जलदलेखन स्पर्धा - नोव्हेंबर - 2025
( सत्य कथा )
दुरून डोंगर साजरे - भाग - 1
तेजश्री… घरात सगळे तिला प्रेमाने तेजू म्हणतात. आई-बाबांची लाडकी, हुशार, शांत, घरकामात हुशार, आणि प्रेमळ आणि गुणी अशी ही तेजू, वडिलांचं आर्थिक उत्पन्न मध्यम पण समाधानी असलेलं असं हे कुटूंब,कष्ट, प्रेम आणि माणुसकी- एवढेच त्यांचे भांडवल.
तेजू एम.कॉम. पर्यंत शिकली. हातात चांगल्या नोकरीच्या संधी होत्या, पण आईला असणाऱ्या दम्याच्या त्रासामुळे तिची त्यबेत सतत बिघडत असे, यामुळे तेजू घराजवळचं शिकवणी घेऊ लागली.
आई— आरती, एकदम साधी पण समजूतदार. तिच्या मनात एकच स्वप्न “माझ्या सोन्यासारख्या मुलीला चांगलं घर, चांगले सासर मिळावे.”लग्नासाठी मुलाचीं स्थळ येत नव्हती, पण काही जमतं नव्हतं, कधी पत्रिका जुळत नसे, तर कधी मुला- मुलीची पसंती होतं नसे.
एके दिवशी सिद्धार्थ नावाच्या मुलाचं स्थळ आलं,उंच, स्मार्ट, परदेशातून MBA केलेला. वडील मोठे बिल्डर, आई सोशल वर्कर, घरात ऐशोआरामाची रेलचेल, सगळं छान होतं.
आई - आरतीला खूप आनंद झाला, असं घर मिळालं तर तेजुचं नशिबच उजळेल!" ती देवाला हे स्थळ जमून येऊ देत म्हणून साकडं घालू लागली.
पत्रिका जुळल्यावर घरच्यांनी कांदा- पोहेचा कार्यक्रम ठरवला. ठरल्याप्रमाणे मुलाकडची मंडळी तेजुला बघायला आले.
सिद्धार्थचा स्वभावही पहिल्या भेटीत नम्र वाटला.“तेजू खूप शांत आहे. मला आवडली.” – त्याने इतकंच म्हटलं, पण त्या वाक्याने तेजूच्या घरातल्या सगळ्यांनी मोकळा श्वास टाकला.
संभाषणं, भेटीगाठी झाल्या. तिथल्या लोकांचा मोठेपणा, घरातील भव्यता, गाड्या, दागिने… सर्व काही तेजूला आणि तिच्या आई-वडिलांना नवीनचं होतं.
आरती कोपऱ्याला तेजुला घेऊन म्हणाली,“तेजू, हे घर म्हणजे परीकथेचं घर आहे ग. रोज असं कुणाला मिळतं?”नशीब काढलंसं पोरी...
तेजुच्या मनात मात्र थोडासा गोंधळ होता. एवढं श्रीमंत, एवढा बडेजाव… आणि ती साधी, सरळ… पण आईच्या आनंदासाठी ती खुश होती. बाबा पण आनंदी होते.
लग्न ठरलं.लग्नाची तयारी जोरात झाली. सासरच्यांच्या मागण्या फार नव्हत्या, पण सूक्ष्म इशारे मात्र बरेच होते.
“आमच्या घरी स्टँडर्ड आहे... पाहुण्यांना व्यवस्था उत्कृष्ट हवी.”
“मुलाच्या मित्रांमध्ये कोट्यधीश लोक आहेत, त्यांना काही कमी वाटायला नको.”
“लग्नाची जागा ग्रँड असली पाहिजे…”
तेजूच्या वडिलांनी आरती आणि तेजुला विचारलं, “ इतका खर्च… जमेल का?”
तेजूने म्हंटल.“बाबा, तुम्ही काळजी करू नका. आईने तिच्या शिवणकामाचे आणि मी माझ्या शिकवणीमधले असे मिळून आम्ही दोघींनी बऱ्यापैकी सेविंग केली आहे.
तेजूने म्हंटल.“बाबा, तुम्ही काळजी करू नका. आईने तिच्या शिवणकामाचे आणि मी माझ्या शिकवणीमधले असे मिळून आम्ही दोघींनी बऱ्यापैकी सेविंग केली आहे.
पण सत्य हे होतं की तो खर्च त्यांना जाचक होत होता.
तरीही लग्न भव्य पद्धतीने झालं. सगळीकडे लाईटिंग, संगीत बँड, फिल्मी स्टाइल एंट्री… सासरचे लोक सतत आपल्या श्रीमंतीची जाहिरात करत होते.
तेजूला पहिल्या दिवसापासून लक्षात आलं— हे लोक मोठेपणा दाखवण्यात जास्त, आणि मनाच्या बाबतीत खूपच कोरडे आहेत.
पण नव्या आयुष्याच्या सुरुवातीला ती दुर्लक्ष करत होती.
( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - हे मोठेपणा असणारे सासर तेजुला किती त्रासदायक होते. )
सौ. सोनल गुरुनाथ शिंदे
देवरुख.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा