मागील भागात आपण पाहिले की अमित रोहनला जीवदान देण्याचे ठरवतो.आता पाहूया पुढे..
तेवढ्यात अचानक पुन्हा आवाज आला.
" असे होय.तू रोहनला वाचवू पाहतोय,पण रोहन खोटं बोलून, खोटे भासवून सर्वांची सहानुभूती कायम मिळवत आलाय हे तुला माहित आहे का?"
" नाही तो गरीब आहे,शिवाय कुटुंबाची आर्थिक जबाबदारी त्याच्यावरच आहे."
" साफ खोटे आहे हे. तो एक वाया गेलेला श्रीमंत बापाचा मुलगा आहे."
तेवढ्यात एका मोठ्या स्क्रीनवर रोहनचे सारे फोटो दाखवण्यात आले,ज्यात तो एक वाया गेलेला श्रीमंत मुलगा आहे हे स्पष्ट झाले होते.
अमितने रोहनकडे पाहिले.रोहन मान शरमेने खाली करत रडू लागला.तेवढ्यात त्याच्यावर गोळी झाडली गेली आणि तो निपचित पडला.
आता चित्र स्पष्ट झाले होते की अमित या खेळाचा विजेता ठरला.
" खूप अभिनंदन अमित.तू या खेळाचा विजेता ठरला आहेस."
" बस! मी तुमचं खूप सहन केलं आता.हा खेळ खेळून ,या निरागस जीवांचे प्राण घेऊन तुम्ही काय कमावले?कोण आहे या मागील मास्टरमाईंड?"
" अच्छा म्हणजे तुला स्पष्टीकरण हवे आहे तर!"
अचानक एक मास्कधारी व्यक्ती त्याच्यासमोर आली.त्या व्यक्तीने हळूच मास्क उतरवले.तो साधारण ५० वर्षे वय असणारा एक माणूस होता.
" मी आहे यामागचा मास्टरमाईंड.सर्वप्रथम मी वर्तमानपत्रात ही जाहिरात टाकली.ती वाचून तुमच्यातील मोह तुम्हाला इथे घेऊन आला ,मी नाही बोलावले.अरे तुम्ही सारे सुशिक्षित बेरोजगार होते ना, मग पैसा मिळवण्याचा असा शॉर्टकट मार्ग तुम्ही नेहमी शोधता. तेवढा वेळ तुम्ही स्वतःला आणखी परिपूर्ण करण्यासाठी देत नाही,हो ना?"
अमित ऐकत होता.
"पहिल्या फेरीत मी तुम्हाला अक्षरांवरून नावांचा चढता क्रम लावण्याचा साधा टास्क दिला.पण त्यातही ज्यांच्यात जिद्द,धडपड,चिकाटी नव्हती तेच मारले गेले.दुसरा टास्क नाणी मोजण्याचा होता. त्यातही अनेकांना आकडेमोड जमेना.म्हणजे काय अर्थ आहे याचा? हे सुशिक्षित नाही तर नक्कल,कॉपी करून मार्क्स मिळवलेले तरुण होते.म्हणून त्यांना आपला प्राण गमवावा लागला.तिसऱ्या फेरीत ज्यांच्याकडे सुशिक्षित पणा असूनही व्यवहार कौशल्य नाही असे बाद झाले.ती म्हातारी जिला तू मदत केली ती माझ्याच टीम मधील सदस्य होती.तुझा दयाभाव मला आवडला.म्हणून मीच तिला ५०० रुपये तुला द्यायला लावले.शेवटच्या फेरीत खोटे बोलल्यामुळे रोहनचा बळी घेतला गेला."
का खेळला असेल या माणसाने असा जीवघेणा खेळ?अमित तर आता विजेता आहेच.मग ७ कोटी मिळतील त्याला की हे केवळ मृगजळ होते?
भाग ५ समाप्त..
पाहूया पुढील भागात..
©® सौ प्रियंका शिंदे बोरुडे
पाहूया पुढील भागात..
©® सौ प्रियंका शिंदे बोरुडे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा