घटस्फोट एक पुनर्विचार १

नात्यातली तिखट आंबट चव!
सौ वैशाली मंठाळकर.
घटस्फोट एक पुनर्विचार १



"सायली अजून एकदा विचार कर. खूप मोठा निर्णय आहे." तो कंठ दाटून तिच्या हातावर हात ठेवत म्हणाला.

त्याच्या डोळ्यात आशेची किरण दिसत होती. तिने त्याच्या हाताखालचा आपला हात अलगद काढला आणि नजर वर करून त्याच्या डोळ्यात पाहू लागली. तिचेही डोळे पाण्याने भरलेले होते. ती त्याक्षणी उठली आणि तिने शेजारची पर्स उचलली.

"मानव माझा विचार झालेला आहे." ती डोळ्यातलं पाणी पुसत जड आवाजाने म्हणाली.

तशी त्याच्या डोळ्यातली आशेची किरण मावळून गेली. डोळ्यातला अश्रूचा एक थेंब गालावर ओघळून आला. तो पटकन नजर फिरवून आपले अश्रू पुसत तडक जागेवरून उठला. मनाला त्रास होत होता. ती त्याच्याकडे बघत होती. त्याचेही दुःख तिला जाणून येत होतं पण राग मनात इतका होता की, तिला तिचा निर्णय बदलायचा नव्हता.

"ओके ,मिसेस सायली जाधव. तुम्हाला लवकरात लवकर घटस्फोट मिळून जाईल." तो निर्विकार चेहऱ्याने तिच्या डोळ्यात बघत पॉकेटमध्ये हात घालून आपली मूठ आवळत रागाने म्हणाला.

त्याच्या चेहऱ्यावरचा राग बघून तिचं काळीज थरथरलं. त्याच्या डोळ्यात ती आपल्याबद्दल द्वेष बघू शकत नव्हती. स्वतःला सावरत दीर्घ श्वास घेत ती त्याला क्रॉस करून निघून गेली. ती गेल्यानंतर तो हाताश नजरेने तिच्याकडे बघत डोळे घट्ट मिटून पुन्हा त्या चेअर खाली बसला.


गाडीचा आवाज आला आणि तो जड पावलांनी घरात पाऊल टाकू लागला. घरातल्या सगळ्यांच्या नजरा त्याच्यावरच होत्या.आईच्या डोळ्यात पाणी होतं. तर वडिलांना आपल्या मुलाच्या चेहऱ्यावरची निराशा बघून त्रास होत होता.

" मानव काय झालं ? काय म्हणाली, सायली ?" सुलेखाताई (मानवच्या आई ) जवळ येऊन त्याच्या दंडाला पकडून काळजीने विचारू लागल्या.

मानवच्या डोळ्यातले पाणी तसेच वाहत होते. महिनाभरापूर्वी सायली भांडण करून घरातून निघून गेली होती. त्याने तिला समजावून घरी आणण्याचा खूप प्रयत्न केला होता. त्याच्या आई-वडिलांनी सुद्धा तिच्या घरच्यांना फोन लावला होता पण त्यांनी त्यांचा एकही कॉल उचलला नव्हता आणि म्हणूनच मानवने त्यांच्या घरी आपल्या आई-वडिलांना पाठवले नाही. आणि आज घरात कोर्टातून घटस्फोटाचे पेपर आले होते. ते बघून आई-वडिलांच्या पायाखालची जमीन हादरून गेली होती. त्यांनी लगेच मानवला फोन करून घटस्फोटाच्या कागदांबद्दल सांगितले. तोही ऑफिसमध्ये सुट्टी टाकून घाईगडबडीतच घरी आला होता. त्याला अजूनही विश्वास होत नव्हता की , सायली या टोकापर्यंत जाईल. तिला आपण समजावून घरी आणू. ह्या उद्देशाने तो तिला भेटायला गेला होता पण ती एकाच मतावर ठाम होती. तिला काहीच ऐकून घ्यायचं नव्हतं.

मानव त्याच्या आईचा हात दंडावरून काढून आपल्या रूमच्या दिशेने निघाला. सुरेखाताई डोळ्याला पदर लावून तिथेच खाली बसून रडू लागल्या. त्यांचा घरात त्यांचा मोठा मुलगा, मोठी सून , बिना लग्नाची बहीण आईला रडताना बघून आईजवळ येऊन समजावून सांगू लागले. विश्वासराव मानव चे वडील चेअरवर बसून शून्यात नजर लावून बसले होते. कधी आयुष्यात त्यांनी विचार केला नव्हता की, त्यांना किंवा त्यांच्या मुलांना कोर्टाची पायरी चढावी लागेल.

मानवने आपल्या रूमचा दरवाजा उघडून लाईट ऑन केली. समोरच बेडच्यावर त्यांच्या लग्नाचा फोटो लावलेला होता. तो हळूहळू पावला टाकत त्या सुंदर हसणाऱ्या फोटो वरून हात फिरवत डोळ्यातल्या अश्रूंना वाट मोकळी करू लागला. काही क्षणांनी तो फोटो बघून त्याला चिड येऊ लागली. त्याने तो फोटो काढला आणि झटकन फेकून दिला.जोरात खळकन आवाज आला तसे आवाजाने घरातले सगळेजण हादरले. सगळ्यांनी त्याच्या रूम कडे धाव घेतली. तर त्यांच्या लग्नाचा फोटो खाली पडून त्याची फ्रेम फुटून सगळीकडे काचा पसरल्या होत्या.

सुरेखाताई रूममध्ये जात होत्या तसं मागून विश्वास रावांनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांना थांबवलं.

मानव बेडवर त्याचे अंग झोकून डोळे बंद करून पडला होता.

"त्याला थोड्यावेळ एकटं सोडा." विश्वासराव सुलेखाताईंकडे बघत हळू आवाजात धीर देत म्हणाले.
तशा सुलेखाताई मागे वळून एक नजर त्याला पाहून बाहेर आल्या. आपल्या मुलाची अवस्था त्यांना बघवत नव्हती.


क्रमशः

🎭 Series Post

View all