घटस्फोट एक पुनर्विचार २

नात्यातली गोड आंबट चव
सौ वैशाली मंठाळकर
घटस्फोट एक पुनर्विचार २


त्या दिवसापासून घरातलं पूर्ण वातावरण बदलून गेलं होतं. मानव न सगळ्यांशी बोलणं सोडून दिलं होतं. सकाळी घरातून ऑफिसला निघाला तरी ऑफिसवरून घरी लवकर येत नव्हता. घरी आला की सायलीची आठवण येऊन पूर्ण घर खायला उठत होते, पण आपल्या आई-वडिलांचा विचार करून त्याची पावले घरी येत होती. बघता बघता कोर्टाची तारीख जवळ आली.

पहिला दिवस
मानवने आज ऑफिसला सुट्टी घेतली होती. अकरा वाजता कोर्टात हजर राहायचं होतं म्हणून सकाळी लवकरच उठून त्याने स्वतःचा आवरलं होतं. सुरेखाताईंनी पुढ्यात नाष्टा ठेवला होता पण त्याच्या घशाखाली घस जात नव्हता.. तरीही मनात नसताना त्यांनी दोन-तीन घास घशाखाली ढकलून पाणी पिले. मनात एक हुरहुर लागली होती.

"आम्ही पण येत आहोत.", विश्वासराव त्याच्या शेजारी बसत त्याच्या पाठीवर हात ठेवत दिलासा देत म्हणाले.

"बाबा प्लीज मला एकट्याला हे सगळं हँडल करू द्या. माझ्यामुळे तुम्हाला कोर्टाची पायरी चढायची गरज नाहीये. ह्या वयात तुम्हाला देवदर्शनाच्या पायऱ्या चढवायच्या होत्या, पण माझ्यामुळे कुठेतरी कोर्टाची पायरी चढावी लागत आहे, याचं मनात गिल्ड वाटत आहे.", तो भावना शून्य नजरेने बोलत म्हणाला.

"बाबा तुम्हाला यायची काही गरज नाहीये. मी आणि मानव कोर्टात जाऊन येतो.", मानवचा मोठा भाऊ रवी म्हणाला.
आज त्यानेही त्याच्या ऑफिसवरून सुट्टी घेतली होती. आपल्या भावाला तो एकटा सोडणार नव्हता.

विश्वासराव सुद्धा हुंकार भरत रवीला डोळ्याने समजावू लागले.
थोड्यावेळाने रवी आणि मानव कोर्टात येतात. सायली आणि तिचे आई-वडीलसुद्धा कोर्टात आलेले होते. दोघेही एकमेकांना इग्नोर करून बसले होते. दोघांचे वकील तिथेच होते. सायली तिच्या ओढणीच्या टोकाशी खेळत स्वतःची भीती लपवण्याचा प्रयत्न करत होती. आपण जे पाऊल उचलला आहे, ते बरोबर आहे का नाही ह्याच्यावर अजूनही ती ठाम नव्हती. मानवला कायमचं गमवू, याची भीती होती.. आणि त्याच्याजवळ जायचं ही नव्हतं.
तो निर्विकार चेहऱ्याने समोर बघत होता. जुने दिवस आठवत आतल्या आत घुसमटत होता. आपल्या एका चुकीमुळे आपण इथपर्यंत आलो, म्हणून स्वतःचा त्याला राग येत होता.

जज आल्यावर सगळेजण उठून उभे राहतात. जज सगळ्यांवर आपली नजर टाकून आपल्या जागेवर बसतात.
काही वेळाने पूर्ण कोर्टात शांतता पसरते. वकील आपले पेपर्स सबमिट करतात. त्याच्यावरून आपली नजर फिरवून ते वकिलांना इशारा करतात.

सायलीच्या बाजूने असणारे वकील आणि मानवच्या असणारे वकील एकमेकांसमोर उभे राहिले आणि दोघांना घटस्फोट का हवा आहे, त्याबद्दल जजला सांगू लागले .

तीन वर्षांपूर्वी दोघांचं लव मॅरेज झालं होतं. लग्नाच्या आधी दोघेजण वर्षभर एकमेकांच्या प्रेमात होते. नंतर घरात कळल्यावर थोडाफार वाद झाला पण कसेबसे दोघांच्या घरचे तयार झाले. लग्न झाल्यावर दोन महिन्यानंतर सायलीने नोकरीसाठी अप्लाय दिला आणि तिला जॉब लागला. घरातही काहीच प्रॉब्लेम नव्हता. त्यांची मोठी सूनसुद्धा जॉब करत होती. मुलीचेही स्वतःचे ब्युटी पार्लर होते. माणूस म्हणून घरातल्यांचे विचार सुशिक्षित होते. त्यामुळे करिअर बाबतीत सायलीला कुठलेच अडचण आली नव्हती. दोघांचे रुटीन चांगलं बसलं होतं. सकाळी दोघे एकत्र जात होते. फक्त येताना कधी कधीच दोघांना एकत्र येण्याची संधी मिळत होती. सायलीचे ऑफिस लवकर सुटत होतं... पण म्हणतात ना हळूहळू अंगावर जबाबदारी वाढत जाते, तसे दोघांमधले प्रेम कमी होते. तसेच काहीच मानव आणि सायली बाबतीत झाले. आधी फक्त एकमेकांसाठी वेळ देणारे ते, आता त्यांचा वेळ वाटला गेला होता. छोट्या छोट्या गोष्टीमुळे दोघांमध्ये वाद होऊ लागले.. मग ते वाद आता घरच्यांच्याही नजरेत येऊ लागले, पण समजवणार कोणाला..? दोघांच्यात इगो कुटून भरला होता. त्यामुळे कोणीही माघार घ्यायला तयार नव्हते. त्याचं लेट नाईट कधीतरी उशिरा येणं, सायलीला पटत नव्हते तर मानवला तिचं कामानिमित्त बाहेर जाणं पटत नव्हते. भांडणाला आता त्यांना कारण लागत नव्हते. लग्नाआधी तो तिचे सगळे हट्ट पुरवत होता, पण लग्नानंतर त्याच्याकडून चुकून कधीतरी तिची हट्ट राहिले, तर तेही मनाला लावून त्याचाही उद्रेक होत होता. सासु सुनेमध्ये सुद्धा हळूहळू भांडणे वाढू लागली. सुरेखाताई तिला समजावून सांगत होत्या, पण तिला समजून घ्यायचं न्हवत. मानव आणि सायली आता मानसिकरित्या कमजोर पडत होते. कोणीही माघार घ्यायला तयार नव्हते. इगो आडवा येत होता. सायलीच्या आई-वडिलांना आपल्या मुलीची मनस्थिती बघून त्यांनी घरी येऊन या गोष्टीची शहानिशा लावली. त्यामुळे मानव भलताच चिडला. घरात सगळ्यांसमोर दोघेही एकमेकांवर आरोप लावत होते आणि सगळेजण थक्क होऊन दोघांकडे बघत होते... आणि हळूहळू दोघांचे एकमेकांवर लावणारे आरोप वाढतच गेले आणि एके ठिकाणी मानवचे पेशंस संपत गेले.. आणि त्याचा हात तिच्या कानशिलात पडला. त्याचबरोबर पूर्ण घरातलं वातावरण शांत झाले.

दोन्ही अर्जदारांचे वकील दोघांची साईड घेऊन आपले पॉईंट्स मांडत होते. त्यांना फक्त ही केस जिंकावी, इतकाच वाटत होतं. ह्यात त्यांना काही पडलं नव्हतं की ह्यांचं नातं आपण टिकवावे.. एकमेकांना आरोप लावत दोघे आपला जीव ओतत होते. जज शांतपणे ऐकत मानव आणि सायली यांचे चेहरे बघत होते.

दोघे वकील शांत झाले आणि जजकडे बघू लागले. त्यांनी आपला निर्णय सांगितला अन् तिथून निघून गेले.