Login

दोन शब्द आपुलकीचे

शब्दांची किंमत

‘अरे सिद्धार्थ जरा माझी औषधं आणायची आहेत. तर आज येताना आणशील का?’, वंदनाताईंनी सिद्धार्थला विचारलं.

‘ अगं तू सीमाला सांग ना ती ऑफिसमधून येताना आणेल. मला आज बँकेमध्ये खूप काम आहेत. आणि मला यायला उशीरसुद्धा होईल.’, सिद्धार्थ म्हणाला.

‘ अरे, तुझ्याकडे गाडी आहे ना? तुला मेडिकल मध्ये जाऊन घेऊन यायला सोपं पडेल. सीमा बसने येते तिला तेवढ्यासाठी मेडिकलमध्ये जायला लागेल. आणि तिची एकदा बस चुकली की तिला लवकर बस मिळत नाही. अरे आणि ती बिचारी काय काय बघणार? ऑफिसला जाताना सगळ घरचं करून जाते. मला आजारपणामुळे घरात लक्ष देता येत नाही. तू जरा मदत करत जा बाळा तिला. ती बोलत नसली तर प्रत्येक माणसाला मदतीची गरज असते.’ वंदनाताई एवढं बोलत होत्या पण सिद्धार्थचं लक्ष नव्हतं. तो त्यांना मध्येच थांबवत म्हणाला, ‘ हे बघ मला काम आहे मी आणणार नाही. सीमाला सांगतो ती आणेल. मला ह्याच्यापेक्षा खूप महत्वाची काम आहेत. असली फालतू कामं मला सांगू नका.’ आणि सीमाला हाक मारून म्हणाला , ‘ सीमा, येताना आईची औषधं आण. जरा लक्ष दे घरात. असल्या गोष्टींकडे मला लक्ष द्यायला लावू नका. चला मी ऑफिसला चाललोय माझा डबा कुठे आहे. तयार आहे का? की आज कॅन्टीन मध्येच जेवायचय.’ सीमा शांतपणे आली आणि त्याच्या हातात डबा दिला. आणि ती शांतपणे वंदनाताईंना म्हणाली, ‘ आई, मी आणते औषधं.’ सिद्धार्थ डबा घेऊन बँकेत गेला. तो गेल्यानंतर सीमा ऑफिसला जायला निघाली. जाताना ती वंदनाताईंना म्हणाली, ‘ काळजी करू नका आई. मी बोलते त्याच्याशी. तुम्ही वाईट वाटून घेऊ नका बँकेत हल्ली खूप काम वाढलंय न त्यामुळे त्याच घरात लक्ष नाहीये आणि असा तोडून बोलतो जरा. चला मी येते हा वेळेवर जेवून घ्या आणि औषधं पण घ्या.’ वंदनाताईंना सीमाच खूप कौतुक वाटलं. त्यांच्या मनात विचार चालू झाले की सिद्धार्थला बँकेत बढती मिळाल्यापासून त्याच्या वागण्यात आणि बोलण्यात ताठरपणा आला आहे. हे वागणं त्याने वेळीच थांबवलं पाहिजे कारण ह्या अशा तोडून बोलण्यामुळे आपलीच माणसे आपल्यापासून दूर जातात. सीमा घरात सगळी काम अगदी आनंदाने करते. पण तिलाही मन आहे ह्याचा विचार सिद्धार्थने करायला हवा. आणि आपण त्याला हे समजवायला हवे असं वंदनाताईनी मनात ठरवलं. सिद्धार्थ बँकेत खूप चांगल्या पोस्टवर होता. आणि त्याचं काम चांगलं असल्यामुळे त्याच्याबद्दल बँकेत आदर होता. परंतु ह्यामुळेच त्याला ‘ग’ ची बाधा होऊ लागली होती. खरंतर जेवढे सिद्धार्थचे कष्ट महत्वाचे होते तेवढाच घरच्यांचा त्याला वेळोवेळी मिळालेल्या पाठिंबाही महत्वाचा होता. पण आपल्याला बँकेमध्ये मिळणाऱ्या आदरामुळे आणि कौतुकामुळे त्याला आपणच खूप ग्रेट आहोत असं वाटायला लागलं होतं.
आज बँकेत पोहचल्यावर सिद्धार्थजवळ एक आजोबा आले आणि म्हणाले, ‘ अरे सिद्धार्थ, ओळखलस का मला?’ सिद्धार्थ म्हणाला, ‘ अरे बेलसरे आजोबा. तुम्हाला कसं विसरेन मी? कसे आहात तुम्ही?’ बेलसरे आजोबा म्हणाले, ‘ मी छान आहे. अरे जरा २ ३ दिवस झाले एक कामासाठी येत होतो. आज होईल काम बहुतेक.’ सिद्धार्थ त्यांच्याकडे बघून हसला आणि म्हणाला, ‘ काम नक्की होईल आजोबा नका काळजी करू. चला येतो जरा काम आहे.’ सिद्धार्थ त्याच्या कामाला लागला. थोड्यावेळाने त्याच काम जरा कमी झाल्यावर त्याने समोर बघितले तर त्याला बेलसरे आजोबा समोर बसलेले दिसले आणि त्यांच्या चेहऱ्यावर जरा चिंता दिसली. सिद्धार्थने शिपाई काकांना हाक मारून बेलसरे आजोबांना आपल्या केबिनमध्ये बोलावून घेतले. आणि विचारले , ‘ काय झालं आजोबा? काय काम होत तुमचं?’ बेलसरे आजोबा म्हणाले, ‘ बाळा, मला आज जरा पैसे काढायचे होते. पण नेमका माझा चष्मा मी घरी विसरलोय त्यामुळे मला स्लिप भरता येत नाही. ही स्लिप भरून देशील का?’. सिद्धार्थने आजोबांना समोर बसवून घेतलं आणि प्यायला पाणी दिलं. आणि ती स्लिप भरली आणि शिपाई काकांना बोलावलं. ती स्लिप त्यांच्याकडे दिली आणि सांगितलं, ‘ ही स्लिप कॅशियरकडे नेऊन द्या.आणि आजोबांना पैसे सुद्धा आणून द्या.’ त्या शिपायाने बेलसरे आजोबांना पैसे आणून दिले. ते बघून आजोबांना खूप छान वाटलं. त्यांचे डोळे भरून आले. त्यांनी सिद्धार्थचे आभार मानले. सिद्धार्थने आजोबांना विचारले, ‘ आजोबा सकाळी म्हणालात २ ३ दिवस येत आहात. ते काम झालं का?’ बेलसरे आजोबा सिद्धार्थला म्हणाले, ‘ अरे माझ्या मुलाने काही दिवसांपूर्वी बँकेत लोन मिळण्यासाठी अर्ज केला होता. त्याचा मध्ये फोन आला होता त्याला यायला वेळ मिळत नाहीये त्यामुळे मी चौकशी करायला आलो तर साहेबांनी मला आज हा पेपर दिला. पण ह्यावर काय लिहिले आहे ते मला वाचता येत नाहीये. आता घरी गेलो की वाचतो तो पेपर.’ सिद्धार्थने तो कागद बेलसरे आजोबांकडे मागितला. आणि तो कागद वाचल्यावर तो आजोबांना म्हणाला, ‘ आजोबा काळजी नका करू. ह्यावर एक दोन ठिकाणी तुमच्या मुलाच्या सह्या हव्यात. हा एक फॉर्म आहे. मी फॉर्म भरतो तुम्ही फक्त तुमच्या मुलाला सह्या करायला सांगा. आणि हा फॉर्म बँकेत आणून द्या.’ सिद्धार्थचे ते शब्द आजोबांना आधार देऊन गेले. सिद्धार्थने आजोबांना फॉर्म भरून दिला. आणि त्यांचे खूप महत्वाचे काम सिद्धार्थमुळे झाले त्यामुळे जाताना त्यांनी सिद्धार्थचे खूप आभार मानले. सिद्धार्थला पुन्हा आपण ग्रेट असल्यासारखे वाटले आणि तो त्या आनंदात पुन्हा कामाला लागला.
संध्याकाळी घरी निघताना बँकेच्या बाहेर सिद्धार्थला पुन्हा बेलसरे आजोबा दिसले. सिद्धार्थ आजोबांकडे गेला आणि म्हणाला, ‘ काय झालं आजोबा अजून काही काम होत का?’ आजोबांना सिद्धार्थला बघून आनंद झाला ते म्हणाले, ‘ नाही रे बाळा, काम काही नव्हतं. तुझ्याशीच बोलायचं होतं. आज सकाळी माझं खूप महत्वाच काम तू केलंस. पण त्याहीपेक्षा मला तुझं कौतुक वाटलं म्हणजे तू जे ‘काळजी करू नका हो आजोबा’ म्हणालास ना म्हणून. हल्ली मुलांना वेळ नसतो रे असं म्हणायला. माझा मुलगा बाहेर गावी असतो. त्याला वेळ नसतो. मध्ये एकदा ह्याच त्याच्या लोनच्या कामासाठी येऊन परत गेला. साधी माझी चौकशीही कराविशी त्याला वाटली नाही. बाहेर गावीच कामाला असल्यामुळे कधीतरी फोन येतो त्यातसुद्धा बराचसा वेळ त्याचं बाजूला कामच चालू असत त्याच मध्येच तब्येत विचारतो पण लक्ष सगळ कामात असत. आत्ता त्याच काम होतं म्हणून तेवढं सांगायला फोन आला पण कधी चौकशीने विचारपूस नाही. आता ह्या वयात फक्त मुलांचा आधार हवा असतो. मुलांचा थोडावेळ हवा असतो. त्याच फक्त एक वाक्य ऐकायचं असतं ‘ बाबा काळजी करू नका मी आहे.’ बाकी काही नको असतं. आणि खरं सांगू का अगदी ह्या वयातच नाही पण एकंदरीतच कोणत्याही वयाच्या माणसासाठी थोडे आधाराचे शब्द हवे असतात. चला माफ कर हा खूपच वेळ घेतला तुझा. आणि पुन्हा एकदा धन्यवाद. आणि एक नक्की सांगेन की हे समोरच्याची काळजी करणं कधीही सोडू नकोस हो. चल येतो.’
सिद्धार्थला अचानक त्याचं आईबरोबरचं सकाळचं बोलणं आठवलं आणि त्याला स्वतःचा राग आला. त्याला वाटलं की हे बेलसरे आजोबांचं मी काम करून दिलं त्यामुळे त्यांना खूप आनंद झाला. पण सगळ्यात जास्त आधार त्यांना माझ्या नीट बोलण्यामुळे मिळाला. जर आपण सकाळी आईशी असंच नीट बोललो असतो तर आईला बरं वाटले असते. आजपासून घरातसुद्धा नीट बोलायचं अस ठरवून तो घरी आला. घरी आला तोवर सीमा ऑफिसवरून आली होती. ती चहा पित होती. सिद्धार्थ आल्यावर तिने त्याला चहा दिला. आणि म्हणाली , ‘ जरा बोलायचं होतं. बोलू का?’ त्याला सीमाच्या बोलण्यात तुटकपणा जाणवला. त्यामुळे जास्त काही न बोलता त्याने होकारार्थी मान हलवली. सीमा म्हणाली, ‘ हे बघ, आईंशी बोलताना जरा त्यांच्या मनाचाही विचार केलास तर बरं होईल. मला आता तुझ्या अशा बोलण्याची सवय आहे. परंतु त्यांना असं वाटत की तू नीट बोलावस त्या तुझ्याशी बोलण्याची वाट बघत असतात. तुला वेळ नसतो दिवसभर पण थोडा वेळ काढून संध्याकाळी तरी बोलत जा त्यांच्याशी. बाकी तू हुशार आहेसच तुला सगळ कळतं.’ सिद्धार्थला आपली चूक त्या आजोबांच्या बोलण्यामुळे लक्षात आलीच होती. पण सीमाच्या बोलण्यातून त्याला हेसुद्धा कळले की आपल्या अशा तुटक बोलण्यामुळे आपली बायकोसुद्धा खूप दुखावली आहे. त्याने सीमाचा हात हातात घेतला. आणि तिची माफी मागितली आणि आज बँकेत घडलेला प्रसंग तिला सांगितला आणि म्हणाला, ‘ सीमा खरच सॉरी. मी तुम्हाला खूप गृहीत धरलं. आणि स्वतः मी मात्र तुमच्या विचार न करता बोलत आलो पण आजपासून माझी ही चूक मी नक्की सुधारण्याचा प्रयत्न करेन.’ सीमाला हे ऐकून बरं वाटलं आणि तिने हसून त्याच्या हातावर हात ठेवला. तेवढ्यात बेल वाजली. वंदनाताई देवळातून आल्या होत्या. आल्यावर लगेच सीमाने त्यांना चहा दिला. आणि त्यांची औषध त्यांना दिली. सीमा आत रात्रीच्या जेवणाची तयारी करायला गेली.
सिद्धार्थ वंदनाताईंना म्हणाला, ‘ आई आजचा वेळ मी तुझ्यासाठी काढलेला आहे. आपण मस्तपैकी तासभर गप्पा मारुया.’ बऱ्याच दिवसांनी आपल्या मुलाने आपल्यासाठी वेळ काढलाय हे बघून वंदनाताईंना खूप आनंद वाटला. त्यांनी सुद्धा सिद्धार्थबरोबर खूप गप्पा मारल्या. सीमाला सिद्धार्थ मधला हा बदल बघून खूप छान वाटलं. आणि जेवणाची सगळी तयारी करून सीमासुद्धा त्या दोघांच्या गप्पांमध्ये सामील झाली.




0