घटस्फोट एक पुनर्विचार ४

नात्यातली गोड आंबट चव
सौ .वैशाली मंठाळकर
घटस्फोट एक पुनर्विचार ४

दोन दिवसांनी दोघेजण मध्यस्थी केंद्रात आले. सायलीचे आणि मानवचे आई-वडील बरोबर होते. कोर्टातून तशी ऑर्डरच होती की दोघा अर्जदारांचे आई वडीलसुद्धा हजर असतील.

दोन्ही वकीलसुद्धा तिथेच होते. त्यांना थोडंसं टेन्शन आलं होतं, कारण मध्यस्थी केंद्रात क्वचितच घटस्फोटाचे केस येतात आणि जे केस इथे येतात, त्यातले काही जुळतात तर काही जुळत नाहीत.

जज साहेबांनी पहिले दोघांच्या आई-वडिलांना आतमध्ये बोलावून घेतलं होतं.

सायली आणि मानव बाहेरच्या बाकावर बसले होते. त्याची नजर सारखी राहून राहून तिच्यावर पडत होती. तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट करून येत होतं, की ती आतून किती घाबरून गेली आहे. तिचा एक पाय थरथर कापत होता. ती तिची भीती कमी करण्यासाठी तो पाय हलवत होती. डोळे तर तिचे खोल गेले होते. एक दीड महिन्यात तिची तब्येतसुद्धा खराब जाणवत होती. मानवचीसुद्धा तीच अवस्था होती. पोटाला आधार म्हणून दोन घास पोटात ढकलत होता.

कधी काळी त्या डोळ्यात स्वतःसाठी तो प्रेम बघत होता. आज त्या डोळ्यात फक्त पाणीच पाणी दिसत होतं...

तो आपल्याकडे बघत असल्याचे जाणीव होताच सायलीने हलकी नजर फिरवली, तसं त्याने लगेच नजर दुसरीकडे फिरवली.

काही वेळाने दोघांचे आई वडील बाहेर आले. त्यांच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसून येत होता. दोघेसुद्धा आपल्या मुलांची बाजू घेऊन जज साहेबांसमोर भांडून आले होते.

मानवच्या आईने रागाने सायलीकडे जळजळीत कटाक्ष टाकला. सायलीने लगेच नजर खाली घेतली. आपल्या मुलाने तिला डोक्यावर सजवून ठेवले होते आणि तिने त्याला कोर्टाची पायरी चढवली होती, याचा राग त्या आईच्या डोळ्यात दिसून येत होता.

वकील साहेबांनी दोन्ही अर्जदारांना आतमध्ये बोलावले.

"सायली काही घाबरायची गरज नाहीये. तुझे आई वडील तुझ्या पाठीशी आहे. जज साहेब काय बोलतील, त्याचं व्यवस्थित उत्तर दे.. तस आम्ही तुझ्या बाजूने पूर्ण गोष्ट क्लिअर केलेली आहे, म्हणून त्यांनाही कळू दे.. तू हया मानवचा किती अत्याचार सहन केलेला आहे...", सायलीच्या आई रागात मानवकडे बघत म्हणाली.

"आमच्या मुलाने अत्याचार केले नाहीत, तर तुमच्याच मुलीने त्याला मानसिक टॉर्चर केलेला आहे. कधी कुठल्या गोष्टीची कमी केली नाही, पण तिला सगळ्या गोष्टीची काही ना काही कमीच पडत होती. दररोज त्याच्याशी भांडत होती. तुम्ही नव्हता, आम्ही घरात असतो. आम्ही पाहिले आहे तुमच्या मुलीचे गुण बिलकुल नांदायच्या लायकीचे नाहीयेत.", मानवची आईसुद्धा रागारागात सायलीकडे बघत बडबड करू लागली.

सायली डोळ्यातलं पाणी तिच्या ओढणीच्या टोकाने पुसू लागली. खरंच आपलं काही चुकलं का, असं एक क्षण वाटून गेल. पुन्हा मानवने तिच्या गालावर दिलेली चपराक आठवताच तिचे डोळे रागाने भरले. मानवने कपाळावरून हात फिरवला आणि आत निघून गेला. सायलीला बोललेलं त्याला सहन होत नव्हतं.

सायलीची आई तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला आत जाण्याचा इशारा करते. सायली दीर्घ श्वास घेत आतमध्ये निघून जाते. जज आणि त्यांचे दोन वकील तिथे बसले होते. मानवसुद्धा तिथल्या चेअरवर जाऊन बसला होता. ती भीतभीतच त्याच्या शेजारच्या चेअरवर जाऊन बसली.
तिने हळूच वर नजर करून तिच्या वकिलाकडे पाहिलं. त्यांनी डोळ्यानेच तिला दिलासा दिला.. नंतर तिची तिरकी नजर मानवकडे गेली. तो भावना शून्य नजरेने समोर जज साहेबांकडे बघत होता.

जज साहेब वयाने वयस्कर होते. ते शांतपणे समोरच्या पेपरवर काहीतरी लिहीत होते. दहा मिनिटे झाले अजूनही त्यांनी वर पाहिलं नव्हत. दोघांची बेचैनी वाढत चालली होती. वकील साहेबसुद्धा शांत बसून जज साहेबांच्या बोलण्याची वाट बघत होते.

दहा मिनिटाची आता वीस मिनिटे होत आली, पण ते अजून खाली बघून लिहीतच होते. मानव आणि सायली थोडेसे वैतागलेले होते. त्यांच्यासोबत वकीलसुद्धा वैतागून एकमेकांकडे बघत होते.

क्रमशः


🎭 Series Post

View all