Login

दोन नणंदा -भाग -3(अंतिम )

घरातील बाई समजूतदार असली की घर स्वर्ग बनतो.
दिवस पुढे सरकत होते. रंजनाच्या मनातील बदल आता फक्त तिच्या शब्दांत नव्हे, तर कृतीतून दिसू लागला होता. तिच्या चालण्यात आता मृदुता होती, बोलण्यात करुणा होती आणि नजरेत आपलेपणाचं तेज दिसू लागला.

देवघरात पुन्हा घंटी वाजत होती. शिवानी शांत मनाने आरती करत होती, आणि रंजना यावेळी हात जोडून, डोळे मिटून तिच्या बाजूला उभी होती. तिच्या भावनांचा ओलसर किनारा तिला स्वतःलाच जाणवत होता.

आरती संपली. शिवानी प्रसाद वाटत होती. तेवढ्यात रंजनाने शिवानीचा हात धरला आणि म्हणाली—

रंजना (भावनांनी दाटून):
“शिवानी, तू फक्त या घराची वहिनी नाहीस… तू या घरात देवाजवळची जागा घेतेस. कारण तुझ्यात प्रेम आहे, संयम आहे, आणि प्रत्येक नातं जोडण्याची शक्ती आहे. मला आज कळलं — पदरी पडलं तेच पवित्र झालं म्हणजे नशीबाने जे दिलं, ते स्वीकारलं तर आयुष्य सुंदर होतं.”

शिवानीचे डोळेही भरून आले. तिनं रंजनाचा हात डोक्यावर ठेवला आणि ममतेने म्हणाली—
“ताई, तुम्ही बदललात म्हणून मी नाही जिंकले… आपण दोघी जिंकलो. कारण आपल्या नात्यानं अहंकार हरवला आणि प्रेम जिंकलं.”


त्या दिवसापासून घरात एक अमूल्य शांतता पसरली. रंजना हलकेच शिवानीसोबत स्वयंपाकात रमू लागली. ती आईच्या औषधांची वेळेवर काळजी घेई, स्वातीच्या कामात मदत करे, आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे — प्रत्येक गोष्टीत “माझं”ऐवजी “आपलं” हा भाव दिसू लागला.

देवकीबाईंनी कौतुकाने म्हणालं—
"घर श्रीमंत भिंतींमुळे सजत नाही… तर समजूतदार मनांनी फुलतं.”



रंजनाची ऑफिस सुट्टी संपली. गाडीत बसवण्यासाठी सगळे दारात उभे होते. सामान ठेवला गेला होता, पण रंजनाच्या मनात जणू अनेक वर्षांचा गाठोडा खाली पडला होता.

तिने सगळ्यांकडे प्रेमाने पाहिलं आणि सर्वात शेवटी शिवानीसमोर उभी राहिली.

ती काही बोलू शकेल इतक्यात तिचे डोळे भरले. ती पुढे झाली आणि शिवानीला घट्ट मिठी मारत रडू लागली.

रंजना (रडत-रडत म्हणाली):
“शिवानी… मला नेहमी वाटायचं तू माझ्याकडून माझं काहीतरी घेत आहेस… पण खरं तर तू मला माझ्यापासून हरवलेलं प्रेम परत देत होतीस. आज मी जात आहे… पण ही सुट्टी संपत नाहीये, एका नव्या नात्याची सुरुवात होत आहे.”

शिवानीने तिच्या पाठीवर हलकेच हात फिरवत सांगितले—
“ताई, तुम्ही आता पाहुण्या म्हणून नाही जात… घराच्या जीवाचा आणि बहिणीचा सन्मान घेऊन जात आहात. आणि लक्षात ठेवा, हे घर तुमच्याविना अपूर्ण आहे.”


गाडी निघायला लागली. शिवानीने आरती दाखवली. रंजनाच्या डोळ्यांतून आसवे गालावर ओघळली… पण त्यात दुःख नव्हतं, होतं प्रेमाचं समाधान.


देवकीबाईंच्या डोळ्यांत अश्रू चमकले. त्यांनी मनोमन देवाला प्रार्थना केली—

"हे देवा, जर प्रत्येक घरात अशी समजूतदार वहिनी आणि अशी बदल घडवून आणणारी जाणीव झाली तर,
मग प्रत्येक संसार मंदिर बनेल आणि प्रत्येक स्त्री देवी बनेल.”




नातं जेव्हा स्वीकारलं जातं, तेव्हा ते पवित्र होतं.

जेव्हा मन अहंकारातून प्रेमाकडे वळतं, तेव्हा घर स्वर्ग बनतं.

शिवानी आणि रंजनाने दाखवलं की नात्यांमध्ये ‘जिंकणं’ म्हणजे कुणी हरवणं नाही… तर दोघींनी एकत्र प्रेम जिंकणं आहे.




"जिथे अहंकार नसतो, तिथं प्रेम आपोआप फुलतं.”
0

🎭 Series Post

View all