Login

दोन ध्रुवांवर दोघे आपण..

दोन ध्रुवांवर दोघे आपण

शीर्षक:- दोन ध्रुवांवर दोघे आपण
कवितेचा विषय:- दोन ध्रुवांवर दोघे आपण
राज्यस्तरीय कवितास्पर्धा

रात्र एकटी बंदीवान मी दिवस मोकळा उनाड तू
दोन ध्रुवांवर दोघे आपण अल्याड मी अन् पल्याड तू

तू पावसातला थेंब बिलोरा, मृद्गंधाची माया गं
धरणीसाठी धडपडणारी नीलांबराची छाया गं
क्षितिजावरल्या उदासीतला सवाल मी अन् जवाब तू
दोन ध्रुवांवर दोघे आपण अल्याड मी अन् पल्याड तू

मी असह्य रणरण ग्रिष्माची, तू बहर.. कोवळी हिरवाई
जगण्याची उसनी फरफट मी, तू नव्या ऋतूची नवलाई
ती सांज केशरी विरक्त मी, अन् दवात फुलती पहाट तू
दोन ध्रुवांवर दोघे आपण अल्याड मी अन् पल्याड तू

दुनियेमधल्या विश्वासाला खरे ठरवते सत्य तुझे
मरणाऱ्याला मरता मरता जगवुन जाते स्वप्न तुझे
दिवसरात्रीला जोडुन धरतो ऐसा संधिप्रकाश तू
दोन ध्रुवांवर दोघे आपण अल्याड मी अन् पल्याड तू

जगण्याची उत्कट इच्छा मी तू वात्सल्याचा आशीर्वाद
कळसावरला पक्षी मी, तू गाभाऱ्याचा अंतर्नाद
अतृप्ताची जमीन मी अन् आभाळाची पखाल तू
दोन ध्रुवांवर दोघे आपण अल्याड मी अन् पल्याड तू

या स्वप्नांना रोज मिळू दे ओंजळ श्यामल नयनांची
बळ वाढू दे पंखांचे अन् व्हावी पूर्ती वचनांची
किती संकटे असोत भवती माझ्या मागे पहाड तू
दोन ध्रुवांवर दोघे आपण अल्याड मी अन् पल्याड तू

© परेश पवार (शिव)
जिल्हा :- रायगड रत्नागिरी