Login

दोघांची निवृत्ती: सेकंड इनिंग

आयुष्यातील दुसऱ्या इनिंगबद्दल सांगणारी ही कथा.
#लघुकथालेखन
#ईरास्पर्धा

विषय:- सेकंड इनिंग

शीर्षक:- दोघांची निवृत्ती : सेकंड इनिंग

मागच्याच आठवड्यात मारुतीरावांची सेवानिवृत्ती झाली होती. सरकारी नोकरीत त्यांनी फक्त काम आणि कामच केले होते. आपण कुटुंबाचा कर्ता माणूस म्हणून त्यांनी आपल्या कुटुंबासाठी आपले जीवन समर्पित केले होते.

मारुती शिर्के आणि आणि त्यांची पत्नी नर्मदा ह्या सकाळी बाल्कनीत बसून चहा पीत असताना त्यांना पुढे काय करायचे हे विचारत होत्या.

"आता जे आपण ठरवून करू शकत नव्हतो ते आता करायचे." त्यांनी चहाचा एक घोट घेत सांगितले.

"म्हणजे?" त्यांच्या पत्नीला त्यांचे कोड्यातले बोलणे समजले नव्हते.

"आयुष्यभर आपण आपल्या मुलांसाठी केले आता थोडे आपण आपल्यासाठी जगायचे. परवाच आपण काही दिवसांसाठी बाहेर फिरायला जाणार आहोत." त्यांनी सांगितले.

हे सर्व ऐकून नर्मदा ह्यांना काय बोलावे समजत नव्हते.
कारण कधीच त्या देवधर्मासाठी आणि गाव सोडून अन्य कुठे गेल्याच नव्हत्या. त्यातच त्यांचा नातू आता एक वर्षाचा झाला होता. त्यांची सूनबाई  पुन्हा कामावर रुजू झाली होती म्हणून त्याच त्यांच्या नातवाला सांभाळत होत्या.

"पुन्हा केव्हातरी जाऊ. आता आपला सोहम खूप लहान आहे. त्याला माझी सवय लागली आहे." असे म्हणून त्या नातवाच्या आवाजाने आतमध्ये गेल्या.

त्यांनी एक सुस्कारा सोडला आणि रेडिओवर सकाळी गाणी ऐकत वर्तमानपत्रातील शब्दकोडे सोडवण्याचे काम करण्यात मग्न झाले.

रात्री सर्व एकत्र जेवायला बसले. जेवून झाल्यावर त्यांची सून आणि मुलगा खोलीत झोपायला जाणार तर त्यांनी त्यांना थांबवले.

"थांबा. मला जरा तुमच्याशी बोलायचे आहे." मारूतीराव म्हणाले.

"हो, पप्पा बोला ना." त्यांचा मुलगा विराट म्हणाला.

"आम्ही परवा, दहा दिवसांसाठी बाहेर जाणार आहोत. त्यामुळे आता थोडे दिवस तुम्ही जरा पूर्ण घराची जबाबदारी घ्या." त्यांनी सांगितले.

"आई, कुठे जाणार आहात तुम्ही?" त्यांची सूनबाई सोना विचारत होती.

"ते तिलाही माहीत नाहीये. दहा दिवस आम्ही बाहेर फिरायला जाणार आहोत. त्यामुळे सोहमकडे लक्ष द्या." मारुतीराव आपल्या नातवाला मांडीवर घेवून म्हणाले.

विराट आणि सोना एकमेकांकडे पाहत होते. कारण सकाळचा डब्बा आणि रात्रीचे थोडे जेवण तरी नर्मदा करून देत होत्या. तसेच सोहम त्यांच्याकडे राहिल्याने त्याची काळजी पण त्याच घेत होत्या.

"पप्पा पण आम्हाला आमची कामे आहेत आणि अजून सोहम लहान आहे. आताच तर सोनाने पुन्हा कामाला जाणे चालू केले आहे. लगेच सुट्टी कशी घेणार?" त्यांच्या मुलाला काही ते पटले नाही.

"आम्ही जाणार हे तर ठरलं आहे, आता तुम्ही तुमची कामे कशी करता हा तुमचा प्रश्न आहे." त्यांनी सांगून सोहमला त्याच्या आईकडे सोपवून झोपायला गेले.

दुसऱ्यादिवशी सकाळपासून घरात शांतता होती. मारुती ह्यांनी आपल्या बायकोला रविवारीच काही ड्रेसची खरेदी  तिला सोबत घेऊन केली होती.

पूर्ण दिवस शांततेत गेल्याने रात्री जेवताना नर्मदा न राहून बोलल्या की, "अहो, आपण नंतर जाऊ. आता हे दोघे सर्व कसे सांभाळणार?"

जेवून झाल्यावर ह्यावर बोलूया असे त्यांनी सांगितले म्हणून त्यांची बायको पुढे काहीच बोलली नाही.

सर्व आवराआवर झाली आणि सोनाने बोलायला सुरुवात केली, " तुम्ही दोघे जाऊन या. इथली काही काळजी करू नका. दहा दिवसांचा तर प्रश्न आहे. मी तोपर्यंत घरातून काम करेल. मला कंपनीने त्याची परवानगी दिली आहे."

"बरं झाले मग. चला आम्हाला आता झोपायला हवे. सकाळी लवकर निघावे लागेल." आपल्या बायकोला इशारा करून ते झोपायला खोलीत गेले.

पहाटे लवकर उठून ते तयार झाले आणि पाहतात तर काय त्यांचा मुलगाही तयार झाला होता. रात्रीच त्यांच्या मुलीने फोन करून त्यांना प्रवासासाठी शुभेच्छा आणि काळजी घ्यायला सांगितले होते.

त्यांच्या मुलाने त्यांना विमानतळावर सोडले आणि इथली  काळजी करू नका असे सांगितले.

"अहो, आपण विमानातून जाणार?" खूपच उत्सुक असलेल्या आपल्या बायकोकडे पाहून तिने विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी मानेनेच होकार दिला.

पहिल्यांदाच विमानप्रवास करणाऱ्या दोघांना आधी थोडे समजण्यास अवघड गेले मग त्याबद्दल इतरांना विचारून त्यांनी आवश्यक असणाऱ्या गोष्टी नीट केल्या.

एकदाचे विमानाने आकाशात उड्डाण केले आणि नर्मदा मात्र आपल्या नवऱ्याचा हात पकडून बसल्या होत्या. नंतर आकाशातील ढग आणि मध्येच विमानात काय चालले आहे हे पाहणे त्यांचे चालू होते.

त्यांच्या इच्छित स्थळी ते पोहोचले आणि समोर दिसणारा पांढरा शुभ्र बर्फ पाहून ते कुठे आलेत ते समजले.

"इथेच यायचे होते ना तुला?" मारुतीराव हसत म्हणाले.

"हो, पण खूप थंडी आहे." त्या हातावर हात घासत म्हणाल्या.

लगेच बॅगतले हातमोजे त्यांनी त्यांना घालून दिले. मग एका बुक केलेल्या हॉटेलमध्ये दोघे गेले.

'नर्मदा ही माझीच नाही तर तुझ्या आयुष्याची दुसरी इनिंग चालू आहे. तुला कधीच कुठे फिरायला नेले नाही म्हणून आता शक्य आहे तर मी तुला इथे घेवून आलो आहे.'मनाशीच मारुती म्हणाले.

तिथे राहून दहा दिवसांत त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देवून तिथल्या खाद्य संस्कृतीचाही आस्वाद घेतला होता. शिमला आणि मनाली फिरून नंतर त्यांनी दिल्लीमध्ये काही ठिकाणे फिरली. येताना मात्र ते रेल्वेने आले कारण त्यांच्या बायकोची इच्छा होती.

दहा दिवस भुर्रकन उडून गेले होते सोबतच शरीर जरी थोडे थकले होते तरी उत्साह मात्र अजूनही होता.

आल्या आल्या आपल्या नातवाला घेवून दोघेही त्याच्याशी त्याला बोलता जरी येत नसले तरी गप्पा मारत होते. सोहमही त्यांना हसून प्रतिसाद देत होता.

रात्री झोपताना परतीच्या प्रवासात झालेले त्यांचे बोलणे आठवले.

"अहो, मला तर हे दहा दिवस संपूच नये असे वाटते. बरे केलेत मला जरा आता खूप मस्त वाटत आहे." आपल्या नवऱ्याला रेल्वेत त्यांच्या बाजूला बसून त्या सांगत होत्या.

" हो तर, पण किती तुझा नकार गं, इथे मी म्हणतोय जायचे आणि तू नवऱ्याचे ऐकायचे सोडून आपल्या मुलांचेच तुला पडले होते." शेवटी त्यांनी बोलून दाखवलेच.

"अहो, दोघे सगळं कसे सांभाळतील ती मला चिंता होती. म्हणून मी नाही बोलले." त्यांनी आपली बाजू मांडली.

"हे बघ नर्मदा, सेवानिवृत्त मी जरी झालो असलो तरी आता तू सुद्धा घरातील कामातून आणि काही जबाबदारीतून मुक्त हो. तू तुझे पूर्ण आयुष्य माझ्या आणि आपल्या मुलांमध्ये वाहून घेतले. आता स्वतःसाठी थोडा वेळ काढ. तुला फिरायला आवडते ना पण तेव्हा पैशाची अडचण आणि मुलांचे शिक्षण ह्यामुळे तुला बाहेर जाता आले नाही. आता तसे करू नको. आपण दरवर्षी आता बाहेर जाणार आहोत. तसेच महिन्याचा एक दिवस नाटक नाहीतर सिनेमा आपण पाहायचा हे मी ठरवले आहे."

त्यांचे बोलणे ऐकून आपला नवरा नेहमीप्रमाणे आपला विचार करतो हे पाहून त्यांना समाधान वाटले.

विचारातून बाहेर आल्यावर बाजूला त्यांनी पाहिले तर त्यांच्या नवऱ्याचा घोरण्याचा आवाज सुरू झाला होता आणि हसून त्या पण शेजारी झोपून गेल्या.

© विद्या कुंभार

सदर कथेचे हक्क हे लेखिकेकडे आहेत त्यामुळे साहित्य चोरी करून इतर ठिकाणी कॉपी करून पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.


0

🎭 Series Post

View all