आनंद ही काही शोधण्याची गरज नाही म्हणून ती निर्माण करा.

Create Your Happyness Own.
आनंद ही काही शोधण्याची गरज नाहीये, म्हणून ती निर्माण करा.

चारू अद्वयला घेऊन दवाखान्यात आली होती. अद्वयचे बाराव्या तेराव्या वर्षी हर्नियाचे ऑपरेशन झाले होते. रेग्यूलर चेकअप साठी चारू त्याला हॉस्पिटलला घेऊन आलो होती. दवाखान्यातून बाहेर पडताना चारुला तिची लहानपणीची घट्ट मैत्रीण गौरी भेटली. दोघीही बऱ्याच वर्षानंतर एकमेकींना भेटल्या होत्या. किती बोलू आणि किती नको असे झाले होते दोघींना. पण अद्वयची तब्येत जरा नाजूक असल्याने चारूने खूप आग्रह करून गौरीला घरी आणले.

चारूचा बंगला खूपच मोठा आणि प्रशस्त होता. अंगणात दोन गाड्या, चारही बाजूंनी लावलेली झाडे, प्रशस्त घर आणि हाताखाली तितकेच नोकर चाकर. चारूचा नवरा निनाद एक मोठी कंपनी चालवत होता. त्यामुळे कोणत्याच गोष्टीची कमतरता नव्हती. पण का कोणास ठाऊक चारूच्या चेहऱ्यावर पाहिजे तो आनंद गौरीला दिसत नव्हता. तिला वाटले अद्वयची तब्येत ठीक नसल्यामुळे चारू उदास आहे पण तिचा लहानपणीचा स्वभाव बघता चारू एकदम बिनधास्त आणि आनंदात जगणारी मुलगी होती. कोणत्याच गोष्टीचा फारसा विचार न करता स्वतःचा आनंद निर्माण करणारा स्वभाव होता तिचा.

बऱ्याच गप्पा मारून गौरी निघाली आणि आता तुम्ही दोघांनी माझ्या घरी यायचं अस शंभर वेळा सांगून गेली. नुकतीच गौरीच्या नवऱ्याची शाशंकची बदलू बारामतीत झाल्यामुळे दोघींची भेट झाली होती. चारूने ही यायचे कबूल केले होते.

गौरी हसतच आणि आनंदात घरात आलेली पाहून शशांक आनंदी झाला. अग गौरी कुठे होतीस इतका वेळ ?? बरं फोन पण घरीच विसरून गेलीस. मला काळजी वाटत होती तुझी म्हणत शशांकने गौरीला मिठीत घेतले. ऑफिसमध्ये जाण्याआधी आणि घरी आल्या बरोबर शशांक गौरीला मिठीत घेऊन कपाळावर ओठ टेकत होता. आजवर त्यांच्या हा शिरस्ता कधीच मोडला नव्हता. त्यामुळेच शशांक घरी आल्याबरोबर गौरी दिसली नाही तर बेचैन होत होता. आज पाच मिनिट झालेला उशीर त्याला जरा चुटका देऊन गेला होता. गौरी ही सगळं काही विसरून त्याच्या कुशीत शांत होत होती. आल्यावर तिची आणि चारूची भेट तिने शशांकला सांगितली आणि त्यालाही ते ऐकून खूपच बरे वाटले.

गौरी आणि चारूचे ठरल्याप्रमाणे आज गौरीच्या घरी भेटायचे ठरले होते. त्यामुळेच शशांक लवकर जाऊन लवकर घरी येणार होता. पण त्याला यायला उशीर होणार असल्याचे त्याने गौरीला कळवले होते. त्याप्रमाणे चारू, निनाद आणि अद्वय आले. चारूच्या अपेक्षेप्रमाणे गौरीचे घर अजिबातच नव्हते. गौरी आणि शशांक त्यांच्या छोट्या परी सोबत दोन खोल्यांच्या एका घरात रहात होते. त्यांचे घर स्वतःचे होते पण चारूच्या घराच्या मानाने खूपच छोटे. तिच्या चेहऱ्यावरील हावभाव गौरीच्या लगेच लक्षात आले पण ती काही बोलली नाही. शशांक येईपर्यंत गौरीने सगळ्यांना चहा पाणी दिले. तेवढ्यात शशांक आला आणि येताना अद्वय आणि परीसाठी खूप खाऊ घेऊन आला तसेच निनाद आणि चारूसाठी स्वीट आणले होते त्याने. गौरीने चारूची फेवरेट पाव भाजी बनवली होती. शशांकने निनाद आणि चारूला ग्रीट केले आणि किचनमद्ये गौरीला भेटायला गेला. लगेच त्याने गौरीला मिठीत घेतले आणि कपाळावर ओठ टेकले. घर छोटे असल्याने तसेच चारू समोरच्या बेडवर बसली असल्याने ते चारूच्या दृष्टीस पडले. त्यावेळी दोघांच्याही चेहऱ्यावरचा ओसंडून वाहणारा आनंद चारुंच्या नजरेतून सुटला नाही.

बराच वेळ गप्पा मारून झाल्यावर सगळेच गेले. गौरीने आणि शशांकने अगदी मनापासून केलेला पाहुणचार निनाद आणि अद्वयला खूपच आवडला. त्यात अद्वय आणि परीची खूपच छान मैत्री झाल्याने अद्वयला तिला सोडून जाण्याची इच्छाच होईना.
गौरीच्या घरातील आनंदी वातावरण बघून चारुला आश्चर्य वाटले. कारण तिला वाटत होते, माझ्या घराच्या मानाने कोणत्याच सुख सोई उपलब्ध नसताना ही हे कुटुंब इतकं आनंदी कसे राहू शकते ?? मनाचा गोंधळ चेहऱ्यावर आणू न देता कसेबसे हसत ती तिथून गेली. पण गौरीला तिच्या मनातला गोंधळ चांगलाच लक्षात आला होता.

गौरी दुपारच्या वेळी चारूला घेऊन एका ठिकाणी आली. एक मोठी दहा बारा खोल्यांची प्रशस्त जागा होती ती आणि समोरच्या अंगणात खूप मुले खेळत होती. गौरी तिथे गेली की सगळी मुले तिच्याकडे धावत येऊन तिला बिलगली. कोणी गोष्ट सांग म्हणून् हट्ट करू लागले, कोणी खाऊ काय आणला विचारू लागले तर कोणी आज काय शिकवणार हे विचारू लागले. चारूला तर हा सगळा काय प्रकार आहे तेच समजेना. गौरीने मुलांना एक खेळ शिकवला आणि चारूकडे आली. चारू आताही गोंधळून तिच्याकडे पहात होती. गौरीने तिला सांगितले की हा अनाथआश्रम आहे आणि इथे मी समाजसेवेचे काम करते. महिन्यातून एकदा या मुलांसाठी शक्य तो खाऊ, शालेय साहित्य, कपडे आणते आणि जमेल तसे शिकवते. चारू या मुलांना त्यांचे आई वडील कोण, हे कोणत्या कुळातले, वंशाचे काहीच माहीत नाही. इथे असलेली बाकी मुले हाच त्यांचा परिवार. तरीही त्यांच्या चेहऱ्यावर खूप आनंद आहे. मला माहित आहे माझे छोटे घर, त्यात फारशा नसलेल्या सुविधा हे बघून तुला प्रश्न पडला की आम्ही इतके आनंदी कसे ?? हो ना ?? कारण मी आणि शशांक एकमेकांवर खूप मनापासून प्रेम करतो. कोणत्याच सुखसोईवर आमचे सुख अवलंबून नाही. अगदी फर्शिवर जरी झोपण्याची वेळ आली तरी मी आनंदाने झोपेन. फक्त शशांक बरोबर हवा, मग त्याच्या कुशीत डोके ठेवून झोपले की फरशी पण काही मॅटर करत नाही. तुमच्यातही ते प्रेम नक्कीच असेल. पण कुठेतरी हरवले आहे. तेच शोध आणि पूर्वीसारखी आनंदी रहा. आनंदी राहण्यासाठी कोणत्याच गोष्टींची, व्यक्तींची गरज लागत नाही तो मनात असावा लागतो आणि असायला हवा. आज माझ्या सोबत शशांक ऐवजी दुसरा कोणताही जोडीदार असता तरीही त्याच्यासोबत किंवा त्याच्याशिवाय मी आनंदी राहण्याचा प्रयत्न केला असता. कारण आनंद ही काही शोधण्याची गोष्ट नाही तर निर्माण करण्याची गरज आहे. म्हणूनच तो निर्माण कर चारू.