लघुकथा_
डोळस नजर
"आई माझा डबा आणि पाण्याची बाटली ठेवलीस ना ग बॅगेत. आज काय आहे डब्यात?
"आज तुझी आवडती बटाट्याची सुकी भाजी. सुकी भाजी म्हटली की तुला पुऱ्या लागतातच. छोट्या डब्यात सलाड पण आहे."
"बरं चल मी निघते आता नाहीतर गाडी चुकेल माझी."
"अगं सायली तू म्हणत होतीस ना की हल्ली वरचेवर तुझी नेहमीची गाडी कॅन्सल करतात. पण मग नंतरच्या गाडीत तुला नीट चढायला मिळतं का ग!"
"हो आई. अगं मी अपंगांच्या डब्यात जाते ना त्यामुळे मला चढायला मिळतं. माझ्या हातातली काठी बघून लोक मला मदतच करतात. पण मला कोणी सहानुभूती दाखवलेली आवडत नाही. काही जण मात्र माझ्या स्वाभिमानाला धक्का न लागू देता मदत करतात. चल बाय".
सायली आणि तिची आई दोघीजणी मुंबई शहरातील कांदिवली उपनगरातील एका छोट्याशा चाळीत राहत होत्या. सायलीला लहानपणी एका अपघातामुळे अंधत्व आलं होतं. तिच्या आईने मोलमजुरी करून सायलीचं शिक्षण तर पूर्ण केलं होतं. शिक्षण पूर्ण झाल्यावर सायलीला एका राष्ट्रीयकृत बँकेच्या चर्चगेट येथील मुख्य कार्यालयात टेलिफोन ऑपरेटरची नोकरी मिळाली. सायली खूप प्रामाणिकपणे काम करायची. तीने अंध असल्याचा गैरफायदा कधीच घेतला नाही. तिच्याबरोबर अजून चार मैत्रिणी होत्या. त्या नेहमीच तिला सांभाळून घेत असत. सायलीच्या स्वभावामुळे सगळ्या मिळूनमिसळून काम करत होत्या.
सायलीला स्टेशनवरून बस पकडून कार्यालयात जावं लागायचं. ती नेहमी पुढच्या दाराने प्रवेश करायची. एक दिवस ती बस मध्ये चढताना तिला मागून एक पुरुषी स्पर्श जाणवला. ती त्या व्यक्तीवर खूप चिडली. तीला वाटलं त्या माणसाने तिला मुद्दामहून स्पर्श करायचा प्रयत्न केला. तो माणूस खूपच शर्मिंदा झाला. त्याने तिला चढताना सॉरी म्हटलं उतरताना पण सॉरी म्हटलं. नंतर शेवटच्या स्टॉपवर उतरून कार्यालयात जाताना सायलीच्या ऑफिसमधील मनोज तिला म्हणाला,
"ताई तू ज्या माणसावर चिडलीस ना तो सुद्धा अंध होता गं. तुला मी मुद्दाम तिथे सांगितलं नाही नाहीतर त्या माणसाला वाईट वाटलं असतं."
"अरे मनोज काय सांगतोस! मी त्याला वाटेल तसं बोलले. उद्या जर तो बस मध्ये असेल ना तर मला सांग मी नक्कीच स्वतःहून त्याची माफी मागेन. त्याला बिचाऱ्याला कसं वाटलं असेल."
"ताई उद्या तो माणूस असेल तर आपण बोलू त्याच्याशी. त्याला मी आपल्या बाजूच्या बँकेत शिरताना पाहिलं आहे."
घरी आल्यावर सायली खूप अस्वस्थ होती. तिच्या आईने विचारल्यावर तिने झाला प्रसंग आईला सांगितला.
"सायली तू वाईट वाटून घेऊ नकोस. उद्या तू त्यांची माफी माग म्हणजे तुझ्या मनाला शांत वाटेल."
दुसऱ्या दिवशी सायलीने त्या माणसाची माफी मागितली. त्याच्याशी बोलल्यावर तिला कळलं की तो पण तिच्यासारखाच अंध असून तिच्यासारखाच टेलिफोन ऑपरेटर आहे. हल्ली त्याचे टायमिंग बदलल्यामुळे तो ह्या वेळेला येऊ लागला. नंतर रोजच त्यांची बसमध्ये भेट होऊ लागली. अपंगांच्या सीटवर बाजूबाजूला ते बसू लागले. त्याचं नाव सुमित होतं. बोलता बोलता सुमितने सायलीला विचारलं,
"तू जन्मांध आहेस की इतर कशामुळे तुला अंधत्व आलं"
"जन्मांध नाही पण लहान असताना माझा एक अपघात झाला त्यात माझी दृष्टी गेली. मला पुन्हा दृष्टी येऊ शकते परंतु त्यासाठी खूप मोठा खर्च आहे. आम्ही गरीब आहोत. एक संस्था अर्धा खर्च द्यायला तयार आहे. परंतु अर्ध्याएवढे पण पैसे आमच्याकडे नाहीत. म्हणूनच मी नोकरी करते आणि माझी आई सुद्धा कष्टाची कामं करते. तुझ्याबद्दल काय सांगशील."
"सायली मी जन्मांध आहे त्याचप्रमाणे मी अनाथ आहे. इथे अंधांसाठी संस्था आहे तिथेच मी लहानाचा मोठा झालो. माझे शिक्षण तिथेच झालं. आता मला नोकरी लागली आहे. जोपर्यंत मी अविवाहित आहे तोपर्यंत तिथे राहू शकतो. एकदा लग्न झालं की आम्हाला ती संस्था सोडावी लागते. आम्ही सर्वजण फावल्या वेळात कलाकुसरीच्या वस्तू बनवतो. त्याचं प्रदर्शन भरवलं जातं. त्यातून सुद्धा आमच्या संस्थेला उत्पन्न मिळतं. ही संस्था जमशेदजी म्हणून एका श्रीमंत पारशी माणसाची आहे."
"तुला आई बाबांची, आपल्या माणसांची खूप उणीव वाटत असेल ना. आपण लहान असताना आपल्याला आपल्या आईची खूपच गरज असते. तुझं लहानपण अगदी आईच्या छत्रछायेशिवाय गेलं. खूप वाईट वाटत असेल तुला."
"अगं चुकतय तुझं सायली. या जगात फक्त रक्ताचीच नाती असतात असं नाही. जोडलेली नाती पण खूप श्रेष्ठ असतात. आमच्या संस्थेत कोणाला पोरकेपणा कधी जाणवला नाही. जेव्हा आम्ही मोठे झालो तेव्हा आम्ही आमच्यापेक्षा लहान मुलांची काळजी घेतली. त्यांच्या शिक्षणात त्यांना मदत केली. आता सुद्धा माझ्याकडे भरपूर वेळ असतो तेव्हा मी त्यांना शिकवतो. ब्रेल लिपीतील इतर पुस्तके वाचून दाखवतो. उलट आम्ही सगळे एका कुटुंबाप्रमाणे राहतो. डोळस माणसांमध्ये हेवेदावे असतात पण आपल्यासारखे अंध एकमेकांना सांभाळून घेतात."
"खरं आहे तुझं म्हणणं. माझ्या आईचं स्वप्न आहे की मला जेव्हा दृष्टी येईल तेव्हा ती एका एखाद्या डोळस माणसाशी माझं लग्न लावून देईल म्हणजे तिला माझी काही काळजी उरणार नाही."
"सायली तुला दृष्टी आली की तू मला पाहू शकशील पण मी तुला कधीच पाहू शकणार नाही. पण कल्पनेने माझ्या मनात तुझी प्रतिमा साकार झाली आहे. त्यात तू मला नेहमी सुंदरच भासतेस."
"कधी कधी वाटतं हे असं जीवन सुद्धा खूप चांगलं आहे. आता मी माझ्या डोळस मैत्रिणींची चर्चा ऐकते तेव्हा मला जाणवते की त्यांच्यात खूप हेवेदावे, भांडण, रुसवे फुगवे असतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे एखाद्याबद्दल मत्सर असतो हे खूप वाईट आहे."
"सायली तू आमच्या संस्थापकांना भेटलीस तर ते तुझ्या शस्त्रक्रियेसाठी नक्कीच मदत करतील आणि तुला लवकरच दृष्टी येऊ शकेल."
"अरे नाही ज्या संस्थेमधून माझी शस्त्रक्रिया होणार आहे त्यांना मी आता कळवले की आमच्याकडे अर्धा खर्च करण्या एवढा पैसा जमा झाला आहे. आता एक दोन महिन्यातच माझी शस्त्रक्रिया होऊ शकते."
बोलताना सायलीला जाणवलं की जेव्हा तिने सांगितलं की आईचं स्वप्न सायलीचे डोळस माणसाशी लग्न लावण्याचं आहे तेव्हा सुमितचा आवाज कातर झाल्यासारखा तिला वाटला. रोजच्या पंधरा-वीस मिनिटांच्या सहवासात दोघांची खूप घट्ट मैत्री झालीच होती त्याशिवाय दोघांमध्ये तरल प्रेमभावना निर्माण होत होती. सुमितचे विचार खूपच चांगले होते. आपल्या संस्थेबद्दल आणि तेथील सर्वांबद्दलच त्याला खूपच आपुलकी होती.
नंतर सायलीची शस्त्रक्रिया व्यवस्थित पार पडली. तिला दिसू लागलं होतं. ती खूपच आनंदी झाली. तिला भेटायला सुमित आला होता. सुमितचं व्यक्तिमत्व खूपच प्रभावी होतं. अंध असला तरी त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा आत्मविश्वास होता. सायलीशी बोलताना तिला जाणवलं की सुमितला आपल्याला दिसू लागले म्हणून खूप आनंद तर झालाच आहे पण कुठेतरी आपण त्याला दुरावणार अशी एक खंत ही जाणवत आहे. काही काळानंतर सायली ऑफिसला जाऊ लागली तेव्हा ती त्याच्या शेजारी बसू लागली. एकदा सुमित तिला म्हणाला,
"अगं आता तू अपंगांच्या सीटवर का बसतेस. तू आता सगळं काही पाहू शकतेस. आता स्वतःला कमी लेखून न्यून बाळगू नकोस."
"सुमित वेडा आहेस का! अरे आपण अंध असताना सुद्धा आपल्याला कधीच आपल्यात काही कमी आहे असं वाटलं नव्हतं. सीटच्या बाबतीत म्हणशील तर कोण तसा आला तर मी उठेन. पण मला तुझ्या जवळच बसायचं आहे. खरं तर मला तुला काही सांगायचं आहे. सुमित तू माझ्याशी लग्न करशील का?"
सुमितचा आपल्या कानांवर विश्वासच बसला नाही. त्याच्या मनाला मोरपिसांचा स्पर्श होतंय असं जाणवलं. सायलीवर तो मनापासून प्रेम करत होता. तो एकदम सावध झाला.
"अगं सायली तुझ्या आईच्या स्वप्नांप्रमाणे तू एखाद्या डोळस माणसाशी लग्न कर. माझ्याशी लग्न करून तू सुखी नाही होणार ग. मी तुला कुठे घेऊन जाऊ शकणार नाही. तुझ्यावर आपत्ती आली तर मी तुला वाचवू शकणार नाही."
"सुमित तू आणि मी वेगळे आहोत का. आता कुठे जायचं असेल तर मी तुला घेऊन जाईन. तुझ्यावर येणार संकट मी आधी माझ्यावर झेलेन. आपला संसार नक्कीच सुखाचा होईल."
"अगं पण तुझ्या आईच्या स्वप्नाचं काय!"
"सुमित या रविवारी तू माझ्या घरी ये मी आईला सर्व समजावून सांगेन. कधी कधी डोळस माणसं सुद्धा आंधळ्यासारखी वागतात. तू अंध असून सुद्धा तुझे विचार किती प्रगल्भ आहेत. तू या रविवारी नक्की ये मी वाट बघते."
सायलीने घरी आईला सर्व सांगितलं पण आईने खूपच थयथयाट केला.
"अगं तू अंध असताना त्याच्याशी विवाह केला असतास तर एक वेळ चाललं असतं पण आता तुला एवढी दृष्टी प्राप्त झाली आहे तर तू डोळस माणसाशी लग्न कर मला खूप आनंद होईल. स्वतःहून तू एखाद्या खाईत का उडी मारतेस. सुमित मित्र म्हणून ठीक आहे पण नवरा म्हणून मला तुझ्यासाठी तो योग्य वाटत नाही."
"आई तू फक्त बाह्यदृष्टीचा विचार करतेस. आज सुमित जे त्याच्या संस्थेतील इतर अंधांसाठी काम करतोय ते किती महान आहे त्याची तुला कल्पना नाही. आई आपण डोळस माणसं फक्त स्वतःपूरती विचार करतो, आपल्या माणसांपूरती विचार करतो. पण या माणसाने सर्व परक्या लोकांना एकत्र घेऊन त्यांना आपलंसं केलं आहे. माझ्यासाठी हे खूप महत्त्वाचे आहे. दुसरं म्हणजे लग्न झाल्यावर सुमितला तिथे संस्थेत राहता येणार नाही. त्यामुळे आम्ही दोघेही इथे तुझ्याजवळच राहू. आम्हाला पण तुझं प्रेम मिळेल. तुला सुद्धा आमचा आधार मिळेल. आता तुझं सुद्धा वय होत चाललय. तुला एकटीला सोडून मी राहिले तर मला नेहमी तुझी काळजी वाटत राहील."
सारासार विचार करताना सायलीच्या आईला तिचे विचार पटले. तिने त्या दोघांच्या लग्नाला होकार देण्याचा निर्णय घेतला. सुमित घरी आल्यावर आईने जेव्हा पाहिलं तेव्हा सायलीचा निर्णय योग्य असल्याचं तिला जाणवलं. सुमित सायलीला म्हणाला,
"तू सायलीच्या फुलाप्रमाणे नाजूक आहेस असं मला जाणवते पण तुझं मन खूपच मोठे आहे."
"आज मी खूपच आनंदात आहे. मी अंध असताना जे गाणं मला म्हणावसं वाटत होतं तेच मी आज म्हणते,
'तुला पाहते रे तुला पाहते
तुझी मूर्त माझ्या उरी राहते
तुला पाहते रे, तुला पाहते
जरी आंधळी मी तुला पाहते'
'तुला पाहते रे तुला पाहते
तुझी मूर्त माझ्या उरी राहते
तुला पाहते रे, तुला पाहते
जरी आंधळी मी तुला पाहते'
©️®️ सीमा गंगाधरे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा