिलांसोबत असायची,तेव्हा तिला खूप मनमोकळे वाटायचे त्यामुळे ती नुकत्याच फुललेल्या फुलासारखी टवटवीत दिसायची. पण मनिषासोबत घरी सोन्याच्या पिंजऱ्यातील पक्ष्यासारखी असायची. सर्व सुख असूनही त्यात तिचे मन रमायचे नाही. त्यामुळे ती कोमेजलेल्या फुलासारखी होऊन जायची.
तिने मनिषाकडे पप्पांकडे जाऊन राहण्याचा हट्ट केला. पण मनिषाने तिला पप्पांना फक्त भेटण्याची परवानगी दिली होती , त्यांच्या कडे राहण्याची परवानगी दिली नव्हती .

मनिषाला वाटत होते, थोड्या दिवसांनी.. वर्षांनी आर्यहीचे वागणे बदलून जाईल. हळूहळू तिला या वातावरणाची सवय होऊन जाईल. अभ्यास, खेळ ,वेगवेगळे क्लासेस यात तिचे मन रमून जाईल.
त्यामुळे मनिषा आर्यहीचे वागणे,बोलणे मनावर घेत नव्हती आणि आपल्या कामात लक्ष देत होती.


क्रमशः
नलिनी बहाळकर

🎭 Series Post

View all