Login

डोळस भाग-२०

तिमिरातूनी तेजाकडे वाटचाल करणाऱ्या दोन जीवांची कथा !
प्रस्तुत कथा ही काल्पनिक असून त्यात नाव,गाव,स्थळ, प्रसंग, जीवित अथवा मृत्यूशी संबंध आला तर तो योगायोग समजावा.

डोळस भाग-२०

मागील भागात,

रात्री तो आपल्या बायकोच्या फोटोकडे पाहून खूप वेळ विचार करत होता.

"मी बरोबर करतोय ना?" त्याने तिच्या हसऱ्या चेहऱ्याच्या फोटोकडे पाहून विचारले.

आता पुढे,

सकाळी आवरून हर्ष चिन्मयीला घेण्यासाठी आला.ती काही न बोलता त्याच्या कारमध्ये बसली.हॉस्पिटलपर्यंत तो काहीच बोलला नाही.तिने फोन काढून त्याला पैसे ट्रान्स्फर केले.त्याने त्याचा मेसेज पाहिला.

"मी घेण्यासाठी येईन." तो म्हणाला आणि ऑफिसला गेला कारण आज त्याचे डॉक्टरकडे सेशन नव्हते.

जशी आपल्या समुपदेशनाच्या खोलीत तिने प्रवेश केला तसे ती सर्व विचार खोली बाहेर सोडून समुपदेशनाचे काम करण्यासाठी तयार झाली.

"हाय फ्रेंड sss" तिला ओळखीचा आवाज आला.

"हॅलो बडी..." तिच्या चेहऱ्यावर हसू उमटले.

त्याने थोडा वेळ तिच्याशी संवाद साधला आणि आपल्याला प्राप्त झालेले मेडल्स आणि ट्रॉफी त्याने तिच्या हातात देऊन त्याबद्दल सांगत होता.ती सुद्धा त्या सर्वांना स्पर्श करून त्याच्या गालावर हात फिरवून स्मितहास्य करून त्याला अभिनंदन करते.

"मी पुन्हा भेटायला येईन हा?" तो म्हणाला.

आणि जाताना तिने त्याला एक चॉकलेट दिले मघ तो निघून गेला.

असे खूप क्वचित मुले येऊन तिला भेटून जात.कारण त्यांना
एकदा उपचार दिल्यावर ते पुन्हा तिथे येतीलच असे नव्हते.
कृतज्ञता सगळ्यांकडेच असते असे नाही.दुसऱ्यांचे दुःख दूर करण्याचे काम त्यामुळेच तिला आवडत होते.समाधान ह्यातूनच प्राप्त होते त्यामुळे ती नेहमीच आधी समोरच्याचे ऐकून घेत होती.

वेळ झाला आणि तो आला.

"कालच्यासाठी तुमचे धन्यवाद." एवढेच ती म्हणाली.

त्याचे ओठ रुंदावले होते.आज नक्कीच काहीतरी छान झाले असेल असा त्याने अंदाज लावला.

"उद्या तुम्हाला वेळ आहे का? मला तुमच्याशी थोडे महत्त्वाचे बोलायचे आहे." त्याने विचारले.

"हो.शाळेनंतर वेळ आहे." चिन्मयी म्हणाली.

त्याने तिला शाळेत सोडले आणि संध्याकाळी घरी सोडून तो राहिलेले काम करायला गेला.

रात्रभर त्याला काय बोलायचे असेल हाच विचार ती करत होती.

हर्ष उद्या काय आणि कसे बोलायचे ह्याचा विचार करत होता. त्याबद्दल तिचा विचार काय असेल आणि ती त्यावर कशी प्रतिक्रिया देईल ह्याचा तो विचार करत होता.

दोघांना भेटून काही महिनेच झाले होते.त्यात चिन्मयी लोकांचा विचार करून त्याच्याशी जेवढ्याच तेवढे बोलत होती.त्यामुळे त्यालाही पुढे कसे होईल ह्याची चिंता वाटत होती.

कवी-कवयित्री असो की लेखक/ लेखिका त्यांना व्यक्त करण्याचे एकच साधन म्हणजे लेखणी.आधी कागदावर लिहून व्यक्त व्हायचे तर आता डिजिटल युगात टायपिंग करून स्क्रीनवर जास्त प्रमाणात लिहितात.लिहिण्याचे माध्यम बदलले तरी शब्द रेखाटले जात होतेच.

मनाची घालमेल कशी सांगू तुला
एकदा शांतपणे ऐकून घेशील का?

तुझ्यासोबत चालायची इच्छा आहे खूप
तुझ्या संमतीने बदलेल नात्याचे रूप

विचार केला आता व्यक्त होण्याचा
अबोल होण्याचा निर्णय सोडण्याचा

गैरसमज तू काही करून नको घेऊ
नात्याला भले मैत्रीचे नावच देऊ

मनातील भावना मुक्तछंदात लिहिण्याचा प्रयत्न करून त्याने कासावीस झालेल्या चित्ताने त्या ओळी ब्लॉगवर पोस्ट केल्या.

बाहेर रात्रीची शांतता पसरली होती पण ह्या दोन व्यक्ती स्वतःच्या अंतर्मनातील शांतता दूर करण्यास फोल ठरले होते.

सकाळी उठून तिने त्याने आधी दिलेला ड्रेस घातला होता.तो तिच्याकडे पाहतच राहिला.तिच्या जाण्याच्या बोलण्याने तो भानावर आला.

दिवसभर दोघांनी आपले काम केले.जस जशी संध्याकाळ जवळ येत होती तस तशी अस्वस्थता वाढत होती.

पावसाचा ऋतू जाऊन आता हलके ऊन पडायचे मध्येच सायंकाळी थंडीची चाहूल लागायची.

"आपण एक शांत ठिकाणी जात आहोत." त्याने सांगितले.

तिला मंदिरात घंटानाद ऐकायला आला.संध्याकाळची आरती चालू होती.त्याने तिचा हात पकडला आणि गर्दी आहे असे सांगितले.तिनेही नकार दिला नाही.दोघांनी मंदिरात दर्शन घेतले.गणपतीची मूर्ती आहे आणि आजूबाजूचे वर्णन तो तिला सांगत होता.

संगमरवरी बांधकाम केले असल्याने तिथे थोडा थंडावा होता.
तेवढ्यात त्यांना एका मुलीचा  रडण्याचा आवाज आला.

"काय झाले बाळा?" हर्ष चिन्मयीसोबत तिच्याजवळ जात विचारतो.

"म.. माझी मम्मा.ती हरवली." ती रडत हुंदके देऊन म्हणाली.

"हर्ष,आपण तिला इथे मंदिराचे ऑफिस असेल तिथे घेऊन जाऊ." ती म्हणाली.

त्या मुलीनने एक हात चिन्मयीचा पकडला आणि एक हात हर्षचा पकडला.

"तुझी मम्मा आपण शोधू.तुझे नाव काय सांग?" चिन्मयीने तिला चालत असताना विचारले.

"निशी." ती म्हणाली.

"अरे वाह! खूप छान नाव आहे." चिन्मयी अंदाजाने तिच्या केसांवर हात फिरवत म्हणाली.

ऑफिसमध्ये तिथे पोहोचल्यावर त्यांनी लाऊडस्पिकरच्या मदतीने त्या मुलीचं वर्णन केले आणि काही वेळात तिची आई लगेच पळत तिथे आली.

"मम्मा, ह्या काका- काकूंनी मला इथे आणले." ती मुलगी तिच्या आईला बिलगून म्हणाली.

"तुम्हा नवरा बायकोचे खूप धन्यवाद.हात पकडूनही ही गर्दीत हात सोडून पळाली मी किती उशीर झाले शोधत होते." तिची आई म्हणाली.

नवरा-बायको म्हणाल्यावर ते दोघे गडबडले.

चिन्मयी "नाही, तुम्हाला काहीतरी गैर..."

तेवढ्यात हर्ष मध्येच म्हणाला, "काही हरकत नाही.तिला नीट सांभाळा आणि बाळा मम्माचा हात सोडून जायचा नाही."

तिच्या आईने पुन्हा एकदा धन्यवाद मानून तिथून आपल्या मुलीला घेऊन गेली.

"मागे एक छोटे उद्यान आहे तिथे आपण जाऊया." तो म्हणाला.

तिथे एका बाकावर ते दोघे काही अंतर ठेवून बसले.

"तुम्ही मला मघाशी त्यांना आपल्या बद्दल गैरसमज झालेला तो दूर का करून दिला नाही?" तिला रागच आला होता.

आता आपण विषय कसा काढायचा त्या आधीच ही रागावली असा तो विचार करत होता.

"त्या मुलीला तिची आई भेटली अजून काय हवे.तसेही आपण थोडी त्यांना ओळखतो."तो म्हणाला.

तरीही त्याने आमचे तसे काही नाही नाते नाही आहे हे सांगावे असे तिला वाटत होते.

"तुम्ही इथे काहीतरी बोलण्यासाठी बोलावले होते.काय बोलायचे आहे?" ती मुद्द्यावर येत विचारत होती.

"हो." त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि मनातच विचारांची जुळवणी केली.

"त्यादिवशी तुम्ही बेशुद्ध झालात आणि मला असे वाटले की मी तुम्हाला सांगायला उशीर तर नाही केला.म्हणून आज मी बोलायचे ठरवले."

"काय?" तिने त्याच्याकडे तोंड करून विचारले.

"मला तुमच्याशी लग्न करायचे आहे." तो काहीही आढेवेढे न घेता म्हणाला.

आधीतर तिला आपण काय ऐकले हे समजले नाही.थोडा वेळ शांतता पसरली.

"तुम्हाला कळते आहे का तुम्ही काय बोलत आहात ते?"
आता ती चिडून म्हणाली.

"हो,मला बरोबर कळत आहे.म्हणूनच तर मी तुम्हाला आता सांगायचे ठरवले.त्यादिवशी तुम्हाला त्या अवस्थेत पाहून माझा जीव जातोय का असेच वाटत होते.आधीच मी माझ्या कुटुंबाला गमावले आहे.मला तुम्हाला गमवायचे नाहीये." तो तिला समजावत म्हणाला.

"ह्याला सहानुभूती म्हणतात.तुम्हाला माझ्याबद्दल फक्त सहानुभूती वाटते.थोडी मदत केली म्हणजे मी तुम्हाला हो बोलेन हे वाटलेच कसे तुम्हाला ? ह्याला आकर्षण म्हणतात अजून काही नाही." तिला तो तिच्यावर दया करतो असेच वाटत होते.

"तुम्ही चुकीचे समजत आहात.सहानुभूती असती तर तुम्ही आहात तसे मला पसंत पडला नसता.आकर्षण म्हणायला आपण काय कॉलेजमध्ये किंवा लहान नाहीत.मला तेवढे समजते.तुम्ही एक दिवस जरी नजरेसमोर नाही दिसलात तरी मन चलबिचल होते.
मला पुढचे आयुष्य तुमच्यासोबत व्यतीत करायचे आहे.मी तुमच्यावर प्रेम करायला लागलो आहे हे कारण पुरेसे नाही का?" तो पोटतिडकीने म्हणत होता.

"पण माझे प्रेम नाहीये.तुम्ही मला ह्यासाठी जबरदस्ती नाही करू शकत मिस्टर हर्ष.हा विषय इथेच थांबला तर बरे होईल."असे म्हणून ती तिथून उठून निघू लागली.

"ठीक आहे.तुम्ही तुम्हाला हवा तो वेळ घेऊ शकता.नंतर उत्तर
द्या."असे म्हणत त्याने तिच्यासाठी आणलेली गुलाबाची फुले तिच्या हातावर ठेवली.

त्याचे डोळे भरून आले होते.ती सहजासहजी हो म्हणेल असे त्याला आधीपासून वाटतच नव्हते तरी एक आस त्याला होती पण तिच्या नाही म्हणण्याने ती पण गळून पडली होती.

"मी तुम्हाला घरी सोडतो."

"त्याची गरज नाही मिस्टर हर्ष." ती निर्विकारपणे म्हणाली.

"तुम्ही माझी जबाबदारी आहात त्यामुळे ती तुम्हाला घरी
सोडणारच.तुम्हाला समस्या असेल तर तुमच्या प्रशासक सरांशी तुम्ही बोलू शकता." आवाजात जरब आणत तो म्हणाला.

ती काहीच न बोलता त्याच्यासोबत गेली.

क्रमशः

© विद्या कुंभार

काय होईल पुढे?

सदर कथेचे हक्क हे लेखिकेकडे आहेत त्यामुळे कॉपी करून इतर ठिकाणी पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.

"सदर कथेचे लिखाण सुरू आहे, पुढील भाग नियमितपणे ईरा फेसबुक पेजवर येतील त्यामुळे पेजला फॉलो करून ठेवा."

अष्टपैलू लेखक स्पर्धा २०२५
0

🎭 Series Post

View all