Login

दोन नणंदा - भाग -2

घरातील बाई समजूतदार असली की घर स्वर्ग बनतो.
दुसऱ्या दिवशी सकाळी देवघरात घंटी वाजली. शिवानी नेहमीप्रमाणे पायघड्या घालून देवपूजा करत होती. स्वाती शांतपणे फुलं अर्पण करत होती. पण रंजना मात्र मोबाईल हातात घेऊनच आली.

रंजना (चिडचिड्या आवाजात):
“आई, तुम्ही ना... उठल्यावर लगेच पूजा लावता. मला उठायला जरी उशीर झाला तरी फोनवर सगळी ऑफिसची कामं चालू असतात. थोडं आधुनिक व्हा. इतकी कडक शिस्त नको!”

देवकीबाई शांतपणे म्हणाल्या,
“शिस्त म्हणजे बंधन नसतं ग, घराचं सौंदर्य असतं. पण तुला काम आहे तर तू तुझ्या खोलीतून कर. शिवानीवर टोमणे मारून काही साधणार नाही.”

शिवानीने काहीही बोललं नाही. पण स्वातीच्या चेहऱ्यावर दुःख स्पष्ट दिसत होतं.

त्या दिवशी दुपारी – जेवणाच्या टेबलावर

रंजना परत टोमणे मारत होती: “शिवानी, पातळ भाजी मला आवडत नाही. मी तुला कालच सांगितलं होतं. माझी आवड तुला कळतच नाही का?”

शिवानी हसत म्हणाली,
“ताई, भाजी आईसाठी बनवली म्हणून थोडी कमी तेलात केली.”

रंजना लगेच प्रत्युत्तर देत म्हणाली,
“म्हणजे माझ्या आवडीचं काहीच चालत नाही इथे?”

या वेळी अनिकेत बोलला. त्याने शांत पण ठाम आवाजात म्हणाले, “रंजना ताई, हे घर सगळ्यांचं आहे. पण इथे प्रत्येकाच्या सवयी जपल्या जातात. तुम्ही आलात म्हणजे घरातील शांती ढळायला नको. शिवानी जे करते ते सगळ्यांच्या मनात जागा करून करत असते.”

रंजना एक क्षण थबकली. तिच्या मनात थोडं दुखावलं गेलं. पहिल्यांदाच भावाने तिच्याशी असा स्वर लावला होता.

ती उठून खोलीत गेली.

रात्री स्वाती आणि रंजना दोघी छतावर बसल्या होत्या. चंद्रप्रकाश शांत होता पण वातावरण दडपलेलं.

स्वातीने हळूच विचारलं, “रंजना, तुला खरंच आनंदी वाटतो का इतकं बोलून? तुला असं वाटत नाही का की तू घरात माणसांपासून दूर जातेय?”

रंजनाने सुरुवातीला हसून टाळलं. पण नंतर तिचे डोळे ओलावले. “ताई… सगळं माझ्या मनासारखं हवं असं नाही. पण जेव्हा आई माझ्याकडे कमी बघते, भाऊ शिवानीच्या बाजूने बोलतो… तेव्हा मला वाटतं, मी कुणाचीच राहिले नाही. मला तुमचं प्रेम हवं असतं, लक्ष हवं असतं… आणि कदाचित म्हणून मी बोलते, टोचते…”

स्वातीने तिचा हात हातात घेतला. “अगं रंजना, प्रेम मागून घेत नाहीत, ते देऊन मिळवत असतात. तू शिवानीशी प्रेमाने बोलणं सुरू कर. बघ, ती तिचं सगळं जग तुझ्यासमोर उघडेल.”

रंजनाच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच एक वेदनादायक शांतता उमटली.


शिवानी देवघरात होती. रंजना दाराशी थांबली. क्षणभर ती उभी राहून शिवानीकडे पाहत राहिली. शिवानी वळून म्हणाली, “या ताई… पूजा संपली. तुम्हाला प्रसाद देते.”

रंजनाने हळू आवाजात विचारलं,
“शिवानी, मी काल जरा जास्त बोलले का?”

शिवानीनं आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. ती काही बोलणार इतक्यात रंजनाने पुढे येत तिचा हात धरला.

“मला हे घर माझं वाटावं असं वाटतं. पण मीच सगळ्यांना दूर लोटते. मला शिकायचं आहे… स्वाती ताईसारखं समजूतदार व्हायचं आहे. तू मला शिकवशील का?”

शिवानीच्या डोळ्यात हलकं पाणी आलं. ती मृदू आवाजात म्हणाली, “ताई… मी काही शिकवणार नाही. आपण दोघी मिळून घर सांभाळू. तुम्ही मोठ्या आहात, मी तुमच्याकडून शिकते आणि तुम्ही मला मैत्रिणीसारखं स्वीकारा.”

त्या क्षणी देवघरातलं तेज जणू दोघींच्या मनात उतरलं.

या प्रसंगाने घरात नवा अध्याय सुरू झाला —

रंजना हळूहळू बदलू लागली. ती स्वयंपाकघरात शिवानीसोबत मदत करू लागली. देवकीबाईंच्या औषधांची काळजी घेऊ लागली. स्वातीने कौतुकाने म्हटलं,
“हेच तर खरं नात्याचं सौंदर्य आहे — जेथे अहंकार विरघळतो आणि प्रेम उगवते.”
0

🎭 Series Post

View all