Login

डोळस भाग-२४

तिमिरातूनी तेजाकडे वाटचाल करणाऱ्या दोन जीवांची कथा !
प्रस्तुत कथा ही काल्पनिक असून त्यात नाव,गाव,स्थळ, प्रसंग, जीवित अथवा मृत्यूशी संबंध आला तर तो योगायोग समजावा.

डोळस भाग-२४

मागील भागात,

आता कुठे सूर्यास्त होईपर्यंत तिचा थांबण्याचा हट्ट का होता हे त्याला समजते.तिने खाली गुडघ्यावर बसून त्याला उत्तर दिलेले असते तो तसाच पुढे जाऊन तिला मिठी मारतो आणि चिन्मयीच्या कपाळावर साश्रू नयनांनी ओठ टेकवतो.

तिच्यासाठी हा निर्णय अवघड होता हे तो जाणून होता.

थोड्यावेळानी ती त्याला बाजूला करते आणि बोलते,
"पण माझी एक अट आहे."

आता कुठे आनंदाच्या जहाजात बसलेला तो त्या एका अटीने लगेच वास्तवात आला.

आता पुढे,

"तुमची कोणती अट आहे ती सांगा."हर्ष चिन्मयीला म्हणाला.

"लग्न झाल्यानंतर तुम्हाला कधी माझ्यासोबत राहून एकटेपणा वाटायला लागला किंवा तुम्हाला कोणी दुसरी व्यक्ती आवडू
लागली त्यामुळे त्या व्यक्तीवर प्रेम झालं तर तुम्ही मला ते आधी सांगून आपल्या ह्या नात्यातून मुक्त व्हाल."

तिची अशी अट ऐकल्यावर त्याला आधी तर तिचा रागच आला.
असे कसे काय ती बोलू शकते आणि दुसरी गोष्ट त्याला मन आहे का नाही? सारखे प्रेम व्हायला मी एका व्यक्तीचा काय एक गाडी म्हणून विचार करतो का?  की एकदा या गाडीचा कंटाळा आला म्हणून ती बदलली आणि  कालांतराने दुसरी घ्यायची.

पण यामागेही तिने काही विचार केलाच असेल किंवा  तिला असुरक्षितता वाटत असेल असा विचार करून म्हणून तो तिला म्हणतो की,"तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही आहे का ?"

"हर्ष,इथे प्रश्न विश्वासाचा नाहीये.तुम्ही माझी ही अट मान्य करत असाल तरच आपण पुढे जाऊया." असं ती म्हणते.

त्याने थोडा वेळ घेतला आणि तिने पुढे केलेल्या हातावर हात ठेवून त्याने मान्य आहे असं सांगितलं.

"आता तुम्ही मला वचन दिले आहे आता ही अट मान्य केलीत त्यामुळे तुमच्यासोबत असे कधी झाले तर माझ्याशी न लपवता प्रामाणिकपणे सरळ येऊन मला सांगाल अशी मी आशा करते."ती म्हणाली.

"ठीक आहे.माझी पण हीच अट आहे की माझ्यापेक्षा तुम्हाला अजून कोणी योग्य व्यक्ती जीवनात आली तर तुम्ही माझ्यापासून विभक्त व्हाल? बोला आहे मंजूर?" त्यानेही प्रतिप्रश्न करत तिचा हात धरला.

तिनेही हात पुढे करत त्याच्या हातावर हात ठेवून त्याला हसून संमती दिली.

दोघांनी थोडा वेळ हातात हात घालून शांततेत वेळ व्यतीत केला.खाली चालत गेले आणि रात्रीचे जेवण करून आपल्या घरी गेले.

सुरू झाली जीवनाची
तुझ्या सोबतीने कहाणी
भावते मनास माझ्या
गोड तुझी मंजुळ वाणी

त्याने ब्लॉगवर पोस्ट केले.

तिला नोटिफिकेशन आले आणि रीड लाऊड ह्या पर्यायावर क्लिक करून तिने ते ऐकले.

भावना व्यक्त करण्यास
केला जरा मी उशीर
झाले तुला पाहण्यास
सजणा मी खूपच अधीर

तिने त्याला उत्तर दिले होते.

रात्रभर दोघेही चारोळी जुगलबंदी करत होते.चिन्मयीला व्हॉईस टायपिंगमुळेच वेळ लागत होता.त्यामुळे तोही थांबत प्रतिसाद होता.

पहाट होण्याची वेळ आली आणि त्याने मेसेज केला,"झोपा आता.खूप उशीर झाला."

"झोप नाही येत आहे." तिने मेसेज करून उत्तर दिले.

"उद्या काम आहे.त्यामुळे लवकर झोपा." त्याने काळजीने पुन्हा पाठवले.

एकमेकांना शुभ रात्रीचा मेसेज करून ब्लॉगिंग साईटवरून दोघांनीही लॉगआऊट केले.

ती विचार करत झोपली पण तो मात्र जागाच होता.

नशिबाने त्याला दुसरी संधी दिली होती असा विचार करत हे नाते खूप जपायचे असे मनोमन ठरवले.

ज्या दिवशी त्याने आपल्या पहिल्या बायकोच्या फोटोजवळ जावून चिन्मयीवर असलेल्या प्रेमाची कबुली दिली.तेव्हा त्या रात्री ती त्याच्या स्वप्नात आली होती.

(त्याच्या स्वप्नात)

"यामिनी,तू इथे?" तो विचारतो.

"हो,मी तुम्हाला हे सांगण्यासाठी आले आहे की,तुम्ही आता आयुष्यात पुढे जावे हेच मला योग्य वाटते."

"म्हणजे?" तो अबोधपणे विचारतो.

"मी इथे ठीक आहे पण तुम्ही ठीक नाही आहात.चिन्मयीला हो बोला." ती म्हणाली.

"पण मी तुला दिलेले वचन?" त्याने न राहून त्याबद्दल आठवणीने विचारले.

"मी तुमच्यासोबत आता नाहीये.त्यामुळे तुम्ही त्या वचनातून मुक्त झाला आहात.मला तुम्हाला सुखात पाहायचे आहे.मी तुमची साथ नाही देऊ शकले पण देवाने चिन्मयीच्या रूपात तुम्हाला योग्य जोडीदार निवडण्याची दुसरी संधी दिली आहे.त्यामुळे तुम्ही ती गमावू नका." ती म्हणाली.

"मी चुकीचे करत नाही ना?" पुन्हा तो मनातील शंका विचारतो.

"बिल्कुल नाही.मला वचन द्या की माझ्याहून जास्त प्रेम तुम्ही तिला द्याल?" ती हात पुढे करत विचारते.

"हो.तू ह्या निर्णयात माझ्यासोबत आहेस ना?" त्याने तिचा हात पकडून शांतपणे विचारले.

"हो कायम." असे म्हणत हसत ती वाऱ्याच्या आलेल्या झोक्याने गायब झाली.

हर्ष तिच्या मागे जाण्यासाठी उठला आणि त्याचे स्वप्न तुटले.
घामाघूम झालेला तो तिला आजूबाजूला शोधत होता पण ती तिथे नव्हती.

वर्तमानात,

"यामिनी,तू खरंच माझ्या मनातील गुंता सोडवलास."असे म्हणत तो डोळे मिटून न झोपता पडून राहिला.

बंद डोळ्यांतही चिन्मयीचा चेहरा त्याला दिसत होता.तिने वेगळ्या पद्धतीने त्याला प्रेमाची कबुली दिली होती.

दोघांनी एकमेकांना समजण्यासाठी वेळ देण्याचे ठरवले. तो तिला रोज घ्यायला आणि सोडायला यायचा.आता बाकीचे काय बोलतात ह्याबद्दल तिने विचार करणे सोडून दिले.त्यानेही तिला त्रास नको व्हायला म्हणून तिच्या घराच्या आतमध्ये जाणे टाळले.

दोन दिवस झाले होते.ना त्याचा काही फोन किंवा मेसेज त्यामुळे ती वैतागली होती.आपले काम करून ती घरी जायची.त्याची सवय लागली असल्याने नेहमी कोणती कार जवळून गेली की तिचे कान टवकारायचे पण त्याच्या कारचा आवाज नाही म्हणून लगेच हिरमुसायची.

'प्रेमाची कबुली दिल्यावर सर्व मुले असेच वागतात का ?'

' त्याने माझ्यासोबत प्रँक तर केला नाही ना?'

त्याच्याशी काहीच संपर्क होत नसल्याने ती काहीही विचार करत होती.

शशीला फोन करून तिने घरी बोलावले.

"बोल चिनू? आज मला इथे राहण्यासाठी बोलावलेस काय झाले?" जेवण झाल्यावर तिने विचारले.

"ते माझ्याशी बोलत नाहीयेत."तुडुंब भरलेल्या डोळ्यांनी ती सांगत होती.

"कोण ते?" शशीला काही समजत नव्हते.

"हर्ष..."

"पण तू तर त्यांना नकार दिलास ना?" तिने डोकं खाजवून विचारले.

"हो पण नंतर होकारही दिला." ती मुसमुसत म्हणाली.

"काय??" तिला माहीत नसल्यामुळे ती चिन्मयीकडे आ वासून पाहत होती.

"हे कधी? केव्हा? कुठे झालं?"

"मला कसे समजले नाही? आणि काय गं तू मला आता सांगतेस?" एकावर एक प्रश्न शशी विचारत होती.

"आता सांगितले ना?" नाक पुसत चिन्मयी म्हणाली.

"तू मला आधी सांगितले नाही ना म्हणूनच तुझ्यासोबत असेच झाले." शशी मुद्दाम भाव खात म्हणाली.

ते ऐकून चिन्मयी अजूनच हुंदके देऊन रडू लागली.

आता तिला शांत करावे म्हणून तिला मिठी मारत शशी तिला पाठीवर हात ठेवून रडू नकोस म्हणत होती.

"तुला त्यांचे घर माहीत आहे?" तिने विचारले.

"हो." ती मान हलवत म्हणाली.

शशी "ठीक आहे.तिकडे जावूया."

"चल आताच जावूया." ती डोळे पुसत म्हणाली.

"काय लगेच जावूया? किती वाजलेत? एवढ्या रात्रीचे असे त्यांच्या घरी जाणे बरोबर नाही.उद्या जाऊ."

"ठीक आहे." ती निरुत्साहाने म्हणाली.

चिन्मयी सकाळी लवकर उठून शशीला तयारी करण्यास घाई करायला सांगत होती.बिचारी शशी मैत्रिणीसाठी सकाळी सकाळी ओरडाही खात होती.

'हर्ष मला विसरले का?'

'दुसरी कोणी मुलगी भेटली तर ते वचन इतक्या लवकर पाळायला लागले का?'

मनाशीच प्रश्न विचारून स्वतःचा हिरमोड करून घेत होती.

आपली मैत्रीण प्रेमात पूर्ण वेडी झालेली आहे हे शशीला तिच्या अशा वागण्याने दिसत होते.मनोमन आपल्या मैत्रिणीच्या पदरात जोडीदाराचे सुख टाकल्याबद्दल तिने देवाचे आभार मानले.

"चल ना गं लवकर.किती वेळ लावतेस?" तिची स्कूटी अजून सुरू नाही झाली म्हणून चिन्मयी ओरडत होती.

"जरा वेळ शांत बसशील का? किती ती घाई करायची?" आता मात्र वैतागून शशी म्हणालीच.

नेहमी ओढणी बांधून पुढे घेणारी चिन्मयी आज खूप साऱ्या गोष्टी विसरत होती.त्यामुळे ती सर्व कामं शशी करत होती.

"जरा वेग वाढव." तरीही सूचना केलीच.

"एक काम कर.तू बस पुढे आणि चालव.किती रहदारी आहे माहीत आहे ना? आता जर तू शांत नाही बसलीस ना तर तुला मी इथेच सोडेन." रागावून शशी म्हणाली.

एकतर खूप रहदारी होती.त्यात मध्येच ब्रेक दाबावा लागत होता आणि दोघी पडू नये ह्याचीही ती खबरदारी घेत होती.

दोघीही त्याच्या घराजवळ पोहोचल्या.

क्रमशः

© विद्या कुंभार

हर्ष खरचं चिन्मयीला फसवत असेल का?

सदर कथेचे हक्क हे लेखिकेकडे आहेत त्यामुळे कॉपी करून इतर ठिकाणी पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.

"सदर कथेचे लिखाण सुरू आहे, पुढील भाग नियमितपणे ईरा फेसबुक पेजवर येतील त्यामुळे पेजला फॉलो करून ठेवा."

अष्टपैलू लेखक स्पर्धा २०२५

🎭 Series Post

View all