चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५
लघुकथा
दोन शब्द प्रेमाचे
सकाळची कामं उरकल्यावर मंजिरी निवांत वर्तमानपत्र चाळत बसली होती इतक्यात दारावरची बेल वाजली म्हणून तिने दार उघडले. दारात सरिताला, तिच्या जिवलग मैत्रिणीला पाहून तिला आश्चर्याचा धक्का बसला.
"सरू तू अशी अचानक कशी आलीस? औरंगाबादला उन्हाळा वाढला की कायं?"
"मंजू मुद्दाम तुला भेटायला आले आहे. तुला औरंगाबादला यायला वेळ मिळत नाही म्हणून म्हटलं आपणच जावं."
जेवण झाल्यावर दोघी गप्पा मारत बसल्या तेव्हा सरिताच्या लक्षात आलं की मंजू नेहमीसारखी बोलत नाही. हातचं काहीतरी राखून बोलते. नक्कीच हिचं काहीतरी बिनसलं असणार. दोघी अगदी कॉलेज जीवनापासूनच्या मैत्रिणी. धम्माल मस्ती, एकमेकींची सुखदुःख सगळं एकत्र शेअर केलेलं. तिला बोलतं करण्यासाठी सरिता म्हणाली,
"मंजू तुला आठवतं का गं आपण कॉलेजमध्ये असताना चौघी जणी लेक्चर बंक करून पावसाळ्याच्या दिवसात मरीन ड्राईव्हला लाटांचे तुषार अंगावर झेलत बरसणाऱ्या आभाळाखाली छत्री न उघडता फिरत रहायचो. तिकडच्या भन्नाट वाऱ्यापुढे छत्री उघडायची कोणाची बिशाद!मला वाटतं बहुतेक मुंबईकराने हा अनुभव घेतला असावा. त्यावेळी भिजायला किती मजा यायची ना." एरवीची मंजू असती तर ती उत्साहाने बरेच काही बोलली असती पण आता ती फक्त, "हो ना गं" एवढेच बोलली.
योगायोगाने दोघी एकाच ऑफिसमध्ये कार्यरत होत्या. ऑफिसमध्ये कोणत्याही कार्यक्रमात दोघींचाही पुढाकार असायचा. दोघींना साधारणतः मागेपुढे मुलं झाली. मंजूचा निखिल आणि सरूचा आनंद या दोघांमध्ये पण छान मैत्री होती. ऑफिसमध्ये पूजा असली की दोघी मुलांना ऑफिसमध्ये न्यायच्या. सात-आठ वर्षांपूर्वीच सरिता आणि तिचे कुटुंब औरंगाबादला स्थलांतरित झाले होते. सरिताचा मुलगा आनंद डॉक्टर झाला आणि त्याने तिथल्या हॉस्पिटलमध्ये नोकरी स्वीकारली होती. मंजूचा निखिल इंजिनियर झाला होता. सरिता औरंगाबादला गेली तर तरीही दोघींची मैत्री तसूभरही कमी झाली नव्हती. सरू मंजुला जुन्या आठवणींमध्ये रमवण्याचा प्रयत्न करत होती.
संध्याकाळी सगळे घरी परतण्याची वेळ झाली तेव्हा मंजू सरिताला म्हणाली,
"चल आता मी आपल्या सर्वांसाठी सुंदर जेवण बनवते."
"अग थांब ना आता तुझी सून मीनाक्षी येईलच ना आपण तिघी मिळून बनवूया काहीतरी."
"नको गं ती दमून येते. मी बनवते ना."
"बरं चल मी पण येते तुझ्याबरोबर किचनमध्ये."
किचनमध्ये आल्यावर मंजू शांतपणे काम करत होती. सरू सर्व निरीक्षण करत होती. तिने पाहिलं की किचनमध्ये समोरच्या ओट्यावर अजून एक पोळपाट लाटणं आणि इतर आधुनिक पद्धतीची भांडी होती. तिने मंजुला विचारलं,
"काय गं ही भांडी अशी वेगळी का ठेवली आहेत? ही अशी आधुनिक पद्धतीची भांडी तू कधीपासून वापरायला लागलीस!"
"नाही गं इथे ट्रॉलीमध्ये जागा नाही ना म्हणून तिथे ठेवली आहेत."
सरूला मंजूचा आवाज रडवेला वाटला. तिने मंजूचा चेहरा स्वतःकडे वळवला तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी दिसलं. सरूने गॅस बंद केला आणि तिला बाहेर सोफ्यावर बसवले. तिला थोडं पाणी प्यायला दिलं. सरुच्या गळ्यात पडून मंजू रडायलाच लागली. सरुने तिला शांत केलं आणि म्हणाली,
"मंजू आपण दोघी एवढ्या जिवलग मैत्रिणी आहोत तुझ्या मनात काय चालतंय ते मोकळेपणाने सांग. मनात ठेवून अशी कुढू नकोस. मला सर्व सांग."
"सरु तुला काय सांगू. आमच्या चौघांच्या घरात दोन वेगवेगळे स्वयंपाक होतात. माझा आणि महेशचा मी करते आणि निखिल आणि मीनाक्षीचा ती आल्यावर करते. ती त्यांच्यासाठी काहीतरी पास्ता, नूडल्स असं बनवते नाहीतर काहीतरी बाहेरूनच ऑर्डर करतात."
"अगं पण असं का? काहीतरी कारण असेलच ना. तुझं आणि मीनाक्षीचं पटत नाही का!"
"अगं निखिलचे लग्न झाल्यावर सुरुवातीला ती उशिरा उठायची. मी पण तिला काहीच सांगायचे नाही. नंतर ती मला गृहीतच धरायला लागली. दोन्ही वेळचा स्वयंपाक, सगळी कामं मीच करू लागले."
"ती तुला काहीच मदत करायची नाही का!"
"नाही ना. मी काहीच बोलत नाही हे पाहून एकदा महेशच निखिलला म्हणाला,
"अरे मीनाक्षीला थोडं लवकर उठून आईला थोडीफार मदत करायला सांग ना." त्यावर मीनाक्षीने स्पष्ट सांगितलं की मला हे असं दोन्ही वेळेला भाजी पोळी, वरण भात अजिबात आवडत नाही आणि असे जुन्या पद्धतीच्या भांड्यांमध्ये मी स्वयंपाक पण करणार नाही. आईना त्रास होत असेल तर मी माझे आणि निखिलचं वेगळं जेवण करेन. त्यानंतर तिने वेगळी भांडी आणली आणि ती दोघांसाठी रोज स्वयंपाक करू लागली. स्वयंपाक म्हणजे दोन्ही वेळेला असं फास्ट फूड."
"निखिल साठी आई-बाबा म्हणजे जीव की प्राण तो सुद्धा काहीच बोलत नाही."
"त्याचं काहीच चालत नाही गं. मीनाक्षीने त्याला तिच्या मुठीत ठेवले आहे."
"मी निखिलशी बोलून बघू का."
"नाही नको गं. उगाच त्याला वाटेल मीच तुला काहीतरी सांगितलं. बरं ते जाऊ दे. आनंद आणि मीरा दोघे कसे आहेत. तुमच्या घरी सगळं व्यवस्थित आहे ना."
"दोघेही आमच्याशी खूप छान वागतात. मला एक कल्पना सुचली आहे. मी निखिल आणि मीनाक्षीला दोन दिवस आमच्या घरी बोलावते. त्याला सांगते की आनंदने तुला अगदी आग्रहाने बोलावलं आहे. तिथे आल्यावर हे दोघं आनंद आणि मीरा आमच्याशी कसे वागतात हे बघतील आणि मी त्याला काही समजावता आलं तर बघते."
"आता ते दोघं आल्यावर सांगून तरी बघ ते काय म्हणतात."
संध्याकाळी निखिल आणि मीनाक्षी आल्यावर निखिलला सरु मावशी आल्याचा खूप आनंद झाला. ती त्याचे खूपच लाड करायची. मावशी घरी आहे म्हणून निखिलने पटकन मीनाक्षीला मेसेज करून सांगितलं आज वेगळा स्वयंपाक करू नकोस. तिला उगाच काही कळायला नको. दोघेही फ्रेश झाल्यावर मंजूने सगळ्यांसाठी ताटे घेतली. मीनाक्षी पण मदतीला आली. सहा सात महिन्यांनी चौघं एकत्र जेवायला बसत होते. मंजुला खूपच आनंद झाला होता. जेवणानंतर सरिताने निखिल आणि मीनाक्षीला आग्रहाचे आमंत्रण दिलं. तुम्ही आला नाहीत तर मी पण येणार नाही असं सांगितलं.
सरू मावशीने आमंत्रण दिल्यामुळे दोघेही औरंगाबादला गेले त्यानिमित्ताने त्यांनाही चार दिवस औरंगाबाद फिरता येईल हा त्यांचा हेतू. आनंद आणि मीरा दोघेही सर्जन होते. दोघेही एमबीबीएसला एकाच कॉलेजमध्ये होते आणि त्यांचं प्रेम जमलं. शिक्षण पूर्ण झाल्यावर दोघही एकाच हॉस्पिटलला जॉईन झाले होते. सरिताचा सुंदर बंगला होता. घरात नोकर चाकर होते. रोज सकाळी नऊ वाजता आनंद आणि मीरा हॉस्पिटलला जायला निघायचे. त्याआधी मीरा सगळ्यांसाठी ब्रेकफास्ट करायची. आई आणि बाबांना दोघांना डायनिंग टेबलवर बसवून ती आणि आनंद दोघं मिळून त्यांना ब्रेकफास्ट द्यायचे. सगळे मिळून हसत खेळत एकत्र ब्रेकफास्ट करायचे. त्यानंतर ते हॉस्पिटलला जायचे. हॉस्पिटल मधून आल्यावर पण जेवण तयार झालेलं असलं तरी मीरा स्वयंपाक घरात येऊन सरिताला, "आई मी काही मदत करू का" असं नेहमी विचारायची. रात्री जेवण झाल्यावर चौघं थोडा वेळ एकत्र बसून गप्पा मारायचे आणि नंतर झोपायला जायचे.
निखिल आणि मीनाक्षीला हे सगळं बघून आश्चर्य वाटत होतं. दोघेही एवढे डॉक्टर आहेत. त्यांना हॉस्पिटलमध्ये सर्जरी आणि दिवसभर पेशंट्सना तपासून किती ताण येत असेल. तरीपण हे सगळे किती आनंदाने एकत्र राहत आहेत. रात्री जेवण झाल्यावर सगळे झोपायला गेल्यावर सरू मावशीने निखिल आणि मीनाक्षीला थोडा वेळ थांबायला सांगितलं. मीनाक्षी ने सरु मावशीला विचारलं,
"मीरा आम्ही आलो आहोत म्हणून तुला मदत करत होती की नेहमीच ती अशी मदत करते?"
"नेहमीच ती मला मदत करते आणि माझ्याशी खूपच प्रेमाने वागते. मला तुम्हाला दोघांना तेच सांगायचं आहे. निखिल तुला मी अगदी लहान असल्यापासून पाहते आहे. आईचं मन तू किती जपतोस ते मला माहिती आहे. माझ्यासारखी मंजू सुद्धा आता साठी जवळ आली आहे. आम्हाला आपल्या मुलांसाठी खूप काही करावसं वाटतं. पण वयोमानामुळे सगळ्या गोष्टी साध्य होत नाहीत. या वयात मन जास्त हळवं झालेलं असतं. अशावेळी कोणी थोडा मदतीचा हात पुढे केला तरी खूप छान वाटतं. प्रेमाचे दोन शब्द खूप हवेहवेसे वाटतात." दोघांनी सरु मावशीला एकदमच विचारलं,
"मावशी हे असं आज तू आम्हाला का सांगत आहेस."
"निखिल आणि मीनाक्षी मला कळलं आहे की तुमच्या घरात दोन स्वयंपाक होतात. मीनाक्षी तुला रोज भाजी पोळी, वरण भात आवडत नाही ठीक आहे. कधीतरी तू तुझ्या आवडीचा स्वयंपाक करत जा आणि तुम्ही सगळे तो स्वयंपाक जेवा. कधीतरी आपल्या माणसांसाठी आपल्याला न आवडलेल्या गोष्टीही कराव्या लागतात. सकाळी मंजुला जमेल तशी मदत करत जा. संध्याकाळी तू फक्त किचनमध्ये तिच्याबरोबर गेलीस तरी तुझा वावर तीला खूप दिलासा देऊन जाईल. मला खात्री आहे ती पूर्ण भार तुझ्यावर कधीच टाकणार नाही."
"मावशी तुझं खरं आहे. मीरा एवढी सर्जन असून सुद्धा ती तुझ्याबरोबर किचनमध्ये असते. मी खूपच चुकीचे वागत होते. मला वाटायचं मी दिवसभर दमते. आई घरीच असतात तर त्यांना घरातली सर्व कामं करायला काय हरकत आहे. मी आईना कधी समजूनच घेतलं नाही. आता मी माझ्या वागण्यात नक्कीच बदल करेन."
"कसं असतं ना एखाद्याने नुसता उपदेश करून कधी कधी काही साध्य होत नाही. पण प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी पाहिलं की वागणुकीत आणि विचारांत नक्की सुधारणा होते."
दोन दिवस झाल्यावर निखिल आणि मीनाक्षी घरी जायला निघाले तेव्हा आनंद आणि मीराने त्यांना खूप छान भेटवस्तू दिल्या. निखिलने त्यांना मुंबईला येण्याचं आमंत्रण दिलं. दोघं घरी परतले. मंजूने दार उघडल्याबरोबर मीनाक्षीने तिला मिठीच मारली.
"आई मी इतके दिवस तुमचं मन दुखावलं आहे. मी माझ्यात धुंदीत वावरत होते. तुमच्या भावना समजून घेण्यात मी कमी पडले. मला माफ करा."
"अगं वेडी आहेस का! प्रत्येक व्यक्तीकडून काही ना काही चूक होतच असते. आता मी पण तुझ्या हातचे आधुनिक पदार्थ खायची सवय करेनच. मला पण तू ते पदार्थ कसे करायचे ते शिकव."
"तुम्ही मला आपले सगळे पारंपरिक पदार्थ शिकवा."
निखिल आणि सतीश दोघेही ह्या परिवर्तन झालेल्या जोडीकडे अनिमिष नेत्रांनी पाहत गालातल्या गालात हसत होते.
©️®️सीमा गंगाधरे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा