Login

वेड शॉपिंगचं भाग १

Online Shopping Mhanje Ek Prakare Ved Ch
भाग १
"दिवाळी पंधरा दिवसावर आलीय, कधी जायचं खरेदीला? मुलांचे कपडे, माझी साडी. सगळी खरेदी करायची राहिलीय. स्टॉक संपला की मनासारखं काही मिळत नाही मग." सीमाची बडबड सुरु होती, अभयने ऐकून न ऐकल्या सारखं केलं.

"अहो ऐकताय का? कधी जायचं सांगा तरी. पहिलेच उशीर झालाय मग पाण्यासारखा पैसा खर्च होतो.  काही बोलणार आहात की नाही? मी एकटीच बडबडतेय केव्हाची." सीमाने पुन्हा विषय छेडला.

"तू थकत नाही का ग. सतत पटरपटर सुरू असते तुझी, थकत नाही. का ग तू बोलून आणि खरेदी करून ही. आत्ता चार सहा महिन्यापूर्वी एवढी खरेदी केली बहिणीच्या लग्नाची, तरी अजून बाकी आहेच का?"

"ही दिवाळी, माणसाचं दिवाळं काढायलाच येते, खात्रीच पटली मला. लग्नात एवढ्या साड्या घेतल्या. मागच्या महिन्यात ही आवडली म्हणून एक साडी ऑर्डर केली.  लग्नात केलेल्या खरेदी मधली एक तरी साडी आणि मुलांचे ड्रेस, घातलेय का तुम्ही लोकांनी.. गरजेचं तेवढं जा आणि घे. बाकी उगाच विनाकारण दिवाळी आहे म्हणून नको खरेदी." 

"ह्या, दिवाळीला काही तरी वेगळं करायचा विचार करतोय. बघ तूझी साथ मिळाली तर नक्कीच शक्य होईल. " अभय बोलत होता.

"म्हणजे काय? खरेदी करायची नाही." सीमाची धुसपूस सुरू झाली. 

"तसं नाही गं, आवश्यक ते घे, फराळ, फटाके वगैरे आणूच. मुलांच वाढीचं वय,  कपडे लवकर छोटे होतात. लाडक्या मावशीच्या लग्नात प्रत्येक सोहळ्यासाठी नवनवीन कपडे घेतलेत त्यांनी आणि तू ही घेतल्याचं की साड्या. त्यांचे छोटे कपडे नवीन असतात मन भरत नाही आणि देऊन टाकावे लागतात. शक्य असेल तर या वर्षी कर मॅनेज." अभय बोलून थांबला.


"मॅनेज कर म्हणजे. दिवाळीसारखी दिवाळी आणि खरेदी नाही. शेजारी पाजारी बघा कसे, उत्साहाने मोठमोठ्या पिशव्या घेऊन येतायत रोज. ज्याच्या त्याच्या तोंडी एकच वाक्य "झाली का दिवाळीची खरेदी?" काय सांगायचं लोकांना?" सीमा तावातावात बोलत होती.


"लोकांना दाखवण्यासाठी दिवाळी साजरी करतो का आपण? आणि नवीन कपडे घातले म्हणजेच दिवाळी साजरी होते, असं कुणी म्हटलयं." आम्हाला नव्हते मिळत नवीन कपडे प्रत्येक दिवाळीला तरी खूप मजेत साजरा करायचो आम्ही दिवाळीचा सण."

"हे बघ, सणसमारंभ आनंद मिळवण्यासाठी असतात. ह्या चार पैशाच्या खरेदीवर आनंद अवलंबून नसावा आपला?"

"ये दिवाली, दो कपडोंके मोहताज नहीं है मॅडम!" आपण खरेदी हा विषय गमतीशीर रित्या हाताळतोय ह्या आनंदात अभय बोलत होता. 


"माझ्या बचत गटातल्या मैत्रिणीकडून पहिलेच घेतली असती एखादी साडी तर बरं झालं असतं. मी च एक पागल, तुमची वाट बघत बसले." सीमा चिडून बोलली. 


"घेतली का नाही मग!"
" जसं काही, तू सगळं काही मला विचारूनच करतेस. आजकाल खरेदीवर पैसा  वाहत्या पाण्यासारखा खर्च होतोय आपला. खर्चाचा तसाही काहीच मोजमाप राहिलेला नाही. ऑनलाईन पार्सल तर सतत पडलेच असतात. ऑनलाईन शॉपिंगचं तर तुला वेडच लागलयं ." अभय रागात बोलला.


"घरात किती काय काय लागत तुम्हा माणसांना काय कळतं? बायका प्रत्येक गोष्टीवर बारीक नजर ठेवून असतात. सणासुदीला साडी  रिपीट झाली की आवर्जून विचारतात." सीमा पुटपुटली.

"साड्या साड्या साड्या.. त्या शिवाय, कामधंदेच नाही तुम्हाला." अभय जोरात चिडला होता.

"चारेक वर्ष तरी झाले, आवश्यक ते सोडून मी फार काही कपडे घेतले नाहीत. मला नाही वाटत सांगताना जराही संकोच. एवढ्या वर्षापासून दिवाळीला आहे त्यातलाच एखादा कुर्ता घालतोय. तुझ्या बहिणीच्या लग्नातही मी आपल्या लग्नातल्या ब्लेझर आणि कुर्त्यावर निभावलं."

"लग्नातल्या ब्लेझर मध्ये मी अजूनही फिट बसतोय, ह्याचा मला जास्ती अभिमान वाटत होता. निभलंच ना!" अभय अभिमानाने बोलत होता.

"माणसाच्या पड्यांकडे कोण बघत?"

" बायकांच्या साड्या आणि ड्रेसवर लक्ष असतं बायकांचं. एखाद्या जागतिक विषयावर चर्चा व्हावी, तसा हा खरेदी विषय सीमा हाताळत होती. ती तिच्या बोलण्यावर ठाम होती.

"पैसे पैसे पैसे! जसे काही पैसे झाडाला लागतात?"
"काय करायचं ते कर! हे घे पैसे आणि कर तूझ्या मनासारखं" पाकिटातले होत्या नव्हत्या सगळ्या नोटा,  अभयने टेबलवर ठेवल्या आणि तावातावत आत निघून गेला.


"दिलेल्या या चार सहा नोटांमध्ये काय काय करू मी?  साडी घेऊ, मुलांसाठी खरेदी करू, घरात सामान भरू, रांगोळ्या, सजावट, पूजेचं सामान आणू की फराळ...!"  महागाई बघितली का किती वाढलीय? सीमा चिडून बोलली.

"लग्नाआधी, मज्जा असायची आमची.  आमच्या आईवडिलांनी कधी काहीं कमी केलं नाही आम्हाला. दिवाळीत दरवर्षी नवीन कपडे मिळायचे. आणि इथे.... एवढं होतं तर, एवढी वर्ष पण नव्हत्या घ्यायच्या ना दिवाळीला साड्या.  म्हणे घरची लक्ष्मी नव्या साडीत सजयला हवी." ती तावतावत बोलत होती. 

" पूर्वी, एवढं शॉपिंगच वेड  नव्हतं ना तुला. पूर्वीसारखी तू तरी वागतेस का? असो....  त्या नोटांच्या खाली,  क्रेडिट कार्ड ठेवलंय. कर काय खरेदी करायची ते. अभय आतून ओरडला. क्रेडिट कार्डवर लक्ष गेलं तसा सीमाचा चेहरा आनंदाने क्षणात उजळून निघाला.