Login

डोळस भाग-२९

तिमिरातूनी तेजाकडे वाटचाल करणाऱ्या दोन जीवांची कथा !
प्रस्तुत कथा ही काल्पनिक असून त्यात नाव,गाव,स्थळ, प्रसंग, जीवित अथवा मृत्यूशी संबंध आला तर तो योगायोग समजावा.

डोळस भाग-२९

मागील भागात,

"मलाही चालेल.माझे काही कामे आहेत त्यामुळे एक महिना मलाही जमणार नाही."तो कामाबद्दल सांगत म्हणतो.

"उशीर होतोय.मला घरी लवकर सोडा."त्याला बाजूला करत बोलते.

ही तीच मुलगी आहे का जिला माझ्या कारमध्ये काही महिन्यांपूर्वी बसायचे नव्हते आणि आता हक्काने सांगते हा प्रश्न त्याला पडतो.

"चला लवकर." ती त्याला हलवून बोलते.

आता पुढे,

चिन्मयी ब्रेललिपीमध्ये आपल्या पुस्तकाचे काम करत होती.
तेवढ्यात तिला फोन येतो.

"हा,बोला हर्ष." ती फोन उचलल्यावर आनंदात बोलते.

"आज तुम्ही भेटू शकता का?" तो विचारतो.

संध्याकाळ होऊन गेलेली असते आणि आता भेटायचे म्हणजे जाऊन पुन्हा घरी यायला उशीर होणार म्हणून ती विचार करते.

"मी जास्त वेळ नाही घेणार लगेच सोडतो." ती पुढे काही बोलत नाही म्हणून तो म्हणतो.

"ठीक आहे." ती बोलते.

तो थोड्यावेळात तिच्या घराजवळ येतो.हॉर्न वाजवून तो
आल्याचे सूचित करतो.

ती केनच्या साहाय्याने बाहेर येते.कारमध्ये बसते आणि अचानक त्याने का बोलावले असे ह्याचा विचार करते.

काही दिवस झाले दोघांच्या कामामुळे त्यांना भेटायला जमत नसते.त्याने एक गाडी तिच्यासाठी न्यायला आणि सोडायला ठरवून दिलेली असते.

"आधी जेवून घेऊ मघ बोलू." तो हॉटेलमध्ये गेल्यावर बोलतो.

"पुस्तकाचे काम कसे चालू आहे?" तिचा हात हातात घेत तो विचारतो.

"चालू आहे.अजून थोडे दिवस लागतील." ती म्हणते.

तेवढ्यात जेवण येते.दोघे बोलत जेवत असतात.नेहमीप्रमाणे ती अर्धे पैसे देते.

दोघे तिथून बाहेर पडतात आणि समुद्रकिनारी येतात.

"काय झालं? सर्व ठीक आहे ना?" ती तो शांत आहे म्हणून विचारते.

"हो,मला एक आठवडा कामानिमित्त बाहेर जावे लागणार आहे." तो म्हणतो.

"एक आठवडा?" ती कपाळावर आठ्या आणत विचारते.

तो तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला जवळ घेतो.

"ठीक आहे." ती शांतपणे बोलते.

"मला तुमची खूप आठवण येईल." तो म्हणतो.

"मघ त्यासाठी लवकर काम संपवून इकडे या." ती त्याचा एक हात दोन्ही हातात घेत म्हणते.

"लवकर येण्याचा प्रयत्न करेन." तिचा चेहरा समोर करून तिच्या कपाळावर त्याचे ओठ टेकवतो.

"हो,मी वाट पाहीन." ती त्याला बिलगते.

तिचा काळा चष्मा तो काढून बाजूला ठेवतो.त्यामुळे ती गडबडते.

"हर्ष..."

"आपण सोबत असताना नका घालत जावू." तो अलवार तिच्या नयनांना स्पर्श करत म्हणतो.

ती "सवय झाली आहे."

तिला मनापासून त्याने स्वीकारले ह्याची अनुभूती ह्या त्याच्या क्रियेने तिला येते.

"चला उशीर होतोय.घरी जावूया." तो तिला उठवत म्हणाला.

तो दूर जाणार म्हणून मन नाराज झाले होते पण त्याचे काम महत्त्वाचे असेल म्हणून ती जास्त काही बोलत नाही.तो तिला कार चालवत असताना मध्येच बघत असतो.तिने त्याचा गियरवर ठेवलेला हात त्यावर स्वतःचा ठेवते.

"चिन्मयी, येतो."  घरात जात असताना तो म्हणाला.

"हर्ष..." ती मागे वळते.

"हा बोला." तो म्हणतो.

"स्वतःची काळजी घ्या आणि लवकर या." ती म्हणते.

"हो.तुम्हीही स्वतःची काळजी घ्या." तो म्हणतो.

ती आतमध्ये गेल्यावर जड अंतःकरणाने तो माघारी फिरतो.

माणसाची झालेली सवय काही काळ दुरावा आल्यावर त्रासदायक ठरते.असेच दोघांचे झाले होते.

"हा डॉक्टर मन ह्यांचा मोबाईल नंबर आहे.गरज लागली तर नक्की फोन करा." त्याने मेसेज केलेला.

"हो नक्की." ती त्याला प्रतिसाद देत म्हणते.

तो दुसऱ्यादिवशी बंगलोरला जातो.पोहोचल्यावर मेसेज करतो.

ती स्वतःला काही हॉस्पिटलच्या अपॉइंटमेंट असतात त्या आणि शाळेच्या कामात व्यग्र करून घेते.

दररोज त्याला यायला किती दिवस बाकी आहेत हे ती मोजत असते.

"चिन्मयी व्हिडिओ कॉल करतोय.उचला." तो साधा फोन कॉल करून बोलतो.

ती उचलते.

"तुमच्या डाव्या बाजूला थोडा सरकवा." ती दिसत नसते म्हणून तो बोलतो.

"आता आहे बरोबर?" ती विचारते.

"हो." तो तिला घरात नाइट ड्रेस घातलेला आहे ह्याचे निरीक्षण करत उत्तर देतो.

"परवा येणार ना?" ती विचारते.

"हो,प्रयत्न चालू आहे." तो बोलतो.

"थकला आहात का?" तिचा उतरलेला चेहरा त्याला दिसतो.

"नाही.पुस्तकाचे काम करत होते.काही पेपर झाले ते पण तपासत होते." ती सांगते.

"बरं." तो म्हणतो.

"मी निळ्या रंगाचा टीशर्ट घातला आहे आणि पांढऱ्या रंगाची शॉर्ट पॅन्ट." तो म्हणतो.

"मी पण निळ्या रंगाचा शर्ट घातला आहे." ती हसून बोलते.

तो तिला कोणते कपडे घातले आहे आणि आजूबाजूला काय आहे ह्याचे वर्णन करत न चुकता सांगत असतो.त्यामुळे तिला पण ऐकताना ते बरे वाटते.

आपण बघू शकत नसलो तरी त्याच्या सांगण्याने ती कल्पना करण्याचा प्रयत्न करायची.

"गाणे म्हणा ना." तिच्या आवाजात गाणे ऐकण्याची तो बोलून दाखवतो.

"बोलेन पण तुम्हीही मला चारोळी वाचून दाखवायची." ती सुद्धा मागणी करत म्हणते.

तो होकार देतो.

"हा सागरी किनारा ss"  चिन्मयी गाणे गाते आणि तो तिच्या आवाजात मंत्रमुग्ध होऊन तिला एकटक बघत असतो.

"कसे वाटले?" तिने संपल्यावर विचारले.

"खूप मस्त." तो भानावर येत म्हणाला.

"आता तुमची चारोळी ऐकवा."

तुझा आवाज ऐकल्यावर
मनाला मिळते थोडी शांती
नजर तुझ्यावर पडता सखे
दर्शन देई तुझी सुंदर कांती

"कशी वाटली?" तो ती लाजून खाली बघते म्हणून विचारतो.

मनातल्या भावना सख्या
तुला कशी सांगू मी आता ?
काळजात दुराव्याची कळ
येते सख्या तू लांब जाता

ती लगेच मनात शब्दांची जुळवणी करून त्याला बोलते.

मीही अधीर झालो आहे
थोडीशी वाट बघ राणी
सोबतीने गाऊ आपण
प्रेमाची मंजुळ गाणी

असे म्हणताच ती लाजून फोन कट करते. त्यालाही ती लाजली हे समजता तो गालात हसतो.

तिची भिरभिरणारी नजर चष्मा नसताना तो बघायचा.आसपास काय चालू आहे हे जाणून घेण्यासाठी तिचे प्रयत्न चालू असायचे आणि तोही जमेल तसे तिला सांगण्याचा प्रयत्न करायचा.

शशी घरी आलेली असते.दोघेही कामानंतर भेटत असल्याने त्याबद्दल बोलून मग चिन्मयीच्या साखरपुड्यावर बोलण्याची गाडी घसरते.

शशीला ती सर्व माहिती सांगत असते.ते सांगत असताना तिच्या चेहऱ्यावर हसू असते आणि आनंद ओसंडून वाहत असतो हे शशीने मैत्रीण म्हणून हेरले नसते तर नवलच!

"तू खूश आहेस ना?" ती काळजीने विचारते.

"मी खूश आहे शशी, पण.." ती बोलायची थांबते.

ती काय म्हणून विचारते.

"आमच्या नात्यात हर्षला समजून जास्त घ्यावे लागेल.एक पत्नी म्हणून जेवण बनवणे आणि सर्व पाहून कोणतीही परिस्थिती ओळखणे हे मी माझ्या व्यंगामुळे नाही करू शकत.कालच बघ मी थकली आहे हे त्यांना माझ्या चेहऱ्यावरून समजले.तसे मला नाही समजणार.मला भीती वाटते की ते काही दिवसांनी मला कंटाळून सोडून तर जाणार नाहीत ना?"आपली कमकरता सांगताना तिला खूप त्रास होत होता.

"असे नाही होणार, चिनू." शशी तिला मिठी मारत जवळ घेत समजावते.

"असे झाले ना शशी.मी स्वतःला सावरू शकणार नाही.मी ह्या नात्यात खूप गुंतले गेले आहे.तसे ते सोडून नाही जाणार असे म्हंटले आहेत पण मला ही भावना नाही समजत." ती म्हणाली.

"शांत हो.काही होणार नाही.घटस्फोट होणार हे आधीच माहीत असेल तर कोणी लग्न करणारच नाही.तुम्ही तुमच्या नात्याला वेळ दिला आहे.पुढे अजून लागेल सर्व नवीन असेल तेव्हा जिजू समजून घेतील." ती तिची भीती दूर करण्याचा प्रयत्न करते.

'असेच होऊ दे.' ती मनात म्हणते.

उद्या हर्ष येणार म्हणून ती खूप खूश असते.त्याच्यासोबत व्यतीत केलेले क्षण तिला आठवतात.

सकाळी उठून ती एक काम करत बसते.शशी आपल्या घरी जाते.चिन्मयी डब्यातील जेवून तो डब्बा बाजूला ठेवते.शाळेला सणामुळे सुट्टी असते म्हणून पुस्तकाचे काम करून ती दुसरे काम करते.

गाणे गुणगुणत रोजची कामे करत होती.सकाळची संध्याकाळ होते पण हर्षचा काही फोन नसतो.कोणते नोटिफिकेशन आले की त्याचा मेसेज आला असेल म्हणून तिला आनंद व्हायचा पण लगेच कोणत्या कंपनीचा मेसेज असला की तिचा हिरमोड व्हायचा.

'ह्या कस्टमर केअरला काही काम नाही का? आजच सर्व मेसेजेस पाठवत आहेत.' ती वैतागून फोन बाजूला ठेवते.

दाराची घंटी वाजते आणि तो आला आहे म्हणून की काय ती लगबगीने दरवाजा उघडते.

"हे तुमचे पार्सल आहे." पोस्टमन तिला देतो.

त्यावर नेमक्या ठिकाणी ती सही करते.त्याबद्दल आधी शाळेत असताना शिकवलेले असताना ती विचारून करते आणि ते पार्सल स्वतःजवळ घेते.

पुन्हा घंटी वाजते तर मागच्या सारखा उतावीळ राहण्याचा वेडेपणा ती करत नाही.

"कोण आहात? बोलाल का?" दरवाजा उघडल्यावर ह्यावेळी मात्र कंटाळून पाच मिनिटे झालीत तरी समोरची व्यक्ती बोलत नाही म्हणून विचारते.

क्रमश:

© विद्या कुंभार

सदर कथेचे हक्क हे लेखिकेकडे आहेत त्यामुळे कॉपी करून इतर ठिकाणी पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.

"सदर कथेचे लिखाण सुरू आहे, पुढील भाग नियमितपणे ईरा फेसबुक पेजवर येतील त्यामुळे पेजला फॉलो करून ठेवा."

अष्टपैलू लेखक स्पर्धा २०२५

🎭 Series Post

View all