Login

दिव्याखाली अंधार अंतिम भाग

Marathistory
जलदलेखन स्पर्धा नोव्हेंबर 2025

दिव्याखाली अंधार अंतिम भाग

आपल्यामुळे आईला हे ऐकून घ्याव लागलं याचं कुठेतरी प्रियंकालाही खूप वाईट वाटत होते. आता घरी गेल्यावर आपले काही खरे नाही असे तिला वाटले.

दोघीही घरी पोहोचल्या. आईची प्रत्येक गोष्ट मान खाली घालून ऐकण्याची तयारी प्रियंकाने ठेवली होती. पण वेदिका तिला एकही शब्द न बोलता बेडरूम मध्ये निघून गेली. आपल्याला आई एकही शब्द बोलली नाही याचे प्रियंकाला आश्चर्य वाटत होते आणि याचा त्रासही होत होता.

त्याच दिवशी महेश रात्री उशिरा घरी आला. त्यामुळे झालेल्या प्रकार त्याला माहीत नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी कोणालाही न सांगता वेदिका घराबाहेर पडली.
प्रियंकाने उठल्यानंतर आईला घरभर शोधलं. ती कुठेही दिसली नाही म्हणून ती घाबरली आणि बाबांकडे गेली.
घाईतच तिने महेशला उठवले.

"बाबा , बाबा उठाना. बाबा!आई घरात कुठेच नाहीये."
रात्री उशिरा झोपल्यामुळे महेश ची झोप झाली नव्हती. त्याने तिथेच कुस बदलली आणि म्हणाला, गेली असेल शाळेत. दुसरीकडे कुठे जाणार ती."

बाबा मला तुम्हाला काही सांगायचंय असं म्हणून प्रियांका रडू लागली.
तिच्या रडण्याने महेश लगेच उठून बसला.
सागर ही त्याच्या जवळ आला.
घडलेला प्रकार दोघांनीही बाबांना सांगितला.
त्याने प्रियंकाला जवळ घेतलं. आता मात्र त्याला काळजी वाटू लागली.

"वेदिका कुठे गेली असेल?" मनाशीच विचार करत त्याने लगेच तिला फोन लावला.
रिंग वाजत होती पण वेदिका फोन उचलत नव्हती.
तो झटकन बेडवरून उठला.
फोन लावता लावताच आवरू लागला.
त्याने प्रियांकाला विचारले,

"आई तुला खूप रागवली का काल?"

"नाही बाबा, ती मला एकही शब्द बोलली नाही."

हे ऐकून महेश ही काळजीत पडला. त्याच आवरून तो घराबाहेर पडणार तोच वेदिका आली.
तिने घरात पाऊल ठेवल्याबरोबर घरात शांतता पसरली.
तयार होऊन निघालेल्या महेश कडे बघत तिने विचारले,

"कुठे निघालात सकाळी सकाळी."

"तू कुठे गेली होतीस सकाळी सकाळी कोणालाही न सांगता."

महेश ने उलट तिलाच प्रश्न केला.

"एक काम होतं,ते करून आले."

महेश ला वाटलं होतं आता वेदिका आपल्याशी भांडणार पण वेदिका त्यालाही एक शब्द न बोलता किचनमध्ये नाष्टा बनवण्यासाठी गेली.थोड्या वेळात तिने सर्वांना नाष्टा वाढला आणि ती सागरला म्हणाली,

"सागर आज शाळेत जाऊ नको. मला तुम्हा दोघांशीही बोलायचं आहे. तुमचा नाश्ता झाला की स्टडीरूम मध्ये या."

महेश ला एकही शब्द बोलायची संधी न देता ती स्टडी रूम मध्ये निघून गेली.

सागर आणि प्रियंका एकमेकांकडे आणि बाबांकडे केविलवान्या नजरेने बघत होते.

महेश ने प्रियंका च्या हातावर हात ठेवला आणि डोळ्यांनीच सांगितलं,
"मी आहे ना."

मुलांच्या मागोमाग महेशही स्टडी रूममध्ये गेला.
महेश ला पाहून वेदिका म्हणाली,

"अरे मी दोघांना बोलावलं होतं तुम्ही तुमचं काम करायला जाऊ शकता."

"हे बघ वेदिका जे झालं ते चुकीचं झालं मला मान्य आहे. पण.."
त्याला पुढे बोलू न देता वेदिका म्हणाली,

"महेश मी माझ्या मुलांशी फक्त बोलणार आहे. कदाचित हे मला आधी करायला हवं होतं. मी चुकले. इतरांच्या मुलांना चांगले संस्कार लावण्याच्या नादात स्वतःच्या मुलांना संस्कार लावणं विसरून गेले. पण आता मला माझी चूक सुधारायची आहे. मी सकाळीच माझा राजीनामा देऊन आले आहे आणि आता पूर्ण वेळ घरीच मुलांबरोबर थांबणार आहे."

हे ऐकून तिघही स्तब्ध झाले.

"तू राजीनामा दिलास..."
महेश ने पुन्हा एकदा विचारले.

"हो.."
वेदिका प्रियांकाकडे बघत म्हणाली.

"आई ,एम सॉरी ना... असे म्हणत प्रियंका वेदिकाच्या गळ्यात पडली.
वेदिका ने तिच्या पाठीवरून हात फिरवला आणि म्हणाली,

"नाही बाळा तुझी काही चूक नाही.चूक माझीच झाली. तुला सायन्स साईड घ्यायची नव्हती तरी मी घ्यायला लावली. एक शिक्षिका म्हणून मला समजून घ्यायला पाहिजे होतं की मुलांच्या ही काही इच्छा असतात. माझ्याच मुलांच्या बाबतीत मी चुकले यात मला खरंतर खूप वाईट वाटतंय. एक आदर्श शिक्षिका म्हणून घेण्याचा मला काहीही अधिकार नाही."

हे सगळं बोलताना तिला गहिवरून आलं होतं.
कितीही वाद-विवाद असले तरी महेशचही आपल्या बायकोवर प्रेम होतं. तिची झालेली अवस्था पाहून तोही आतल्या आत तळमळत होता.

वेदिका पुढे प्रियंकाला म्हणाली,

"पिऊ काळजी करू नकोस अजून एक महिना आहे बोर्ड एक्झामला, मी तुझा सगळा अभ्यास व्यवस्थित घेईन
पण तू तयार आहे ना बाळा."

प्रियंकाने रडतच मान हरवली आणि म्हणाली,

"हो आई,इथून पुढे तु सांगशील ते मी सगळं ऐकेन."

"मी सुद्धा तुझं सगळं ऐकणार."
असं म्हणून सागर ही तिच्या गळ्यात पडला.

वेदिकानी आपल्या दोन्ही मुलांना कवटाळलं.
तिघांना बघून महेशला राहवलं नाही. त्यानेही तिघांना मिठी मारली आणि म्हणाला,

"मी सुद्धा इथून पुढे आईचं सगळं ऐकणार. आजच दुसरी नोकरी शोधायला सुरुवात करतो."

महेश असं म्हणाल्याबरोबर वेदिका ने त्याच्याकडे आश्चर्याने बघितलं.
महेश ने तिला डोळ्यांनी सांगितलं
"खरंच."

सागर आणि प्रियांका बरोबरच ओरडले
"बाबा खरंच"

"हो मग.. जोक करतोय का मी? पण"

महेश पुढे म्हणाला,
"वेदिका तू नोकरी सोडू नकोस. तू एक चांगली शिक्षिका आहे. हवं तर काही दिवसांसाठी सुट्टी घे."

मुलांनीही या गोष्टीला दुजोरा दिला.
वेदिका आणि महेश मधील मतभेदांमुळे निर्माण झालेली दरी आज समजूतदारपणामुळे, एकमेकांमध्ये झालेल्या मोकळ्या संवादामुळे भरून आली होती.
दिव्याखालील अंधार मिटवायला सगळा परिवार प्रेमाने एकत्र आला होता.
समाप्त.
सुजाता इथापे


0

🎭 Series Post

View all