प्रस्तुत कथा ही काल्पनिक असून त्यात नाव,गाव,स्थळ, प्रसंग, जीवित अथवा मृत्यूशी संबंध आला तर तो योगायोग समजावा.
डोळस भाग-१२
मागील भागात,
चिन्मयी खूप थकलेली होती कुलूप उघडून ती घरात गेली. सर्व कामे संथ गतीने त्याचा विचार डोक्यात घेऊन ती करत होती.
दाराची घंटी वाजली आणि भिंतीच्या साहाय्याने दरवाजा उघडला. शरीराचा गंध कोणाचा आहे हे ओळखून तिने समोरच्या व्यक्तीला विचारले, "तुम्ही?"
आता पुढे,
"आत मध्ये येऊ का?" चिन्मयीला विचारले.
"हो, आतमध्ये या." ती मागे फिरली आणि सोफ्यावर बसली.
"कशी आहेस?"
"मी ठीक आहे वहिनी." तिने अनुजा वहिनींना उत्तर दिले.
थोडा वेळ शांतता पसरली.
"आज खूप थकलेली दिसत आहेस." त्या म्हणाल्या.
"हो आज कामं खूप होते आणि नंतर चालत आले त्यामुळे वाटत असेल." त्या मागचे कारण सांगत होती.
"तुझ्या डोक्याला काय लागले?" अनुजा वहिनीने विचारले.
"ते टेबलाचा कोपरा लागला होता." ती म्हणाली.
सकाळी जे झाले त्याबद्दल कसा विषय काढायचा हे अनुजा वहिनींना समजत नव्हते. तरी त्या बोलल्याच.
"आज सकाळी जे झाले ते काही मला पटले नाही. आमच्या सासूबाईंनी आणि इतर माणसांनी उगाच एका गोष्टीवरून वाद घातला. मला आधीच मध्ये बोलण्यास बंदी घालण्यात आली होती. म्हणून मी काहीच बोलली नाही. तू कशी आहेस हे ह्या लोकांना माहीत नसल्यासारखे वागत आहेत. जे एवढे सज्जन असल्यासारखे वागतात त्यांच्या मुली काय ठीक वागतात का? त्या रंजना काकूंच्या मुली किती वेळ तरी लग्ना आधी गरोदर राहिल्यात पण कोणी याबद्दल काही बोलत नाही. त्यांना तर ह्या मध्ये बोलायचा काहीच हक्क नाही. तसेच त्या मुलाने सांगितले ना की तसे काही नाही तरी त्याला बोलत होते. प्रत्येकाच्या वैयक्तिक गोष्टीत का म्हणून डोकावतात? " अनुजा वहिनी त्यांच्या मनातील गोष्टी व्यक्त करत होत्या.
"वहिनी, हा समाज असाच आहे. आपण कोणाला काही बोलू शकत नाही. मला इथे राहण्यासाठी ह्या लोकांचे ऐकावे लागेल. कारण हे शाळेचे घर आहे मला राहण्यासाठी दिले आहे. माझ्याकडे राहण्यासाठी दुसरे ठिकाणं नाहीये. आधीच महिलांच्या सुरक्षितेवर प्रश्न निर्माण झाला आहे, हे आपण सगळीकडे ऐकतो आणि वाचतो. त्यामुळे मी मिस्टर हर्ष यांना पण सांगितले की तुम्ही मला ने-आण करण्यासाठी मदत करू नका." तिने उसासा सोडला.
" त्यांचे हर्ष नाव आहे वाटते पण ते माणूस म्हणून चांगले वाटले. सर्वांना प्रत्युत्तर देत होते. फक्त तुम्ही अजून त्यांना साथ दिली असती तर बरे झाले असते. तुमच्यासाठी एवढे बोलत होते आणि तुम्ही काही चूक केल्यासारखे त्यांना इथे येऊ नका म्हणून सांगितले." जी गोष्ट खटकली ती बोलून दाखवली.
"हो, तसे ते समजूतदार आहेत. मला त्यांनी प्रत्येकवेळी मदत केली आहे. त्यादिवशी माझे अपहरण होणार होते आधी त्यांनी मी सोडतो म्हणत असताना नकार दिला तरी ते मागे आले होते. नाहीतर माझ्यासोबत काय झाले असते ह्याची कल्पनाही मला करवत नाही." तो दिवस तिला आठवल्याने भीतीने सरकन तिच्या अंगावर काटा आला.
"तू तुझा विचार कर. बाकी सर्व काय काहीही केले तरी बोलतात. मैत्री असणे किंवा प्रेम असणे ह्यात वाईट काहीच नाही. तुम्ही दोघे वयाने आणि विचाराने परिपक्व आहात त्यामुळे योग्य काय नि अयोग्य काय हे तुम्हाला ज्ञात आहे." अनुजाने चिन्मयीला समजवण्याचा प्रयत्न केला.
थोडावेळ बसून अनुजा आपल्या घरी गेली.
चिन्मयी विचारात पडली होती. कारण अनुजा वहिनी जसे म्हणतात तसे मी नकार द्यायला हवा होता का आणि हर्षने एवढ्यांदा मदत करूनही मी असे वागून त्यांना दुखावले का असा विचार करत तिची रात्र जागे राहण्यातच गेली.
चिन्मयी हॉस्पिटलला पोहोचली होती पण आज तिला ठीक वाटत नव्हते.
"मिस चिन्मयी, तुम्ही ठीक आहात ना?" तिथल्या परिचारिकेने तिचा उदास चेहरा पाहून विचारले.
"हो, मी ठीक आहे." ती बोलली.
आजचे समुपदेशन झाले आणि ती निघणार तर तिला चक्कर आली. त्या परिचारिकेने तिला मागे खुर्चीवर बसवून पळत जात डॉक्टरांना बोलावले.
"डॉक्टर sss मिस चिन्मयी त्यांना चक्कर आली आहे." असे तिने मोठ्या आवाजात सांगितले.
डॉक्टर गेले आणि तिला तपासले. एक आयव्ही लावली आणि ती संपेपर्यंत तिला थांबायला सांगितले. तिच्या कपाळावरची पट्टी बदलून त्यासाठीही औषधे दिली.
"त्यांना काय झाले?" डॉक्टरांनी मागे वळून आवाजाच्या दिशेने पाहिले.
"जागरण केले असेल आणि सकाळी काही खाल्ले नाही म्हणून तसे झाले. त्यात डोक्याला थोडे लागले आहे त्यामुळे अशक्तपणा आला आहे पण आता काळजी करण्यासारखे काही नाही." डॉक्टर बोलून निघून गेले.
ती शांत डोळे बंद करून झोपली होती. थोडा वेळ तिला तिथेच झोप लागली.
परिचारिका येऊन हातातील सलाईनची सुई काढून बाजूला ठेवतात. तेव्हा थोडे " स्स..." करते.
"इथे दुसरे कोणी असेल तर त्यांना जायला सांगा." ती परिचारिकेला म्हणाली.
तो उठून निघून गेला.
"मिस्टर हर्ष, इथेच थांबून होते. तुमच्या तब्येतीची चौकशीही डॉक्टरांकडे केली." ती केन काढत असताना त्यांनी सांगितले.
नंतर परिचारिका निघून गेली.
तिने आपले बिल भरले आणि केनच्या मदतीने बाहेर जाऊ लागली.
"शशी, तू फ्री आहेस?"
"मघ मला घ्यायला येशील?"
ती फोनवर बोलत होती.
'कोण हा शशी? आणि ह्या एवढ्या का हसून बोलत आहेत?'
तोही कोण आहे हे बघण्यासाठी दूर थांबला.
शशी येईपर्यंत ती तिथे असलेल्या बाकावर बसली. हाताला सुई लावलेली त्याठिकाणी अजूनही दुखत होते. त्यामुळे ती हात पकडूनच बसली होती.
इतक्या लगेच मला
तू परके टाकलेस करून
वेदनेत तुला बघून सखी
डोळे आले माझे भरून
तू परके टाकलेस करून
वेदनेत तुला बघून सखी
डोळे आले माझे भरून
त्याने ब्लॉगवर पोस्ट केले.
तेवढ्यात एक दुचाकी आली आणि "चिनू, चल ये इकडे." असा आवाज आला.
ती केन काढून चालत आली. कपाळावरची पट्टी आणि अशक्त दिसलेली मैत्रीण ह्या मागचे कारण विचारायला तिने सुरूवात केली.
तेव्हा हर्षला समजले की मी 'शशी' हे मुलाचे नाहीतर मुलीचे नाव आहे. स्वतःच्या विचारावर त्याला हसायला आले. ती मैत्रीणीसह गेली त्यामुळे त्याला तिची काळजी नव्हती.
तो आपल्या ऑफिसला काम करण्यासाठी कार चालवत तिकडे जाऊ लागला. ऑफिसला गेल्यावर त्याने मन लावून काम केले. दुपारी जेवण करण्याचेही त्याला भान नव्हते.
रात्री उशिराच तो ऑफिसमधून निघाला. घरी पोहोचला. एक एक करत सर्व लाइट्स लावले आणि थोडा वेळ सोफ्यावर बसला. ते घर रिकामे वाटत होते. कितीही केले तरी त्याला एकटेपणा आणि आपली माणसे आपल्यापासून दूर गेल्याचे दुःख होतेच.
समुपदेशनात एकटा असल्याचा विचार आला की त्याला ध्यानधारणा करायला सांगितले होते. आधी कपडे बदलून वॉशिंगमशीनमध्ये टाकली. त्याच्या बायकोने सर्व ऑटोमॅटिक वस्तू घेतलेल्या होत्या ज्या व्हॉईस कमांडनेसुद्धा काम करायच्या.
थोडा वेळ ध्यान केले आणि अलेक्सावर जुनी गाणी लावली. जेवण गरम करत त्याने ते ताटात वाढून घेतले.
झोप लगेच येणार नाही म्हणून त्याने इंटरनेटवर शोधकार्य सुरू केले.
पहिला प्रश्न "अंधव्यक्ती त्यांची भाषा कोणती आणि ते पुस्तक कसे वाचतात ?"
काही सेकंदात त्याच्या लॅपटॉप स्क्रीनवर उत्तर झळकले,
"अंधव्यक्ती ब्रेल लिपीत वाचतात. दोन्ही किंवा एका हाताने ते पुस्तकावर सहा बिंदू असलेल्या वेगवेगळ्या अक्षरांच्या ठराविक सांकेतिक खुणांचा अभ्यास करून शिकल्यावर ते त्यांना वाचता येते."
"अंधव्यक्ती ब्रेल लिपीत वाचतात. दोन्ही किंवा एका हाताने ते पुस्तकावर सहा बिंदू असलेल्या वेगवेगळ्या अक्षरांच्या ठराविक सांकेतिक खुणांचा अभ्यास करून शिकल्यावर ते त्यांना वाचता येते."
त्याला आठवले की चिन्मयी कसे एक दिवस एक पुस्तक काढून त्यावर एका हाताने तिची थांबत थांबत बोटे फिरवत होती.
"ब्रेल भाषेचे जनक कोण?" पुढचा प्रश्न त्याने सर्च बार वर टाईप केला.
"लुई ब्रेल हे ब्रेल भाषेचे जनक आहेत. त्यांनी ज्यांनी १८२४ मध्ये अंध आणि दृष्टीहीन लोकांसाठी स्पर्शक्षम लिपी विकसित केली."
'ह्यांनी खूपच चांगले काम केले.' माहिती वाचतच तो म्हणाला.
शशी चिन्मयीसोबत राहणार होती त्यामुळे दोघींनी मस्त खिचडीभात आणि कोशिंबीर बनवायचे ठरवले. चिन्मयीसुद्धा तिला अंदाजाने कांदा, टोमॅटो बाकी साहित्य बारीक कापून देत होती.
गप्पा मारत सर्व जेवण दोघींनी फस्त केले. शशी आपल्या कामाबद्दल आणि कसे तिची घरचे लग्न करण्यासाठी मागे लागले आहेत हे सांगत होती.
शशी बोलतच लवकर झोपली मात्र चिन्मयी जागी होती. सामान्य मुलीसारखे आपले लग्न होऊ शकत नाही. आपल्या आयुष्यात असे कोणी साथ देणारे नाही असा विचार करत असताना हर्षचा विचार आल्यावर तिने तोंडावर चादर घेऊन झोपण्याचा प्रयत्न केला.
सकाळी उठली तर दोघी आवरून आपल्या कामासाठी निघणार होत्या. सर्व तयारी करून बाहेर पडणार तेवढ्यात दाराची घंटी वाजली.
कोण आले म्हणून शशीने दरवाजा उघडला आणि समोरच्या व्यक्तीला पाहून तिला भीती वाटली.
"शशी कोण आले आहे ?" चिन्मयी विचारत होती.
क्रमशः
© विद्या कुंभार
ती व्यक्ती कोण असेल ?
भाग कसा वाटला हे कमेंट करून सांगा.
सदर कथेचे हक्क हे लेखिकेकडे आहेत त्यामुळे कॉपी करून इतर ठिकाणी पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.
"सदर कथेचे लिखाण सुरू आहे, पुढील भाग नियमितपणे ईरा फेसबुक पेजवर येतील त्यामुळे पेजला फॉलो करून ठेवा."
अष्टपैलू लेखक स्पर्धा २०२५
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा