Login

डू ऑर डाय _ खेळ मृगजळाचा (भाग ३)

यशाची खडतर मूल्ये शिकवणारा एक रहस्यमय खेळ
मागील भागात आपण पाहिले की अमितसह इतर ९ जण पहिली फेरी पार करण्यासाठी धडपडत होते.
आता पाहूया पुढे..

दीड तास पूर्ण होण्यासाठी अवघे काही मिनिट बाकी असताना अमित मात्र आत्मविश्वासाने आणि प्रामाणिकपणे ही पहिली फेरी पूर्ण करण्यात यशस्वी झाला.नंतर प्रत्येकाचे काम तपासले गेले आणि ज्यांच्या चुका होत्या त्यांना जागेवरच गोळ्या झाडण्यात आल्या.
अशा रीतीने आता केवळ ७ स्पर्धक उरले होते.
एव्हाना अमित सह इतर ७ स्पर्धक प्रचंड घाबरलेले होते.पण हा खेळ खेळण्यावाचून त्यांना गत्यंतर नव्हते.

" चला दोस्तांनो,आता दुसरी फेरी.यात तुम्हाला काही नाणी देण्यात येतील.ती व्यवस्थित मोजून तुम्हाला एकूण किंमत सांगायची आहे.तुमच्यातील प्रत्येकजण निदान पदवीधर आहेत त्यामुळे ही फेरी काहीच अवघड नाही.लक्षात ठेवा नाणी जास्त असली तरीही वेळ असेल ३० मिनिटे."

अमित मात्र या आवाजाचा स्त्रोत कुठे आहे हे शोधू लागला तेव्हा त्याला सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेरे दिसले.पण आपल्याला इथून सहीसलामत बाहेर पडून या खेळाच्या मास्टर माईंडला शोधून काढायचे आहे हा विचार त्याने पक्का केला आणि तो पुढील फेरी खेळू लागला.

नाणी तर खूप होती पण त्यामानाने ती मोजण्यासाठी दिलेला वेळ खूप कमी होता.तरीही पूर्ण जिद्दीने,एकाग्रतेने,सचोटीने अमित नाणी मोजू लागला. अवघे पाच सेकंद असताना त्याची पूर्ण नाणी मोजून झाली. नेमके दोन जणांचे नाणी मोजण्याचे काम अजून चालूच होते. वेळ संपला. एका मास्कधारी व्यक्तीने त्या दोघांना गोळ्या झाडल्या.ते जागेवर कोसळले.अमित धरून एकूण आता ५ जण उरले.ते सर्व आता प्रचंड घाबरलेले अवस्थेत एकमेकांकडे बघु लागले.

सर्वांना एकच प्रश्न पडला की खेळ जमला नाही तर मारून टाकणे एकदम अयोग्य आणि भीतीदायक आहे.
सर्व स्पर्धकांना राहण्याची, जेवणाची सोय ठीक होती पण तरीही एकमेकांशी बोलण्यासाठी अजिबात मुभा नव्हती.

आज अमितसह बाकीचे स्पर्धक येऊन चार दिवस झाले.रात्रीची वेळ झाली. अमितने इतर सर्व स्पर्धकांना मध्यरात्री उठवले व त्यांच्याशी चर्चा करायचे ठरवले. चर्चेच्या शेवटी अमितला बऱ्याच गोष्टी खटकल्या. एकतर सर्वच्या सर्व दहा जण हे पदवीधर होते. जणू काही मुद्दामच त्यांना या ठिकाणी बोलावण्यात आले होते.कारण प्रत्येकाने आधीच ऑनलाईन फॉर्म यासाठी भरला होता. त्याप्रमाणे त्या त्या व्यक्तीलाच तिथे बेशुद्ध करून आणण्यात आले होते. अमितसह इतर स्पर्धक या जीवघेण्या खेळामुळे खूप गोंधळलेले, घाबरलेले आणि असह्य झाले. सर्वांनाच आपल्या घरची आठवण येऊ लागली.

आता पुढे काय होईल? या स्पर्धकांना अजून किती परीक्षा द्याव्या लागतील? शेवटी रोख रकमेचे बक्षीस कोण जिंकेल ? अमित टिकेल का शेवटपर्यंत?पाहूया पुढील भागात..

भाग ३ समाप्त
©® सौ प्रियंका शिंदे बोरुडे

0

🎭 Series Post

View all