Login

दिव्याखाली अंधार भाग 2

Marathistory
दिव्याखाली अंधार भाग 2


महेश मुलांना घेऊन मुव्ही बघायला गेला त्यामुळे वेदिका चिडली होती.
त्यांना यायला रात्रीचे दहा वाजले.

"बाबा ती राईड तर एकदम मस्त होती."

सागर बोलतच घरात आला तसे त्याने हॉलमध्ये वेदिकाला बघितले. इतका वेळ बाबांशी मस्ती घालणारा सागर तिला बघून एकदम शांत झाला.

तिघांना बघून वेदिका म्हणाली,

"आलात गावभर उंदडून."

"प्रियंका त्याला नाही तर नाही तुलाही अक्कल नाही बारावीचे वर्ष आहे तुझं. कळतंय ना."

"आई पण..."
ती काही बोलणार तोच महेश मध्येच म्हणाला,
तुम्ही दोघेही फ्रेश व्हायला जा.
दोघेही मुलं फ्रेश व्हायला गेली.

"दिवसभर आमचा खूप आनंदात गेला पण घरात पाय ठेवला आणि सगळ्या आनंदावर विरजण पडल."
महेश कुश्चित हसत म्हणाला.

" हो ना मग यायचं नाही घरी.आपण तर सतत बाहेर असतात मुलांनाही ठेवायचं बाहेरच."

"वेदिका एक दिवस तरी मुलांना आनंदी राहू दे."
महेश म्हणाला.

"मी... वेदिका काही बोलणार तोच महेश ने हात करून तिला शांत बसवले आणि तो बेडरूम मध्ये निघून गेला.

दुसऱ्या दिवशी पहाटेच महेश दूरवर निघून गेला. इकडे वेदिकाने दोन्ही मुलांना चांगलेच फैलावर धरले.

"वेदिका अभ्यास कुठपर्यंत आलाय. बारावीचे वर्ष आहे तुझं, आणि तू रे....माझ्या क्लास मधले सगळे मुलं एक्स्ट्रा क्लासेस घ्या म्हणून माझ्या मागे लागतात आणि तुम्ही दोघे अभ्यास सोडून बाहेर भटकता."

"तू कुठे होती घरी आमचा अभ्यास घ्यायला."
प्रियंका एकदम बोलून गेली.

"काय म्हणाली? मला उलटं बोलतेस ...बाबांबरोबर फिरण्याचा परिणाम दिसतोय."

"उलटं कुठे? तू सकाळीच गेली म्हणून बाबा आम्हाला घेऊन गेले फिरायला."
सागर हळूच म्हणाला.

"मी सकाळी गेले तर दुपारपर्यंत घरी आले ना.मला माझ्या जबाबदाऱ्या कळतात पण तुम्हाला....तुमचे बाबा ही तसेच आणि तुम्हीही तसेच.त्याला सुद्धा वाटले नाही मुलांचा अभ्यास महत्वाचा आहे, बाहेर भटकण्यापेक्षा घरी बसून अभ्यास घेतला असता तर बिघडले असते का? पण नाही....मी एकटीच का काळजी करू तुमच्या भविष्याची...तुम्हाला बोलून काय उपयोग ...आवरा उशीर होईल शाळेला.."

थोड्यावेळात तिघही घराबाहेर पडले.
सागर वेदिकाच्या शाळेत होता.आपली आई शिक्षिका आहे म्हटल्यावर बऱ्याचदा सागर त्याचा गैरफायदा घ्यायचा.त्याचा होमवर्क पूर्ण नसला तरी बाकीचे शिक्षक त्याला काही बोलत नव्हते मात्र वेदिकाकडे त्याची तक्रार करायचे.वेदिका ही त्याला समजावून, रागावून थकली होती पण त्याच्यात काहीच फरक पडत नव्हता.सागर बाबत सतत येणाऱ्या तक्रारींमुळे तिला लाजिरवाणे वाटायचे.याचा दोषही ती महेशला देत होती.

प्रियांकाचे ही लक्ष जास्त अभ्यासाकडे नव्हते. आईच्या सांगण्यामुळे अगदी नाईलाजास्तव तिने सायन्स साईड घेतली होती.

वेदिकाचे दोन्ही मुलं अभ्यासामध्ये हुशार नव्हते पण वेदिका मात्र इतर विद्यार्थ्यांची आवडती शिक्षिका होती.
तिच्याकडे सगळे मुलं स्वतःचे प्रॉब्लेम सॉल करून घ्यायला येत. तिच्याशी मनमोकळा संवाद करत, त्यावेळी वेदिकाला नेहमी वाटे आपल्या मुलांनीही आपल्याशी मनमोकळ्या गप्पा माराव्या पण प्रत्यक्षात मात्र त्यांच्यात एक दरी निर्माण होत होती.
ही दरी कमी होईल का? वाचू पुढील भागात...