Login

डोळस भाग-२१

तिमिरातूनी तेजाकडे वाटचाल करणाऱ्या दोन जीवांची कथा !
प्रस्तुत कथा ही काल्पनिक असून त्यात नाव,गाव,स्थळ, प्रसंग, जीवित अथवा मृत्यूशी संबंध आला तर तो योगायोग समजावा.

डोळस भाग-२१

मागील भागात,

"मी तुम्हाला घरी सोडतो."

"त्याची गरज नाही मिस्टर हर्ष." ती निर्विकारपणे म्हणाली.

"तुम्ही माझी जबाबदारी आहात त्यामुळे ती तुम्हाला घरी
सोडणारच.तुम्हाला समस्या असेल तर तुमच्या प्रशासक सरांशी तुम्ही बोलू शकता." आवाजात जरब आणत तो म्हणाला.

ती काहीच न बोलता त्याच्यासोबत गेली.

आता पुढे,

चिन्मयी रात्री झोपताना खूप वेळ विचार करत होती.हर्षचा सहवास तिला आवडत होता.मैत्रीसाठी त्याने स्वतःहूनच हात पुढे केला होता. तो आता जरी खरे बोलत असेल तरी पुढे काय? तिला त्याच्याकडून सहानुभूती नको हवी होती.त्याने पुन्हा विचारले तरी नकार द्यायचा हाच ती विचार करत होती.

'मी त्यांना जबरदस्ती करत नव्हतो.त्यांचा नकार देण्याचे कारण मला पटले नाही.सहानुभूती आहे हे त्या कसे म्हणू शकता? त्यांना हे सर्व नाटक तर वाटत नसेल ना?' तो घरी आल्यापासून सोफ्यावर बसूनच विचार करत होता.

माझ्या मनातील भावना
तुला सांगून केला का गुन्हा?
तू विचार कर ना माझ्या बाजूने
संमतीसाठी प्रयत्न करेन पुन्हा?

ब्लॉगवर लिहून त्याने पोस्ट केले.

आता तिला दिलेल्या वेळात तिने विचार करावा हीच त्याची इच्छा होती.

दुसऱ्यादिवशी तो येण्याच्या आधीच ती हॉस्पिटलला निघून गेली होती.घराला असलेले कुलूप त्याला दिसले होते.

हॉस्पिटलमध्ये त्याने आपले सेशन केले.त्याला पुन्हा रात्रीची झोप येत नसल्याने त्याने सांगितले.त्यावर कोणतीच औषधे न देता त्याला अतिविचार न करण्याचे काही मार्ग सांगण्यात आले.

ती आणि तो सोबतच हॉस्पिटल बाहेर पडले पण तिने आपली कॅब बुक केली आणि शाळेत गेली.ती त्याला दुर्लक्ष करते हे त्याला समजत होते.वाईट तर वाटतच होते पण तिच्या कलाने घेण्याचे त्याने ठरवले.

काही दिवस मध्यंतरी असेच गेले आणि तो ही गोष्ट विसरून जाईल असेच तिला वाटले.त्याचे हॉस्पिटलमधले सेशन पूर्ण झाले होते.त्यामुळे तो काही त्यासाठी हॉस्पिटलमध्ये येत नव्हता.त्याने आपल्या कामात स्वतःला गुंतवून ठेवले होते कारण वेळेत घरी गेल्यावर त्याला तिची आठवण येत होती.म्हणून जास्त वेळ तो आपल्या कामात व्यग्र राहत होता.

तीन-चार महिने असेच गेले.चिन्मयीने तो तिला विसरला असेल असेच मानले होते.

एकदा शशी सोबत ती त्याच मंदिरात गेली होती ज्या मंदिरात ती हर्षसोबत गेली होती.मंदिरात गर्दी खूप होती आणि त्यामुळे रांगेत काही माणसे मुद्दाम त्याचा फायदा घेऊन काही महिलांनास्पर्श करून त्रास देत होते.शशीने तिचा हात पकडला होता पण मागून येणाऱ्या काही मुलांच्या घोळकाच्या धक्क्याने तो सुटला.
चिन्मयीने नेमकी तेव्हा केन पिशवीत ठेवली होती आणि ती पिशवी शशीकडे राहिली.ती शशी बाजूला असेल म्हणून हात लावण्याचा प्रयत्न करत असताना एका माणसाने तिचा हात धरला.त्याचा हात घट्ट होत असताना तो स्पर्श तिला सहन झाला नाही म्हणून ती झटकत होती.तर त्या माणसाने चिन्मयीचा काळा चष्मा बघून तिला दिसत नाही हे त्याला समजले.पुढे जाऊन तो दुसऱ्या हाताने तिला स्पर्श करणार तर त्यावर एक जोरात हाताने मारले आणि त्या माणसाने वेदनेने तिचा दुसरा हात सोडला.

चिन्मयीला अजून एक हात स्पर्श झालेला जाणवला पण तो आश्वस्त करणार वाटला.

"तुम्ही ठीक आहात ?" त्या व्यक्तीने विचारले.

"हो,खूप धन्यवाद डॉक्टर मन." ती म्हणाली.

शशी तिच्याजवळ आली.डॉक्टर मन यांची ओळख तिने शशी
सोबत करून दिली.

"तुमचे मित्र हर्ष कसे आहेत?" न राहून तिने विचारले.

"तो ठीक आहे,पण तुम्ही नकार द्याल असे मला अपेक्षित नव्हते." त्यांनी सांगितले.

"होकार देऊन त्यांना आयुष्यभर मी माझे ओझे वाहून कशी देणार? मी काही तुम्हा सर्वांसारखी सामान्य व्यक्ती नाही.शरीराचा सर्वात महत्त्वाचा अवयवच देवाने मला दिला नाही.माझ्यासोबत मी इतरांची फरफट करू शकत नाही.माझ्यासोबत राहणे इतके सोपे नाही.तुम्ही आताच पाहिले ना कसे मला दिसत नसल्याने त्या माणसाने फायदा घेतला? आम्ही दोन वेगळ्या व्यक्ती आहोत त्यामुळे एकमेकांपासून दूर राहणेच त्यांच्या आणि माझ्यासाठी बरे." असे म्हणून ती निघून गेली.

शशीने त्यांचे बोलणे ऐकले होते.तिने आधीही हर्षला होकार देण्यासाठी समजावले होते पण चिन्मयीने नकार दिला.

रात्री ब्रेल लिपीमध्ये पुस्तके लिहिण्याचे काम चिन्मयी करत होती.
कितीही केलं तरी हर्षची आठवण तिला येतच होती.त्यामुळे एका पुस्तकांच्या बदली दोन पुस्तकांचे काम ती वेळ जाण्यासाठी काम करत होती.

"आता तुम्हाला पहिली पायरी जमत आहे.त्यामुळे तुम्ही सराव म्हणून मी जे सांगितले तसे करा." हर्षला एकजण म्हणाले.

"हो,मी प्रयत्न करतो." तो म्हणाला.

"हॅलो हर्ष,काल मला चिन्मयी मंदिरात दिसली होती." असे म्हणून कालचा प्रकार त्याच्या कानावर घातला.

"कशी आहे ती? आणि धन्यवाद तिची मदत केलीस." सर्व ऐकून वाईट आणि त्या माणसाबद्दल राग आलेला पाहून तो म्हणाला.

"ठीक तर आहे.तुझ्याबद्दल विचारत होती." त्यांनी सांगितले.

"बरं."असे म्हणून त्याने फोन ठेवला.

'दोघांना एकमेकांची एवढी गरज आहे तरी अजून एक पाऊल ना हा पुढे घेत आहे ना ती.ह्यांचे पुढे कसे होणार?' वरती देवाला बघून डॉक्टर मन मनातच विचार करत होते.

काही महिन्यांनी अनुजाने गोंडस मुलीला जन्म दिला.तिने ते बाळ पाहण्यासाठी तिच्या नवऱ्याला चिन्मयीला घेऊन यायला
सांगितले.चिन्मयी बाळाला बघायला त्यांच्या घरी गेली.

अनुजाच्या मांडीवर असलेल्या त्या चिमुकलीला तिने हाताने गोंजारले.

"आत्याबाई तुम्हाला हातात घ्यायचे आहे का?" अनुजाचा नवरा हसून विचारत होता.

"कशाला? तिला काही दिसत का? उगाच ते आपले बाळ खाली पाडेल.काय हात लावायचा ते आताच लावून घे म्हणावं."
अनुजाची सासू फणकाऱ्याने म्हणाली.

तिला चिन्मयी तिथे आलेली मुळीच आवडली नव्हती.उगाच आपल्या बाळाला तिची नजर लागायची असे विचार मनात येत होते.

"काही होत नाही.चिन्मयी तू मांडी घालून बस.मी मांडीवर ठेवल्यावर तिला नीट पकडते." अनुजा मात्र आपल्या मुलीला तिच्याकडे देत म्हणाली.

तिने आपल्या मांडीवर त्या लहान कोवळ्या मुलीचा स्पर्श अनुभवला.सतत हलणारे ते इवले आणि कोमल हात हातात घेताना किती नाजूक आहेत हे जाणवले.गोड हसू चिन्मयीची चेहऱ्यावर पसरले.ते पाहून अनुजाने तिच्या नवऱ्याला डोळ्यांनी खुणावले.

"मघ बाळाची आत्या.नाव ठरवायचे आहे.काही सुचत असेल तर सांगा." तो म्हणाला.

"तुम्हाला कोणते ठेवायचे आहे?तुम्ही सुचवले असतील की?" तिने त्यांनाच उलटा प्रश्न केला.

त्यांच्यात भांडण होतात म्हणून त्यांनी तिला सुचवायला सांगितले.
ती नंतर सांगते म्हणून जाताना बाळाला छोटे कपडे देऊन गेले.

'आत्या' एक नवीन नाते तिला त्यांच्यामुळे अनुभवता आले.आता पर्यंत ताई आणि काहींची बहीण म्हणून तिला ही नाती माहिती होती पण आज त्या दोघांनी आत्या म्हणून तिला त्यांच्या कुटुंबात काही वेळासाठी का असेना सामावून घेतले होते.

आपल्याला असे अनुजा वहिनींसारखे आई बनण्याचे सुख कधी प्राप्त होणारच नाही का असे वाटून मन भरून आले.अलगद पोटावर तिचा हात गेला.एका अवयवाची कमकरता तर होतीच पण ती अनुभूती फार वेगळी असेल हे तिला अनुजाच्या मुलीला हातात घेतल्यावर समजले होते.जे नशिबात नाही त्याचा नको विचार करायला असे म्हणून ती त्याच गोष्टींचा विचार करत होती.

दुसऱ्या दिवशी पुन्हा नेहमीचा दिनक्रम चालूच होता.त्यादिवशी ती मुद्दाम घराच्या बाहेर होती कारण अनुजाच्या मुलीचे बारसे होते.
तिला आणि तिच्या नवऱ्याला कितीही वाटत असले की तिनेही त्यांच्या समारंभात सामील व्हावे तरी तिच्या सासूला ते पटणार नव्हते.काहीना काही तरी त्या चिन्मयीला बोलणार आणि मघ आलेल्या पाहुण्यांमध्ये कुजबुज होणार हे आधीच माहीत असल्याने तिने लवकर घरी जाण्याचे टाळले.त्या दोघा नवरा-बायकोनी खूप फोन केले पण तिने एकही फोन त्यांचा उचलला नव्हता.

तिला काही पत्रे आलेली ती तिच्यासोबत असलेल्या काकांनी वाचून दाखवली आणि एक पत्र मात्र तिला स्वतःला वाचण्यासाठी बाजूला ठेवले.

"हे काय चिन्मयी आम्ही तुझी किती वाट पाहिली." अनुजाचा नवरा जेवण घेऊन आलेला म्हणून नाराजीत म्हणालात.

"मला आज अचानक काम आले भाऊ.त्यामुळे मी येऊ शकले नाही." ती जेवत म्हणाली.

"खरे सांगायचे नसेल तर राहू दे.माझ्या आईच्या स्वभावाने तू alआली नाहीस.हे आम्हाला माहीत आहे." तो म्हणाला आणि तिचे काही न ऐकता निघून गेला.

तिलाही वाईट वाटत होते पण त्यांचा कार्यक्रम छान पार पाडला हे ऐकून बरे वाटले.

ती झोपत असताना तिला ते पत्र वाचायचे हे लक्षात आले.तिने पाकिटातून ते बाहेर काढले.ते ब्रेल लिपीत होते.त्यावर तिची बोटे फिरवली आणि मध्येच तिला त्याची सुरवातीची वाक्ये वाचून मोठा धक्काच बसला.

क्रमशः

© विद्या कुंभार

चिन्मयीला धक्का का बसला असेल?

सदर कथेचे हक्क हे लेखिकेकडे आहेत त्यामुळे कॉपी करून इतर ठिकाणी पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.

"सदर कथेचे लिखाण सुरू आहे, पुढील भाग नियमितपणे ईरा फेसबुक पेजवर येतील त्यामुळे पेजला फॉलो करून ठेवा."

अष्टपैलू लेखक स्पर्धा २०२५
0

🎭 Series Post

View all