Login

कुछ ना कहो ( भाग ८) नवी कोरी रंगतदार कथा

कुछ ना कहो


कुछ ना कहो ( भाग ८)

(ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. कुठल्याही घटनेशी याचा संबंध नाही. तसे आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा.)


दवाखान्यातून तिलोत्तमाला तिचे आईवडील परस्पर त्यांच्या घरी घेऊन गेले. आव्वा आप्पा एकदा जाऊन नातीला बघून आले. पण नंतर त्यांना तिला बघता आले नाही. त्यांनी पद्मनाभ बरोबर दोन तीन वेळा निरोप दिला. " बाळाचे नामकरण झाल्याखेरीज वेस ओलांडून जायचे नसते. घरी या, पाळण्यात घालू मग तुम्ही जावा गावाकडे. " पण तिलोत्तमा आणि तिच्या आईवडीलांनी अजिबात ऐकले नाही. ते तसेच नवव्या दिवशी बाळाला घेऊन गावी निघून गेले. इकडे आव्वानी, डिंक लाडू, बाळंतिणीला लागणारे काढे वगैरे करून ठेवलेली सगळी तयारी तशीच राहिली. सरस्वतीला तर एकदाही बाळाला पाहता आले नाही. डोहाळजेवणाच्या दिवशी इतके ऐकले म्हणून तिने घरी आल्यावर बाळाला पाहून यायचा विचार केला होता. पण… … . सगळेच राहिले.

तिलोत्तमा गावाकडे गेल्यावर पंधरा दिवस तिकडची काहीच खबरबात नव्हती. पंधरा दिवसांनी तिलोत्तमाने पद्मनाभच्या ऑफिसमध्ये निरोप पाठविला. " बाळी आठवण काढते आहे. तिला भेटायला या. " आठवडाभर पद्मनाभ कामात व्यस्त होता. नंतर तो सुट्टीच्या दिवशी तिलोत्तमा आणि बाळाला भेटायला गेला. त्याचे स्वागत तरी चांगले झाले. पण तिकडे गेल्यापासून तिलोत्तमाचे एकच चालू होते, " रजा टाका जास्त दिवस आणि इकडेच रहायला या. " पद्मनाभने "पुढच्या वेळी बघू. " इतकेच बोलून विषय सोडून दिला. परत पंधरा दिवसांनी पद्मनाभ बाळाला बघायला गेला तेव्हा तिलोत्तमाचे आईवडीलांनी नवीनच विषय काढला. म्हणाले, " जावईबापूं आपली एवढी शेती आहे, मालमत्ता आहे. आम्हाला ही हे बघायला आता होत नाही. तुम्ही नोकरीचा राजिनामा द्या आणि सरळ इकडे. हे सगळे सांभाळा म्हणजे आमच्या डोक्यावरचा भार हलका होईल. पद्मनाभ अवाक झाला. " म्हणजे मी घरजावई होऊ म्हणता? मग हे आधीच सांगायचे होते म्हणजे मी हे लग्नच केले नसते. "पद्मनाभ म्हणाला. त्याचा रागरंग पाहून तिलोत्तमा म्हणाली " तस नाही. आईआप्पांचे पण वय झालयं ना आता. त्यांना आता जमत नाही हे सगळे बघायला. म्हणून ते म्हणत होते. जाऊ दे ते. एवढे काही नाही त्याचे. आपल्या बाळीचे नाव आपण भाग्यलक्ष्मी ठेवायचे ना. "
" नाही, तिचे नाव वीणाच ठेवायचे घरीपण आणि कागदोपत्री पण. मला दुसरे कुठलेही नाव ठेवायचे नाही. " पद्मनाभने वीणा म्हंटलेले समजल्यासारखे वीणा ने हुंकार दिला. पद्मनाभला खूप आनंद झाला.
शेवटी हो नाही करत पाळण्यातले नाव भाग्यलक्ष्मी ठेवायचे ठरले. आणि कागदोपत्री व वीणाच म्हणायचे ठरले. बारशाच्या विषय झाला, कोणाला बोलवायचे, काय करायचे सगळे बोलणे झाले पण तिलोत्तमा किंवा तिच्या आईवडीलांनी पद्मनाभच्या आव्वाआप्पाचे, सरस्वतीचे नावही घेतले नाही. पद्मनाभच्या हे लक्षात आले. तो तिलोत्तमाशी आव्वा आप्पा विषयी बोलायला गेला की ती शिताफीने विषय बदलत होती. तिकडून परत येताना प्रवासात पद्मनाभ फक्त या एकाच गोष्टींचा विचार करत होता. आणि राहून राहून तो " आपल्या लेकराला वीणा देव काय? आपली लेक आपल्यापासून दुखावणारे तर नाही ना? असे त्याला सारखे वाटत होते.

गावाकडून वीणा आणि तिलोत्तमाला बघून आल्यानंतर पद्मनाभचा एक आठवडाभर खूप गडबडीत गेला. त्याला बॅंकेत खूप काम होते. नंतरच्या रविवारी त्याने रामला घरी बोलवून घेतले होते. राम आल्यावर त्याने आव्वा आणि आप्पांना पण स्वतः समोर बसवले व बोलू लागला, " आता मागच्या आठवड्यात मी भेटायला गेलो तेव्हा तिलोत्तमा आणि तिच्या आईवडीलांनी माझ्यसमोर एक प्रस्ताव ठेवला. त्यांची अशी इच्छा आहे की मी माझ्या नोकरीचा राजिनामा देऊन माझे घरदार सोडून त्यांच्याकडे जाऊन रहावे व त्यांच्या इस्टेटीची देखभाल करावी, थोडक्यात घरजावई व्हावे. "
हे ऐकल्यावर आप्पांच्या चेहरा पडला. आव्वाने विचारले " तू काय ठरविले आहेस? "
" त्यांनी विचारल्यावर मी उत्तर देऊन आलोय. मी त्यांना म्हणालो " हे आधीच सांगितले असते तर मी हे लग्नच केले नसते. " हे ऐकून ते गप्प बसले. तिलोत्तमाने आई आप्पांना होत नाही असे म्हणून सावरून घेतले पण मला माहिती आहे तिच्यापण डोक्यात हेच असणार. आत्ता ती गप्प बसली आहे पण हा विषय ते परत परत काढणार आणि आपल्याला त्रास देणार. म्हणूनच विचार विनिमय करायला मी सगळ्यांना एकत्र बोलावून आहे. " पद्मनाभ म्हणाला.
" अच्छा असा डाव होता तर " आप्पा म्हणाले. " तरी मी विचार करत होतो स्वतःच्याच डोहाळजेवणाच्या कार्यक्रमात तिने असे का केले असेल? ती भागव्वा बाई बोलली म्हणून कळलं नाहीतर सगळ्यांनी आम्हालाच दोषी ठरवले असते. असे करून तुला आमच्यापासून तोडायचे आणि घरजावई करून घ्यायचे. "

" पण मी बरा होईन त्यांचा घरजावई? मी माझ्या आई आप्पांना सोडून कुठेही जाणार नाही. " पद्मनाभ भावविवश झाला. आव्वाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. स्वतःला सावरून पद्मनाभ म्हणाला " राम काय करायचे? काय उत्तर द्यायचे त्यांना? "
" मला वाटत आपण एखाद्या वकिलाची सल्ला घेऊन. शिवाय यापुढे तू तिकडे एकटा जाऊ नको. बरोबर एखाद्या मित्राला घेऊन जा. तसे घाबरण्याचे कारण नाही. पण या कावेबाज माणसांचे काही सांगता येत नाही. तिकडे गेल्यावर त्यांनी तुला इकडे येऊच दिले नाही तर? काळजी नका करू पण सगळ्या शक्यता गृहीत धरून मगच पाऊल उचलायला हवे. काही व्हायला नको ह्याची सगळी काळजी घेऊ. आपण सावध राहू म्हणजे पुढचा त्रास होणार नाही. " राम म्हणाला.
" नाही घाबरत नाही, पण राम तू त्याची साथ सोडू नको. त्याला जप. त्याच्या बरोबर रहा. तिला आम्ही दोघे नको आहोत तिच्या संसारात असे एकंदरीत दिसते आहे. तसे असेल तर आम्ही आपल्या गावच्या चाळीत जाऊन राहतो. तुमचे तुम्ही इकडे सुखात रहा. आमचे काय आम्ही दोघे म्हातारी म्हातारी राहू तिकडे. " आप्पा म्हणाले. अव्वांना वाईट वाटले, त्यानी डोळ्याला पदर लावला. " आव्वा नको रडूस, नको काळजी करू. मी तुम्हांला सोडून नाही रहाणार. मला तरी कसे राहावेल तुम्हांला सोडून? " पद्मनाभ आव्वाजवळ जाऊन बसत म्हणाला.

ठरल्याप्रमाणे राम आणि पद्मनाभ वकिलाला भेटले. त्यांना घडलेल्या सर्व घटना सांगितल्या. त्यामागचा त्यांना लक्षात आलेला त्या लोकांचा उद्देश ही सांगितला. त्यांचा सल्ला घेतला. एक पोलीस इन्स्पेक्टर रामच्या ओळखीचे निघाले. त्यांच्याशी देखील बोलून घेतले. पुढच्या वेळी जाताना पद्मनाभ बरोबर दोन मित्रांनी तिकडे जायचे ठरले.

क्रमशः

सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे
मिरज

0

🎭 Series Post

View all