Login

दोनाचे तीन भाग १

दोनाचे तीन भाग १
भक्तीताई बऱ्याच वेळा पासुन बाल्कनीत उभ्या होत्या. एक नजर दरवाज्यावर तर एक नजर रस्त्यावर होती. रात्रीचे नऊ वाजले होते. पण अर्णवी घरी आली नव्हती. सक्षम हॉल मध्ये बसून न्यूज बघण्यात रमला होता. संकेतराव तर नेहमी प्रमाणे पुस्तक वाचत बसले होते. रिटायर झाल्यावर त्यांनी त्यांचा वाचनाचा छंद जोपासला होता.

" सक्षम अरे बघ ना अर्णवी अजून का नाही आली ? असाच दररोज उशीर झाला तर घर कसं चालणार ? " भक्तीताई तणतणल्या.

" आई येईल ती. काम वाढल आहे तिचं." सक्षम ने चॅनेल बदलत आईला सांगितले.

" अरे काम असतात, मान्य आहे. पण इतका उशीर चांगला नव्हे. आधीच उशीरा येते. आल्यावर पुन्हा ते लॅपटॉपचा डब्बा घेउन बसते. तिला समजतं नाही का ? लग्न झाल्यावर जबाबदाऱ्या बदलतात. वाढतात." भक्तीताई म्हणल्या.

" आई अग एकदम कशा काय अपेक्षा करते तिच्याकडून ? स्वयंपाक करायला काकू येतात ना. वरकामाला मावशी बाई आहेत ना ! मग ? " तो काहीसा वैतागून बोलला.

" पण म्हणून काय उशिरा यायचं का ? हे असच,ं चालु राहिलं तर तुमचा संसार कसा होणार ? बहरणार कसा ? फुलणार कसा ? " त्यांनी विचारलं.

" आई होईल सगळं व्यवस्थित. आताशी कुठं लग्नाला वर्ष झालं आहे. दोघांना कामाचा लोड जास्त आहे. कधी कधी नाईट शिफ्ट पण असते. जरा समजुन घे ना." त्याने शेवटचं उत्तर दिलं. पुन्हा लक्ष टीव्ही मध्ये घातलं.

" हो. लग्नाला आता सव्वा वर्ष होऊन गेलं आहे.बरं ! " भक्ती ताई म्हणल्या. सक्षमच्या कपाळाला आठ्या पडल्या.

" माझ्या कडे असं बघू नको. मी इतके महिने समजुनच घेत आले ना. बघतेय ना. अर्णवीला जबाबदाऱ्या समजत नाहीत. कामाला बायक्या लावल्या की झालं. पैसै दिलं की काम मोकळं. स्वतः कधी काही करायचं नसतं. संसार थाटला म्हणजे तो सांभाळावा पण लागतो. आता पर्यंत तुम्ही दोनाचे तीन होण्याचा विचार करायला हवा. पण दोघं म्हणजे चंद्र सूर्य आहात. तुमच्या दोघांना तुमचा असा वेळच नसतो." भक्तीताई बडबड करत होत्या.

त्यांच्या बडबड करण्यावर सक्षमने काहीही प्रतिक्रिया दिली नाही. शेवटी भक्तीताई गप्प बसल्या. सक्षम आणि अर्णवी यांचं लग्न अगदीं कांदे पोहेच्या कार्यक्रम करून झालं होतं. दोघं ही आय टी मध्ये नोकरी करत होते. अर्णवी सध्या एका मोठ्या प्रोजेक्टमध्ये काम करत होती.

त्यामुळे त्यांच्या टीमवर कामाचा लोड होता. त्यांना हे प्रोजेक्ट मिळवायचं होत. त्यामुळे सगळी टीम जोमाने कामाला लागली होती. लग्नाच्या वेळी तिने सक्षमला तिच्या नोकरीची, कामाची पद्धत सांगितली होती. त्याने तिला तिच्या कामात घरातून सपोर्ट मिळेल याची शाश्वती देखील दिली होती.

सुरुवातीला तर सगळ सुरळीत चालु होत. जसं जसं काम वाढलं तशा तिच्या जबाबदाऱ्या देखील वाढल्या. त्यामुळे तिला घरकाम आणि नोकरी करणं जमतं नव्हत. त्या दोघांनी घरकामाला मदतनीस ठेवल्या होत्या. ज्यामुळे आईं बाबांना कामाचा ताण येणार नाही. ते दोघं मिळून त्यांचा पगार देखील देत होते.

पण भक्तीताईंना ते पटत नव्हत. लग्नाला वर्ष व्हायला लागलं तशी त्यांची कुरकुर चालु झाली. अर्णवी घरी लक्ष देत नाही. नीट संसार करत नाही. स्वतःच्या गृह कर्तव्य बद्दल टाळाटाळ करते. घराला कमी आणि तिच्या कामाला जास्त वेळ देते. तिला करिअर करण जास्त महत्वाचं वाटतं. मुलाचा विचार करत नाही.

रात्री दहा वाजता अर्णवी घरी आली. तो पर्यंत सगळ्यांची जेवण झाली होती. भक्ती आणि संकेतराव झोपले होते. सक्षम तिची वाट बघत होता. तो पर्यंत त्याने त्याचं काम करण्यात मन रमावल. अर्णवी खूप दमलेली. जेवण नको म्हणाली. सक्षमने बळे बळे तिला जेवायला सांगितल. तिचं जेवण होई पर्यंत तिच्या सोबत बसला होता.

दुसऱ्या दिवशी तिला उठायला उशीर झाला. रात्री जेवण झाल्यावर तिने नंतरची आवराआवर केली नव्हती. त्यामूळे घरातलं वातावरण जरा गरम होत.सक्षम तर लवकर निघून गेला होता. भक्तीताईंचा राग रंग पाहून अर्णवी नाश्ता न करताच कंपनीत गेली होती.

काल भक्ती तिला बोलू शकल्या नव्हत्या, म्हणून आज त्यांनी कालची कसर भरून काढली होती. अर्णवीला प्रचंड वाईट वाटलं होतं. लग्ना आधी सगळं काही मान्य होत, मग आता काय झालं ? लग्न झाल्यावर जबाबदाऱ्या बदलतात, मान्य आहे, पण आधीच्या जबाबदाऱ्या तर नाही ना सोडून देता येत ? सासू बाईंना कस समजावायचं ?

गेले दोन महिने झाले असतील सासूबाई आडून आडून बाळाचा विचार करा अस सुचवत आहेत.
पण इतक्या लवकर बाळाचा विचार करणं जमणार नाही. अर्णवी एका नविन सिक्युरिटी सिस्टीम डेव्हलप करण्याच्या प्रोजेक्टमध्ये गुंतली होती. हे प्रोजेक्ट जर सक्सेस फुल झालं तर तिला प्रमोशन मिळणार होत.परदेशांत जाण्याचा चान्स मिळाला असता. तिच्या इतके दिवसांच्या मेहनतीचं चीज झालं असत. तिचं स्वप्न पुर्ण झालं असतं. त्यासाठी ती स्वतःला झोकून देऊन काम करत होती.

तिच्या कामामुळे तिला परदेशात जाता येणारं हे तिच्या साठी लाख मोलाचं होत. त्यात सासूबाई तिला ती घर सांभाळण्यात कशी चुकते ? तिला बायकोच्या जबाबदाऱ्या समजतं नाही ?

क्रमशः

टीम सुप्रिया