Login

डोळस भाग-१७

तिमिरातूनी तेजाकडे वाटचाल करणाऱ्या दोन जीवांची कथा !
प्रस्तुत कथा ही काल्पनिक असून त्यात नाव,गाव,स्थळ, प्रसंग, जीवित अथवा मृत्यूशी संबंध आला तर तो योगायोग समजावा.

डोळस भाग-१७

मागील भागात,

ती पलंगावर बसली आधी एक पाय समोर केला नंतर दुसरा पाय आणि एका हाताने पांघरूण ओढून ती त्याच्या बाजूला कुस करून डोळे मिटून पडून राहिली आणि झोपली.

तो तिच्याकडेच पाहत होता जणू त्याची झोप तिला देऊन तो जागाचं राहणार होता!

आता पुढे,

सकाळी घंटीच्या आवाजाने चिन्मयीला जाग आली आणि अगरबत्तीचा सुगंध सगळीकडे दरवळत आहे हे तिला समजले.कदाचित हर्ष पूजा करत असेल असे तिला वाटले.

"उठलात तुम्ही?" त्याने विचारले.

"हो."

आता प्रश्न हा होता की,तिच्याकडे जास्तीचे कपडे नव्हते तेच
कपडे पुन्हा घालायचे म्हणजे तिला नकोसे झाले होते पण पर्याय नव्हता.ती कोणत्या तरी विचारात हरवलेली आहे हे त्याला समजले.

"मी एक ड्रेस घाईत मागवला.एकदा पाहून घ्या तुम्हाला आवडत असेल तर." तो म्हणाला.

त्यात त्याने पाहून घ्या म्हंटल्यावर तिच्या चेहऱ्यावर सूचक हसू आले आणि त्याला आपण काय बोललो ह्यासाठी स्वतःवरच राग आला.

"ह्या कपड्याचा रंग कोणता आहे?" तिने विचारले.

"गुलाबी रंग आहे आणि पायजमा पिवळा आणि ओढणी दोन्ही रंग मिळून आहे." तो सांगत होता.

"काही चित्र किंवा नक्षी आहे का?"

"हो गुलाबाची फुले आणि पिवळी फुलपाखरे असे चित्र आहे.
पायजम्यावर जास्त काही नाही पण एक नाजूक बारीक फुलांची नक्षी आहे." त्याने माहिती सांगितली.

तिने त्या कपड्याला तो सांगत असताना हातात घेतले आणि त्यावर हात फिरवला जणू ती,तो सांगत आहे तसे कल्पना करून समजून घेत होती.

सुती कापड होते त्यामुळे तिला ते आवडले.

"धन्यवाद हर्ष,आवडले मला फक्त मी घालून झाल्यावर हा ड्रेस कसा दिसतो ते मात्र तुम्हाला सांगावे लागेल आणि एक फोटो काढून शशीला पाठवायचा आहे." ती हसत म्हणाली.

तिला आवडले ह्यामुळेच त्याचे तिला आवडेल की नाही ह्या धाकधुकीची समाप्ती झाली होती.

"हो नक्की.आवरून या मी नाश्ता बनवतो." तो सांगून तिला आवरण्यासाठी वेळ देऊन गेला.

एका मुलाने पहिल्यांदा तिला आज ड्रेस दिला होता त्यामुळे तो विचार करतच तिने स्वतःचे आवरले.

अत्तरचा सुगंध आला आणि तिच्या येण्याच्या मार्गाकडे त्याचे लक्ष वेधले गेले.ती खुर्ची चाचपून बसली.

"पोहे केलेत का?" तिने मस्त गरम वाफेचा वास आल्यामुळे अंदाज लावला.

"ह... हो." गडबडून त्याने उत्तर दिले.

"डाव्या बाजूला कढईला दोन कान आहेत त्याला हात लावून वाढून घ्या म्हणजे भाजणार नाही." त्याने तिला भाजू नये म्हणून सूचना दिली.

आधी तिने हात थोडा वरती केला आणि झाकण बाजूला करत असताना ते बाजूला न ठेवता त्याची एक कड जिथे कढईला कान असेल त्यावर शोधून थोडे त्यावर टेकवले आणि मग तिने आपला दुसरा हात तिथे ठेवला.बाजूला मोठा चमचा होता त्याने कढईच्या दुसऱ्या कानाच्या रेषेत तो चमचा असा ठेवला की गरम चटका बसणार नाही आणि प्लेट आधीच बाजूला सारून खाली ठेवल्याने त्यात तिने वाढून घेतले. हे सर्व हर्ष विस्फारलेल्या डोळ्यांनी बघत होता.

"तुमची प्लेट?" तिने हात पुढे केला.

त्याने कढई जवळ प्लेट ठेवून ती प्लेटमध्ये वाढत होती. एकही कण तिने खाली न सांडता बरोबर त्यात वाढला.

दोघे खायला सुरुवात करणार तर तिने मिरच्या आधी चाचपून एका बाजूला केल्या आणि मघ खायला सुरुवात केली.

चहाही तिनेच व्यवस्थित कपात गाळला होता.

"तुम्ही एकटेच सर्व घरातील कामं करता?" तिने विचारले.

"नाही.एक काकी आहेत त्या येतात पण मी त्यांना तुम्ही इथे असताना उद्यापर्यंत येऊ नका असे सांगितले."

आपल्याला पाहून इतर ठिकाणी त्याची चर्चा नको म्हणून त्याने काळजी घेतली हे समजण्यास तिला वेळ लागला नाही.

त्याने नाश्ता आणि चहा बनवला म्हणून तिने बेसिनमध्ये भांडी घासून धुण्याचे काम करायला घेतले.

एक एक भांडे ती आधी विसळून सावकाशपणे बाजूला ठेवत होती.हाताने सर्व नीट स्वच्छ निघाले आहे का नाही आणि तेलकट कढईला तेलाचा वास येतो की नाही हे ती नाकासमोर धरून वास घेऊन पाहत होती.नसेल नीट धुतले असे वाटत असेल तर पुन्हा त्याला लिक्वीड लावून फेस करून घासून धुत होती.

"मी स्वच्छ धुतले आहे ना?" तो थोड्या अंतरावर तिथेच उभा असल्याचे तिला जाणवले म्हणून ॲपरन काढत त्याला प्रश्न केला.

"हो,अगदी नीट आणि स्वच्छ." तो हसतच म्हणाला.

"तुम्हाला आज ऑफिस नाही का?" तिने विचारले.

"आहे पण वर्क फ्रॉम होम आहे." तो म्हणाला.

तिच्या शाळेला आज पावसामुळे सुट्टी होती.तिला आता घरी जाण्याचे वेध लागले होते.

"तुम्हाला जर काही काम नसेल तर तुम्ही टीव्ही.." पुढचे शब्द त्याने टाळले.

"नाही,मला जरा पुस्तक वाचायचे आहे.तुम्ही तुमचे काम
करा."अजूनही पाऊस थांबलात नव्हता हे मघाशी रेडिओवर तिने ऐकले होते.

पुस्तक काढून त्यावर बोटे फिरवत ती वाचत होती आणि आतल्या खोलीत तो फोनवर काही सूचना देत असल्याचा आवाज येत होता.

मध्येच ती काही गोष्टी टिपण म्हणून नोट्स मध्ये व्हॉईस टाईपने करत होती.त्यानंतर 'लाऊड रीड' पर्यायाचा वापर करून ती बरोबर झाले का ऐकत होती.एखादा शब्द चुकीचा झाला तर ती पुन्हा बोलून तो नीट टाईप झाला का ह्याची शहानिशा करत होती.

तंत्रज्ञान मदतीला असले तरी त्यातही उणिवा असतातच हे स्वीकारून जे आहे त्यातच कितीही वेळा त्रास झाला तरी नीट होईपर्यंत ती प्रयत्न करतच होती.

तिने जेवढी पुस्तके उपलब्ध होती ती वाचण्याचा प्रयत्न केला होता.काही चांगल्या पुस्तकांचा सारांश ब्रेल लिपीमध्ये तिने लिहिण्याचा प्रयत्न केला होता त्यातही स्वखर्चाने कारण प्रत्येक
वेळी ठराविक वर्गाच्या मुलांसाठी हे क्लिष्ट काम करण्यास अनुदान देणारे फार कमी लोक आहेत ते तिला माहीत होते.

त्याने एकदा बाहेर येऊन ती काय करते ह्यावर नजर टाकून तिला तिच्या कामात अडथळा येणार नाही ह्याची काळजी घेतली होती.

दुपार होत आलेली आणि तिला भूक लागली होती.

तिला फ्रिज उघडताना आवाज आलेला त्यामुळे तो कुठे आहे हे माहीत झाले होते.तिने फ्रिज उघडला आणि काही खाण्यासाठी बनवू का म्हणून हात लावून तपासत असताना एक बाटली खाली पडली; त्या आवाजाने ती दचकली आणि त्यालाही काही
पडल्याचा आवाज आला म्हणून तो पळतच स्वयंपाकघरात गेला.

"काही हवे आहे का?" त्याने बाटली नीट ठेवत विचारले.

"काहीतरी जेवण बनवायचे म्हणून मी शोधत होती."

"मी मागवले आहे.दहा मिनिटांत येईलच." तो म्हणाला.

ती हॉलमध्ये येऊन बसली.तोही आता समोरच्या एका खुर्चीत बसला होता.

"जेवून झाल्यावर मी निघेन.इथला पत्ता सांगा तसे मी कॅब बुक करेन." ती म्हणाली.


"मी सोडायला आलो तर चालणार नाही का? की त्यादिवशी झाले म्हणून मला तिथे यायला बंदी आहे." त्याने नाराजीच्या सुरात विचारले.

"असे काही नाही.तुमचेही ऑफिसचे काम असेल आणि त्यादिवशी मी तुम्हाला जाण्यासाठी ह्यासाठी म्हंटले की ती लोकं काही ऐकून घेण्यास तयार नव्हती तसेच अजून तुम्हाला काहीतरी मनाला लागेल असे बोलले असते.तसेच माझी तक्रार मुख्य अंधविद्यालयाच्या ऑफिसमध्ये केली असती आणि मघ मला ते घर सोडावे लागले असते.मला राहण्यासाठी जागा शोधायला लागली असती." ती शांतपणे त्याला वस्तुस्थिती सांगत होती.

आता त्याला तिच्याबद्दल झालेला गैरसमज दूर झालेला.आपलाही विचार तिने केला होता आणि खरेच ती कुठे राहिली असती हा प्रश्न तेव्हा त्याला पडला नाही.रागात आपण तिला किती काही बोललो ह्याचा त्याला आता रागचं आला होता.

"माफ करा.मी ह्या सगळ्याचा विचार केला नाही.तुम्हाला त्रास नको व्हायला म्हणूनच मी त्यादिवशी एवढे बोललो." त्याला वाईट वाटत होते.

तेवढ्यात दरवाजाची घंटी वाजली आणि जेवण आल्याची ग्वाही त्या डिलिव्हरी बॉयच्या कानावर आलेल्या आवरत्या संभाषणाने दिली.

दोघे जेवत होते आणि त्याने छोटा डब्बा तिच्याकडे सरकवला.

तिने तो उघडला आणि हात लावताच चिकट आणि गोल पदार्थ हाताला लागला, " गुलाबजामून !" म्हणून तिच्या चेहऱ्यावरची कळी खुलली.

"तुम्ही एकतरी खाऊन बघा."ती त्यातला एक काढून त्याच्यासमोर धरत म्हणाली.

त्याने लगेच काही विचार न करता तिचा हात पकडून तोंडात
घेतला त्याची मिशी आणि ओठांचा स्पर्श तिच्या अंगावर काटा आणून गेला.

"छान आहे आणि जास्त गोडही नाही." तो खाऊन झाल्यावर म्हणाला.

ती अजून पण त्या स्पर्शातून बाहेर आली नव्हती म्हणून शांत बसली.

"तुम्ही खात का नाहीये?" त्याने विचारले.

क्रमशः

© विद्या कुंभार

हर्ष चिन्मयीला घरी सोडायला जाईल की नाही?

सदर कथेचे हक्क हे लेखिकेकडे आहेत त्यामुळे कॉपी करून इतर ठिकाणी पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.

"सदर कथेचे लिखाण सुरू आहे, पुढील भाग नियमितपणे ईरा फेसबुक पेजवर येतील त्यामुळे पेजला फॉलो करून ठेवा."