Login

डू ऑर डाय _ खेळ मृगजळाचा (भाग १)

यशाच्या खडतर मूल्यांची शिकवण देणारा,एक रहस्यमय खेळ..
डू ऑर डाय _ खेळ मृगजळाचा ( भाग १) - जलद कथामालिका लेखन स्पर्धा

" अमित,उठतोस का बाळा?"

" आई तू माझ्याशी इतके प्रेमाने कसे काय बोलतेय?"

" दिवसभर एवढे कष्ट करतोस ना तू म्हणून."

" काय?"

अमित संभ्रमात पडला.मी तर एक अशिक्षित बेरोजगार आहे,हे आईला माहित आहे.जाऊ दे. आज सूर्य पश्चिमेकडून उगवला आहे वाटतं.होऊ दे आईकडून आपले लाड असा विचार करत असतानाच
अचानक त्याला पुन्हा आवाज आला.

" अरे माकडा उठलास की नाही अजून? काम नको,कष्ट नको.नुसता आळशी असल्यासारखा वागतो.कधीही झोपतो,कधीही उठतो.उठ लवकर. खाऊन घे,नाही तर रहा उपाशी."

अमित ताडकन उठला.

आपण स्वप्न पाहिले हे कळताच त्याचा भ्रमनिरास झाला. आपल्या नशिबात आईचे प्रेमाचे बोल नाहीतच अशा विचारांत हरवत तो सकाळचे प्रातःविधी उरकत होता. एकीकडे आईचे त्याच्याबद्दलचे तक्रारीचे सूर
नेहमीप्रमाणे चालू होते.

तो डायनिंग टेबलवर नाश्ता करू लागला. तसे वर्तमानपत्र रोजच यायचे पण आज बाजूलाच पडलेल्या वर्तमानपत्रातील एका जाहिरातीने त्याचे लक्ष वेधले.

"लॉटरी लॉटरी लॉटरी
त्वरा करा, त्वरा करा
आमच्या सोबत खेळ खेळा आणि जिंका भरघोस रक्कम!"

आधी त्याने दुर्लक्ष केले. मग अचानक त्याला घरातील वाढता खर्च आठवला. आपल्यासाठी आपल्या बाबांनी इतका पैसा लावला तरीही आपण अद्याप बेरोजगारच. एक साधी नोकरीही मिळवण्याची आपल्यात धमक नाही.

एका ठिकाणी अमितचे नोकरीचे काम दोन लाख रुपयांवरून अडकले होते. काहीही करून पैसा हातात असणे आता त्याच्यासाठी खूप गरजेचे झाले होते. म्हणूनच कधीही वर्तमानपत्र न वाचणारा मुलगा आज अगदी बारकाईने ही जाहिरात वाचत होता. हे बघून अमितची आई क्षणभर सुखावली. कधीतरी माझ्या टोमण्यांनी याच्या डोक्यात फरक पडेल असे तिला वाटतच होते. म्हणून तीही बोलायची थांबली.

अमित तसाच उठला आणि जाहिरातीतील पत्त्यावर पोहोचला पण तिथे कोणीच नव्हते. शिवाय ते एक अज्ञात स्थळ असल्याचे जाणवत होते. एवढ्या नावाजलेल्या वर्तमानपत्रात जाहिरात असूनही इथे काहीच गर्दी नाही याचे अमितला आश्चर्य वाटले.
तो माघारी फिरणार तोच कोणीतरी त्याचे रुमालाने तोंड दाबले. त्याने स्वतःच्या सुटकेसाठी खूप प्रयत्न केला पण तो फोल ठरला. क्षणात तो बेशुद्ध झाला.

काही कळण्याच्या आतच त्याला आत आणण्यात आले.काय आहे हा लॉटरीचा खेळ? ही लॉटरी म्हणजे केवळ एक मृगजळ आहे की जीवन मरणाचा खेळ? पण हा खेळ पैशांसाठी आहे की जीवनातील मूलभूत तत्त्वांसाठी? अमित कुठे गेला? अचानक तो कुठे गायब झाला? पाहूया पुढील भागात..

भाग १ समाप्त
©® सौ प्रियंका शिंदे बोरुडे


0

🎭 Series Post

View all