दोन घडीचा डाव!
भाग -पाच.
रात्री तर ती स्वप्नात यायचीच. दिवसाढवळ्यादेखील उघड्या डोळ्यांनी तो तिच्याच स्वप्नात गुंतलेला असायचा. तिला कशाप्रकारे आपली करता येईल याच विचारात तो होता.
आणि एक दिवस त्याला ती संधी मिळाली. सुमनचा वाढदिवस. तिने तिच्या मित्र मैत्रिणींना आमंत्रित केले होते. अनायसे संधी चालून आली म्हणून श्रीधर खूष होता. आधीच इंग्लिश लिटरेचरचा विद्यार्थी, त्यामुळे शेक्स्पिअर, डिकीन्सन,ऑस्कर विल्ड..कोणाकोणाचा त्याच्यावर असलेला प्रभाव. त्याने आपल्या वळणदार अक्षरात तिच्यासाठी प्रेमपत्र लिहिले. आपल्या हृदयातील तिच्याबद्दलच्या भावना त्या पत्रात ओतप्रोत भरल्या होत्या. वाढदिवसाच्या शुभेच्छा देता देता हळूच त्याने ती चिठ्ठी तिच्या हातात सरकवली.
वाढदिवस साजरा झाला. जेवण उरकली आणि मग सुमन पुन्हा सर्वांसमोर आली. कार्यक्रमाला आल्याबद्दल तिला सगळ्यांचे आभार मानायचे होते.
"सर्वांचे खूप खूप आभार. तुमच्या येण्याने माझा आजचा दिवस खास झाला. तुमच्यासोबतच अजून एक व्यक्ती आहे, जिच्यामुळे हा क्षण आणखी खास झालाय. ती व्यक्ती माझ्या खूप जवळची आहे, प्रेमाची आहे."
तिने एक चोरटा कटाक्ष श्रीधरकडे टाकला तसा त्याच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. हृदयाची धडधड वाढली होती. इतक्या लवकर ती सर्वांसमोर हे बोलेल असे त्याला वाटले नव्हते.
"प्रेम.. किती सुंदर भावना असते नाही? ज्यावर आपण प्रेम करतो तोच जर आपला लाईफ पार्टनर बनत असेल तर? माझ्या बाबतीत तेच झालेय. मी ज्याच्यावर प्रेम करते त्यानेच आज मला मागणी घातली." सुमनच्या प्रत्येक वाक्यासरशी श्रीधर हवेत उडत होता. रघुने हलकेच त्याला कोपराने धक्का दिला तसा तो गोड हसला.
"हा रमेश, माझा बालपणीचा मित्र, माझा प्रियकर आणि आता माझा होणारा नवरा. नुकतेच त्याने त्याच्या बाबांची कपंनी जॉईन केलीय. आणि आता दिवाळीनंतर आम्ही लग्न करतोय." अचानक तिने तिथे असलेल्या एका तरुणाला समोर आणत सगळ्यांना धक्का दिला. तिचे आईबाबा आणि मग सर्वांनीच टाळ्यांच्या गजरात तिचे अभिनंदन केले.
आत्तापर्यंत हवेत असलेला श्रीधर एकदम जमिनीवर आपटला. रघुचा चेहरादेखील पडला. श्रीधर तिच्यावर किती जीव टाकतो ते त्याला माहित होते. तिथून निघताना सुमन मुद्दाम बाहेर आली.
"श्रीधर, लग्नासाठी नुसतं प्रेम किंवा सुंदर दिसणं हे एकमेव भांडवल नसतं अरे. त्याहून जास्त पैसा महत्त्वाचा असतो. रमेशजवळ ते आहे आणि म्हणून माझ्याजवळ तो आहे." तिने त्याच्या वर्मावर बोट ठेवले होते. तो काही न बोलता तिथून निघून गेला.
*****
"अरे, तिच्यासाठी का असा नाराज होतोस? कोणीतरी तुझ्यावर मनापासून प्रेम करणारी भेटेलच ना? सुमन कशी आहे ते आपल्याला कळले ना आता? तिला पैसेवाला मुलगा हवा होता म्हणून तिने रमेशशी नाते जोडलेय. माझ्या मित्राच्या आयुष्यात अशी मुलगी नकोच." रघू त्याला समजावत होता.
"रघू, आयुष्यात केवळ पैसाच महत्त्वाचा असतो का रे?" डोळ्यात पाणी आणून श्रीधर विचारत होता.
"जगण्यासाठी पैसा आवश्यक असतो मित्रा." त्याच्या खांद्यावर हात ठेवत रघू म्हणाला.
आज पुन्हा श्रीधरला कळून चुकले होते, पैसा आहे तर सारे काही आहे. हे प्रेम बीम बाकी सगळा दिखावा असतो. मनाशी काही तरी निश्चय करून त्याने डोळे पुसले.
आताशा त्याचे वागणे बदलू लागले होते. सुमनकडे तर तो बघतही नव्हता. डोक्यात असलेले शेक्स्पिअर अन डिकीन्सन कागदावर उतरू लागले होते. त्याच्या त्या भावनिक आणि रोमँटिक लिखाणावर कित्येक ललना भाळू लागल्या. आणि आता तोही त्यांच्यात इंटरेस्ट घेऊ लागला.
"श्रीधर,तुझे काय चालू आहे रे? एका वेळी इतक्या मुलींच्या नादाला कसा काय तू लागू शकतोस?" रघू जरा रागातच होता.
"तुला यातले नाही कळायचे. मी आता कुठे एंजॉय करतोय." श्रीधरच्या ओठावर एक वेगळेच हसू होते.
"याला एंजॉय करणे नाही, टाइमपास करणे म्हणतात मित्रा. सोड हे सगळं आणि अभ्यासाकडे लक्ष दे." रघुने पुन्हा त्याला समजावून सांगितले.
"रघू, तुझ्या आयुष्यात तुझ्यावर खरंखूर प्रेम करणारी प्रेयसी आहे म्हणून तू मला हे सांगतो आहेस. माझ्याकडे तशी कुणीच नाही रे आणि आता मला तशी मुलगी खरंच नको आहे. कॉलेज आहे तोवर इथे मस्त एंजॉय करणार नंतर एखादी पैसेवाली मुलगी बघून लग्न करणार."
"श्रीधर?" रघुच्या डोळ्यात आश्चर्य होते.
"गमंत केली रे. तू तर सिरीअस झालास." श्रीधर खळखळून हसला. "पैसेवाली मुलगी कोण मला देईल? आणि मुळात मी का कोणावर डिपेंड राहू ना? माझ्यात धमक आहे तेवढी. स्वतःच्या बळावर मी पुढे जाईन."
"मानलं मित्रा तुला. तू तर मला घाबरवलंच होतंस." रघू त्याला मिठी मारत म्हणाला. "पुढच्या आठवड्यात दिवाळीच्या सुट्ट्या सुरू होत आहेत. काही प्लॅन वगैरे केलेस की नाही?" रघू विषय बदलवत म्हणाला.
"कसली प्लॅनिंग? उलट घरी गेलो की आईचा दुःखी चेहरा आणि बहिणीची माझ्याकडे बघणारी आशावादी नजर दोन्ही मला खायला उठतात रे. त्यापेक्षा इथेच राहून अभ्यास करावा म्हणतो." श्रीधर खिन्नपणे म्हणाला.
"काय रे, सगळी मुलं आपापल्या घरी जातील नि तू इथे एकटा काय करणार? त्यापेक्षा माझ्या घरी चल. काहीदिवस माझ्याकडे थांब आणि मग तुझ्या गावी जा. काय म्हणतोस?"
"नको रे. असे सणाच्या दिवशी दुसऱ्यांच्या घरी जायला बरं वाटत नाही." त्याने नकारार्थी मान हलवत म्हटले.
'बस का मित्रा, असे बोलून लगेच परकं करून टाकलेस ना?" चेहरा पाडून रघू म्हणाला.
"सॉरी रे. मला तुला हर्ट करायचे नव्हते. आय जस्ट वॉन्ट टू से.."
"ए, शेक्स्पिअरच्या नातलगा, माझ्याशी इंग्लिशमध्ये नको बोलू हं. आणि माफी हवीच असेल तर तू माझ्या घरी येत असशील तरच माफ करणार. नाही तर मी बोलणार देखील नाही. कबूल? आणि आता असा टू बी ऑर नॉट टू बी च्या एक्सप्रेशन मध्ये माझ्याकडे बघू नकोस. तुझी बॅग पॅक करून ठेव." बाहेर जात रघू म्हणाला.
त्याच्या या आग्रहावर नाही म्हणायला श्रीधरला जमले नाही. आपले दोन जोडी कपडे एका छोट्याश्या पिशवीत त्याने कोंबले आणि मग पुस्तक घेऊन तो अभ्यासाला बसला.
******
"गुडमॉर्निंग आजोबा. बरीच सुधारणा झालीये. कदाचित उद्या तुम्हाला डिस्चार्ज होऊन जाईल." राऊंडवर आलेला डॉक्टर श्रीनय श्रीधरची फाईल बघून बोलत होता. त्याच्या बोलण्यावर श्रीधर काही न बोलता एकटक कुठेतरी बघत होता.
"काय झाले? आनंदी नाही आहात का?" त्याच्या त्या प्रतिक्रियेवर श्रीनय म्हणाला.
"याह, आय एम हॅपी." श्रीधर.
"गुड. असेच आनंदी राहा. उद्यापासून दिवाळीचा सण सुरू होतोय. तेव्हा तुम्हाला शुभेच्छा." त्याला शुभेच्छा देत श्रीनय दुसऱ्या पेशंटकडे वळला.
दिवाळीच्या शुभेच्छा कानावर पडल्या आणि श्रीधरच्या मनात कालवाकालव झाली.
"डॉक्टर, आर यू मॅरीड?" त्याने श्रीनयला हाक देत अनपेक्षित प्रश्न केला.
"हं?" श्रीनयच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटले होते.
"आय एम जस्ट आस्किंग." श्रीधर.
"हम्म. म्हणजे जुळलेय. मे बी उन्हाळ्यात करेन." त्यानेही हसत उत्तर दिले.
"वन ॲडव्हाईस.. प्लीज मॅरी अ गर्ल हू लव्ह्ज यू अँड नॉट युअर मनी." श्रीधरच्या डोळ्यात पाणी होते.
"आजोबा, ज्या मुलीशी माझे लग्न होतेय तीही डॉक्टर आहे आणि माझी बालपणीची मैत्रीण आहे." श्रीनय.
"छान. खूप शुभेच्छा तुम्हाला." श्रीधर म्हणाला तसा स्मित करून श्रीनय पुढे गेला.
"सर, तुम्हाला मी बोलले होते ना, म्हातारा सर्किट आहे ते. खरंच तसा आहे तो." सोबतची नर्स श्रीनयला म्हणाली तसे श्रीनयने नकारार्थी मान डोलावली.
"असे नका बोलू सिस्टर. बिचाऱ्याचा तसा काही अनुभव असेल."
"कसला अनुभव सर? कधी झोपेत चित्रा म्हणून ओरडतो, कधी सुमन तर कधी लिली. मला वाटते या चक्रम माणसाला सगळे चक्रम अनुभव आले असतील." ती खोचक हसली.
"चित्रा.." नाही म्हणायला श्रीधरच्या कानावर नर्सचा आवाज जाऊन आदळला. आणि चित्राच्या आठवणीत तो व्याकुळ झाला.
"चित्रा, तुझ्यासोबतची सगळी नाती तर तुटलीत गं. माझ्यामुळेच. तरी मन व्याकुळ झाले की तुझ्याचजवळ येऊन का थांबते?" तो परत स्वतःशी बडबडायला लागला. अस्वस्थ मन आणखी अस्वस्थ होऊ लागले.
:
क्रमश:
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
******
फोटो गुगल साभार.
कोण ही चित्रा? का झालाय श्रीधर असा अस्वस्थ? वाचा पुढील भागात.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा