Login

कुछ ना कहो ( भाग ९) नवी कोरी रंगतदार कथा

कुछ ना कहो


कुछ ना कहो ( भाग ९)

(ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. कुठल्याही घटनेशी याचा संबंध नाही. तसे आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा.)


आता वीणा एक वर्षाची झाली. तिचे उद्योग तिचे हसणे, तिचे खेळणे सगळ्यांचे मन वेधून घेत होते. पण पद्मनाभच्या आव्वा आप्पांना तिच्याशी खेळायचा मनाई होती. ती भरभर रांगत त्यांच्याकडे गेली तरी तिला तिलोत्तमा उचलून नेई. ह्याचा त्यांना फार त्रास होईल. म्हणून आणि आव्वा ची कामे करून तब्येत बिघडायला लागली म्हणून आव्वा आणि आप्पांना गावाकडे जायचा निर्णय घ्यावा लागला. ते गावाकडे जायची तयारी करू लागल्यावर तिलोत्तमाचा जीव भांड्यात पडला पण पद्मनाभचा जीव अगदी कासावीस होत होता. वीणा लहान होती म्हणून तो गप्प होता. नाहीतर त्याने तिलोत्तमाला तिच्या आई आप्पांच्या बरोबर घरातून बाहेर काढले असते.

आठवडा भरातच आव्वा आप्पा गावाकडे जायला निघाले. त्यांना पोचवायला पद्मनाभ आणि राम जाणार होते. ते बाहेर पडताना पद्मनाभला खूप वाईट वाटत होते. त्याच्या डोळ्यात पाणी होते. तिकडे जाऊन राम आणि पद्मनाभनी सगळी साफसफाई केली. आव्वा होतीच पण तिला एकटीला जमले नसते. आप्पांनी विहरीवरून घागरीने पाणी आणले. तिकडे चोवीस तास पाणी नव्हते. सगळे पाणी भरावे लागत असे. आवराआवर झाल्यावर पद्मनाभने एक कावडवाला शोधून काढला व त्याला पाणी भरायला लाऊन टाकले. आप्पांचेही वय अशी अवघड कामे करण्याचे नव्हते. एक दिवस राहून दोघे परत आले.
परत आल्यावर तिलोत्तमा अगदी खुशीत येऊन पद्मनाभशी बोलत होती. तिला आणि तिच्या आईवडिलांना कसला आनंद झाला हे पद्मनाभने ओळखले होते. " तुम्ही जे वागला आहात माझ्या आई आप्पांशी त्याची फळे तुम्हाला ही मिळतील. " तो मनात म्हणाला.

आठवडाभर सगळे ठीकठाक चालले होते. तिलोत्तमा आवडीने स्वयंपाक करत होती. घरातील कामेही करत होती. आणि वीणाला सुद्धा बराचवेळ तिला बघावे लागत होते. तिला अजिबातच आराम मिळतो नव्हता त्यामुळे तिची चिडचिड सुरू झाली. "आता तिला धडा शिकवायचा " पद्मनाभने ठरवले.
तो तिच्या कष्टाने केलेल्या स्वयंपाकात दोष काढत होता. त्याला नावे ठेवत होता. " अव्वाच्या हाताची चव तुझ्या स्वयंपाकाला नाही. " असे म्हटले की ती आणखीन चिडत होती. पण खरचं आव्वा अतिशय चविष्ट स्वयंपाक करायच्या हे तिच्या आई वडीलांना ही माहिती होते. पंधरा दिवसांनी त्यांनी एक कामवाली बाई गावाकडून बोलावली. पद्मनाभ चिडला. " तू स्वतः स्वयंपाक कर. वरच्या कामाला बाई लाव. " त्याने तिलोत्तमाला सांगितले. ती बाई गावाकडून आलेली त्यामुळे त्यांच्या माहितीतील होती. ती सगळे त्यांच्या म्हणण्यानुसार करत असे.. एक दिवस पद्मनाभने त्या बाईच्या स्वयंपाकाचे वारेमाप कौतुक केले. तिलोत्तमाला ते फारसे रूचले नाही. ती बाई कामसू होती. तिच्या हाताला चवही होती. पद्मनाभ रोज तिचे कौतुक करी. आणि तिला उद्या काय बनव ते सांगत असे. असे होत त्या बाईला कामाला लागून महिना होत आला होता. एकदिवस तिने सांजाच्या पोळ्या केल्या. अतिशय सुंदर मऊ लुसलुशीत पोळी त्यावर साजुक तूप. त्यादिवशी रामही पद्मनाभकडे दोघे पूर्ण वेळ त्या पोळीचे कौतुक करत होते. आणि इकडे तिलोत्तमाचा रागाचा पारा चढत होता. ते पाहून पद्मनाभने त्याचा फायदा उचलला. त्या रात्री तो मुद्दामच त्या बाईशी बराचवेळ बोलत थांबला. बोलणे फक्त तिची जनरल घरगुती चौकशी एवढेच होते. पण पद्मनाभ पुढे आठवडाभर तिच्याशी असाच बोलत टाइमपास करत होता. त्याचा परिणाम व्हायचा तोच झाला. पुढच्या आठ दिवसात तिलोत्तमानी त्या बाईला कामावरून काढून टाकले. आता फक्त वर कामाला बाई ठेवली आणि स्वयंपाक ती स्वतः करू लागली. पद्मनाभ मनातल्या मनात हसत होता. तिलोत्तमाला आता तिच्या आई आणि आप्पा चे करणेही जड जात होते. त्यांना सारखी काॅफी प्यायची सवय होती आणि ती ही हातात लागे. कारण त्यानी कधीच स्वतःच्या हाताने काही केले नाही. घरात नोकर माणसे होती. ती दर तासाला त्यांच्या हातात गरम काॅफी आणून देत असत. एक दिवस तिलोत्तमाचे आणि तिच्या आईचे त्यावरून भांडण झाले. तिलोत्तमा आईला म्हणाली," अग, दिवसभर मरमर काम करते मी. एखाद्यावेळी तरी स्वतः काॅफी करून घेत जा. मी नाही तुला सारखी सारखी आयती काॅफी देणार. " मग तिलोत्तमाच्या आईचा ही पारा चढला आणि भांडण झाले. तिलोत्तमा चक्कर येऊन पडल. तिला दवाखान्यात न्यावे लागले. पद्मनाभने तिला दवाखान्यात नेले व औषधोपचार करून घरी आणले. घरी आल्यावर तिला चार विश्रांती घ्यायला हवी असे सांगितले. त्यामुळे सगळे काम तिच्या आव्वावर पडले. ते पाहून तिच्या आप्पांनी त्यांच्या घरी परत जायचे ठरवले. पद्मनाभने त्यांना खूप सांगितले, " तिलोत्तमाला एकटीला सगळे जमणार नाही. तुम्ही इथेच रहा. " पण ते ऐकायला तयार नाहीत. शेवटी पूर्णवेळ कामाला बाई ठेवायचे ठरले. पद्मनाभला तिलोत्तमावर जराही विश्वास नव्हता. ती एकटी वीणाला सांभाळू शकणार नाही हे त्याला माहिती होते. म्हणून त्याने बाई ठेवायला हो म्हंटले. पण वीणाच्या बाबतीत कोणताही हलगर्जीपणा चालणार नाही हे कबूल करून घेतले. " तुझे पूर्ण लक्ष वीणाकडे पाहिजे. नुसते लोळत बसायचे नाही. तिच्याकडे लक्ष द्यायचे" असे बजावून सांगितले. वीणाची आई असल्यामुळे तिचे वीणाकडे लक्ष नसायचे. ते पद्मनाभला आवडत नव्हते.

रोज कामावरून आल्यावर तो वीणाशी खेळण्यात वेळ घालवी. तिला घेऊन चक्कर मारून येई. वीणा आता त्याला चांगले ओळखत होती. आणि त्याच्या सवयीची झाली होती. रोज ती बाहेर घेऊन जाण्यासाठी पद्मनाभच्या मागे लागायची. कधीकधी पद्मनाभ तिला रामच्या घरी घेऊन जायचा. त्या सगळ्यांची पण ती खूप लाडकी झाली होती. रामच्या मुलाची यशची आणि वीणाची चांगली गट्टी जमली होती.

दर आठवड्याला तो एक दिवस गावाकडे जाऊन राही. आव्वा आप्पांची सगळी खबरबात घेऊन येई. घरातले काय संपले आहे, काय आणायचे आहे त्याची औषधे आहेत की संपली आहेत. सगळे जातीने लक्ष घालून बघत असे. आता आव्वा देखील थकत चालली होती. थोडे काम केले कि ती जरावेळ बसून राहात होती. पद्मनाभने लगेचच चौकशी करायला सुरुवात केली. अव्वाच्या मदतीला एक बाई ठेवावी असे त्याला वाटत होते. त्यांच्याकडे आधी कामाला असलेली आक्का तिची चौकशी तो करत होता. तिच्या झोपडीला कुलूप होते. ती आणि तिची धाकटी मुलगी रूद्रा तिथे रहात होत्या पण त्या आता कुठे आहेत कुणालाच काही माहिती नव्हते. कोणी बाई अव्वाच्या मदतीला मिळाली नाही म्हणून पुढच्या आठवड्यात रजा काढून यायचे ठरवूनच तो परत घरी गेला.

क्रमशः

सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे
मिरज
0

🎭 Series Post

View all