Login

डोळस भाग-१८

तिमिरातूनी तेजाकडे वाटचाल करणाऱ्या दोन जीवांची कथा !
प्रस्तुत कथा ही काल्पनिक असून त्यात नाव,गाव,स्थळ, प्रसंग, जीवित अथवा मृत्यूशी संबंध आला तर तो योगायोग समजावा.

डोळस भाग-१८

मागील भागात,

"तुम्ही एकतरी खाऊन बघा."ती त्यातला एक काढून त्याच्यासमोर धरत म्हणाली.

त्याने लगेच काही विचार न करता तिचा हात पकडून तोंडात गुलाबजामून घेतला त्याची मिशी आणि ओठांचा स्पर्श तिच्या अंगावर काटा आणून गेला.

"छान आहे आणि जास्त गोडही नाही." तो खाऊन झाल्यावर म्हणाला.

ती अजून पण त्या स्पर्शातून बाहेर आली नव्हती म्हणून शांत
बसली.

"तुम्ही खात का नाहीये?" त्याने विचारले.

आता पुढे,

"ह.. हो. मी खाते." चिन्मयी म्हणाली.

जेवण झाल्यावर हर्ष तिला घरी सोडण्यासाठी जाणार होता आणि ती काही नाही बोलली नाही.

"तुमची ट्रीटमेंट कशी चालू आहे ? अजून किती सेशन बाकी आहेत?" तिने कारमध्ये बसल्यावर विचारले.

"आणखी काही त्यासंबंधी सांगितले नाही." तो म्हणाला.

पुन्हा पाऊस सुरू झाला आणि तिने छत्री घेतली नाही हे तिच्या लक्षात आले.

"चिन्मयी..." तो म्हणाला.

"तुमची छत्री काल हवेने उडून गेली.त्यामुळे तुम्हाला नवीन छत्री घ्यावी लागेल." तो शांतपणे तिच्या चेहऱ्याचे भाव काय असतील असा अंदाज लावतो.

"ठीक आहे." ती म्हणाली.

"म्हणजे तुम्ही काल भिजला होता?" आता कुठे तिला तो छत्री उडून गेली म्हणून भिजला असेल हे आठवले.

"हो.थोडा भिजलो होतो." तिच्या प्रश्नाचे उत्तर दिले.

एका ठिकाणी त्याने कार थांबवली आणि आता पाऊस थांबला होता म्हणून तिला बाहेर येण्यास सांगितले.

"कुठे आलोत आपण?" एसीची थंड हवा तिच्या शरीराला लागत होती.

त्याने छत्री घेण्यासाठी मॉलमध्ये आलोत हे सांगितले. जिथे छत्रीचे सेक्शन होते तिथे तो घेऊन गेला.

"कोणती छत्री दाखवू सर आणि मॅम?" चिन्मयीचा काळा चष्मा पाहून तिच्या चेहऱ्यावर वेगळे भाव आले.

"आम्ही आमचे घेतो. तुम्ही नका तसदी घेऊ." तो म्हणाला.

"काल होती तशी हवी की काळ्या रंगाची?" त्याने विचारले.

"हर्ष मला ना ते इंद्रधनुष्याचे रंग असतात ना तशी हवी.इथे आहे का ?"  कुतूहलता तिच्या आवाजातच झळकत होती.

त्याने तिला स्टँडवर लटकवलेल्या छत्र्या होत्या तिथे नेले आणि ती हात लावून स्पर्श करून पाहत होती तसेच बंद चालू नीट होते का ह्यासाठी आधी हर्षला बाजूला केले आणि उघडून बघत होती.
त्याच्यामध्ये असणाऱ्या काट्या त्या वाकड्या तर नाहीत ना हेही स्पर्शाने तपासून घेत होती.

"ही घेऊ या." ती स्मितहास्य करत म्हणाली.

"अजून काही घ्यायचे आहे का?" त्याने विचारले.

तिने नाहीमध्ये मान हलवली.

ती बिलाचे पैसे भरत असताना माझ्याकडून छत्री उडाली म्हणून त्यानेच त्याचे पेमेंट केले.

"दिसत तर नाही आणि हिला इंद्रधनुष्याची छत्री हवी आहे."
मघासची सेल्सगर्ल उपहासाने ते जाताना म्हणाली.

काहीतरी राहिले म्हणून हर्ष तिला बाहेर थांबवून आतमध्ये गेला.

"मॅडम,ग्राहकाशी कसे नीट बोलायचे हे जरा शिकून घ्या.तुम्हाला त्या छत्रीचे पैसे द्यायचे नव्हते जे तुम्ही असे बोललात.कोणाच्या कमीपणावर टिपण्णी करण्यापेक्षा आधी स्वतः परिपूर्ण आहात का ते बघा." चांगलेच सुनावून हर्ष चिन्मयीजवळ आला.

तिथल्या मॅनेजरने हा प्रकार सजल्यावर त्या सेल्सगर्लला त्याबद्दल रीतसर कानउघडणी केली.

चिन्मयीने त्याला घरापासून थोड्या अंतरावर सोडण्यास सांगितले आणि ती त्याचे आभार मानून निघून गेली.

संध्याकाळ झालेली आणि अनुजाच्या नवऱ्याला चिन्मयीच्या घराची लाईट चालू असलेली दिसली.अनुजा सोबत तो तिच्याघरी येत तिची विचारपूस करून गेला.

कालची हर्षने तिची घेतलेली काळजी आणि त्याचा नकळत
झालेला स्पर्श अंगावर गोड शहारा देऊन गेला.ती भिजू नये म्हणून त्याने स्वतःचा दिलेला रेनकोट आणि घाबरली म्हणून तिच्यासोबत अंतर राखून खोलीत राहिलेला तो ते क्षण तिला आठवत होते.

तसेच आपल्याला आवडते म्हणून मागवलेले गुलाबजामून आणि नंतर त्याला भरवताना झालेला तिच्या हाताला त्याच्या ओठांचा आणि मिशीचा किंचित स्पर्श वेगळी अनुभूती तिला देऊन गेला. त्या विचाराने तिचे हृदय अजून धडधड वाजत होते.

"मी घरी पोहोचलो." असा त्याचा मेसेज आला आणि सिस्टमने तो वेगळ्या उच्चारात वाचून दाखवल्याने तिला हसू आले.

कपडे बदली करून कालचे धुतले आणि त्याने घेतलेल्या ड्रेसवर सारखे हात फिरवत होती.

शशीला पाठवलेल्या फोटोवर स्तुती करणारे व्हॉईस मेसेजेस आले होते.आपणही छान दिसतो असे आज तिला त्याच्या बोलण्याने समजत होते.

ना पुस्तक वाचण्यात लक्ष लागत होते ना दुसरे काही करण्यात. तेवढ्यात आज पाऊस पुन्हा बरसत आहे म्हणून तिने रेडिओ सुरू केला.थोडा वेळ नीट सिग्नल येत नव्हता म्हणून खर खर असा आवाज आला आणि कार्यक्रम सुरू झाला.

प्रेमीयुगालांचा कार्यक्रम चालू होता.ज्यात प्रश्न आणि उत्तर आणि मध्येच त्याला अनुसरून गाणे लावले जात होते.

रेडिओ जॉकीला एका मुलीने प्रश्न विचारला होता की,एका व्यक्तीचा सारखा मनात विचार येतो आणि तेव्हा हृदयाचे ठोके जास्त वाढतात तेव्हा ती व्यक्ती आपली आठवण काढत आहे म्हणून असे असेल का,असा प्रश्न होता.

तेव्हा त्याला उत्तर येते, "त्याला प्रेम म्हणतात.त्या व्यक्तीचा तुम्ही विचार करत आहात त्यासोबत घालवलेले क्षण तुम्हाला सारखे आठवतात आणि तुम्हाला त्यांच्यासोबत सुरक्षित वाटत असेल तर तुम्ही त्या व्यक्तीवर प्रेम करता." हे उत्तर ऐकता चिन्मयी चकित झाली. कारण हे सर्व काहीच वेळापूर्वी तिच्यासोबत होत होते.

तिकडे हर्षही हाच कार्यक्रम ऐकत होता आणि त्याने डोळे बंद करताच चिन्मयीचा चेहरा समोर आला.तसे झटकन त्याने बंद डोळे उघडले.

'मला चिन्मयीसोबत प्रेम झाले आहे?' तो स्वतःलाच विचारत होता.

'नाही,हे प्रेम नसेल कार्यक्रमात काहीही सांगतात.' तिकडे चिन्मयीसुद्धा ते स्वीकारण्यास तयार नव्हती.

दोघांनी रेडिओ बंद केला.तिने झोपून घेतले पण निद्रादेवी काही तिच्यावर आज लवकर प्रसन्न होत नव्हती.

त्याने ब्लॉग उघडून आधीच्या कमेंटसना उत्तर दिले तसेच त्याची बोटे टाईप करायची थांबून पुन्हा काहीतरी विचार करून टाईप करायला लागली.

आवडतो मला सखी
नेहमीच तुझा सहवास
काहीतरी नक्कीच आहे
नाते हे वेगळे नि खास

त्याने चारोळी पोस्ट केली.

त्यावर लगेच ऑनलाईन असणाऱ्या वाचकांनी प्रतिसाद दिला.

'सखी नाही प्रेयसी आहे मग ती.'

'काव्यहर्ष प्रेमात पडले वाटते.'

एकामागून एक कमेंट येत राहिल्या आणि त्याने वैतागून ब्लॉगसाईट लॉगआऊट केली.

'प्रेम? छे! मुळीच नाही.काहीही बोलत आहेत.' स्वतः शी तो म्हणत झोपण्याचा प्रयत्न करू लागला.

दोन आठवडे असेच गेले.ती अपॉइंटमेंट नसल्याने हॉस्पिटलमध्ये जात नव्हती.तो मात्र समुपदेशन आणि ती भेटेल म्हणून येत होता.

दोघांनी मनाशी ठरवलं होते की भेटायचे नाही त्यामुळे
त्यादिवसापासून त्यांनी एकमेकाला संपर्क केलाच नव्हता.असे ठरवूनही मनातील त्यांच्या विचारावर त्यांना ताबा ठेवता येत नव्हता.

ती मुलांच्या अभ्यासात व्यग्र होती तर तो त्याच्या ऑफिसमध्ये.
दोघेही लवकर घरी जात नव्हते कारण त्यांना त्यादिवशी घालवले दिवस आठवायचा आणि तोच विचार करत राहायचे.

आज सर्वच काम झाले होते म्हणून तो घरी निघण्यासाठी निघाला पण त्याने अचानकपणे तिच्या शाळेच्या मार्गाला कार नेली.
लांबूनच तिला पाहून तो जायचे असा विचार करत होता.

तिला पण त्याची आठवण येत होती पण तिने हातात घेतलेला फोन बाजूला ठेवला.तेवढ्यात तिला एक फोन आला आणि फोनवरचे ऐकून तिला धक्काच बसला.

हर्ष मस्त तिच्याकडे येण्यासाठी खूप आनंदात असल्याने गाणे गात जात होता.लांबून तर लांबून तिला पाहायचे त्यामुळे त्याने परफ्यूमही दुसरा वापरला होता.नाहीतर तिला तो आल्याचे ते पण समजले असते.तिच्या आकलनशक्तीला सलाम करत स्ट्रेरिंगवर हात लयबद्धतेने फिरवत गाणे गात होता.

तो तिथे पोहोचला तर खूप लोकं तिथे जमा झाले होते. त्याला काहीतरी विचित्र झाले आहे हे वाटत होते.म्हणून आधी कार पार्क करून तो तिथे निघून आला.

कोणाचे तरी पार्थिव तिथे अंत्य दर्शनासाठी आणण्यात आले होते.बरीचशी मुले त्यांना एका रांगेत पाया पडून बाजूला होत होते.

त्याची नजर जिला शोधत होती ती मात्र तिथे नव्हती.एका सुरक्षारक्षकाला त्याने गाठले आणि कोणाचे निधन झाले ह्याबाबत विचारले.त्यानेही दर्शन घेतले आणि मागे फिरला तर धपकन कोणी पडल्याचा आवाज आला.

कोण पडले हे बघितल्यावर त्याचे डोळे मोठे झाले आणि धावतच तो त्या व्यक्तीपाशी गेला.

क्रमशः

© विद्या कुंभार

कोण पडले असेल?

सदर कथेचे हक्क हे लेखिकेकडे आहेत त्यामुळे कॉपी करून इतर ठिकाणी पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.

"सदर कथेचे लिखाण सुरू आहे, पुढील भाग नियमितपणे ईरा फेसबुक पेजवर येतील त्यामुळे पेजला फॉलो करून ठेवा."

अष्टपैलू लेखक स्पर्धा २०२५
0

🎭 Series Post

View all